Showing posts with label राजकारण. Show all posts
Showing posts with label राजकारण. Show all posts

Tuesday, February 26, 2019

मोदी की राहुल?

२०१९ च्या निवडणुकांमध्ये भाजपाला मत द्या किंवा काँग्रेसला मत द्या किंवा मोदीनी अमुक केलं म्हणून त्यांनाच निवडून द्या किंवा म्हणून त्यांना निवडून देऊ नका किंवा राहुल गांधी ने असं केलं म्हणून निवडून द्या किंवा निवडून देऊ नका वगैरे चर्चा जरा हास्यास्पद नाहीत काय?

एकतर तुम्ही आम्ही घंटा पंतप्रधान पदासाठी मत देत नाही. आपली संसदीय लोकशाही आहे असं आपण नागरिक शास्त्रात शिकलोय. याचा अर्थ, आपण आपापल्या भागातून कार्यरत असलेल्या लोकांपैकी MP ना निवडायचं आणि मग त्यांनी पुढे जाऊन पंतप्रधान निवडायचा हे असं आहे आपलं. अमेरिकेत प्रेसीडेंशिअल डेमोक्रसी आहे. तिथे थेट ट्रम्प किंवा हिलरीला मतं देतात लोक. कधी कधी मला वाटतं, तिथल्या पक्षांसाठी कार्यरत लोक किंवा कंपन्या किंवा त्यांचे छक्के पंजे यांचं आपण अंधानुकरण केल्यामुळे हे असं चुकीचं गणित सोडवत बसलो असू आपण.

आपण ज्या भागातून मत देणार आहोत, तिथं कोणत्या MP ने किती काम केलंय याची माहिती आपल्याला असणं अनिवार्य आहे. प्रत्येक MP कडे आपल्या भागात वापरण्यासाठी आपापला फंड असतो. त्याची बाकडी बांधली की रस्ते, हे तपासणे हे आपलं काम. तुमचा माझा प्रभाग वेगळा म्हणून माझं मत माझ्या भागात काम केलेल्याला हे प्रमाण असावं. कोण माणूस आहे, त्याने राजकारणात आणि राजकारणाबाहेर काय काम केलंय, या सगळ्याची माहिती आपण शोधली पाहिजे. मतदाता म्हणून आपण इतके जागरूक आहोत आणि ही माहिती आधार म्हणून वापरतोय हे मोठ्या संख्येने दिसून आलं तर त्या त्या पक्षाचे लोकही आपापले उमेदवार निवडताना याची काळजी घेतील. नाही का? एक म्होरक्या भारी घ्या. बाकी जाऊ दे न व... यामुळं आपल्याला अभिप्रेत अशी आपल्या देशाची प्रगती होणार नाही हे नक्की.

या पार्श्वभूमीवर थेट भाजपा की काँग्रेस? मोदी की राहुल? असा विचार करणं आणि विचारत राहणं म्हणजे स्थानिक पातळीवर झालेलं किंवा न झालेलं काम याच्याकडे दुर्लक्ष करणं किंवा करायला लावणं. आपण तर करूच नये पण राजकीय पक्षांनी किंवा न्युज वाल्यांनी किंवा त्यांच्या IT सेल नी पण कायम याच प्रश्नांचा भडिमार करणे म्हणजे तद्दन फालतूपणा आहे आणि जाणीवपुर्वक केलेली दिशाभूल आहे. नाही का?

मग पार्टीचा काहीच संबंध नाही? असं असायचंही कारण नाही. पण जेवढं महत्व आत्ता पार्टीना दिलं जातंय ते चिंताजनक आहे. आपला देश आहे त्याहून अधिकाधिक प्रगत व्हायचा असेल तर संसदेमध्ये निवडून जाणारे सगळेच्या सगळे ५४३ लोक उत्तमच असले पाहिजेत. असाच हट्ट आपण सर्वानी धरला पाहिजे. यामुळं मत मागणाऱ्यांचं आणि मत देणाऱ्यांचं काम वाढणार आहे. पण वाढू दे की! आता इतकी मोठी लोकशाही चालवायची असेल तर हे अपेक्षित नाही का? उगाच सोशल मीडिया वर कुस्तीचे फड लावून थोडीच होणारे? Information is for the seekers.

त्या त्या पार्टीचा आपापला agenda असतोच. ज्याच्याशी आपण सहमत किंवा असहमत असू शकतो. पण तो एक मुद्दा असावा आपल्यासाठी. एकमेव नव्हे. उदाहरणार्थ २०१४ च्या निवडणुकांच्या वेळी मी राजकारणामध्ये गुन्हेगारी या विषयाचा अभ्यास करत होतो आणि म्हणून माझ्यासाठी no criminal case हा खूप महत्वाचा मुद्दा होता. ५४३ पैकी कोणीही गुन्हेगार नसावा ही मला तेव्हा मूलभूत मागणी वाटली. दुर्दैवाने या एकाच निकषाच्या आधारावर माझ्या प्रभागात माझ्यासाठी केवळ १ किंवा २ च उमेदवार उरले. यावेळी तसं नसावं अशी अशा आहे. या बरोबर बाकीचेही बरेच निकष लावता यावेत हीही अपेक्षा आहे. आपल्यात या निकषांवर चर्चा व्हावी.

एकूणच आपल्यातल्या चर्चांचे सूर बदलले पाहिजेत. राष्ट्र आहे, घटना आहे, कायदे आहेत. पण ते अमलात आणणारे लोक नसतील तर ते घेऊन काय करणार?

Monday, February 18, 2019

भाड्याची मशाल

Being part of the governance आणि being a political commentator या दोन गोष्टी खूप वेगळ्या आहेत. नुसतंच political commentator असणं याचा petriotic असण्याशी सबंध नाही. Governance मध्ये भाग घेणं म्हणजे निवडणुकाच लढवणं असं नाही. थोडक्यात फरक असा की एकात तोंडची वाफ दवडायची आणि एकात बुड हलवायचं. या दोनही गोष्टी करायची विधी आणि प्रमाण हललं की केविलवाणी अवस्था होते. मग पुलवामानंतर कोणी काय केलंच पाहिजे हे शीरा फुगवून सांगायला जमलं तरी घराबाहेरच्या रस्त्यावरचा खड्डा पलिकेबरोबर पाठपुरावा करून बुजवयचं जमत नाही. चमचाभर बुड हलवलं म्हणून खंडीभर वाफ दवडायला मुभा नाही. खंडीभर वाफ दवडली हा बुड हलवायला पर्याय नाही. म्हणून वाफ दवडायचीच नाही का? अमक्याचा तमाका करतो तेव्हा कसं चालतं? असे पोटतिडीकीने प्रश्न पडले तर खालील दोन पैकी एक उत्तर स्वतः स्वतःसाठी निवडून दुसऱ्यांचा त्रास वाचवायचा. पहिलं उत्तर म्हणजे रावसाहेबनी म्हणल्याप्रमाणे मूळव्याध होतंय का नाही बघ! हे. आणि दुसरं म्हणजे शांतेच कार्टं मध्ये होतं तसं, आपला पगार किती? आपण बोलतो किती? हे. दुसऱ्यानं घाण केली की आपण करायलाच हवी या मूलभूत अवस्थेतून आपण सुमारे पन्नास साठ हजार वर्षांपूर्वी गच्छंति केलेली आहे. ही एकदाची मनाशी गाठ बांधून घ्यावी.


त्याही पुढे, आत्ताच काही शे वर्षांपूर्वी आपण एकमेकावर एककल्ली मतांचा भडिमार करून, निरुत्तर करून, आपापला मुद्दा सिद्ध करायची सवय पण सोडलेली आहे. आता प्रयोग करून, अभ्यास करून, तज्ञ बनून आपापला मुद्दा अधिकारवाणीने मांडायचा, इथवर आपण पोचलेलो आहोत. या मधल्या पायऱ्या वगळून आपला मुद्दा किंवा भाड्याचा मुद्दा, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पणे मांडणं आणि कळत नकळत तोच प्रमाण माना असा हट्ट धरणं हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. कोणावरही, कशावरही, कसंही, कुठंही, काहीही बोलणं याचाही अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी संबंध नाही. आपली बोलण्याची कुवत हे बोलण्याच्या लायकीचं प्रमाण नाही. स्थलकालपरत्वे एकाच गोष्टीच्या वेगवेगळ्या छटा असू शकतात. त्या असू द्याव्यात. मतभेद असू शकतात. तेही असू द्यावेत. मतं चूक असू शकतात. आपण शिकलेल्या गोष्टीही चूक असू शकतात. आणि चूक सुधारता येऊ शकते. याची आपल्याला जाण असणं आणि याचा दुसऱ्याला वाव असू देणं याला प्रगती म्हणतात. हे न करू देण्याला हट्ट म्हणतात. आणि त्या हट्टाची परिणीती अधोगतीत होते.


आपण आपापल्या क्षेत्रात अभ्यास करावा. मेहनत घ्यावी. खूप प्रगती करावी. आपण आपल्या क्षेत्रातले छोटे मोठे प्रश्न सोडवावेत. हे कौतुकास्पद आहे. हे नियमित आणि प्रामाणिकपणे केलं की आजूबाजूचा प्रत्येक जण सुद्धा त्याच्या त्याच्या क्षेत्रात मेहनत घेतोय यावर विश्वास बसेल. आपल्या आजूबाजूला बरेच प्रश्न आहेत असं वाटलं तरी त्यावर तोडगा काढायला ती ती तज्ञ मंडळी कार्यरत आहेत, हे मान्य करणंही सोपं जाईल.


