Sunday, December 27, 2009

Illusions

बऱ्याच दिवसानी पुण्यात आल्यावर जसं सगळं जुनंच नव्यानं दिसायला लागलं तसं बरेचसे जुने अदृश्य झालेले मित्र वगैरेपण परत भेटायला लागले. नव्यानं बघताना नकळत आपण "किती बदललायस तू?" किंवा "काहीच बदलला नाहीस यार तू!" या वाक्याना जागा शोधत असतो. मला वाटतं प्रत्येकजण ही वाक्यं तरी फेकत असेलच. नाहीतर आपणतरी समोरच्याला "ईतक्या दिवसानी आलायस असं वाटतच नाही" या वाक्याला जागा करून देतो. पण कमीत कमी या वाक्यांची देवाण घेवाण झाल्याशिवाय आठवणी सुरूच होत नाहीत. पुर्वीच्या थेअऱ्या, लोजीकंच काय तर अगदी ठरलेले पीजे पण परत निघतात. जुन्या विश्वात घेऊन जातात या गोष्टी. परत सगळं तस्सच्या तस्स वाटतं. बऱ्याचदा असं होतं की आपण बरच पुढं आलेलो असतो. पुर्वीचे आपलेच विचार आपल्याला भोळसट वगैरे वाटत असतात. आपल्याच विचारांची ही दशा तर दुसऱ्यांच्या थेऱ्यांची तर आणखीच वाईट अवस्था असते. पण परत तेच दुसरे तस्सेच परत भेटले आणि बोलू लागले तर थोडावेळ का होईना आपण परत तेच सगळं अनुभवतो.

-------------------------------------------
"I think, I still live in illusions. मला अजुनही असच आवडतं रहायला. ज्याला जे चांगलं करता येतं त्यानं ते करावं. मला हे असं रहायला जमतं, मी असा राहतो."

हा असाच एक अनुभव परत जुन्या कॉलेजच्या वयातल्या गप्पांची आठवण देऊन गेला. अशावेळी जनरली मी गप्पच बसतो तसा यावेळीही गप्प ऐकत होतो.

"एखादी गोष्ट, एखादा प्रसंग, वेगवेगळ्या लोकाना वेगवेगळा वाटतो. वेगवेगळ्या लोकांनाच कशाला? माझं मलाच एखादं वागणं कधी असह्य वाटतं तर कधी सुसह्य! म्हणजे असं काहीतरी रसायन नक्की आहे आपल्यामधेच एका असह्य गोष्टीला सुसह्य बनवणारं? असं आहे काहीतरी आपल्यामधे की ज्यानं आपल्याला, सहसा अशक्य वाटणाऱ्या गोष्टीपण सहज शक्य होतात. ‘मी अमुक अमुक केल्याशिवाय राहूच शकत नाही’ हे प्रकार मला खरच हस्यास्पद वाटतात. म्हणजे एखादी गोष्ट आवडणे, नावडणे, कोणावर राग, किंवा प्रेम वाटणं हा सगळा किती विचित्र आणि अशाश्वत प्रकार आहे! हे सगळं कंट्रोल करता आलं पाहिजे. म्हणजे जर का ही रसायनं कंट्रोल करता आली पाहिजेत. मग स्वतःच स्वतःचा डाव दिग्दर्शीत करायचा. विचार केला जरा तर फारसं अवघडही काय त्यात? ईतकी वर्षं स्वतःबरोबर राहील्यानंतर ईतकं तरी कळालं पाहीजे ना, की काय केल्यावर कधी कसं वाटतं! आणि तसं वाटवून घ्यायचं"

गडी बदलला नसला तरी सुधारीत अवृत्ती नक्कीच झालेला. मी आपलं मधेच पिल्लू सोडलं, "Are you talking about manipulating yourself? Is it a manipulation?"

समोरच्यानं प्रश्न वगैरे विचारले (फुटकळ किंवा असंबद्ध जरी असले तरी) अशावेळी बोलणाऱ्याला मस्त किक बसते. "असेलही. I don't care. Why should I care anyway? सत् चित् आनंद! गीतेमधे सांगीतलय भावा! आणि नसतंही सांगीतलं तरी काय!"

ईथं गीतेमधे exactly काय सांगीतलय याचा संदर्भ मला अजुनही आजीबात कळालेला नाही. पण कदाचीत त्यानंही चान्स मारून गीतेचं ज्ञान खपवलं असेल असं म्हणून मीही पुढे आपलं श्रोत्याचं काम सुरू ठेवलं.

"म्हणजे कसं स्वतःचच आयुष्य नाटक लिहील्यासारखं लिहायचं. आता बघ. सारखंच काय एकाच मूडमधे राहायचं? मधे मधे चिडायचा मूड आला, की पुढे घडणाऱ्या बऱ्याच गोष्टी तशाही माहीत असतात. त्यातली एखादी निवडायची आणि त्यावेळी सगळी चिडायची खाज भागवायची. बरं ना. आपण म्हणजे चिडायचं तेही आपल्यासाठी. परत कोणावर डुख धरून बसायचं कारण नाही. कधी चिडायचा मूड नसेल आणि कोणी अगाऊपणा करत असेल तर मग केवळ हे आपण Orchestrate केलेलं नाही म्हणून निघून जायचं. माझ्या कथेमधे हे नाही म्हणून कानाडोळा करायचा. म्हणजे तेही पथ्यावर. म्हणजे डोकंही वापरायचं पुढच्या घटनांचा बरोब्बर वापर करण्यासाठी. कधी खुश तर कधी ट्रान्समधे. जेव्हा जसे हवे तसे. तेही संपुर्ण कथेचा तोल सांभाळत. एकदम लाईव ड्रामा. रन टाईमला स्क्रिप्ट तयार करत जायची. What say? Logical?"

मीही हळू हळू मूडात येत होतो. "तुला अजुनही लोक येडा म्हणत असतील ना?"

"सोड रे. त्याना झेपत नाहीत या गोष्टी. असंख्य लोकानी केलेल्या अगणित गोष्टींच्या परणामानं ज्यांचं आयुष्य पुढं सरकतं त्याना माझ्या या थेअरीची मजा काय कळणार?"

"I know. So much." मी हसलो. पण त्याचा मुद्दा ध्यानात येत होता माझ्याही.

"कथा एवढीच नाही. त्याच्याही पुढं जाऊन लोकांच्या नजरेत आपण कसं दिसावं हेही आपण ठरवावं. म्हणजे जर आपण आपल्या कथेमधले कलाकार असलो तर त्या कलाकाराच्या कुठे कुठे आणि कशा कशा एंट्र्या व्हाव्या, आणि कशी ईंप्रेशन्स पडावीत, हे जसं आपण ठरवायचं तसं. आणि मग पुढचा खेळ रचायचा. शेवटी आपण तसेच दिसलो की नाही समोरच्याला हेही चाचपायचं. यातलं बरचसं आपण सर्वच करतो. पण एका ठरावीक मर्यादेपर्यंतच. म्हणजे. कसं वागावं, बोलावं हे तर आपण सगळेच काळजीपुर्वक ठरवतो. पण काही नियम पाळून. एका सुसुत्र कथेमधे याचा काय परीणाम होणार या विचारानं नाही. बऱ्याचदा हे करता करता बऱ्याच लोकांसमोर बरेच चेहरे तयार होतात. पण कधीतरी यानाही एकत्र आणून नव्या कथा जमवाव्या लागतात. सगळे आपल्याच मनात. पण real time. बाकीच्यांच्यासाठी काय ते माहित नाही पण आपल्यासाठी आपलीच कथा पुढे सरकवायची. कधी कुठे काही चुक झालीच तर ती कथेची मागणी होती म्हणून स्वतःलाच पान पुसायचं. कथा पुढे बदलायचा मार्ग आहेच."

मीही जरा गाडं पुढं सरकवलं. "तुला ऊगाच वाटतं हे वेगळं आहे. कदाचीत त्या त्या वयात होतं ठीक. पण डोळे ऊघडून बघ लेका. By and large सगळे असेच जगतात. थोडे फार मागे पुढे."

"Approach महत्वाचा भाऊ. मी औषध म्हणून खाल्लेला आंबा वेगळा (म्हणजे कोणी देत असतील तर...) आणि मला आंबा आवडतो म्हणून खाल्लेला वेगळा. काय? वेगळा की नाही? माझ्या दृष्टीनं मी माझी कथा पुढं सरकवतो की जी नंतर वेगळ्याच पातळीवर जाईल. तेव्हा मला त्या त्या अवस्थेतली कारणं या आजच्या मी तयार केलेल्या सीनमधे मिळतील. पण बाकीच्यांच्याकडं केवळ ‘ते असच असतं’ किंवा ‘सगळे असेच करतात’ असली सच्यातून काढल्यासारखी ऊत्तरं असतील."

"आणि तुझ्याकडं काय असेल?"

