Saturday, June 16, 2018

तुम्ही सुद्धा?

आपल्यावर जेव्हा ब्रिटीश लोकं राज्य करत होते, तेव्हाची गोष्ट आहे. भारत म्हणजे आपल्या हक्काचं कुरण आहे आणि इथं आपल्याला चरायलाच पाठवलंय म्हणून अपचन होईपर्यंत खात बसायला आलेली एक मोठीच्या मोठी ब्रिटीश लोकांची जमात होती. एक न दोन. केवढे किस्से आहेत असे.

इकडं लोकं भुकेनं मरतायत पण तिकडं युद्धात कमी पडू नये म्हणून अन्न धान्य पडून कुजलं तरी चालेल तरीपण साठवायला घेऊन जाणारे महाभाग इथे होऊन गेले. भारतातली समाजव्यवस्था, धर्मव्यवस्था किंवा बेसिक मध्ये भाषाच घ्या न? हे सगळं इतकं spectacularly न कळून सुद्धा, आम्हीच धडे शिकवणार सगळ्यांना हे त्यांचं ब्रीद. आपलंच घोडं दामटा पुढं! यांनी मनाला येईल तशा रेघोट्या मारून धार्मिक फरक गडद करून टाकले. कारण यांच्याकडे म्हणे इतके धर्म होतेच कुठे? इतक्या भाषा कळल्या नाहीत म्हणून यांच्या एका महाभागानं ठरवलं की भारतातल्या भाषांत काही दम नाही! आणि मग दिलं इंग्रजी ठासून. आणि एवढं पुरेसं वाटलं नाही म्हणून यावर पाठ्यपुस्तकं बनवून जे जे संस्कृतीमधलं मुळापासूनच उपटून टाकता येईल ते उपटून टाकलं. राहिलेलं गढूळ केलं.

आता मेख अशी आहे, की हे सगळं एकतर खूप अतिरंजित वर्णन वाटू शकेल किंवा खूपच प्रक्षोभक वाटू शकेल. तुम्ही कोण आहात आणि कुठल्या काळात आहात यावर अवलंबून आहे ते. तुम्ही जर त्या काळात, इंग्लंड मधले रहिवाशी असाल, तर तुम्हाला हे सगळं खूप वेगळ्याच प्रकारे माहिती असेल. म्हणजे कदाचित तुम्ही ऐकलं असेल की, अमक्या जनरल ने किंवा तमक्या वॉईसरॉयने, इंग्लंडच्या राणीसाठी, किंवा एम्पायर वरचा सूर्य मावळू नये म्हणून मोलाचं योगदान दिलं. म्हणजे बघा की, आपापल्या परगण्यातून, त्यातल्या त्यात काय मदत होईल ते शोधून काढून, ती मदत कायम करत राहणं म्हणजे किती देशभक्तीचं. त्यात त्या परगण्यातले लोक अडाणी, मागासलेले, काही प्रांतातले लोक तर थेट जीवावर उठणारे असतील तर आणखीनच जिकिरीचं काम. घरदार सोडून इतक्या लांब राहून आपल्या देशासाठी काहीतरी करणं म्हणजे किती महान! हे लोक जेव्हा मायदेशी परत येतील, रिटायर होऊन म्हणा, किंवा सुट्टीला म्हणा, तुम्ही तर पट्टी काढून गिफ्ट घेऊन द्याल त्यांना? नाही? देशभक्तीच की ती शेवटी! जनरल डायरला नाही तुम्ही बक्षीस दिलं जालियानवाला नंतर?

तुम्ही भारतामधले असाल आणि तेही आत्ताच्या काळातले तर तुम्हाला हे सगळं outrageous वाटेल. किंवा तातडीनं tweet करावंसं पण वाटेल. किंवा कॉंग्रेसनं याबद्दल कसं काहीच केलं नाही किंवा demonetisation कसं यालाच आळा बसवायला होतं असं काहीतरी त्वेषानं whatsapp वर टाकालही. पण माझा मुद्दाच वेगळा आहे.

त्या त्या काळात इंग्लंड मध्येही असे लोक होते की जे म्हणाले, की अरे महापुरुषांनो, हे जे काय चालवलाय हे वाईट आहे, हे चूक आहे. आपण तिकडे राज्य करतो म्हणजे आपल्याला माणुसकी सोडून वागायचा अधिकार नाही! माणसाला माणसासारखं वागवायला काय हरकत आहे? किती ज्यूस काढणार म्हणजे? पण झालं असं की हे म्हणणाऱ्या लोकांना फारसा भाव नाही मिळाला. ते प्रगतीच्या आडे येणारे लोक म्हणून ओळखले गेले. ब्रिटनच्या सूर्याला ग्रहण लावणारे म्हणून यांना बाकी लोकांनी मापात काढलं. आपल्या राज्याच्या विरुद्ध कसं काय बोलू शकता? ऐतं बसून खायला मिळतंय हे सैन्यामूळं, त्यांच्यावर तुम्ही टीका कशी करणार? वगैरे वगैरे.

हे जरा उगाचच सेम नाही वाटतंय?

पण आता काळ बदलला की! आता आपण सगळेच खूप पुढे आलोय. शिकलोय. शहाणे झालोय. नाही काय? प्रस्थापितांना प्रश्न विचारणं म्हणजे देशद्रोह नाही किंबहुना आपल्याच हिताचं आहे हे माहिती आहे आपल्याला. आपण त्यांना in-check नाही ठेवणार तर आणखी कोण ठेवणार? सरकारनं चोख वागायचं यामध्ये आपला सहभाग हो ला हो म्हणणं आणि नाही म्हणणाऱ्याला ठो करणं हा नक्कीच नसतो हे कळलंय की आपल्याला. आता ब्रिटिश नाहीत, पण मग कॉंग्रेस असो, भाजपा असो, किंवा आणि कोणीही निवडून आलेले असो, सत्तेत असलेल्याची भक्ती करणं म्हणजे देशभक्ती असं आपल्याला सत्ताधारी सांगू शकत नाहीत. नाही का?

आता हे उपहासात्मक वाटलं असेल तर काळजी करण्यासारखं आहे. कारण जुना काळ होता, कशाचा कशाला पत्ता नसायचा. इंग्रजांच खपून गेलं. सत्ताधारी असतील किंवा सत्ताधाऱ्यांचे भक्त असतील. दशकं उलटली सगळ्यांना सगळं कळायला. साहेब होता म्हणून इतकं तरी झालं नाहीतर आपलं काही खरं नव्हतं असं म्हणणारे कमी थोडीच होते? तुमचा आमचा काळ निराळा आहे. पुढची पिढी आपल्याहून खूप शहाणी आहे, आणि माहिती तंत्रज्ञानाचा वरदहस्त त्यांच्यावर आहे. त्यांना खूप वेळ नाही लागणार समजायला. लवकरच आपली पोरं किंवा नातवंडं आपल्याला विचारतील, की seriously? तुम्ही सुद्धा?


असो, प्रसून जोशीनं सत्यमेव जयतेसाठी लिहिलेलं गाणं ऐकतोय आत्ता योगायोगाने.

मुझे खुद को भी है टटोलना
कहीं है कमी तो है बोलना
कहीं दाग हैं तो छुपायें क्यों
हम सच से नज़रें हटायें क्यों


PS: most of the references to the British empire and what they did to India are influenced by the book Inglorious Empire.

No comments: