Friday, November 08, 2019

प्रिय तू

"आपण न... काही बाबतीत माठ होतो. म्हणून आपल्यात बायोलॉजी नव्हतीच. केमेस्ट्रीचा तास एव्हाना आता संपल्यात जमा आहे. उरलंय ते फक्त फिजिक्स. यात फोर्स इज प्रोपोर्शनल टू मास आणि ऑब्जेक्ट्स आर क्लोजर दॅन दे अॅपियर इन द मिरर. अठ्ठ्याण्णव मार्क्स काढलेले आपण यात! आठवतंय का? पण आता फेस येणारे."
.
.
.
.
असो.
तर ..
प्रिय तू,

तुला भेटून खूप दिवस झाले. मधेच कधीतरी, खूप आठवण येते तुझी. पोट भरून कडकडून भेटावं असं वाटतं. म्हणावं तर रद्दी सुरू आहे माझं सगळं. म्हणावं तर badass पण झालेली आहे मी. पण अशा badass रद्दी पणात सुद्धा एखाद् दिवशी घरी येऊन घडा घडा दिवसात काहीच झालं नाही त्यावर तासभर बडबडत बसावंस वाटतं. पण मग तसं झालेलं काहीच नसतं. आणि तू तरी कुठं असतोस?

आता मोठं झाल्यामुळं न, कोणाचीच गरज नाही खरंतर. नाहीतरी, मॅच्युअर्ड मॅच्युअर्ड च्या नावाखाली सगळं खपून जातंच की. आणि नाही म्हणलं तरी, भटकायला गेले की मला आपल्या गँग मधले एक आणि एक जण सापडतात. मग कशाला हवंय कोणी? कधी कोणी बाकड्यावर फोन चघळत असतो, कोणीतरी कॉफी पीत खिदळत असते, कोणी ट्रेनच्या फलाटावर, कोणी उबर मध्ये, आणि अगदीच रात्री बाहेर पडलं तरी कुठल्यातरी अनोळखी इमारतीमध्ये सुद्धा एखादी ओळखीची खिडकी सापडते. आणि मग त्यातून कोणीतरी हळूच डोकावून जातात.

आपण सगळेच कसले भारी होतो न? नग एकदम! दिसतातच राव हे यत्र तत्र सर्वत्र. कोणीही कुठंच गेलेलं नाही. म्हणूनच कदाचित. Otherwise ओक्के आहे मी. काय नाही कोणाची गरज खरंतर. पण च्यायला, या सगळ्यात तू कधीच येत नाहीस. मी न.. या सगळ्यांबरोबर गप्पा जरी मारल्या, तरी पण रागारागानं तुझा विषय काढत नाही. का काढावा? बाकी सगळे जरी इथून तिथून डोकावले, तरी मी तुला डोकं वर काढू देत नाही. तू पण जरा अवघड झालायस आजकाल. कारण तू चुकून डोकं वर काढलंस की मग थोडं टॅंजंट जायला होतं. सगळं कसं कोपलकल्पित आहे याची बाराखडी सुरू होते. Let's get real जरी खरं असलं तरी Let's get real in a worst possible way कशाला? आपला इथं खटका उडतो. तुझ्या मते जर सगळे माझ्याच मनाचे खेळ असतील तर त्यात तुझी लुडबुड कशाला? तू कुठं असतोस च्यामारी माझ्यात? त्यामुळं न, तुझं नसणं हेच तुझं रेप्युटेशन झालेलं आहे. त्याचा हा परिणाम. त्यापेक्षा नकोच न! खयली पुलाव तर खयाली पुलाव. त्यानं माझं पोट खरखुरं भरतं. तुझ्या real नं खोटी भूक ही भाग नाही! And Joeye doesn't share food. त्यामुळं न, तू जरा दूरच रहा माझ्या या पोटभरीपासून.

तुला ते _रविना, तुम रविना नही, करीना हो_ आठवतंय? मला आपला हा आणि त्याची ती दिसलेले परवा. मी बसमध्ये आणि ते दोघे रस्त्याच्या कडेला उभे होते. मग जाता जाता मी तुझी तक्रार केली त्यांच्याकडे. तक्रार म्हणजे काय अरे, तेच उगाच आपलं चार आण्याच्या कोंबडीला बारा आण्याचा फिलॉसॉफीकल मसाला! इतकी वर्षं झाली तरी तेच सुरू आहे बघ अजूनही. पण मग तू नाहीयेस या सगळ्यात याची तक्रार. तू कधी नव्हतास पण म्हणा तसा. पण तू असू शकशील, यावर इमले बांधलेले. किंवा तसा होतास पण की तू. नाही काय? तेच जरा taken for granted झालेलं. पण आता तू असू शकशील हा भागच संपला असं वाटायला लागलंय. म्हणजे हा आत्ता जसा तू आहेस, तो जर तू असणार असशील, तर तो तू, हा माझा तू नहीचेस की. मी पण ती नाही वगैरे सगळं आहेच. पण मग मी कुठल्या तरी दुसऱ्याच तू बरोबर आहे.

यावर _मै किसी और के साथ हूं देव_ आठवायचं सोडून, या दोघांना _रविना, तुम रविना नही, करीना हो_ हे आठवावं! आणि मग नंतर _तुम पहले तुम्हारा प्रॉब्लम नक्की करो, लड़की, पैसा के घर?_ हे आठवलं. नॉनसेन्स सगळे! तसंही आला माझा स्टॉप पुढं लगेच. आपली सगळी माकड मंडळी मला अजून माकड म्हणूनच दिसतात. त्यामुळं काही सिरीयस राहतच नाही जास्ती वेळ. म्हणून तर. ओक्के आहे मी. काय नाही कोणाची गरज खरंतर.

मी इतकी मोठी झाले तरी आपले सगळे लोक मला अजून तसेच नौटंकी भेटतात. म्हणून न मग प्रत्यक्षात येऊन कोणी आवर्जून भेटत बिटत नाही, त्याचं बरं वाटतं. ते ते सगळे त्यांच्या त्यांच्या बेस्ट आवृत्ती मध्ये असतानाचे साठवून ठेवलेत मी. ते तसेच ठीक आहेत खरंतर.

पण त्यात तू नहीयेस.

आपण न... काही बाबतीत माठ होतो. म्हणून आपल्यात बायोलॉजी नव्हतीच. केमेस्ट्रीचा तास एव्हाना आता संपल्यात जमा आहे. उरलंय ते फक्त फिजिक्स. यात फोर्स इज प्रोपोर्शनल टू मास आणि ऑब्जेक्ट्स आर क्लोजर दॅन दे अॅपियर इन द मिरर. अठ्ठ्याण्णव मार्क्स काढलेले आपण यात! आठवतंय का? पण आता फेस येणारे.
.
.
.
बाय द वे, फेस म्हणजे केमेस्ट्री मध्ये मोडायला हरकत नाही न?
.
.
झालं बघ सुरू परत. असो.
.
.
कळावे. म्हणजे कळलं असेलच तुला.
.
बाकी साष्टांग नमस्कार आहेच.
.
जा गेलास उडत.


No comments: