बऱ्याच दिवसानी पुण्यात आल्यावर जसं सगळं जुनंच नव्यानं दिसायला लागलं तसं बरेचसे जुने अदृश्य झालेले मित्र वगैरेपण परत भेटायला लागले. नव्यानं बघताना नकळत आपण "किती बदललायस तू?" किंवा "काहीच बदलला नाहीस यार तू!" या वाक्याना जागा शोधत असतो. मला वाटतं प्रत्येकजण ही वाक्यं तरी फेकत असेलच. नाहीतर आपणतरी समोरच्याला "ईतक्या दिवसानी आलायस असं वाटतच नाही" या वाक्याला जागा करून देतो. पण कमीत कमी या वाक्यांची देवाण घेवाण झाल्याशिवाय आठवणी सुरूच होत नाहीत. पुर्वीच्या थेअऱ्या, लोजीकंच काय तर अगदी ठरलेले पीजे पण परत निघतात. जुन्या विश्वात घेऊन जातात या गोष्टी. परत सगळं तस्सच्या तस्स वाटतं. बऱ्याचदा असं होतं की आपण बरच पुढं आलेलो असतो. पुर्वीचे आपलेच विचार आपल्याला भोळसट वगैरे वाटत असतात. आपल्याच विचारांची ही दशा तर दुसऱ्यांच्या थेऱ्यांची तर आणखीच वाईट अवस्था असते. पण परत तेच दुसरे तस्सेच परत भेटले आणि बोलू लागले तर थोडावेळ का होईना आपण परत तेच सगळं अनुभवतो.
-------------------------------------------
"I think, I still live in illusions. मला अजुनही असच आवडतं रहायला. ज्याला जे चांगलं करता येतं त्यानं ते करावं. मला हे असं रहायला जमतं, मी असा राहतो."
हा असाच एक अनुभव परत जुन्या कॉलेजच्या वयातल्या गप्पांची आठवण देऊन गेला. अशावेळी जनरली मी गप्पच बसतो तसा यावेळीही गप्प ऐकत होतो.
"एखादी गोष्ट, एखादा प्रसंग, वेगवेगळ्या लोकाना वेगवेगळा वाटतो. वेगवेगळ्या लोकांनाच कशाला? माझं मलाच एखादं वागणं कधी असह्य वाटतं तर कधी सुसह्य! म्हणजे असं काहीतरी रसायन नक्की आहे आपल्यामधेच एका असह्य गोष्टीला सुसह्य बनवणारं? असं आहे काहीतरी आपल्यामधे की ज्यानं आपल्याला, सहसा अशक्य वाटणाऱ्या गोष्टीपण सहज शक्य होतात. ‘मी अमुक अमुक केल्याशिवाय राहूच शकत नाही’ हे प्रकार मला खरच हस्यास्पद वाटतात. म्हणजे एखादी गोष्ट आवडणे, नावडणे, कोणावर राग, किंवा प्रेम वाटणं हा सगळा किती विचित्र आणि अशाश्वत प्रकार आहे! हे सगळं कंट्रोल करता आलं पाहिजे. म्हणजे जर का ही रसायनं कंट्रोल करता आली पाहिजेत. मग स्वतःच स्वतःचा डाव दिग्दर्शीत करायचा. विचार केला जरा तर फारसं अवघडही काय त्यात? ईतकी वर्षं स्वतःबरोबर राहील्यानंतर ईतकं तरी कळालं पाहीजे ना, की काय केल्यावर कधी कसं वाटतं! आणि तसं वाटवून घ्यायचं"
गडी बदलला नसला तरी सुधारीत अवृत्ती नक्कीच झालेला. मी आपलं मधेच पिल्लू सोडलं, "Are you talking about manipulating yourself? Is it a manipulation?"
समोरच्यानं प्रश्न वगैरे विचारले (फुटकळ किंवा असंबद्ध जरी असले तरी) अशावेळी बोलणाऱ्याला मस्त किक बसते. "असेलही. I don't care. Why should I care anyway? सत् चित् आनंद! गीतेमधे सांगीतलय भावा! आणि नसतंही सांगीतलं तरी काय!"