"Of course I will have a better answers. ‘Because I have scripted my life in this way.’ मला असं जगायला आवडतं. मी रंगवलेलं चित्र. जसं आहे तसं. पण माझं आहे. त्यातला मी, खरा मी आहे की नाही वगैरे असले पुस्तकी प्रश्न नाही पडत मला. कधी कधी चित्र रात्रीसारखं गडद काळं होतं. कधी कधी सकाळसारखं तेजस्वी. मला काळं झाल्याचंही आजकाल दुःख वाटेनासं झालय. तेजस्वी झाल्याचा अभिमानही वाटेनासा झालाय. पण माझं मी रंगवतोय यात मात्र मजा येतेय. समोर जे काही आहे, परीस्थीती असो, किंवा कोणी व्यक्ती असो. माझा मूड, माझं वागणं किंवा प्रतिक्रिया ठरवायचा हक्क मी आणि कोणाला का देऊ? त्यानं परीस्थीती बदलणार नाहीए. न का बदलेना! बरी किंवा वाईट. कशीही असो. बरी असेल तर तसाही प्रश्न नाही. वाईट असेल तर तसंही सामोरं जाताना जरा थोडंसं सोपं तरी जाईल. कारण जशी कशीपण असेल, माझ्या कथेसाठी ती फक्त एक परीस्थीती आहे, शेवट नाही. माझ्या थेअरीचं हे मुलभूत तत्व आहे. बाकीच्याना युगं लागतील हे शिकायला. अचानक गोष्टी माझ्याकडंही घडतात. अगदी काहीही न ठरवता मीही प्रतीक्रिया देतो. पण नंतर त्याही कथेमधे बरोबर गुंफतो. ऊगाच सगळंच ठरवून होतय असं वाटायला नको. तसं मला जमतही नाही आणि गरजही नाही कदाचीत.

तुम्ही पेपरमधे दंगा मारामारी वाचता, हवालदिल होता. मी असेन चिडायच्या मूड्मधे तर घालीन चार शिव्या आणि मोकळा होईन ..."

"नाहीतर?"

"... नाहीतर मी त्यामधेही काहीतरी वेगळं बघेन. मला नसेल मूड खराब करायचा तर मी कदाचीत तसल्या बातमीमधे कोण काय ऍक्शन घेतायत ते बघेन. जनतेला काय अवाहन केलेय ते बघेन आणि मीही तेच करतोय का ते बघून खुश होऊन पुढे निघेन. तसं प्रत्यक्ष जाऊन मी कूठेही काही दिवे लावणार नाहीए. पण ईथे जे काही आहे त्याला काहीतरी बेस देऊन पुढे जाईन. परत माझ्या पात्राला असल्या situation ची गरज पडली तर रेफरन्स तयार.

हे असं स्वतःसाठी illusions करणं म्हणजे स्वप्नात वगैरे राहणं नाही. फक्त स्वतःच्या वागण्या बोलण्याचा, क्रिया प्रतिक्रियेचा ताबा स्वतःकडे ठेवणं आहे. केवळ ताबाच नाही. आपल्याला हवं तसं ते ठरवणंही आहे. यामधे प्युरीटी नाही किंवा हे आर्टिफिशिअल आहे वगैरे भानगडी ऐकलेत मी. पण जरा विचार करू - आजूबाजूच्या कोणी काही म्हणावं किंवा करावं, काही व्हावं किंवा नाही व्हावं याला हजार गोष्टी कारणीभूत असतील. या सगळ्यानी जर मी माझा मूड बदलवणार असेन तर काय मजा? म्हणजे आख्ख्या जगानं ठरवलं मला कसं वाटायचय ते तर ते चालतं पण स्वतः असं काहीतरी ठरवलं की मग का artificial? ज्याना कथा रचता येत नाहीत त्यानी या भनगडीमधे पडलं तर artificial, नाहीतर कुठलं काय artificial!?

आपण मोठे लोक वगैरे बघतो. सचिन तेंडुलकर घे. नाहीतर अंबानी घे. नाहीतर तुझा ऑफिसमधला बॉस घे (म्हणजे जर बॉसला आदर्श म्हणून वगैरे बघत असशील तर). बऱ्याचदा आपण नाही त्यांची स्टाईल कॉपी करायचा प्रयत्न करत? ते दररोज खिशाला कोणा अमुक अमुक कंपनीचं पेन लावून येतात, म्हणून आपणही लावतो. ते एका ठरावीक स्टाईलनं बोलतात म्हणून आपणही बोलतो. पण मी जेव्हा यासगळ्याना बघतो तेव्हा मी ऊलटा विचार करतो. यांच्या आयुष्यात कसे कसे सीन घडले असतील की ज्याचा परीपाक म्हणून ही माणसं अशी झाली. आणि मी सीनच्या सीन ऊचलतो. माझा सीन थोडाफार तसाच बनवायचा प्रयत्न करतो. कुठल्या सीनचं पुढे काय होणार आहे अशी सांगड घालत बसतो. कुठले सीन माझ्या कथेमधे येणार आणि कुठले येणार नाहीत यांची पकड ठेवायला जमणं सोपं नाही मित्रा. मलाही जमतं असं नाही. पण तिकडच वाटचाल सुरू आहे. तुम्ही दृश्य गोष्टींचं अनुकरण करताना जितकी कमीटमेंट दाखवता तितकी मी त्यांच्या कथेमधले मागचे सीन्सचा विचार करण्यात घालवतो. स्टाईल माझ्यापण तयार होतील. पण जसं आज आपण याना बघतो, तसं उद्या आपल्याला कोणी बघावं असा सीन लिहायचा प्रयत्न करतो. आज लहान सहान गोष्टी करत असेन मी याचा. पण भाऊ कधीतरी या लेवलवर नक्की पोहोचेन तेव्हा बघशील."

खरं सांगायचं तर एकेकाळी मीही या सगळ्याना भारावून गेलेलो. कोणाला मी असं बोललोही असेन की I live in illusions (म्हणजे याच्या थेअरीप्रमाणं याची फक्त स्टाईल कॉपी करून!), पण ईतका सहजी त्याचा विसर पडेल असंही वाटलं नव्हतं. कधीकाळी भारावून टाकणाऱ्या गोष्टी खरच भारावून जायच्या लायकीच्या असतात की आपण ते भारावून जाणं वगैरे सगळं खरच प्रासंगिक असतं? एखाद्या गोष्टीवर फार ऊशिरा किंवा क्वचितच मत व्यक्त करतो असं म्हणाल्यावर ‘माझ्या कथेमधलं स्थान हुडकत होतो’ असं मला हळूच सांगणाऱ्या या मित्राबद्दलच कुतुहलात्मक आकर्षण अजुनही कायम आहे. कदाचीत बऱ्याचशा गोष्टी माझ्या आयुष्यात घडतील की ज्या ठरवतील की मी याला आणि याच्या थेअरीला लक्षात ठेवायचं की नाही ते. नाहीच राहीलं लक्षात तर परत बाकीच्या असंख्य गोष्टी ठरवतील की आम्ही परत भेटू की नाही ते. आणि मग परत या सगळ्यांची आठवण होईल.

किंवा तो ठरवेल की त्याच्या कथेमधे आम्ही परत भेटणं आवश्यक आहे की नाही ते. जर असेल तर तो भेटेलच.

Tuesday, September 08, 2009

We moved on and we met us

(ट्युलीपच्या वीकेंडच्या पोस्टमधले ’तो’ आणि ’ती’ भलतेच आवडले. तसा त्या पोस्टशी याचा काहीही संबंध नाही. पण ते पोस्ट वाचताना सुचलं हे सगळं.
अदितीचेही आणि नॅनीचेही आभार - मझ्या फंड्यांवर वरताण फंडे मारून मदत केल्याबद्दल!)



तो त्याच्या मनाची विषण्णता त्याच्या नाटकातून मांडे. तिला त्याची नाटकं आणि त्यामागचं प्रेम कधीही फारसं आवडलं नाही. समोर बोलता न येणाऱ्या स्वतःच्या चौकटीमधल्या रास्त गोष्टी तो नाटकामधून मोकळं करायचा. आणि त्याला मोकळं व्हायला नाटक लागतं हा त्याला आधारही होता आणि त्याला लसणारं सत्यही होतं. आपलं नातं आपल्याबरोबर खुलावं असं त्याला वाटायचं. आणि तिच्या स्वप्नात जसं नातं खुललं होतं तसं आपलं नातं बनवावं हे तिचं स्वप्न होतं. ती बऱ्याचदा त्याला ओरडायची की कसं त्याला रोमॅंटीक होता येत नाही. तिला ख्रिश्चन लग्नामधे घालतात तसल्या पांढरा शुभ्र पेहरावाचं भारी आकर्षण. पण तिचे ते बोलणे आठवणीत साठवताना तो तिला प्रतिसाद द्यायला नेहमी विसरायचा! तो तिच्यासाठी तितकाच गुढ होता जितकी ती त्याच्यासाठी अनाकलनीय!

