Tuesday, July 10, 2018

भटकंती

माझ्या पहिल्या विमान प्रवासाच्या आता खूपच अंधुक आठवणी आहेत. तब्बल १४ वर्ष होत आली त्याला. सेऊलला एका क्लायंट कडं जायचं होतं. आधी जो माणूस जाणार असं ठरलेलं, त्याचं लग्न ठरलं. तर मग त्याच्या ऐवजी म्हणून माझी वर्दी लागलेली. पुढे माझ्या कोरियन कलिगना मला हे अडतीसशे वेळा सांगावं लागलेलं की अहो आमच्याकडं २५ म्हणजे खूप लवकर नसतं. म्हणजे एखाद वेळेस, याला खूप उशिरा म्हणू शकतील पण लवकर नक्कीच नाही. Cultural Differences हो आणि काय? पण त्यांना कायमच याचं अप्रूप वाटायचं आणि हा विषय नाही म्हणाल तरी दर दोन चार दिवसांनी निघायचाच. एक परदेशातून इसम आला आपल्याकडे म्हणून जरा माझं कौतुक होईल अशी अपेक्षा होती माझी. झालं पण थोडं कौतुक, पण त्या पेक्षा त्या दुसऱ्या पोराचं कसं काय इतक्यात लग्नाचं ठरलं याचं कुतूहल जास्ती होतं. असो म्हणजे. कुणाचं कशात, तर कुणाचं कशात. तसं बघितलं तर, दुसऱ्या परदेशवारीला पण आधीचा गडी शेवटच्या क्षणी गळाला म्हणून मला धरलेला. त्यावेळी सुनामी हे कारण होतं. आणि माझं अजून ठरायचं होतं की सूनामीला घाबरायच असतं की नसतं. अशा या सगळ्यात पहिल्या दोन तीन छोट्या छोट्या वाऱ्या होऊन गेल्या.

सगळच नव्यानं कळत होतं. जे काही होतंय ते असच असावं दरवेळी हा समज. विमानप्रवासाबद्दल काही मतं नव्हती, काही अपेक्षाही नव्हत्या. सगळ्याचच कुतूहल आणि कौतुक. आता इतक्या वर्षांनी आणि इतक्या adventurous trips नंतर त्या पहिल्या ट्रीप मधली मजा कळतीये. तर झालेलं असं. म्हणजे अंधुकच आठवतंय पण तरीही झालेलं हे असं. शेवटच्या घटकेला माणूस बदलल्याने, माझा विसा बीसा करायचं जरा लेटच सुरू झालेलं. तिकडे क्लायंटने बोंब मारायला सुरू केलेली. तिथे आधी असलेला माणूस त्यांना पसंत नव्हता. प्लस बदली येणारा जो होता तो आता येणार नव्हता होता. तेही क्लायंटच्या मते जेन्युअन नसलेल्या कारणामुळे. त्यामुळे "निवांत करूया", हा पर्याय आमच्याकडे नव्हताच. पटापट कागदपत्रं द्या, विसा काढा, आणि पळा. हे असणार होतं. यातली घाई मला फारशी तेव्हा माहिती नव्हती. माझे खूप बेसिक मध्ये वांदे सुरू होते. म्हणजे पासपोर्टवर एक ECNR (का ECR) चा शिक्का असतो. तो माझ्या पासपोर्ट वर नव्हता म्हणे. त्याचं काहीतरी सुरू होतं. Emigration Check Not Required याच्या पुढं विसाच्या फॉर्मवर yes किंवा no यातलं एक लिहायचं होतं. आता हे काय लिहायचं हे समजून घ्यायला मला का कोणास ठाऊक पण य वर्षं लागली. पासपोर्ट वर शिक्का आहे, म्हणून check ची गरज नाही म्हणून no लिहायचं की शिक्का आहे म्हणून yes लिहायचं? या प्रश्नानं मला का कोणास ठाऊक ३ - ४ वेळातरी छळलं. मीही हा प्रश्न खूप विचार करून दरवेळी रिकामा सोडायचो. किंवा कधी yes, कधी no असं लिहायचो. तेव्हा मुंबई एअरपोर्टला पण एक फॉर्म भरून घ्यायचे तुम्ही उडायच्या आधी. त्यातही हा प्रश्न असायचाच. म्हणजे झालं की आता, माणूस आला न आत दारापर्यंत. अजूनही का छळतायत असं वाटायचं. असो. पहिल्या वेळी तर या प्रश्नानं उगाचच धांदल उडालेली. त्या ECNR असल्या का नसल्या मुळे मला चार ज्यादा कागदपत्रं जोडावी लागणार होती. त्यात आणि मध्येच शोधाशोध पण सुरू होती की कोरियाला जाताना ECNR चा संबंध असतो का नाही. म्हणजे प्रश्नच invalid होतो का बघायचा उगाच केविलवाणा प्रयत्न.

