एखाद्या दिवशी असं व्हावं की सकाळी साडे पाचला जाग यावी आणि चक्क "परत झोपावं" असं वाटूच नये. आता उठलोच आहोत तर सरळ तय्यार होऊन सहा पर्यंत तडक घराबाहेरच पडावं. बघता बघता आपण ५-६ किलोमीटर पळत जावं. रस्त्यावर नेहमी बसमधून बघतो त्या मोठ्ठ्या गार्डन मध्ये त्या दिवशी चक्क पायी जावं. पायातले शूज काढून, तिथल्या हिरवळीवर चालावं. मधोमध आल्यावर उगाच विचार यावा की हे असं इथे आपण सूर्यनमस्कार घालायला सुरु केले तर? आणि दुसऱ्याच क्षणी आपण ते सुरुही करावं! सगळं झालं की "काय सही सुरुये हे सगळं!" असं मनाशीच म्हणत आकाशाकडं बघत तिथंच हिरवळीवर पाठ टेकावी.
त्याचं दिवशी पुढं असं व्हावं की जेवायला म्हणून बाहेर पडावं आणि ६-७ तास भटकतच राहावं. थोडसं नदीवर जावं. थोडं नदीखालून जावं. थोडं नदीच्या बाजूला जाऊन बसावं. तिथल्या बोटी बघत आपल्या देशातल्या गोष्टी अठावाव्यात. पोटभर वारा खाल्ल्यावर सरळ उठावं आणि मग आपल्या मागं चक्क एक फ्ली मार्केटच सापडावं! तिथ खूप सारे कपडे, टोप्या, मफलर, ज्यूलरी, आरसे, चित्रं, फोटो, फ्रेम्स, रंगीबेरंगी कागदाच्या गोष्टी, खाण्याची ठेले, ज्यूस वाले, आपल्या हाताने गोष्टी बानावणारे, हातानी केलेल्या गोष्टी विकणारे, हात बघून भविष्य सांगणारे, हात धरून भविष्य सांगणारे, डोळ्यात बघून भविष्य सांगणारे आणि भविष्य वगैरे विसरून भटकंती करणारे असे खूप सारे लोक असावेत.
छोट्या छोट्या गल्ली बोळामधून फिरताना छोटे छोटे कॅफे सापडावेत. लाल पिवळ्या रंगांच्या भिंती असलेले. खडूने लिहून ठेवलेला मेनूचा फलक दारात लावलेले. तीन किंवा चारच टेबल असलेले. अशाच एका गल्लीतून बाहेर पडता पडता एक वेगळाच कॅफे सापडावा. बिस्कीट अशा विचित्र नावाचा! त्यांच्याकडं खूप साऱ्या रंगांच्या बुधल्या, खूप साऱ्या आकाराचे ब्रश, बरेचसे स्पंज, एचबीच्या लाल पेन्सिली, हे असं सगळं भिंतीलगत लावून ठेवलेलं असावं आणि तुम्हाला कॉफी पीत पीत काही रंगवावं असं वाटलं तर, तिथलं हवं ते हवं तेव्हा उचलायची संधी सुद्धा असावी!
तुम्ही एखादा पांढरा फटक सिरामिकचा मग उचलावा, दोन ब्रश, चार रंग घ्यावे आणि त्यावर मनसोक्त रंगीबेरंगी फर्राटे मारावेत. आजूबाजूची लहान मुलं सुद्धा आपल्यापेक्षा चांगलं बनवतायत याचं तुम्हाला हसूही यावं. मग त्यांच्याकडंच अमुक रंग देतोस का तमुक ब्रश कसा वापरायचा वगैरेचं ज्ञान घ्यावं. कॅफे बंद होईस्तोवर हे सगळं असंच चालू ठेवावं. आणि मग बाहेर पडल्यावर घरी जाताना सोबतीला हलकासा पाऊस यावा. मग पावसात हात हलवत जायला काय मजा म्हणून कोपऱ्यावर एक आईसक्रीमचं दुकानही आपसूक मिळावं.
हा तृप्त आत्मा घरी आल्यावर झोपणार इतक्यात कुंगफू पांडा बघायचा प्लान बनावा. There are no accidents आणि There is no secret ingredients बघत बघत रात्री बारा वाजता दिवस संपवा.
How about that?
I just had such a day yesterday!
No comments:
Post a Comment