माकडाचा माणूस झाला. तेव्हा त्याच्याकडे पर्याय नव्हता. पण आता आपलं परत माकड होऊ न द्यायचा पर्याय आपल्याकडे आहे. आपल्यासारखा दुसरा दिसत नाही, वागत नाही, बोलत नाही, किंवा विचार करत नाही हे काळजीचं किंवा पिसाळण्याचं कारण नाही. या विविध गोष्टी आपल्यात सामील करून घेत आणि आपण या विविध गोष्टींमध्ये सामील होत आपण इथवर पोचलेले आहोत. हे चालू द्यावे. या विविधतेला आपला वैरी न करता, आपली ओळख होऊ द्यावी.


तेव्हा मोजकं बोलू आणि शांतीत क्रांती करू. दर दोन आठवड्यांनी वेगवेगळ्या कारणांनी पेटून उठलो तर राख होऊन जाऊ. त्यापेक्षा ज्योत म्हणून तेवत राहण्याचा प्रयत्न करू. (आता मग ज्योतच का? मशाल का नाही? असं वाटलं तर लगेच मशाल बनून टाका. कोणाच्या अनुमतीची वाट बघू नका. पण मग दर दोन दिवसांनी वेगवेगळ्या कारणांनी भडकू पण नका. नाहीतर लोक भाड्याची मशाल म्हणतील. मग आम्ही पेटून उठायचंच नाही का? असा प्रश्न पडला तर पहिल्या परिच्छेदात याची संभाव्य उत्तरं दिलेली आहेत.)


तसंही अवघड प्रसंगी समजूतदार पणा जास्ती हवा. Let's be one less problem to worry about.

Saturday, June 16, 2018

तुम्ही सुद्धा?

आपल्यावर जेव्हा ब्रिटीश लोकं राज्य करत होते, तेव्हाची गोष्ट आहे. भारत म्हणजे आपल्या हक्काचं कुरण आहे आणि इथं आपल्याला चरायलाच पाठवलंय म्हणून अपचन होईपर्यंत खात बसायला आलेली एक मोठीच्या मोठी ब्रिटीश लोकांची जमात होती. एक न दोन. केवढे किस्से आहेत असे.

इकडं लोकं भुकेनं मरतायत पण तिकडं युद्धात कमी पडू नये म्हणून अन्न धान्य पडून कुजलं तरी चालेल तरीपण साठवायला घेऊन जाणारे महाभाग इथे होऊन गेले. भारतातली समाजव्यवस्था, धर्मव्यवस्था किंवा बेसिक मध्ये भाषाच घ्या न? हे सगळं इतकं spectacularly न कळून सुद्धा, आम्हीच धडे शिकवणार सगळ्यांना हे त्यांचं ब्रीद. आपलंच घोडं दामटा पुढं! यांनी मनाला येईल तशा रेघोट्या मारून धार्मिक फरक गडद करून टाकले. कारण यांच्याकडे म्हणे इतके धर्म होतेच कुठे? इतक्या भाषा कळल्या नाहीत म्हणून यांच्या एका महाभागानं ठरवलं की भारतातल्या भाषांत काही दम नाही! आणि मग दिलं इंग्रजी ठासून. आणि एवढं पुरेसं वाटलं नाही म्हणून यावर पाठ्यपुस्तकं बनवून जे जे संस्कृतीमधलं मुळापासूनच उपटून टाकता येईल ते उपटून टाकलं. राहिलेलं गढूळ केलं.

आता मेख अशी आहे, की हे सगळं एकतर खूप अतिरंजित वर्णन वाटू शकेल किंवा खूपच प्रक्षोभक वाटू शकेल. तुम्ही कोण आहात आणि कुठल्या काळात आहात यावर अवलंबून आहे ते. तुम्ही जर त्या काळात, इंग्लंड मधले रहिवाशी असाल, तर तुम्हाला हे सगळं खूप वेगळ्याच प्रकारे माहिती असेल. म्हणजे कदाचित तुम्ही ऐकलं असेल की, अमक्या जनरल ने किंवा तमक्या वॉईसरॉयने, इंग्लंडच्या राणीसाठी, किंवा एम्पायर वरचा सूर्य मावळू नये म्हणून मोलाचं योगदान दिलं. म्हणजे बघा की, आपापल्या परगण्यातून, त्यातल्या त्यात काय मदत होईल ते शोधून काढून, ती मदत कायम करत राहणं म्हणजे किती देशभक्तीचं. त्यात त्या परगण्यातले लोक अडाणी, मागासलेले, काही प्रांतातले लोक तर थेट जीवावर उठणारे असतील तर आणखीनच जिकिरीचं काम. घरदार सोडून इतक्या लांब राहून आपल्या देशासाठी काहीतरी करणं म्हणजे किती महान! हे लोक जेव्हा मायदेशी परत येतील, रिटायर होऊन म्हणा, किंवा सुट्टीला म्हणा, तुम्ही तर पट्टी काढून गिफ्ट घेऊन द्याल त्यांना? नाही? देशभक्तीच की ती शेवटी! जनरल डायरला नाही तुम्ही बक्षीस दिलं जालियानवाला नंतर?

