Saturday, April 11, 2020

काय खाणार, बोला?

प्लॅस्टिक पिशव्या वापरू नका, त्या पेक्षा कागदी किंवा कापडी पिशव्या वापरा - असा एक काळ होता. आठवतंय? तेव्हा मला एक लाईट बल्ब मोमेन्ट आलेली. ती अशी की, अमुक च्या ऐवजी तमुक पिशव्या वापरा हे जरी तेव्हाची निकड असली तरी, एकूणच इतक्या पिशव्या वापराच कशाला, असा विचार केला तर? म्हणजे, पुणे सेंट्रल मधून मी चार गोष्टी घेऊन बाहेर पडलो, की, चारही दुकानाच्या जाडजूड मोठ्या कागदी बॅग्स हातात असायच्या. म्हणजे, हे पण कुठेतरी कमी नको व्हायला? मग याच्या पुढची लेव्हल म्हणजे, एकाच बॅग मध्ये सगळ्या गोष्टी घातल्या तर? मग माझ्या एकाच पाठीवरच्या बॅगमध्येसुद्धा सगळं मावतं की! त्याही पुढची लेव्हल म्हणजे, इतक्यांदा जायलाच कशाला हवं पुणे सेंट्रल मध्ये? आणि मग तिथून वेगळाच अँगल निघाला. प्लॅस्टिक तसं म्हणाल तर वाईट कुठंय? खूप सही गोष्ट बनवलीय की प्लॅस्टिक म्हणजे. प्लॅस्टिक मुळेच सुरळीत झालेली किती उदाहरणं आहेत! पण मग आपण केलेल्या अतिरेकाचं बील कोणावर तरी फाडलं पाहिजे की. मग म्हणून ते प्लॅस्टिकला व्हिलन बनवलं. आता उद्या कागदी पिशव्या उदंड वापरल्या, की मग झाडं तुटणारच न. मग एकूणच आपण किती वापरत सुटायच्या गोष्टी, यावर थोडीशी चर्चा, किंवा स्वगत का होईना, थोडासा विचार आवश्यक नाही का? आपल्या एकूणच गरजा किती आहेत. आणि त्यासाठी आपण किती उड्या मारतो, याचा ज्याचा त्याने आढावा घेणं आणि त्यावर काहीतरी कृती करणं जास्ती बरोबर नाही का?

ही अशी काहीशी तेव्हा, म्हणजे खूप खूप वर्षांपूर्वी, चर्चा झालेली. याचा अर्थ, सगळं सोडून एकदम जीवन मिथ्या आहे हा मार्ग पकडून, जगायला काय लागतं म्हणून पंचा नेसून जा असं म्हणणं नाही? पण कुठल्याच टोकाला न जाता थोडं फार प्रमाणात आणूच शकतो की, हे असं म्हणणं आहे. By the way, त्या सगळ्या चर्चेची परिणीती कशात झाली असं विचाराल, तर तशी खूप मोठ्या प्रमाणात कशातच नाही. पण माझ्या स्वतःपुरतं म्हणाल तर मी शाकाहारी झालो. हेच काय तर फार फार तर फलित. आता प्लॅस्टिक आणि शाकाहार पासून ते आपण काय खातो पितो, कसे खातो पितो, हा सगळाच खूप विशेष विषय आहे. कधीतरी फुरसत मध्ये त्यावरही बोलू. कारण मग, तू विगनच का नाही झालास? वगैरे ते पण अँगल आहेतच की.

