Friday, December 02, 2016

ले के रहेंगे... आ जा दी

परवा अथेन्समधून परत येताना राडा झाला. तसा तिकडे जाण्यासाठी निघतानाच सुरु झालेला. फायनल बोर्डिंगच्या क्यूमध्ये उभं असताना फोननं हापुशी घातली! अथेन्समध्ये दंगा सुरु झाला अशी बातमी आली. टायमिंग असलं अफलातून की अगदी दोन मिनिटात विमानात बसणार होतो. ओबामा आला, लोकं चिडले, मोर्चे काढले, ओबामा त्याचं काम करून गेला, लोकं मात्र मारामाऱ्या करायला लागले. हे सगळं वाचून क्षणभर विचार केला की ब्वा जायचंय की नाही? पण मोर्चा बीर्चाचं आपल्याला काय कौतुक? आपण स्वतः मोर्चामध्ये सामील झालेली माणसं! म्हणून ठरवलं जाऊच या. काय हाय काय अन नाय काय? तोवर आपला नंबर पण आला लाईन मध्ये.

आपलं नशीब इतकं भारी की या दिवसाच्या दुसऱ्या दिवशी होता स्टुडंट्स डे. जरा कमी लोकशाही दिवसच असायचा. पण कोणीतरी याला स्टुडंट्स डे बनवलं. हा दिवस म्हणजे १९७३ ला ग्रीसच्या स्टुडंट लोकांनी युनिव्हर्सिटीच्या कट्ट्यावर येऊन आरोळी ठोकलेली, "ले के राहेंगे... आ जा दी!!" तो दिवस. घ्या आता. तरीपण हा विषय आपल्याला जरा विशेष होता. म्हणजे ग्रीसने जगाला लोकशाही दिली हे माहिती होतं पण तिथंही अजादीसाठी लढा दिलेला आणि तोही नुकताच ४० वगैरे वर्षांपूर्वी हे माहिती नव्हतं. तर असं झालेलं म्हणे तिकडं काहीतरी. येताना कॅब ड्रायवर बरोबर गप्पा मारताना त्यानं सांगितलं.

या ड्रायवरचं नाव थॉमस. तो म्हणाला की ८-१० वर्षं लष्करानं ताबा घेतलेला म्हणे यांचा. शेवटी स्टुडंटनी दंगा सुरु केला आणि फायनली मिळाली यांना लोकशाही. परत. दर वर्षी आता त्या दिवशी युनिव्हर्सिटी पासून ते अमेरिकन एम्बसीपर्यंत हे लोक रॅली काढतात. अमेरिकन एम्बसीचा संबंध काय झेपाला नाही. पण ठिके. अमेरिकेच्या नावानं किंवा अमेरिकेच्या नावपुढं ओरडायचा छंद युरोप मध्ये तसंही सहज सापडतो. बाकी रॅली म्हणजे किती शांततेत असते माहित्ये की आपल्याला. तर इकडंही असंच झालं. त्यामुळं सलग दुसऱ्या दिवशीही सेंट्रल अथेन्स बंद करावं लागलं.
थॉमस म्हणाला की "लोकं चिडलीत."
मी म्हणालो "कशासाठी? लोकशाही मिळाली न या दिवशी? की लोकांना लष्करच हवंय अजून?"
तर तो खुदकन हसून म्हणाला की "नाही. तसंही नाहीए. आम्ही ग्रीक आहे न? म्हणून काढत बसतो मोर्चे अधे मधे!! बऱ्याचदा आम्हालाही कळत नाही काय पॉईंट आहे ते."
पाहुण्यांच्या समोर हसत हसत घराची इज्जत काढणारं वात्रट पोर सगळ्यांच्याच घरी असतं म्हणा. असो. ज्याची जळते त्याला कळते. आपण बाहेरून येऊन ४ मिनिटांच्या संवादामध्ये रॅशनॅलिटीची काय अपेक्षा धरावी? थॉमसनं चिडण्याचं कारण म्हणून सरळ मला गणितच सांगितलं.
म्हणाला "हे बघ. तू आत्ता दहा युरो देशील. त्यातले बावीस टक्के टॅक्स आणि वर सव्वीस टक्के सरकारला कर्ज चुकवायला. आठठेचाळीस टक्के गेले इकडेच. बाकीच्यातले थोडे कॅबवाल्या कंपनीला द्यायचे ते मी अजून मोजतच नाहीए."
"बरेच झाले की हे. मग कसं करता मग मॅनेज?"
"भरत नाही टॅक्स." एकदम सोर्टेड.
"मग?"
"मग सरकार आणखी टॅक्स वाढवतं! त्यांना कर्ज चुकावायचंय." हाही समजूतदारपणा!