एखाद्या गोष्टीसाठी हट्ट धरला की जीव नकोसा करून टाकायची. त्याला ती तशीही आवडायची. तिलाही तिचे सर्वकाही ऐकणारा तो आवडायचा. आणि मग यांची गाडी घसरायची. तिचा हट्ट संपायचं नाव न घेईना झाला की तोही अस्वस्थ व्हायचा. तो कशा कशा काय काय गोष्टी कधीच करत नाही याची यादी तिच्याकडे तयार असायची. त्या गोष्टींशिवाय प्रेमात मजाच नाही अशा तिच्या समजाविषयी त्याचा आकस. पण ती चर्चा कधी होऊ न शकलेली. त्याने काही बोलला की तिच्या धर्मग्रंथाला धक्का लागल्यासारखं बाघायची! तिच्या मनातल्या गोष्टी फार काही मोठ्याही नसायच्या. पण त्याशिवाय काही असूच शकत नाही यावर त्याच्यामधल्या ईंजीनिअरचं लॉजिकल थिंकींग बंड करायचं. "एवढ्या लहान लहान साध्या गोष्टींसाठी किती माथेफोड करायला लावतोस? सागळी मजाच निघून जाते" म्हणत तिही हतबल व्हायची. "तुझ्यासाठी लहान असली तरी माझ्यासाठी मोठी आहे. आणि तुझ्या या अशाच वागण्यानं, माहितीये, मी फ्रीली विचारच करू शकत नाही! किती छान छान गोष्टी असतात. पण मला आपलं तुला कसं वाटेल आणि काय वाटेल मधेच मारामारी होते!" तिचे हे पद सुरू झालं की त्याला धडकी भरायची. "अगदी ट्रिवीअल गोष्टी आहेत यार! करू की! मी कधी कुठे काय म्हणालो!? आपण बोललोय ना यार यावर!" हे असले सगळं तो एका क्षणात मनामधे म्हणायचा. तसंही बरचसं मनातल्या मनातच म्हणायचा तो. आणि मग पुढच्या एपीसोडला तयार व्हायचा.

तो जसा आहे तसा आवडण्यासारखं बरचसं त्याच्यामधे होतं. पण त्याला आहे तसा स्विकारणं तितकंच अवघड. हे त्याचं मत स्वतःबद्दलच. हे दरवेळी वाद करताना सांगण्याचा त्याचा आग्रह तिला आजिबात आवडायचा नाही. तिचं फायरींग सुरू झालं की त्याला उगाचच राहून राहून बरं वाटायचं की त्याचे विचार किती लॉजिकल आहेत! तिला मात्र फायरींगनंतर फार वाईट वाटायचं. आपल्याला क्षुल्लक गोष्टीबद्दलपण ओरडावं लागतं.

"कसं होणार आपलं भविष्य" यावर ती मधेच अस्वस्थ होई.
तो म्हणे की, "वेडे आपण ईतकी वर्ष एकत्र होतोच ना. आता काय वेगळं आहे त्याहून? फक्त एक मॅरीडचा टॅग लागेल, एवढच" त्याच्या मनामधेपण तोच प्रश्न घर करून जरी असला, तरी तिला समजावताना तो भलताच कॉंफीडंट व्हायचा.
"लहान लहान गोष्टींबद्दल ईतके काही बोलावं लागतं मला. तुला नको असताना मझ्यासाठी फोर्स करतेय मी असं वाटतं. या गोष्टी नॅचरली आल्या पाहिजेत अरे! ईतके सांगावं लागलं तर मग काय मजा राहीली?" ती लगेच तिची अस्वस्थता बोलून दाखवायची.

त्याला खुप आवडे जेव्हा ती असले काही मनचे बोले तेव्हा. ती म्हणायची, "I am sorry if I am hurting you". तो म्हणायचा, "If that's what it takes to make you speak your mind, then that's what it is!" कधी कधी हे अति व्हायचं. ती भलतंच पुश करायला लागली की मग त्याचापण तोल जाऊ लागायचा. तो ऊखडायचा, "कंटाळा आलाय मला याचा! किती वेळा म्हणू की हे करेन आणि ते करेन! आता मी आहे तो असाच आहे बघ. तुला माहिती आहे. नाही झेपत तुझ्या रोमान्सच्या गोष्टी मला तर नाही झेपत. विचार कर यार तूच. मला नाही बरं वाटत सारखं तुला तेच तेच आश्वासन द्यायला. जर नसतील मझ्याकडे काही गोष्टी, किंवा तुला दिसत असतील शंभर सुधारणा तर कदाचीत आपण नसूच योग्य एकमेकांसाठी! कशाला एकमेकाला ढकला यामधे!?"

पुढंचं सगळं तो मनामधेच म्हणे. तिच्याकडे ईतक्या रोमान्सच्या कल्पना असतील तर स्वतः का करत नाही काही, असे वाटे त्याला! आता कॅंडल लाईट डिनर त्यानेच कशाला प्लान करायला पाहिजे, तीही करू शकतेच ना असं त्याचं लॉजिकल मन म्हणायचं. जसं तिला चांगलं वाटतं तसं त्यालाही चांगलं वाटेलच ना! तो विचार करे की सगळं जगानच का करावं तिच्यासाठी? तिनेही एक पाउल पुढे यावं हे कसं नाही समजत तिला? त्याला स्ट्रेच मारायचा आणि काय आवश्यक असतं म्हणून काय सांगते? तो काही बोलत नाही म्हणून पुश करते ईतकी असे वाटू लागायचं. तो तिच्यासाठी हक्काचा आहे हे मात्र अशावेळी त्याच्या लॉजीकल मनात नाही यायचं. हे असं सगळं द्वंद्व मनात झाल्यावर, तोच मग शब्द फिरवी. तिच्यामधे काहीतरी कमी आहे किंवा ती चुकतीये असे बोलायला त्याला कायमच जड जायचं. मग तो बऱ्याचदा सोडून द्यायचा. पण त्याला भिती असायची की हे सगळं मनामधेच दबून राहीलं आणि कधी एकदम अचानक बाहेर आलं तरं? सगळंच उध्वस्त होईल. त्याला स्वतःची भिती जास्ती वाटायची. रागारागात सगळं सजवलेलं नातंच तो तोडून टाकेल असंही वाटायचं. तिच्या दृष्टीनं त्याल तिच्या मनातलं कळत नाही हा अचंभा होता, तर त्याच्या मनातली भिती तिला का कळत नाही याचा त्याला राग आणि तितकच आश्चर्यही.

तो फार कमी वेळा अशा आक्रमक पवित्र्यात जाई. पण जेव्हा जाई तेव्हा तिला दुखावून जाई. ती मग त्याला सांभाळून घेई. म्हणे, "असं नाही यार करायचं. मी जरा आहे डिमांडींग, पण म्हणून तू घ्यायचं ना समजून. तू व्हायचं ना मोठं! I am your child. असं कोणी करतं का आपल्या मुलाला की बाबा बघ मीच तुझ्यासाठी योग्य नाही!" ती असलं काही बोलायला लागली की ओठ एकदम बदकासारखे बाहेर यायचे. त्याच्याकडं बघता बघता तो विषयच विसरायचा. त्याला वाटायचं, "काय उगाच ओरडलो! ती असेल एकवेळ थीरथीरी! मी तरी सांभाळून घ्यायचं ना!" तो काहीच बोलायचा नाही आणि नुसता हलकेच हसायचा. मग ती म्हणायची, "मी फार लहान आहे. कदाचीत मला नाही येत तुझ्यासारखं विचार करायला. स्वार्थी पण आहे. सगळं माझ्यासाठी मागते. सारखं तुलाच म्हणते की तू हे कर आणि ते कर!" एवढं सगळं बोलल्यावर त्यालाही बरं न वाटून तोही बोलून जायचा,
"तसं काही नाहीए रे. मी म्हणालो ना, मला खरच आवडतं तू असं मनातलं बोलल्यावर. असं राहूच नये मनामधे काही.टाकवं बोलून."
"No! Then I hurt you."
"नाही रे. सांगीतलं ना. मला आवडतं तू मन मोकळं केलस तर. हे बघ, माझ्या मनातपण तुझ्यासारखेच विचार येतात. पण everyone has to take own bets! I have taken mine. You should take yours. आपल्याला बोलायला वेळ आहे म्हणून प्रत्येक लहान सहान गोष्टीबद्दल एकमेकाला कोर्टामधे नाही उभं करायचं ना! काही गोष्टी आत्ता होत नाहीएत. तर नंतर होतील ना. नाही वाटेल खात्री आत्ता, पण तीच तर bet घ्यायचीये. मोठ्ठा डिसीजन घेतोय आपण. आपण राहतो आहोतच एकत्र ईतके वर्ष तसे पुढेही राहू. त्यात काहीच बदलणार नाहीए. बाकीच्या लहान सहान गोष्टी हॅंडल करू आपण रे. आपण एकत्र असणं महत्वाचं आहे. नाही का?"

हे बोलताना त्याने दोनवेळा तिच्या अपेक्षाना परत लहान सहान म्हणल्याचं ती नोटिस करायची पण एकुणच रावरंग पाहता विषयाला बगल देऊन सगळाच नूर बदलायची. त्याला हे ही फार आवडायचं. पण हे जसं शेवटी त्याने मनातलं बोलायचं मनामधे ठेवलेलं - तसं ईथे तिचंही काही आतल्या आतच रहायचं. एकमेकाना खुश कसं करायचं यामधे जरी मार खात असले तरी दोघाना एकमेकाना कसं दुःख नाही द्यायचं हे पक्कं माहित होतं. सुखाबद्दल भरपूर झटून झालेलं त्यांचं. कदाचीत आपापल्या गतायुष्यामधे. कुठेतरी नकळत दोघेही त्याच आयुष्याची मोजपट्टी वापरायचे. त्याच्या गतायुष्यामधे कदाचीत तो जसा होता तसा स्विकारणारं कोणीतरी होतं. तिला समजून घेणारं कोणीतरी तिच्याकडंही होतं. ती जेव्हा त्याच्यामधे सुधारणा सांगे, किंवा तो जेव्हा तिच्या छोट्या मोठ्या रोमान्सच्या कल्पनाना प्रतिसाद देत नसे, तेव्हा पुर्णपणे नकळत दोघानाही आपल्या भूतकाळामधल्या तुटलेल्या झोपाळ्यावरचं वारं झोंबायचं. पण नंतर ऊब मिळवायला दोघेही आपापल्या हक्काच्या ठिकाणीच जायचे. एकमेकाजवळ.
--------------------------------------

बऱ्याच वर्षानं भेटलेल्या मित्रासमोर तो आपली कहाणी सांगत होता. ही कहाणी जिव्हाळ्याची. त्याचा हुरूप बघण्यासारखा असे. फार कमी वेळा तो या कहाणीबद्दल बोले. कुठेतरी मागे सोडून आलेल्या कहाणीबद्दल.

"हे सगळं हे असं होतं बघा. कोणासोबतही जितका वेळ नाही काढला ईतका सहवास आम्हा दोघाना एकमेकांचा होता. जेव्हा निर्णयाची वेळ आली तेव्हा देवानं थोडा वेळही देऊ केला आम्हाला. पण आम्ही विचार करत करत त्याचा दुरुपयोग केला. शेवटी एकमेकाना ईतके अनकंफर्टेबल केले की ...
आणि मग ही आली"

ती हसली. त्याला मधेच थांबवून म्हणाली, "हं. माणसाचं मन क्रुर आहे. एखाद्या गोष्टीबद्दल कमालीची आपुलकी की किंवा प्रेम वाटण्यासाठी ती गोष्ट गमवावी लागते! आणि अशा गमावलेल्या गोष्टीना कळत नकळत कुरवाळत, हे मन आजच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतं."

त्याचा बोलायचा जोश अजुन कायम होता. "पुढचा डाव खेळताना कळात जातं की काय काय करता आले असते पण तेव्हा ऊशिर झालेला असतो. अशा हरलेल्या डावांच्या ओझ्याखाली आजचा डाव खलास होतो. काही कालावधीनंतर ईगो तयार होतात. टॉलरन्स लेवल कमी होतात. जेवढी मुभा एखाद्या अनभीज्ञ व्यक्तीला सहज देतो, तेवढीही एकमेकाला देताना ऊपकार केल्यासारखं वाटतं. एखाद्या नव्या नत्यामधे गुंतण्यासाठी मन सैरभैर होतं. नाहीच तर जुन्या नात्याचं अजीर्ण झालेलं वस्त्र तरी दूर करायची घाई होते. ते वस्त्र शिवून ठिक करण्यापेक्षा नागवं फिरणं जास्ती बरं वाटतं."

"त्यानंतर कदाचीत नव्या नात्याची सुरूवात जेव्हा होते, जेव्हा केव्हाही, तेव्हा सावध होते. ईच्छा अपेक्षांवरचे मुखवटे ऊडून गेलेले असतात. एकमेकाना समजून घेण्याच्या उपर आणि कशातच सुख राहत नाही. एकमेकांसाठी केलेल्या गोष्टीमधे तडजोड किंवा कॉंप्रमाईज ऊरत नाहीत, त्या उत्स्फुर्त वाटतात."

"एक क्षण वाटतं, किंवा वाटलं तरी पाहिजे, की अशीच सुरूवात मी मागच्या नात्याची केली असती तर? मला समज ऊशिरा आली यावर त्या नत्याचा बळी का चढवावा? नातं गमावल्याशिवाय समज नाही! आणि समज नसेल तर ते नातं नाही. कसं होतं ना की नात्याच्या गुंत्यामधे कधीतरी एक्सपायरी डेट येतेच. तारीख रीन्यू करावी लागते. नाहीतर आहे ते बिघडून जातं."

"आम्ही मग आमचं नातं सोडलं. खुप रडलो." तिनं त्याचा हात पकडला, पुढे बोलली, "आणि मग आठवड्याने त्याने एक ईमेल केलं. म्हणाला की मला आवडणार नाही पण त्यालाही असह्य झालं म्हणून त्यानं त्याच्या मनातलं सगळं परत त्याच्या नाटकातल्या नायकासाठी लिहिलं! त्याचा प्रयोग आहे. आणि येशील का विचारलं. मी काही ऊत्तर दिलं काही. त्याला अपेक्षीतच असावं कदाचीत. त्या दिवशी मग मुद्दामहून चुकून भेटलो. मी माझी ओळख करून दिली." बोलता बोलता तिचीही कळी खुलली. "जसं काही प्रथमच भेटतोय. तोही हसला आणि त्याने त्याचीही ओळख करून दिली. म्हणाला अवांतर वेळेत नाटकं बनवतो. बघायला बोलावला. मी म्हणाले, तू मन लावून नाटक बनवला असणार पण माझ्या निरसपणाला बघून ऊदास होशील. मला बोलायला आवडतं तू नाटक संपवून ये. मग आपण तुझ्या नाटकाबद्दल बोलत रात्र काढू. मी वाट बघेन. नाटक संपलं. येताना त्याने प्रथमच न विसरता बुके आणला. सोबत कॅंडल्सही आणल्या. शाळेत पहिला नंबर आलेला सांगायला जसं पळत यावं ना, तसा पळत आला. म्हणाला फक्कड झालं नाटक. मी हातामधल्या फुलांकडे बघत होते. नकळत ते बघायला एक अश्रूही डोकावला. त्याच्यामधला परत तोच खट्याळ भाव दिसला. तो म्हणाला, तुम्हाला आजच भेटलो. पण राहवलं नाही म्हणून फुलं वगैरे आणली. अगदी तुमच्यासाठीच आहेत असं वाटलं. एवढच. तुम्हाला आवडलं नसेल तर खरच राहू देत. माफ करा मला."

पुढे सांगायला तो सरसावला. "मी जेवण मांडेपर्यंत हिने गाणी लावली. म्हणाली माझ्याकडं बघून मला ईंग्लीश आवडत नाहीत असं वाटतं. म्हणून सुरूवात हिंदीनं करेल - दिल ही दिलमे हमको मारे, दिल दुखाना आपका सुरू झालं. चक्क तिने आज क्यू लगे दुनियाकी पेहली सुबहा फिरसे होगी पर्यंत तिनं तेच सुरू ठेवलं. तिला एव्हान माझ्या बॅगमधे एक नवी सीडी दिसली. माझ्याकडच्या सीडींवर बहुधा तिचंच राज्य असायचं म्हणून नवी सीडी तिला लगेच ओळखली. त्यावरच्या नावांवरून सरसर नजर सरकवत होती ती. Bryan Adams, Savage Garden, As long as you love me, Right here waiting ... वगैरे बरीच ओळखीची नावं दिसली. दिलही दिलमे ला मिळालेला वेळ तसाही माझ्यासाठी बराच होता. तिकडे माझ्या कॅंडल्स सेट झालेल्या, आणि ईकडे पहिले गाणं सुरू झालं - Nothing gonna change my love for you. एक नव्यानं ओळख झाली आमची. We moved on and we met us."

Friday, August 28, 2009

मराठी विरुद्ध मराठी

सकाळी सकाळी रस्त्यावर एक पोस्टर पाहिले ... जमलं तर त्याचा फोटोपण लावेन. त्यावर लिहिले होते - "अजुन लाज वाटते मराठीची?" का असेच काहीतरी. चित्रामधे ईंग्रजीमधले साइनबोर्ड्स होते. बऱ्याच दिवसापासून मनामधे आहे या विषयी लिहायचं. आजकाल एकदम नाजुकपण झालाय हा मराठीकरणाचा विषय! पण कोणी केले नाजुक त्याला? गरज होती का? बरेच मोठे मोठे लोक आता यावर वक्तव्य करतात. याबद्दल काही कळत नसताना याविषयी अधिकारवाणीने बोलायला जेवढी लोक आहेत तेवढीच याबद्दल समजून उमगून या वादापासून लांब राहणारीही लोक आहेत. दोघेही तितकेच घातकी.