ईथं गीतेमधे exactly काय सांगीतलय याचा संदर्भ मला अजुनही आजीबात कळालेला नाही. पण कदाचीत त्यानंही चान्स मारून गीतेचं ज्ञान खपवलं असेल असं म्हणून मीही पुढे आपलं श्रोत्याचं काम सुरू ठेवलं.
"म्हणजे कसं स्वतःचच आयुष्य नाटक लिहील्यासारखं लिहायचं. आता बघ. सारखंच काय एकाच मूडमधे राहायचं? मधे मधे चिडायचा मूड आला, की पुढे घडणाऱ्या बऱ्याच गोष्टी तशाही माहीत असतात. त्यातली एखादी निवडायची आणि त्यावेळी सगळी चिडायची खाज भागवायची. बरं ना. आपण म्हणजे चिडायचं तेही आपल्यासाठी. परत कोणावर डुख धरून बसायचं कारण नाही. कधी चिडायचा मूड नसेल आणि कोणी अगाऊपणा करत असेल तर मग केवळ हे आपण Orchestrate केलेलं नाही म्हणून निघून जायचं. माझ्या कथेमधे हे नाही म्हणून कानाडोळा करायचा. म्हणजे तेही पथ्यावर. म्हणजे डोकंही वापरायचं पुढच्या घटनांचा बरोब्बर वापर करण्यासाठी. कधी खुश तर कधी ट्रान्समधे. जेव्हा जसे हवे तसे. तेही संपुर्ण कथेचा तोल सांभाळत. एकदम लाईव ड्रामा. रन टाईमला स्क्रिप्ट तयार करत जायची. What say? Logical?"
मीही हळू हळू मूडात येत होतो. "तुला अजुनही लोक येडा म्हणत असतील ना?"
"सोड रे. त्याना झेपत नाहीत या गोष्टी. असंख्य लोकानी केलेल्या अगणित गोष्टींच्या परणामानं ज्यांचं आयुष्य पुढं सरकतं त्याना माझ्या या थेअरीची मजा काय कळणार?"
"I know. So much." मी हसलो. पण त्याचा मुद्दा ध्यानात येत होता माझ्याही.
"कथा एवढीच नाही. त्याच्याही पुढं जाऊन लोकांच्या नजरेत आपण कसं दिसावं हेही आपण ठरवावं. म्हणजे जर आपण आपल्या कथेमधले कलाकार असलो तर त्या कलाकाराच्या कुठे कुठे आणि कशा कशा एंट्र्या व्हाव्या, आणि कशी ईंप्रेशन्स पडावीत, हे जसं आपण ठरवायचं तसं. आणि मग पुढचा खेळ रचायचा. शेवटी आपण तसेच दिसलो की नाही समोरच्याला हेही चाचपायचं. यातलं बरचसं आपण सर्वच करतो. पण एका ठरावीक मर्यादेपर्यंतच. म्हणजे. कसं वागावं, बोलावं हे तर आपण सगळेच काळजीपुर्वक ठरवतो. पण काही नियम पाळून. एका सुसुत्र कथेमधे याचा काय परीणाम होणार या विचारानं नाही. बऱ्याचदा हे करता करता बऱ्याच लोकांसमोर बरेच चेहरे तयार होतात. पण कधीतरी यानाही एकत्र आणून नव्या कथा जमवाव्या लागतात. सगळे आपल्याच मनात. पण real time. बाकीच्यांच्यासाठी काय ते माहित नाही पण आपल्यासाठी आपलीच कथा पुढे सरकवायची. कधी कुठे काही चुक झालीच तर ती कथेची मागणी होती म्हणून स्वतःलाच पान पुसायचं. कथा पुढे बदलायचा मार्ग आहेच."
मीही जरा गाडं पुढं सरकवलं. "तुला ऊगाच वाटतं हे वेगळं आहे. कदाचीत त्या त्या वयात होतं ठीक. पण डोळे ऊघडून बघ लेका. By and large सगळे असेच जगतात. थोडे फार मागे पुढे."
"Approach महत्वाचा भाऊ. मी औषध म्हणून खाल्लेला आंबा वेगळा (म्हणजे कोणी देत असतील तर...) आणि मला आंबा आवडतो म्हणून खाल्लेला वेगळा. काय? वेगळा की नाही? माझ्या दृष्टीनं मी माझी कथा पुढं सरकवतो की जी नंतर वेगळ्याच पातळीवर जाईल. तेव्हा मला त्या त्या अवस्थेतली कारणं या आजच्या मी तयार केलेल्या सीनमधे मिळतील. पण बाकीच्यांच्याकडं केवळ ‘ते असच असतं’ किंवा ‘सगळे असेच करतात’ असली सच्यातून काढल्यासारखी ऊत्तरं असतील."
"आणि तुझ्याकडं काय असेल?"
"Of course I will have a better answers. ‘Because I have scripted my life in this way.’ मला असं जगायला आवडतं. मी रंगवलेलं चित्र. जसं आहे तसं. पण माझं आहे. त्यातला मी, खरा मी आहे की नाही वगैरे असले पुस्तकी प्रश्न नाही पडत मला. कधी कधी चित्र रात्रीसारखं गडद काळं होतं. कधी कधी सकाळसारखं तेजस्वी. मला काळं झाल्याचंही आजकाल दुःख वाटेनासं झालय. तेजस्वी झाल्याचा अभिमानही वाटेनासा झालाय. पण माझं मी रंगवतोय यात मात्र मजा येतेय. समोर जे काही आहे, परीस्थीती असो, किंवा कोणी व्यक्ती असो. माझा मूड, माझं वागणं किंवा प्रतिक्रिया ठरवायचा हक्क मी आणि कोणाला का देऊ? त्यानं परीस्थीती बदलणार नाहीए. न का बदलेना! बरी किंवा वाईट. कशीही असो. बरी असेल तर तसाही प्रश्न नाही. वाईट असेल तर तसंही सामोरं जाताना जरा थोडंसं सोपं तरी जाईल. कारण जशी कशीपण असेल, माझ्या कथेसाठी ती फक्त एक परीस्थीती आहे, शेवट नाही. माझ्या थेअरीचं हे मुलभूत तत्व आहे. बाकीच्याना युगं लागतील हे शिकायला. अचानक गोष्टी माझ्याकडंही घडतात. अगदी काहीही न ठरवता मीही प्रतीक्रिया देतो. पण नंतर त्याही कथेमधे बरोबर गुंफतो. ऊगाच सगळंच ठरवून होतय असं वाटायला नको. तसं मला जमतही नाही आणि गरजही नाही कदाचीत.
तुम्ही पेपरमधे दंगा मारामारी वाचता, हवालदिल होता. मी असेन चिडायच्या मूड्मधे तर घालीन चार शिव्या आणि मोकळा होईन ..."
"नाहीतर?"
"... नाहीतर मी त्यामधेही काहीतरी वेगळं बघेन. मला नसेल मूड खराब करायचा तर मी कदाचीत तसल्या बातमीमधे कोण काय ऍक्शन घेतायत ते बघेन. जनतेला काय अवाहन केलेय ते बघेन आणि मीही तेच करतोय का ते बघून खुश होऊन पुढे निघेन. तसं प्रत्यक्ष जाऊन मी कूठेही काही दिवे लावणार नाहीए. पण ईथे जे काही आहे त्याला काहीतरी बेस देऊन पुढे जाईन. परत माझ्या पात्राला असल्या situation ची गरज पडली तर रेफरन्स तयार.
हे असं स्वतःसाठी illusions करणं म्हणजे स्वप्नात वगैरे राहणं नाही. फक्त स्वतःच्या वागण्या बोलण्याचा, क्रिया प्रतिक्रियेचा ताबा स्वतःकडे ठेवणं आहे. केवळ ताबाच नाही. आपल्याला हवं तसं ते ठरवणंही आहे. यामधे प्युरीटी नाही किंवा हे आर्टिफिशिअल आहे वगैरे भानगडी ऐकलेत मी. पण जरा विचार करू - आजूबाजूच्या कोणी काही म्हणावं किंवा करावं, काही व्हावं किंवा नाही व्हावं याला हजार गोष्टी कारणीभूत असतील. या सगळ्यानी जर मी माझा मूड बदलवणार असेन तर काय मजा? म्हणजे आख्ख्या जगानं ठरवलं मला कसं वाटायचय ते तर ते चालतं पण स्वतः असं काहीतरी ठरवलं की मग का artificial? ज्याना कथा रचता येत नाहीत त्यानी या भनगडीमधे पडलं तर artificial, नाहीतर कुठलं काय artificial!?