आता यावर काय बोलता? पण थॉमसची गोष्ट एवढ्यावर नाही संपली. आजसे बीस साल पहले वाला अँगल पण होता त्याच्याकडे. हमारी दोस्ती भूल गये टाईप राष्ट्रीय दुःख थॉमसनं प्रयत्नपूर्वक मनात जपलेलं. म्हणाला "काये. आमच्या पुढच्या पिढ्यांना पुरेल इतकं कर्ज करून ठेवलंय आमच्या सरकारनं. ते पैसे परत मिळवण्यासाठी जर्मनी वंगाळ नियम टाकतात आमच्यावर. आमचं सरकारपण मन खाली घालून ऐकतं सगळं. ते लोकांना आवडत नाही. मग लोकं ऐकत नाहीत. पण मुळात जर्मनीला आम्ही आवडतच नाही. हा इथं प्रॉब्लेम आहे!" थॉमसची दुखती नस पुढे होती. म्हणाला की, "जर्मनीचा दुसऱ्या महायुद्धामुळं ग्रीसवर राग आहे. तेव्हा जर्मनी हरलं ते ग्रीसमुळे! तरी आम्ही त्यांना खूप पैशाची मदत केलेली युद्धानंतर. पण आमचे लोक आपसात भांडत बसले. कोणी पैसेच परत मागितले नाहीत. आता जर्मनी आमची मदत विसरलंय. आता जेव्हा आमची पैसे परत करायची वेळ आली तेव्हा विसरायचं तर सोडाच, पण ते लोक त्यावर इंटरेस्ट पण लावतायत!!"

आम्ही विसरलो, तुम्हीही विसरा हे असलं फ्रेंडली सोल्युशन बेष्ट. तसंही आपल्याला नाही का वाटत की ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी ते कसे मोठ्या मनानं गरिबांना वाटून टाकावे. तसंच की हे थोड्या फार फरकानं. पण मी खरं तर इथपर्यंत पोचलोच नाही. आपली सुई त्याच्या पहिल्या वाक्यावरच अडखळली.

मी विचारलं, "दुसऱ्या महायुद्धात काय काय काय?" आपलं दुसरं महायुद्ध सुरु झालं पोलंड, ऑस्ट्रिया पासून, पुढे जर्मनी, इंग्लंड वगैरे. मग अमेरीका, रशिया आणि मग डायरेक्ट हिरोशिमा नागासाकीवर बॉम्ब. या सगळ्यात ग्रीसमुळं जर्मनी हरलं हे कुठं हुकलं कळेचना.

प्रत्येक देशाच्या, प्रत्येक गावाच्या आपल्या आपल्या वदंता असाव्यात. तिथल्या तिथल्या लोकांना रमायला आवडतील अशा. तुम्हाला पटो न पटो. तसंच थॉमससाठी एकदम सौ फी सदी सच होतं हे. आणि असेलही खरं. काय सांगा?

म्हणाला, "काय झालेलं? की जर्मनीला वाटलं आपण ग्रीसला असंच जिंकू. आणि मग पुढे जाऊ रशियाला जिंकू. पण ग्रीक लोकं भारी. त्यांनी टफ दिली जर्मनीला. हा असा इकडं डोंगर. जर्मनी त्या साइडला. ग्रीस या साईडला. ग्रीसकडं नव्हती फारशी शस्त्रास्त्र. हे लोकं पडले शेतकरी लोक. मग त्यांनी काय केलं? त्यांनी आणले ट्रॅक्टर. ते लावले डोंगराच्या बाजूला. आणि तेच सुरु करून ठेवले. पलीकडे जर्मन सैन्याला वाटलं रणगाडे आहेत. आणि यामुळं लांबली लढाई. खूप महिने सुरु राहिली. पुढे जर्मनीने ग्रीस काबीज केलंच. पण झालं असं की त्यांना रशियाकडं जायला झाला उशीर. समरच्या ऐवजी विंटर मध्ये जावं लागलं. थंडी कुठे झेपती तिकडची? मग तेव्हापासून जी उतरण लागली जर्मनीला ती थेट हरेपर्यंत. चर्चिलपण म्हणाला तेव्हा की Greeks don't fight like Heroes. Heroes fight like Greeks!" थॉमसला स्वतःलाच मजा आलेली गोष्ट सांगून.

"Wow! मला खरंच हे असलं काही माहिती नव्हतं. टू मच. पण मग तुम्ही पैसे का दिलात जर्मनीला?"
"शेजारधर्म म्हणून. त्यांना उभं राहायला गरज होती." पण अब वो ये सब भूल गये है - असला राग होता बिचाऱ्याचा. त्यात पुढे आता गोष्टीमध्ये लष्कर बिष्कर पण येणार होतं.
"पण आमचे लोक बसले कुठेतरी तिसारीकडंच अडकून. असलंच काहीतरी करत बसतात आमचे लोक. आता जर्मनी बघा विसरतंय का पैसे परत घ्यायला?"

तेवढ्यात आम्ही पोचलो आमच्या ठिकाणी. थॉमसची गोष्ट रंगात आलेली पण मग थांबवावी लागली. म्हणाला पैसे नको. गप्पा मारून मजा आली. तरीही मी आग्रहानं दिलेच आणि म्हणालो की यावाल्या पैशावरचा टॅक्स भर.

शेवटी कोणी कोणापासून कुठली आजादी मिळवली काय माहिती. आणि आजादी नसली तर सत्ता कोणाची हेही काय माहिती. शेवटी लोक त्यातच आपापलं काहीतरी शोधून काढतात. त्यातच त्यांना विरंगुळा सापडतो. त्यातच पुढचं पान उलटतात.