खरं सांगायचं तर मलाही कळत नाही बऱ्याचदा की कसं हाताळायचं या मराठीकरणाच्या वादाला. कधी निर्णयाप्रत पोहोचूच शकलो नाही मी. मला मराठी लिहायला आवडते. मला मराठी बोलायलाही आवडते. म्हणून मी उटसूट सगळ्यांच्याबरोबर मराठी बोलायचच याचा आग्रह धरत नाही पण जिथे शक्य तिथे मात्र भरपूर वापरतो. मला कोल्हापुरी मराठी आणि तिथले खास असे शब्द आवडतात. ते कुठेही आणि कुठल्याही भाषेमधे चपखल बसतात आणि मी बसवतो. समोरचापण तितक्याच खिलाडू वृत्तीने ते ऐकूनही घेतो. प्रसंगी वापरतोही. पण हे सगळे केवळ मराठी आहे म्हणून नाकं मुरडणारे मराठी लोकही माझ्याकडे आहेत. त्याना भाषेमधे एखादा स्पॅनीश शब्द चालेल. एखादा हिंदीही कदाचीत चालेल. पण मराठी दिसला की मात्र नाकं मुरडतील. हे असं का? असं कसं झालं असावं? एकीकडे मी मराठी वश्विक पातळीवर नेणाऱ्या विश्व मराठी सम्मेलनामधे मदत करतो. दुसरीकडे "आतातरी मराठीचा आग्रह सोडा" म्हणणाऱ्या माझ्याच मराठी लोकांबरोबर वाद घालत फिरतो. एखादी भाषा जन्मजात मोठी नसतेच. कोणतीही नसेल. पण ती मोठी नाही म्हणुन कोणी तिचा हात सोडून दुसरीकडे जात नाही. तिला ऊच्च पातळीवर पोहोचवावे लागते.

आता शेजाऱ्याच्या घरतलं काहीतरी चांगलं वाटलं म्हणून आपण शेजाऱ्याकडंच जाऊन थोडीच राहतो? जे काही चांगलं आहे ते आपल्या घरातही करायचा प्रयत्न करतोच ना! शेजारच्या काकू जेवणामधे काहीतरी चांगलं बनवत असतील तर मी एक-दोनदा त्यांच्याकडे जावून जेवेनही. पण तिकडेच मुक्काम करणार नाही! माझ्या घरच्या जेवणावर अचानक आळणीचा शिक्का मारणार नाही. कदाचीत माझ्या घरीही तसच काहीतरी बनवायचा प्रयत्न करेन. नाही का? एखाद्या वेळेस ईदची बिर्याणी खायला दरवेळी करीमकडेच जाइन. त्यासमोर माझ्या पुलावचं कौतुक करणार नाही. पण तसेच मझ्या घरचे खाताना मला कमीपणाचेही वाटणार नाही. तेच भाषेबद्दल का नाही? माझ्याकडचं चांगलं तुम्ही घ्या, मला तुमच्याकडचं चांगलं घेऊ द्या. यात वावगं काय आहे? हातचं सोडून पळत्याच्या मागं लगल्यानं मी माझं असं जे होतं तेच सोडतोय, हे बघायला नको का? दुसऱ्याचच चांगभलं करता करता मीच अनाथ होत चाललोय. मला सगळं दुसऱ्यांचच आवडतं. आवडावंही जर चांगलं असेल तर. पण मग मी माझं का विसरावं? त्याची का लाज वाटावी? तेही तसच सुंदर करायला हातभार का नाही लावावा? पुढे पुढे याची ईतकी सवय होते की जे कोणी हातभार लावत असतील, त्यानाही तुच्छनजरेने बघतो. म्हणतो लेकहो आता तरी हे सोडा आणि बाहेर पडा जरा बाहेरचं जग बघा. ओपन माईंड ठेवा.

हा ओपन माईंड पाहिजे म्हणून शंख करताना मी बऱ्याच लोकाना ऐकलय. स्वतःच्या घरातून बाहेर या, बघा बाहेर काय सुरू आहे, ते स्विकारायचा प्रयत्न करा. हे सगळंही ऐकलय. मान्यही आहे मला. पण आजकाल एवढी वाक्यच मागे राहीलीयेत मागे. त्यामागचा हेतू अदृश्य झालाय. हे ओपन माईंड करताना, का म्हणून मी मराठीकडे क्लोज्ड माईंडने बघावं. केवळ मराठी आहे म्हणून गाणी वाईट. चित्रपट टाकाऊ. ईंग्रजी काहीही असेल तर आम्ही काही पूर्वग्रह न ठेवता बघून येणार. पण ही संधी मराठीला का नाही? काही लोकाना हा आकस मराठी बद्दल असतो. काहीना कुठल्याही ईंग्रजेतर भाषेबद्दल असतो. ओपन माईंडच असेल तर मग मराठीकडेच का नाही बघायचं ओपन माईंडनं? तिथं का लाज? केवळ आपलं ते कसं काय चांगलं असू शकेल या विचारामुळं?

भयंकर राग येतो अशावेळी. पण या सगळ्याला दुसरी बाजूपण आहे. माझे असेही लोक आहेत की जे मराठीचा अनावश्यक आणि अती आग्रह धरतात. वेळी संस्कृत शब्द वापरतील पण ईंग्रजी किंवा हिंदी नाही वापरणार. यांचे ओपन माईंड कदाचीत संस्कृतकडे. संस्कृतची मालमत्ता आपल्याच आज्ज्याची म्हणून ती मराठीच्या नावावर खपावायची आणि वर बाकीच्याना आग्रह धरून बसायचा की बाबानो तुम्हीही हेच केले पाहिजे. प्रत्येक आणि प्रत्येक गोष्टीमधे मराठी पाहिजेच म्हणून मागं लागायचं! हा अत्याचार का? जसे बीन बुडाचा विरोध नको तसाच अतिरेकी आग्रहही नको! समोरच्याला मराठी येते नसेल तर मुद्दामहून त्याच्याशी मराठी बोलणारे लोक काही कमी आहेत? का समोरच्याच्या मनात तिटकारा निर्माण नाही होणार? आणि तो आपणच निर्माण करायचा? समोरच्यालाच काय ईतर मराठी लोकानाही लाज वाटेल याची. म्हणजे आपण मदत करतोय मराठीला की आणि काही? पुढे याचं बिल भाषेवर कोणी फाडलं तर आणि हळू हळू नकळत त्या भाषेपासूनच दुरावलं तर कोणाला दोषी पकडावं? ज्यानी भाषेचं नाव खराब केलं त्याना की जे भाषेपासून दुरावले त्याना? आपलेच दात आणि आपलेच ओठ. लहानपणापासून मराठीपेक्षा ईंग्रजी शब्द वापरले की कौतुक कराणारे पालक जबाबदार की त्या पालकाना ईंग्रजीकडे ड्राईव करणारी आपणच केलेली कटथ्रोट स्पर्धा?

एकीकडे मला जसा मराठीला सावत्र वागणूक देणाऱ्यांचा राग येतो तसाच मी या अशा मराठीचे नाव बिघडवणाऱ्यांसमोरही हतबल होतो. मराठीच काय तर कुठल्याही भाषेमधे अशा प्रवृत्ती नसाव्यात. हे ३ गट आहेत - एक अतिरेकी लोकांचा, दुसरा विरोधकांचा आणि तिसरा राहिलेला समुहाचा ज्याला फक्त कोणाच्यातरी मागे जायचे माहित आहे. हा तिसरा गट बहुमताकडे पळतो. वरकरणी चलती असलेल्या किंवा सेक्सी गोष्टींच्या मागे जातो. या विरोधकाना काही बोलावे तर वाटते की कोणी मला अतिरेकी समजू नये. आणि या अतिरेकी लोकाना बोलावे तर वाटते कोणी मला विरोधकांमधे मोडू नये. आणि असे करत मीही समुहाचा एक भाग बनतो. आणि जिकडे ओघोळ जाईल तिकडे जातो. हाताशपणे. सगळे समजून ऊमगून, न समजलेल्यांच्या मागे. लोक असा बीन बुडाचा विरोध करायला लागले म्हणून या अशा अतिरेकी लोकांची गरज तयार झाली की असे अतिरेकी होतेच म्हणून विरोधक तयार झाले? कोंबडी आणि अंड्याचा वाद आहे हा. विरोधक असोत किंवा अतिरेकी, दोघेही टोकाच्या भुमिकेमधे! ही कट्टरता आता तर आणखीच तीव्र होत चाललीये. पण या सगळ्यामधे भाषा होरपळून निघतीये.

हे विरोधकही माझेच, हे अतिरेकीही माझेच. माझ्याच भाषेवर हल्ला करताहेत. मलाच सहन करायचेय. हा प्रश्न तसा नविन नाही. माहित होताच. पण मला अजुनही उत्तर मिळत नाहीए. काय प्रतिक्रिया द्यायची ते कळत नाहीए. मी कशी मदत करायची ते कळत नाहीए. ईच्छा आहे पण मार्ग दिसत नाहीए. दरवेळी असे रस्त्यावरचे काहीतरी पोस्टर किंवा टिवीवर एखादी बातमी बघून अशी अस्वस्थता जागी होते. पण ...

Saturday, May 23, 2009

Emotionally Challenged!

बऱ्याचदा मी या अशा चर्चेमधे अडकतो. काहीतरी सांगायला जावं आणि त्यातून एकदम डिबेट्सच सुरू व्हाव्यात. म्हणजे एखाद्या नविन कन्सेप्टबद्दल वाचावं. एकदम ईंप्रेस होऊन कोणालातरी सांगावं आणि त्यानं आपल्यावरच हल्ला चढवावा की किती फालतू, युजलेस कन्सेप्ट आहे किंवा एकदम अशक्य म्हणून पकाऊ आहे. मग आपणच एकदम जसे काही स्वतःचच काहीतरी खोटं पडतय अशा भावानं बाजीप्रभू व्हायचं. मग अगदी शिरा ताणून चर्चा. शेवटी मग थकून भागून चर्चेचा सामना अनिर्णित जाहीर करणे. कोणच कसं काय आपल्यासारखं पाहू शकत नाही - हा आणि एक नंतरचा अचंभा - कदाचीत आपण काहीतरी स्पेशल आहे असे स्वतःला वाटून घेण्यासाठी. याचसारखा दुसरा प्रकार म्हणजे एखादी घटना सांगताना कोणीतरी मधेच असिंप्टोटीक शेरा मारावा. आपण त्याची नोंद म्हणून काहीतरी म्हणावं आणि पुढं जावं आणि मग त्यावरच परत आपल्याला सगळ्यानी मागे ओढावं. आणि सुरू लढाई!

"तू वाचली का बातमी? ईथल्या कोणाची कोण पोर, भारतातमधे अपघातात सापडली. पोलिसानी आत्महत्या म्हणून बंद केली केस!"
"नाही गं वाचली." माझं ड्राईवींग सुरू होतं.
"तसंही या लोकाना काम करायला नको. त्यात आणि या मुलीचे आई वडिल देशाबाहेर ... कोणाचा बाप विचारतोय याना केस दाबली तर!!"
"असं नाही व्हायला पाहिजे. आज लोक येतात आपल्या देशात. आपण काळजी नाही केली त्याची तर बंद करतील लोक यायचे."
"अरे... टुरीस्ट लोकाना तर कसलं लुबाडतात माहीत आहे ना? दसपट भाव लावतात! कश्शातही"
"हं."
"आमच्या ऑफीसमधल्या कोण अमुक अमुक गेलेला ताज बघायला. सगळं आवडलं वगैरे त्याला. पण लोक उल्लू बनवतात म्हणून कडवट तोंड करून सांगत होता!"
"हा हा. बिचारा. मेरेको उल्लू बनाया! म्हणून रडत होता काय?"
"नाहीतर काय अरे. पण आपलच नाव खराब करतो यार आपण!"

खरतर मला असली क्रिबींग सेशन्स आवडत नाहीत. म्हणजे त्यातून निष्पन्न काहीच होत नाही. फक्त आपल्या आतमधली अस्वस्थता बाहेर निघते. यामुळं कोणाचं काहीच होत नाही. फक्त स्वतःच स्वतःला समाधान देतो आपण. की बाबा, आपण बेधडक बोललो तरी. बोलल्यानंतर बरंही वाटतं. किंवा म्हणू अस्वस्थता कमी होते. पण सगळं आपल्याच विश्वामधे. असो. भारतामधले पर्यटक आणि त्यांच्या भोवतालचं जग बरच बरं होत चाललय. माझ्या ऑफिसमधला ऑस्ट्रेलिअन ब्रॅड पुण्यात मस्त ८-१० दिवस जाऊन खुश होऊन आला. पलीकडच्या राज्यात फेरफटका मारून यावा तसा. फार मोठी अचिवमेंट आहे यार. People are no more afraid of India, Crowd, and what not. पण हे मला तेव्हा नाही आठवले! मला वेगळाच प्रसंग आठवला. आणि दुर्दैवाने मीही क्रिब सेशनमधे हातभार लावला.

"अगं मीही मागे एकदा एक डिबेट बघत होतो. कोणा रशीयन का ब्रिटीश मुलीवर गोव्यामधे कोणीतरी अतीप्रसंग केला. डिबेट होती नॅशनल न्युज चॅनलवर. मुलीची आईपण तिथे. गोव्यातले लोकल रहिवासीपण उपस्थीत. मुद्दा काय तर, मुलगी ती तशीपण कमी कपडे घालून फिरायची, मुलांशी लगट करायची का असेच काहीतरी. तिच्यावरच संस्कारच नव्हते. आमच्याकडे कोणी करत नाही असे. and blah blah. I mean what the heck yaar! Does that give you right to do anything? डीबेट संस्कार या विषयावर की घडलेल्या घटनेवर? Talk about bloody संस्कार later yaar. तोंड वर करून बोलतात तरी कसे देव जाणे?"
"ओह. तिला वापरू देत ना कपडे कसलेही. Freedom आहे यार. ती तिच्या कल्चरने किंवा सवयीप्रमाणे वापरेल. म्हणून काहीपण कराल काय? तिला असतील ३-४ मित्र तिच्या देशात. म्हणून बोलली असेल गोव्यातही ३-४ मुलांशी. लगेच लगट काय? हे लोक तसेही वसवसलेले. हरकून गेले असतील मागे तिच्या. का म्हणून आपले कल्चर फोर्स करा तिच्यावर?"

विषय भरकटला हे ध्यानी येण्याच्य़ा आधीच माझीही वाट चुकली.
"That was not the time to discuss all that. जिथे जाऊ तिथल्या पद्धती, प्रपंच तिने बघीतले नाहीत. खरय. याबद्दल बोलू नंतर. मला या विषयाकडं जायचच नाहीए. कारण घडलेली घटना त्याच्याही पलीकडली आहे. बलात्कार हा गुन्हा आहे. आणि आहेच."
"हो रे. तसेही पद्धती नाही बघितल्या म्हणजे काय? आपण अमेरीकेत राहतो पण ईथे कोण आपल्याला फोर्स करते की त्यांच्यासारखे वागायला? आपण आपल्या रिवाजाप्रमाणे राहतोच ना?"
"आपण कोणच्याही रिवाजाला धक्का तर लावत नाहीए ना. हा प्रकार वेगळा आहे. आता जपानी कंपनीबरोबर व्यवहार करताना. त्यांच्या ग्रीटींग वगैरे करायच्या वेगळ्या पद्धती वगैरे नाही शिकत आपण? You should know how things will be received at new place, new cities, new country! आपलेच घोडे दामटा पुढं काय?"
"ते बिझनेस एटीकेटस. त्याचा काय संबंध ईथं? आणि असं कसं? आपल्या लोकाना काय म्हणे हौस लगेच मागे मागे जायची. झूमधले प्राणी आहेत काय पर्यटक? त्यांच्या वेगळ्या रीती तसे करत असतील. तुम्हाला काय लगेच सावज मिळाल्यासारखं त्याना पकडायचय? आपले रिवाज शिकवायला? काम नाहीए लोकाना! काहीतरी खुसपट काढून आपलं अस्तित्व दाखवायचय."

सहसा, यावर म्हणलं असतं की सगळ्या पुढारी लोकना, आपल्यासारख्या टाईमशीट्स भरायला लावल्या पाहिजेत! काम नाहीए त्याना! पण गाडी आधीच भरकटलेली. कुठेतरी कळत होतं की आपला मुद्दा सुटलाय आणि आपण दुसऱ्याच लाईनवर खर्ची पडतोय. पण ती एक भावना असते ना की समोरच्याला आपण काय म्हणतोय ते समजलच नाहीए! त्या तसल्या भावनेने आणखी शिरा ताणून मुद्दा मांडण्याचा जोश चढलेला. मुद्द्यवर येऊ रे नंतर.

"वेगासला गेलो. रोमचा गेटअप बघून लगेच म्हणालो आपण, In Rome, do as Romans do! तेव्हा का बरं नाही तुम्हाला हवं तसं केला? का म्हणून अट्टाहास रोमन व्हायचा? मला त्याविरुद्ध नाही बोलायचय. पण तसच, In India, do as Indians do का नाही? जास्ती restrictions आहेत म्हणून? ऊद्या माझ्या कोल्हापुरात कोणी आला. ऊघडा वागडा महाद्वार रोड वर फिरायला आला, छान ऊन पडलय म्हणून. लोक काय वेलकम करणार काय? शक्यच नाही. असशील तुझ्या देशामधे असं फिरत. पण दुसऱ्याकडं आलोय तर जरा त्यांच्या दमानं घ्यावं ना? मला हे म्हणायचय. दुसऱ्याच्या पद्धतींना, दुसऱ्याच्या रीवाजाला का धक्का लावा?"