शेवटी ते सगळं केलं. Travel desk नावाचा एक गूढ विभाग होता कंपनी मध्ये की ज्याच्याशी आधी कधीही संपर्क आलेला नव्हता. त्यांच्याबरोबर हा सगळा रोमान्स सुरू होता. त्यांनी या प्रोसेस मध्ये आधीच तिकीटही काढलेलं. जायची तारीख वगैरे सगळं आलेलं. लोकांचे प्रवास विषयक, कोरिया विषयक खास सल्ले देणं ही सुरू झालेलं. तेव्हा ऑलिंपिक मध्ये कुत्र्यांचं मांस खायला दिल्याबद्दल खूप हल्ला झालेला. त्यासाठी आणखी चार सल्ले मिळालेले. चुकून नॉर्थ कोरिया कडे कसं जाऊ नको, हेही सांगून झालेलं. एकानं तर सांगितलेलं की चपात्या फ्रीज करून घेऊन जा सगळ्या दिवसाच्या. ते ऐकून अमाच्या मातोश्रींनीही हिरीरीने तब्बल पन्नास वगैरे चपात्या फ्रीज करून दिलेल्या. पण मुळात मुद्दा असा होता की, माझ्याकडं अजून व्हिसा आलेलाच नव्हता. आणि तो नसणं ही गोष्ट पॅनिक व्हायची आहे, हे मला माहितीही नव्हतं. वीकेंड आलेला का कुठला सण बिण होता तेव्हा. मुंबईचा एजंट होता आणि त्यानं माझा पासपोर्ट पाठवलेलाच नव्हता. पाठवूच शकणार नाही असं होतं कदाचित. मला आता समान घेऊन मुंबईला जाताना मध्येच उतरून एजंट हुडकून, पासपोर्ट घेऊन पुढं एअरपोर्टला जायचं होतं. आणि या सगळ्यामध्ये कुठलीच गोष्ट कोणालाही odd वाटलीच नव्हती! म्हणजे तसं आत्तातरी आठवत नाही आहे. आज विचार करतो, तर वाटतं की च्यामारी, काय थ्रील होतं. मीस केलं आपण. जरा कल्पना असती तर आणखी मजा आली असती! असो पण आता काय. तीही काय कमी मजा नव्हती.

बीना पासपोर्टची अमाची स्वारी केके ट्रॅव्हल च्या मदतीने शेवटी कोथरुड डेपोवरून निघाली. पुढे मध्येच अंधेरीला उतरलो. एजंटच्या कोपाच्यातल्या हापिसात जाऊन पासपोर्ट घेतला. तोपर्यंत त्या केके च्या ड्रायव्हर ला थांबायला थोडीच वेळ? त्याने बाकीच्या लोकांना एअरपोर्ट वर पोचवलं, आणि परत मला घ्यायला त्याच ठिकाणी परत आला. हे असं सगळं प्लॅनिंग runtime ला करून सहिसलामत मी जाऊ शकेन यावर किंचितही शंका न वाटल्याबद्दल मला माझंच कौतुक वाटतं काहीवेळा. म्हणजे आत्ताची गोष्ट वेगळी आहे, पण एक पंधरा वर्षापूर्वी, तेही पहिल्याच वेळी, नक्कीच सवय नव्हती की अशी! तर हा केके चां ड्रायव्हर आला ठरल्याप्रमाणे. मुंबई तेव्हा फारशी माहिती नसली तरी मीही पोचलो ठरलेल्या ठिकाणी. पासपोर्ट घेऊन तेही. या बाबाने मला पोचवला बरोबर आणि फर्स्ट टाईम आपण मुंबई एअरपोर्ट च्या आतमध्ये शिरलो. पुढचा स्टॉप आता साऊथ कोरिया. प्रवासात पुढे खूप गमजा झाल्या. कधी बच्चन दिसला, कधी हृतिक. कधी एअरपोर्ट वर आल्यावर तिकीटच चुकीचं आहे असं कळलं. तर कित्येकदा शेवटचा म्हणून बोर्ड केलं.

हे सगळं आता आज अठवण्याचं कारण काय? आता तीही एक मजा आहेच की. उगाच थोडीच आठवतं काही? आजचा दिनक्रम मजेशीर होता. दिवसातली शेवटची मीटिंग साडे चारला, तिथून मग पळत पासपोर्ट घ्यायला. शेंगन व्हिसा नव्हता का संपला मागच्या आठवड्यात? आपण लगेच नव्यासाठी ऍप्लिकेशन पण टाकलेलं की. तेही व्हिसा संपायच्या २४ तास अगोदर. म्हणजे इतक्या लवकर ऍप्लिकेशन तयार केलं याचं तेव्हा कौतुक पण जास्ती होतं. आता तो पासपोर्ट रेडी आहे याचं वेळेत ईमेल येणं अपेक्षित होतं. ते आलंच नाही हे सोडा. पण vfs च्या नावानं ओरडणं सोडून, आपण आधीच चातुर्यानं वेळेत ते हुडकून काढलं या प्राईड मध्ये शुक्रवारी पासपोर्ट घ्यायचं राहिलं. आता आज सोमवार. आजच तर उडायचा दिवस. मीटिंग संपवून, पीक टायमाला पळत जाऊन, पासपोर्ट घेऊन, तेही व्हिसा मिळालाच असेल असा विश्वास उराशी बाळगून लगेच तिथूनच पुढे हिथरो! आणि हे सगळं करून फ्लाईट उडायचा आधी हे आपल्या फेसबुक अॅप नसलेल्या फोन वरून फेसबुक वर पोस्ट पण! :)

१४ वर्ष झाली आज असं हवेत प्रवास करून. ३१ ऑगस्ट २००४ ला लागलेला पहिला शिक्का आणि त्याचा हा पहिला किस्सा. आता आजचा हा कितवा काय माहिती, पण फार काही बदललंय असं वाटत नाही. म्हणजे, शेवटी आपल्याला फ्लाईट मिळतेच. यामध्ये फार काही बदललंय असं वाटत नाही.

No comments: