(नटरंग सिनेमातले काही प्रसंग या पोस्टमधे वापरलेले आहेत. तसे फार काही सिनेमातलं गुपित ऊघडलय असं काही नाहीए, पण तरीही आपली एक सुचना.)
सिनेमा पहिल्या तासाभरातच अशा एका ठिकाणी येतो की, गुणाला जर तमशा टिकवायचा असेल तर नाच्या म्हणून स्वतःच ऊभं रहायची वेळ आलेली असते. त्यानं हे ठरवल्यानंतर एक सीन आहे, एक क्षणभर. तुफान पावसात, राजाच्या वेशामधे दगडावर ऊभा असलेला गुणा. अशक्य कन्विक्शन. नजर थेट समोर, क्षितिजाच्या थोडीशी वर. चेहऱ्यावर तेच राजाचे जबरदस्त भाव. पावसाच्या थेंबांचे असंख्य बाण थेट चेहऱ्यावर आपटून गलीतगात्र होऊन निखळून पडताना. तरीही नजर स्थिर.
कसं होतं ना, बऱ्याचदा कलेपेक्षा कलाकार मोठा होतो. आपल्या ध्येयापेक्षा कधी आपणही मोठे होतो. छोटेमोठे आपलेच नखरे ऍटीट्युड बनून आपल्यालाच कायमचे लटकू लागतात. वाट तिसरीच होते किंवा या लेबल्सच्या वजनानं आपण चालणंच बंद करतो. लेबल्स सांभाळू की चालत राहू. एखादं क्षणिक यश मिळवून देणारं लेबल आपल्याला आख्खं चालणंच विसरायला लावतं. जेव्हा जेव्हा मी कोणालातरी यासगळ्या चक्रावर मात करताना बघतो, मला भलतं भारावून जायला होतं. या सिनेमामधे, सुरुवातीला गुणा कायम राजाच्या पात्राची तालीम करताना दिसतो. राजाचं पात्र त्याच्या अगदी अंगात ऊतरल्यासारखं. पडद्यावर गुणा आला की आता "परदानजी" म्हणूनच आरोळी मारेल ईतपत. पण नंतर त्याचं स्वप्न, तमाशा टीकवायची वेळ आल्यावर त्याला या स्वप्नातल्या राजाची आहुती द्यावी लागते. आपलं स्वप्न तमाशा ऊभा करणं आहे, कला दाखवणं आहे, एक राजा साकार करणं एवढ्यावर सीमित नाही. हे गुढ ऊकलणं फार मोठी गोष्ट आहे. मला खरच असलं काहीतरी बघून फार विलक्षण काहीतरी वाटतं. आणि आदरही.
असं होतं ना बऱ्याचदा (कमीत कमी माझ्याबाबतीत तरी बऱ्याचदा होतं) की "मंजिलसे बेहतर लगने लगे है रास्ते!" आणि चक्क यात काहीच वाटत नाही. Royally given up! असं काहीतरी. कदाचीत बहुतंशी लोक असच करतात, किंवा करताना दिसतात. म्हणून आपलाही Tolerance आपसूकच वाढलेला असतो. आजुबाजूच्या घडणाऱ्या बह्वंशी गोष्टींसारखं काहीतरी केलं की आपण "फार काही" वावगं करत नाहीए आणि म्हणून बरोबर करतोय, ही भावना काय जोर करून बसलेली असते मनात! हे आजुबाजुला बघून अनुकरण आणि तुलना करायची जी आपली सवय आहे ना, कदाचीत सर्वात बेस्ट आणि वर्स्ट आहे! असुन अडचण, नसून खुळांबा!
पण असो. अधे मधे असं काही बघीतलं की मग परत सगळी जळमटं सरकवून परत आपल्याला खरं काय करायचं होतं आणि आपण आत्ता खरच ते करतोय की रस्त्यातल्या कशाच्या प्रेमात पडलोय, ही असली गणितं घालायला होतं.
प्रत्येकाकडं एखादं स्वप्न असतच. त्यात जो तो राजाही असतो. स्वप्नं घडवण्यासाठी राजेपणाला तिलांजली देण्याचा प्रसंग जेव्हा येतो, तेव्हा बरेच मोहरे गळतात. जे टिकतात तेच कदाचीत हिरे बनतात.