"मग कसलं स्वातंत्र्य रे? ईथे मी मला हवं तसं करू शकते. वागू शकते. कोणी काही भुवया ऊंचावत नाही. सुरक्षीत वाटतं म्हणून. असं कुठं असतं काय? की स्वतंत्र आहात पण हे, हे आणि हे करायचं नाही. हे, हे आणि हे बघायचं नाही. हे, हे आणि हे बोलायचं नाही! आणि हे जर मोडलं तर मग जे होईल त्याला आणि कोणी जबाबदार नाही!"
"हे बघ. जे झालं मी त्याला डीफेंड करतच नाहीए. पण ..."
"नाहीतर काय? एवढे freedom पाहिजेच की!"
"अरे यार ... हक्क आणि कर्तव्य वगैरे काही शिकलोय की नाही शाळेत? फक्त "हक्क आहे, हक्क आहे!" म्हणून काय ऊड्या मारायच्या? तुमचे काही कर्तव्यपण आहे म्हणलं की मग तत्वज्ञान सुचतं होय? पण सोड मला बोलायचच नाहीए या विषयी. आपण भरकटतोय."
"मला फक्त एवढच सांगायचय ..."
"नको. मला ऐकायचच नाहीए. खूनकी नदिया बेह जाएंगी. जंग छीड जायेगी."

एव्हाना माझं ऑफिस आलं! गाडीमधून हकालपट्टी झाली. दोघानी एकमेकाची शक्ती बहुतांशी खाऊन झालेली. मनात चीडचीड होती. मुद्दा सोडून नाही त्या विषयावर बाजीप्रभू झाल्याबद्दल. जे घडले त्याबद्दलचा राग, अस्वस्थता दुसऱ्या विषयावर निघाली. तो विषय कदाचीत रास्त होताही. पण ...? माहित नाही यार. काही गोष्टी मनामधे एकदम स्पष्ट असतात. एखादी गोष्ट चूक, बरोबर, रास्त, खराब आह. आणि आहे म्हणजे आहे. Last thing, you want is to discuss, argue and proive it!! वाद करू पण. मग शेवटी हकनाक एनर्जी वाया घालवली असं वाटतं. आपल्या मनाविरुद्ध कोणीतरी आपली एनर्जी वापरून टाकली आणि आपण काहीच करू शकलो नाही!! असे काहीतरी. Talk about conclusions. Talk about actionables. Spend hours for that. Why the heck do we spend hours and hours to talk about our feelings and emotions? I feel so much emotionally challenged at these times! अर्धवट विषयांच बॅगेज, आणि स्वतःच्या कल्पना, आणि सिद्धांत अभेद्य नाहीत ही अशी भावना. या अशा तिटक्या विटांचं काय बनणार जर दररोज कोणी येऊन त्यांच्यावर वार करणार असेल तर. आणि तसेही कोणी पुर्णतः वेगळं म्हणत नाही. पण कदाचीत आपण आपले मुद्दे सिद्ध करण्याऐवजी आपले मुद्दे सिद्ध करण्यासाठी खपतो. आणि दुसऱ्याच्या विटाना नकळत भगदाडं पाडतो.

Whatever. वेळ कोणाला आहे ईथं! मी समोर बघून स्वतःशीच म्हणालो, "च्यायला, अजुन अख्खा दिवस आहे!!"

Saturday, May 02, 2009

बिंब

(स्फुर्ती: नुपुरची कविता)


असं होतं खरं मधेच ... अनोळखी वाटणं.
कधी ... हे आपणच का? ... असं होणं.
आरशात बघून विचारावं,
की नातं काय आपलं?
जे काल बिंब दिसलं
ते आज कुठं गेलं?
काही माझं हरवलं?
की मी कशात हरवलो?
मग दररोज आरशात बघणं
आणि आपल्याच बिंबाशी हितगुज करणं,
जुन्या बिंबाचं काय झालं,
आणि हे नवं कुठून तयार झालं
सगळं जरी आपलं असलं
तरी उगाच अनभीज्ञपणे वागणं
लाख यत्नानं ओळख पटवणं
आणि मग दुसऱ्या दिवशी परत कोणी वेगळच दिसणं!

Friday, February 27, 2009

मंदाकिनी

पाऊस आला पाहिला,
ना पाहिला मी सोहळा,
मृद्गंध सारा लोटला,
तोही असे ना वेगळा

शब्दास आली ही कळा,
दूरस्थ भासे भावना,
अल्हाद ना दे मानसी,
जैशी सुखाची शर्तशी

संगीत माया धुंदशी,
बेधुंद काया गुंगशी,
ना गंध वाटे त्यातही,
ना मग्न झाले आजही

झाले कसे वेडेपिसे,
हे अंतरीचे गूढसे,
कोणी असे का दूरचे,
लावी मनाला ओढसे




खरं सांगतो, हा वर जो काही प्रकार तयार झालाय, तो लिहिताना नाकी नऊ आले. बऱ्याच ब्लॉगवर मध्यंतरी कविता कविता पाहिल्या. मधे कुठेतरी वृत्तं वगैरेपण वाचली. मनोगत.कॉम ला धन्यवाद. तिथुनच हा किडा घुसला मनात. (मधेच सगळी वृत्तं, यमक वगैरेची बंधनं झुगाडून प्रसून जोशी सारखा धडा लिहायचा विचार आलेला पण त्याच्यासारखे आपल्याकडे शब्दभांडारही नाही आणि परत त्याला संगित लावून पावन करायला रेहमानही नाही). असो. मंदाकिनी मधे लिहायचा केलेला पहिला प्रयत्न आहे (म्हणून नाव पण तेच आहे. काही दुसरं सुचवलं कोणी तरी चालेल). समस्त कवीवर्गास अर्पण. आणि खरच, हे जो लोक वृत्तात वगैरे बसवून कविता लिहितात त्याना मनापासून सलाम. लयी महान आहात राव आपण! मलाही मजा आली आणि तेवढीच तारांबळही उडाली. :)

Tuesday, February 17, 2009

नॅनी

nani is offline. Messages you send will be delivered when nani comes online.
मी: Hey ... you there?

.
.
.
.
नॅनी: तू हल्ली ईतका बिजी कसा?
Sent at 11:16 AM on Monday
.
.

मी: सध्या जरा सिन्सिअर व्हायचे भूत चढलय ... मे बी त्याच्यामुळे
नॅनी: ईतका की ब्लॉगवर पण काही टाकला नाहीस. कित्येक वर्षात! १०० वर्ष झाली असतील!!!
मी: जखमेवर बोट!! :(
नॅनी: बिजी ऑफिसमधे. घरी काय बिजी ठेवतात तुला हे विचारतीये!
मी: कॉल्स असतात यार पुण्यामधे.
नॅनी: ऑफिसमधे प्युन तुझ्यापेक्षा जास्ती बिजी असेल.
मी: ;)
नॅनी: का काय झालं?
मी: आजतक मै तुमसे झूठ बोल रहा था. मै प्युन हू. हा ... मै प्युनही हू.
नॅनी: तुझी कंपनी भारी आहे बाबा. प्युनला अमेरीकेत ट्रान्सफर करतात!
मी: ईथे महाग असतात बाबा प्युन.
नॅनी: :) असो. पण ब्लॉगपासून दुरी का?
मी: परत जखमेवर बोट!
नॅनी: जखमच का खरं?
मी: नाहीतर काय? सप्टेंबर पासून नवा पोस्ट नाही. मग जखमच की!
नॅनी: तेच तर म्हणतीये.
मी: ११ अनपब्लीश्ड पोस्ट आहेत यार. सगळे अर्धवट राहिलेत. च्यायला मन पुढे सरकले की परत मागच्या विषयावर येतच नाही.
असो.
बघू.
होयेगा.
कुछ तो होयेगा.
हा वीकेंड.
गच्चीसाठी खच्ची!
नॅनी: चलो ... झोपायला जाते.
मी: बाय.
नॅनी: बाय. आणि लिही काहीतरी. तुझे पोस्ट्स खरच मिस् करते मी.
मी: आई शप्पथ! लेखक पेटला आता. लेखकाला माहितच नव्हते की त्याला कोणी मिस् करते. आता बासच.
हर हर महादेव.
नॅनी: :)
मी: झोप तू आता. सोक्ष मोक्ष लावतोच मी आता ईकडे.
नॅनी: पेटते रहो.

nani is offline. Messages you send will be delivered when nani comes online.

.
.
.
.
.
.

कोणाशी कधी कसे सुत जमावं याचा काही नेम नाही. एकदम अनपेक्षीत प्रकारे, काहीही कारण नसताना, किंबहुना चुकूनच आमची गाठभेट झाली. सुमारे ३ वर्ष झाली आता या ओळखीला. हा अनपेक्षीत प्रकार म्हणजे एक ईमेल होते की जे चुकुन मला आलेले.

आपल्या पुढची जनरेशन जशी नेहमी एकदम पांडू वाटते तशी नॅनीपण जरा पाकाऊ होती. चॅटमधे भरपूर "?" आणि "!"! शेवटचे अक्षर अगदी ओळभरेपर्यंत टाईप करणे हे असले प्रकार ठासून भरलेले. ईंटरनेट, ईमेल्स आणि चॅटचे पहिले नऊ दिवस सुरू असल्याने तेच तेच जुने झालेले फॉरवर्ड ईमेल्स पाठवायची. आठवड्याला "Must See...", "don't ignore", "toooooo good" या असल्या ईमेल्सचा रतिब टाकायची. आपण पाठवतो त्या ईमेल मधे काय आहे हे बघायच्या आधीच, माहित असल्या नसल्यांच्या ईनबॉक्समधे ते ईमेल पोहोचवणे म्हणजे आपले परमकर्तव्य आहे असे मानणाऱ्या लोकांपैकी एक होती ती. सुत जुळावे असे आणखी काहीच आमच्यात नव्हते - फक्त डेस्टीनी. माझ्या लेखी सर्वार्थाने निरर्थक प्रकारामधे मोडणारे सगळे गूण तिच्यात. आणि रूड हा शिक्का माझ्यावर आधीपासूनच. एकमेकाशी बोलण्याचे - बोलत राहण्याचे आम्हाला काहीच कारण नव्हते. कोणत्याही क्षणी, कोणत्याही दिवशी, "चल जा गेलास ऊडत" असे झाले असते तरी कोणालही नवल वाटले नसते. पण असे झाले नाही. उलट जास्तीच ट्युनींग जमत गेलं.

एकमेकांकडून काडीचीही अपेक्षा नाही आणि काही गमावण्याचे भय नाही. कदाचीत अशी एक बाजू कदाचीत प्रत्येकाला असते. आहेत त्या सर्व नात्यांना समांतर. आणि ती तशीच रहावी म्हणून मूक धडपडही सुरू असते. एकमेकापासून अनभीज्ञ असण्यामुळे आमच्यातल्या बोलण्यावर आमच्या आजूबाजूच्या तत्कालीक गोष्टींचा फारसा प्रभाव पडलाच नाही. एकमेकाचे मूड्स वगैरे प्रकार फारसे मधे आलेच नाहीत. नॅनी ऊगाच शंभर प्रश्न विचारायची. "काय संबंध हिचा?" हा विचार येण्यापेक्षा "काय फरक पडणार आहे?" हा विचार डोक्यात यायचा. खरं म्हणजे तर आजीबाईसारखे ईतके प्रश्न विचारते म्हणून नॅनी नाव पडलेले. आज जेव्हा असे कधी कधी निवांत बसतो तेव्हा वाटते, यार ... ३ वर्ष! केवढे काही झाले यात. मीही कुठच्या कुठे आलो आणि ती ही! जिथे आमच्या बोलण्यात "हू केअरस्?" भाव असायचा, तिथे बरेच दिवस कोणी पींग नाही केले की त्याचीही नोंद असायची. आणि हे असेच तब्बल ३ वर्ष सुरू आहे. मित्र व्हायला प्रत्यक्ष भेटायला थोडीच लागतं? बरेच किस्से ऐकलेले असे पेन फ्रेंड्स वगैरेचे. नॅनीमुळे मलाही असा एक अनुभव आला.

पण जरा विचार केला की वाटते की यात माझाच स्वार्थ होता. म्हणजे ते असे की कुठेतरी या मागच्या ईतक्या वर्षात हळू हळू मी स्वतःच गढूळ होत गेल्याची भावना येत होती. हाताकड बघीतलं की वाटायचं की यार ३-४ च तर रेघा आहेत. त्याही आखल्यासारख्या. असं कसं काय गिजमीट झाल्यासारखं वाटतय सगळं? बऱ्याच गोष्टी, बरेच विचार आतल्या आतच रहायचे. बोलतो कशाला? उगाच वाटायचे की आधी स्वतःकडे बघा - असले काहीतरी मीच स्वतःला म्हणून गप्प व्हायचो. आपलं अक्षर जरी चांगलं असलं तरी आपली पाटीच कोरी नसेल तर वाचणार तरी कोण? कधी काळी यावर असेही म्हणलो असतो, मी कसा का असेना म्हणून मी काय म्हणतो त्याचे महत्व आणि त्याचा दर्जा कमी थोडाच होतो? पण हळू हळू हे ऊत्तर पटेनासे झाले. आजुबाजूच्या बऱ्याच गोष्टींसाठी मी एक मूक प्रेक्षक व्हायचो. आणि आपण मूकपणे बघतो, म्हणून शब्द आणखीच रसातळाला जायचे. पण या सगळ्या गढूळपणात मग एक असेही अंग पुढे यायचे की जे एकदम पारदर्शक, एकदम स्वच्छ असायचं. अर्थाअर्थी काही संबंध नसताना, केवळ यात काही अशुद्ध नाही म्हणून बरं वाटायचं. त्याच्या टिकण्यानं किंवा न टिकण्यानं कोणालाही काही फरक पडणार नसायचा. पण तरीही त्याचं अस्तित्व ऊगाचच निरागस वाटायचं. त्यात कशाचं भय नाही. त्यामधे अजुनही खुली किताब आहोत आपण असे वाटायचं. यातून तयार होणारा नॉस्टॅल्जीयाच मग पुढे ते टिकवायला भाग पाडायचा. नॅनीबरोबरचं नातं कदाचीत माझ्यासाठी असं होत गेलं. आणि ते असच ठेवलं यामागं हा ईतका सगळा स्वार्थ! पण ... हे असं सगळं मला हल्ली वाटतं. म्हणजे आफ्टरमॅथ.

आपण टप्प्या टप्प्यानं मोठं होतो. प्रत्येक टप्प्यावर आपण वेगळे. बेटा बेटावरून पुढे जातो. प्रत्येक बेटावर कोणाकोणाला भेटतो. बऱ्याच कला दाखवतो. त्याची कदरही होते. त्यातून निर्माण झालेल्या अपेक्षांचे मुठभर मास चढवून मग पुढच्या बेटावर जातो. पण मग त्याच कला कलेकलेने मारूनही टाकतो. एक वेगळंच रुप घेतो. नव्या बेटावरच्या नव्या कला. चक्र सुरू. आणि मग परत एकदा या जुन्या बेटावरच्या सवंगड्यांची भेट झाली की मग मुखवटा पांघरतो. जसे काही आपण अजुन तसेच आहोत. पण मुखवट्यावीना होती ती मजा त्यात राहत नाही. कदाचीत समोरच्याला तिच मजा येतही असेल पण ते श्रेय कदाचीत मुखवट्याला आहे. बरीच बेटं पार केल्यावर, बरेच मुखवटे जमतात. आणि मग अचानक कुठेतरी एक जागा मिळते जिथे मुखवट्याची गरजच लागत नाही. कारण सगळंच अनोळखी. दरवेळी तितकंच नवं. मुखवट्यावीना स्वतःला बघणेही तितकेच रंजक. पुर्वी पुण्यात असताना दर वीकेंडला आश्रमातल्या मुलाना भेटायला जायचो. दरवेळी प्रचंड ताजंतवानं वाटायचं. त्या लहान लहान मुलांचा ऊत्साह बघून स्फुरण चढायचं. पण गेली २ वर्ष आता तो आश्रमही नाही आणि ती मुलंही नाहीत. अगदी तेवढं नाही, पण त्याची आठवण करून देणारं असं काहीतरी आहे हे बिना मुखवट्याचं वावरण्यात. नॅनी आणि माझी बडबड प्रसंगी अगदी निरर्थकही असली तरी यात अशी गोडी आहे. एकमेकाला चुकायचा स्कोपही आम्ही देत नाही आणि बरोबर चुक मोजतही नाही. एकदम काहीच्या काही बडबडत राहाणं आणि काहीच मनाला लावून न घेणं.

गेले ३ वर्ष ईतके काही झाले न भेटता. पुढेही कधी भेटू याची खात्री नाही. Thanks to Globalization. नॅनीचे लग्नही आहे आता थोड्या दिवसात. तिचे करीअरही सुरू होईल. एकामागून एक नव्या जबाबदाऱ्या खांद्यावरती घेईल. माझ्याही ऑफिसमधे माझ्या पुढच्या रोलची धडपड सुरू होईल. पायातली भिंगरी आणखी कुठेतरी घेऊन जाईल. आणखी एखादे बेट येईल. नवे लोक, नव्या कला, नवे मुखवटे. पण परत ती क्षणिक गडबड सरली की मेसेंजरवर एकमेकाला पिंग मारू ...

Hey ... you there?