तुम्ही भारतामधले असाल आणि तेही आत्ताच्या काळातले तर तुम्हाला हे सगळं outrageous वाटेल. किंवा तातडीनं tweet करावंसं पण वाटेल. किंवा कॉंग्रेसनं याबद्दल कसं काहीच केलं नाही किंवा demonetisation कसं यालाच आळा बसवायला होतं असं काहीतरी त्वेषानं whatsapp वर टाकालही. पण माझा मुद्दाच वेगळा आहे.

त्या त्या काळात इंग्लंड मध्येही असे लोक होते की जे म्हणाले, की अरे महापुरुषांनो, हे जे काय चालवलाय हे वाईट आहे, हे चूक आहे. आपण तिकडे राज्य करतो म्हणजे आपल्याला माणुसकी सोडून वागायचा अधिकार नाही! माणसाला माणसासारखं वागवायला काय हरकत आहे? किती ज्यूस काढणार म्हणजे? पण झालं असं की हे म्हणणाऱ्या लोकांना फारसा भाव नाही मिळाला. ते प्रगतीच्या आडे येणारे लोक म्हणून ओळखले गेले. ब्रिटनच्या सूर्याला ग्रहण लावणारे म्हणून यांना बाकी लोकांनी मापात काढलं. आपल्या राज्याच्या विरुद्ध कसं काय बोलू शकता? ऐतं बसून खायला मिळतंय हे सैन्यामूळं, त्यांच्यावर तुम्ही टीका कशी करणार? वगैरे वगैरे.

हे जरा उगाचच सेम नाही वाटतंय?

पण आता काळ बदलला की! आता आपण सगळेच खूप पुढे आलोय. शिकलोय. शहाणे झालोय. नाही काय? प्रस्थापितांना प्रश्न विचारणं म्हणजे देशद्रोह नाही किंबहुना आपल्याच हिताचं आहे हे माहिती आहे आपल्याला. आपण त्यांना in-check नाही ठेवणार तर आणखी कोण ठेवणार? सरकारनं चोख वागायचं यामध्ये आपला सहभाग हो ला हो म्हणणं आणि नाही म्हणणाऱ्याला ठो करणं हा नक्कीच नसतो हे कळलंय की आपल्याला. आता ब्रिटिश नाहीत, पण मग कॉंग्रेस असो, भाजपा असो, किंवा आणि कोणीही निवडून आलेले असो, सत्तेत असलेल्याची भक्ती करणं म्हणजे देशभक्ती असं आपल्याला सत्ताधारी सांगू शकत नाहीत. नाही का?

आता हे उपहासात्मक वाटलं असेल तर काळजी करण्यासारखं आहे. कारण जुना काळ होता, कशाचा कशाला पत्ता नसायचा. इंग्रजांच खपून गेलं. सत्ताधारी असतील किंवा सत्ताधाऱ्यांचे भक्त असतील. दशकं उलटली सगळ्यांना सगळं कळायला. साहेब होता म्हणून इतकं तरी झालं नाहीतर आपलं काही खरं नव्हतं असं म्हणणारे कमी थोडीच होते? तुमचा आमचा काळ निराळा आहे. पुढची पिढी आपल्याहून खूप शहाणी आहे, आणि माहिती तंत्रज्ञानाचा वरदहस्त त्यांच्यावर आहे. त्यांना खूप वेळ नाही लागणार समजायला. लवकरच आपली पोरं किंवा नातवंडं आपल्याला विचारतील, की seriously? तुम्ही सुद्धा?


असो, प्रसून जोशीनं सत्यमेव जयतेसाठी लिहिलेलं गाणं ऐकतोय आत्ता योगायोगाने.

मुझे खुद को भी है टटोलना
कहीं है कमी तो है बोलना
कहीं दाग हैं तो छुपायें क्यों
हम सच से नज़रें हटायें क्यों


PS: most of the references to the British empire and what they did to India are influenced by the book Inglorious Empire.