आपण मोठे लोक वगैरे बघतो. सचिन तेंडुलकर घे. नाहीतर अंबानी घे. नाहीतर तुझा ऑफिसमधला बॉस घे (म्हणजे जर बॉसला आदर्श म्हणून वगैरे बघत असशील तर). बऱ्याचदा आपण नाही त्यांची स्टाईल कॉपी करायचा प्रयत्न करत? ते दररोज खिशाला कोणा अमुक अमुक कंपनीचं पेन लावून येतात, म्हणून आपणही लावतो. ते एका ठरावीक स्टाईलनं बोलतात म्हणून आपणही बोलतो. पण मी जेव्हा यासगळ्याना बघतो तेव्हा मी ऊलटा विचार करतो. यांच्या आयुष्यात कसे कसे सीन घडले असतील की ज्याचा परीपाक म्हणून ही माणसं अशी झाली. आणि मी सीनच्या सीन ऊचलतो. माझा सीन थोडाफार तसाच बनवायचा प्रयत्न करतो. कुठल्या सीनचं पुढे काय होणार आहे अशी सांगड घालत बसतो. कुठले सीन माझ्या कथेमधे येणार आणि कुठले येणार नाहीत यांची पकड ठेवायला जमणं सोपं नाही मित्रा. मलाही जमतं असं नाही. पण तिकडच वाटचाल सुरू आहे. तुम्ही दृश्य गोष्टींचं अनुकरण करताना जितकी कमीटमेंट दाखवता तितकी मी त्यांच्या कथेमधले मागचे सीन्सचा विचार करण्यात घालवतो. स्टाईल माझ्यापण तयार होतील. पण जसं आज आपण याना बघतो, तसं उद्या आपल्याला कोणी बघावं असा सीन लिहायचा प्रयत्न करतो. आज लहान सहान गोष्टी करत असेन मी याचा. पण भाऊ कधीतरी या लेवलवर नक्की पोहोचेन तेव्हा बघशील."
खरं सांगायचं तर एकेकाळी मीही या सगळ्याना भारावून गेलेलो. कोणाला मी असं बोललोही असेन की I live in illusions (म्हणजे याच्या थेअरीप्रमाणं याची फक्त स्टाईल कॉपी करून!), पण ईतका सहजी त्याचा विसर पडेल असंही वाटलं नव्हतं. कधीकाळी भारावून टाकणाऱ्या गोष्टी खरच भारावून जायच्या लायकीच्या असतात की आपण ते भारावून जाणं वगैरे सगळं खरच प्रासंगिक असतं? एखाद्या गोष्टीवर फार ऊशिरा किंवा क्वचितच मत व्यक्त करतो असं म्हणाल्यावर ‘माझ्या कथेमधलं स्थान हुडकत होतो’ असं मला हळूच सांगणाऱ्या या मित्राबद्दलच कुतुहलात्मक आकर्षण अजुनही कायम आहे. कदाचीत बऱ्याचशा गोष्टी माझ्या आयुष्यात घडतील की ज्या ठरवतील की मी याला आणि याच्या थेअरीला लक्षात ठेवायचं की नाही ते. नाहीच राहीलं लक्षात तर परत बाकीच्या असंख्य गोष्टी ठरवतील की आम्ही परत भेटू की नाही ते. आणि मग परत या सगळ्यांची आठवण होईल.
किंवा तो ठरवेल की त्याच्या कथेमधे आम्ही परत भेटणं आवश्यक आहे की नाही ते. जर असेल तर तो भेटेलच.
No comments:
Post a Comment