मग हे आत्ता का आठवावं? तर त्याला दोन तीन करणं आहेत. सध्या घरी बसून आहे हे एक कारण. म्हणून उगाच तत्वज्ञान पाझरत असतं चारी बाजूने. दुसरं म्हणजे, गेल्या वर्षी सायबेरिया मध्ये गेलेलो तेव्हासुद्धा अशी एक लाईट बल्ब मोमेन्ट आलेली. अकरा बारा वर्षं झाली शाकाहारी होऊन आणि आता रशियाच्या दुर्दम्य भागातून दहा दिवस फिरायचं म्हणल्यावर, कुठेतरी आपल्याला आता इतक्या वर्षानंतर परत एकदा कदाचित काहीतरी मांसाहार करावा लागणार, हे दिसत होतं. कारण पुण्यासारख्या शहरात दररोज चिकन खाण्याचा अट्टाहास करणं जर विचित्र असेल, तर सायबेरिया मध्ये जाऊन मला नाश्त्याला पोहे आणि जेवायला पनीर मागणं सुद्धा तितकंच विचित्र. जिथं जे बनतं, पिकतं, किंवा जे सहज उपलब्ध आहे, ते खाणं जास्ती सुटसुटीत. जिथे शंभर शंभर किलोमीटर वर एक माणूस दिसायचा नाही, तर तिथे रस्त्यावर खूप ढाबे किंवा कॅफे वगैरे असायचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे एखादा कॅफे सापडला, तर तिथे जे आहे ते खायचं हा आमचा मास्टर प्लॅन. नाहीतर पुढे काही कधी मिळेल त्याचा नेम नसायचा. खूप मोजकं खाऊन दिवस काढले. पण मुद्द्याची गोष्ट अशी की, कुठल्याही दिवशी कधीही स्टार्व्हेशन वाटलं नाही. (आणि हो, रशिया मध्ये बीट आणि बटाटा घालून एक सूप करतात, ते ठिकठिकाणी मिळतं. माझ्यासारख्या शाकाहाऱ्याला ते पुरेसं होतं). मग ते सगळं संपवून लंडनला परत आल्यावर वाटलं की, इथे आपण किती अखंड चरत असतो! सायबेरिया मध्ये जेवढं खाऊन मस्त दिवस जायचा, त्याच्या दुपटीहून जास्त सहज असेल हे. इतक्या गोष्टी आजूबाजूला रचून ठेवलेल्या असतात न, म्हणजे घरात असो किंवा बाहेर, त्या सगळ्या प्रलोभनांना नको म्हणणं ही आपल्या पिढीची खरी कसोटी आहे. आपल्या आधीच्या पिढीचे खायचे वांदे होते. आपल्या पिढीची अति खायचे वांदे आहेत.

तर सध्या लॉकडाऊन मध्ये, आहे ती लाईफ-स्टाईल मेन्टेन करण्यासाठी फ्रिज भरून ठेवायची शर्यत सुरु झाली, तेव्हा मला हे सगळं परत आठवलं आणि वाटलं, की, हीच ती संधी. आपण जरा आपलं एकूणच खाणं पिणं प्रमाणात आणलं तर? आता बाहेर सुद्धा पडायचं नाही आहे. घरात तसंही सामान कमी असणारे? म्हणजे, लॉकडाऊन संपेपर्यंत हड्डीपसली दिसायची पाळी आणायची हा जरी हेतू नसला, तरी सवयींमध्ये थोडेसे बदल करायची हीच ती वेळ, असा विचार तर आहे. गेले खूप दिवस संध्याकाळचं जेवण बंद करून पाहिलं. फार काही त्रास होत नाही. सकाळचं जेवण आणि संध्याकाळी खूप दुधाची कॉफी, यावर पण मजा येते. हे of course, कुठल्याही डाएट मध्ये सांगितलेलं नाही. ही आपलीच लिमिटेड अक्कल. त्यानंतर दोन जवळच्या लोकांना विचारलं आणि त्यांनी अजून जरा बेहतर पर्याय पण सांगितले. मुद्दा असा की, मोजकंच खायचं आहे, तर काहीही मनाला येईल तसं कशाला करावं? थोडंच खा, पण भारी खा, असा काहीतरी डाएट असेलच की. वजन कमी करणे, किंवा वाढवणे, असा कुठलाही हेतू नाही. फक्त प्रमाणात खाणे. इतकाच आहे. तर यामध्ये काही पर्याय, सल्ले, असतील तर ते हवे आहेत. बघा, तुम्हाला माहिती असतील, तर जरूर सांगा. आपण असले विषय चावत बसू. That is far healthier than anything else.


ता.क. बाकी अर्धा एक किलो वजन कमी झालंय लॉकडाऊन मध्ये. पण ते सुरुवातीच्या ४ दिवसात झालेलं. त्यानंतर कायम आहे. म्हणजे हे असं एकवेळचे खाण्यामुळे ते कमी झालं नसावं हा आपला सोयीस्कर विचार आहे.

No comments: