स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव्ह वाझनियाक यांच्या जोडगोळीबद्दल कितींदा ऐकलंय. एकाला तंत्रज्ञान माहिती होतं, एकाला बिझनेस कळत होता. आणि मग नंतर त्यांनी सगळं जगच बदलून टाकलं. नै का? हे असं सांगितल्यावर, मला एकाने अडीच - तीनशे वर्षांपूर्वीच्या एका स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव्ह वाझनियाक जोडीबद्दल सांगितलं. त्यांनीसुद्धा असंच जग कायमचं बदलून टाकलेलं!
.
गोष्टीची सुरुवात करू पाण्यानं भरलेल्या कोळश्याच्या खाणींनी. काल १७०० चा. आत्ताच्या इंग्लंड प्रमाणेच तेव्हाच्या इंग्लंडमध्येही बीन बादल बरसात हा भाग नवीन नव्हता. अशा पावसात एकदा पाणी खाणींच्या आतमध्ये शिरलं, की खाणींची वाट लागलीच. मग केवळ खाणीतून पाणी काढायला म्हणून लोकांची कुमक पाठवायला लागे. ही सगळी किरकिर सहाजिकच त्रासदायक होती. मग इथे एकाने शक्कल लढवली. पाणी गरम झालं की त्याची वाफ होते आणि ती वाफ वाटेत जे येईल त्याला ढकलत वरच्या दिशेने जाते, हे तोवर ज्ञात होतं. तर मग या बाबाने हे वाफेचं तत्व वापरून पहिलं वाफेचं इंजिन बनवलं. या इंजिनमुळे खाणीतून पाणी काढायला आता लोकांची गरज नव्हती. किरकिर कमी झाली उत्पादन वाढलं.
.
कोण हा बाबा? ऑफ कोर्स, हा म्हणजे जेम्स वॉट नाही.
तर याचं नाव होतं थॉमस न्यूकोमेन. ऍगाथा ख्रिस्तीचा गाववाला. डेवनच्या डार्टमाऊथ मधला.
.
न्यूकोमेन इंजिनमुळे इतका फायदा जरी होत असला, तरी इंजिन खूप कोळसा खायचं. म्हणजे, एकूणच खर्चिक काम होतं. पण तरीही काहीही म्हणा, एक पाया रचला गेला होता. आता मिळालेला मार्ग जास्ती सुकर कसा करायचा, हे कोणीतरी शोधणं बाकी होतं.
.
तर... ही गोष्ट १७१२ ची. पाहिलं सो कॉल्ड वाफेचं इंजिन बनलं तेव्हाची.
पण इथे संपत नाही गोष्ट.
.
यानंतर पन्नास वर्षांनी अजून एका बाबाला ट्यूब पेटली. हा बाबा होता ग्लासगो युनिव्हर्सिटी मध्ये. हे म्हणजे आता आपण दक्षिणेकडून थेट इंग्लंडच्या उत्तरेकडे स्कॉटलँड कडे जाऊ. हा बाबा टेलेस्कोप आणि इतर उपकरणाच्या विविध भागांचं नेमकं कॅलिब्रेशन करायला शिकण्यासाठी तिथे आलेला. लहानपणी त्याला शाळेत मंद म्हणायचे. पण त्याला अभियांत्रिकीमध्ये खूप रस. बाकी विषयामध्ये खड्डा! ग्लासगो युनिव्हर्सिटीसाठी सुद्धा त्याने बरीच उपकरणं बनवलेली. याला न्यूकोमेन इंजिन दुरुस्त करायचं काम एकदा दिलेलं. आणि मग रेस्ट इज हिस्टरी.
कोण हा बाबा? ऑफ कोर्स, हा आपला जेम्स वॉट.
.
जेम्स वॉटला एकूणच वाफेचे इंजिन या प्रकारात खूप रस आला. आणि मग आज कुछ तूफानी करते है म्हणत, त्याने न्यूकोमेन इंजिनमध्ये सुधारणा करायचं ठरवलं. आणि केल्यासुद्धा.
आता जास्ती तांत्रिक गोष्टींमध्ये न पडता, थोडक्यात सांगायचं झालं तर जेम्सने केलेल्या सुधारणांमुळे नव्या इंजिनला ७५ टक्के कमी इंधन लागणार होतं. आणि काम सरस.
.
आता इथे एंट्री होते बिझनेसचं डोकं असलेल्या मॅथ्यू बुलटोनची. जेम्स आणि मॅथ्यूने इथून पुढे जो काही कल्ला केला, तो मग सगळ्याच उद्योगधंद्यावर आपली छाप सोडून गेला. खाणकाम तर वेगाने सुरु झालच. दारू बनवणाऱ्या लोकांना पण ग्राइंडिंग साठी मदत झाली. जगाच्या इतिहासात प्रथम घाऊक प्रमाणात वस्तू बनू लागल्या. त्यामुळं नोकऱ्या वाढल्या. याच दरम्यान आणि याचसाठी खूप लोकांनी गावं आणि शेती सोडली आणि शहराकडे पलायन सुरु केलं (गांधींच्या पुस्तकात या इंग्लंडमधल्या शेती आणि गाव सोडून शहराकडे झालेल्या स्थलांतरावर टीका केलेली आढळते. गांधींच्या मते यामुळे गावांचा विकास खुंटला. हे असं इंग्रज भारतात पण करतील आणि त्यामुळं मूठभरच शहरात विकास होईल आणि लाखोच्या लाखो गावं त्यापासून वंचित राहतील असं त्यांना वाटायचं. आणि त्यामुळं भारतासारख्या देशात असलेलं गावांचं सौंदर्य आणि विविधता नष्ट होईल अशी त्यांना भीती होती. असो. तो विषय वेगळा. इंग्लंड मध्ये तर हे व्हायला सुरू झालं.).
.
या वाफेच्या इंजिनाने वाहतूक सुधारली. १८०० च्या पहिल्या दशकात सर्व प्रथम मनुष्यबळ किंवा प्राणी-बळ न वापरता, सुमारे २५ टन माल एकीकडून दुसरीकडे नेण्यात आला. तेही तब्बल ताशी ८ किलोमीटर वेगाने! लो कर लो बात. ही त्या काळासाठी खुप अभूतपूर्व गोष्ट होती. नव्या युगाची सुरुवात होत होती. अशी पण एक गोष्ट आहे की हे जे गाडीत वापरलं ते (लोकोमोटिव) इंजिन, त्याची कल्पना ना जेम्स ची ना मॅथ्यू ची. पण त्यांच्या कंपनी मधल्या विल्यम मरडॉकची होती म्हणे. असो आता. होती यांच्यातल्या एकाची. पण यांनी या तंत्राचं पेटंट बनवलं होतं आणि त्यामुळे १८०० पर्यंत इतर कोणालाही या इंजिनला हात लावता येणार नव्हता! कर दी न स्टीव जॉब्स टाइप बात! पण १८०० ला पेटंट संपलं आणि सगळ्यांनीच ही अशी वाफ दवडायला सुरु केली!
.
काही वर्षात हे तंत्रज्ञान अमेरीकेत पोचलं आणि वेगळाच कल्ला झाला. १८६० च्या दशकात अमेरीकेत थिओडर जुडाह नावाच्या सिव्हिल इंजिनिअरने पूर्व किनारपट्टीपासून ते पश्चिम किनारपट्टीपर्यंत रेल्वे नेण्याचं स्वप्न बघितलं. याच वेळी तेव्हाच्या काँग्रेसला सुद्धा असंच काहीतरी करायचं होतं पण त्यांना कुठून कुठे गाडी पळावयाची हे ठरत नव्हतं. जुडाहने इथे एंट्री मारली. परफेक्ट मार्ग निवडला. युनिअन पॅसिफिक नावाच्या कंपनीला पूर्वेकडचं आणि सेंट्रल पॅसिफिक नावाच्या कंपनीला पश्चिमेकडचं काम सोपवलं. या दोनीही कंपनींनी सहा वर्षं काम करून शेवटी युटाह मध्ये एकमेकाला आपापले स्टीलचे रेलवे ट्रॅक जोडले. हा होता पहिला ट्रान्स कॉन्टिनेन्टल रेल रोड. यामध्ये कॅलिफोर्निया बाकीच्या जगाशी जोडलं गेलं. तेच ते आपलं बे एरिया.
.
देख रहे हो... एका वाफेच्या इंजिनामुळे केवढ्या केवढ्या क्षेत्रात आणि केवढे परिणाम झाले? केवळ बोलटन आणि वॉट कंपनीमुळेच नाही, पण त्या नंतर इतरांनी या इंजिनमध्ये केलेल्या सुधारणांमुळे आणि त्या कार्यक्षम पद्धतीने वापरल्यामुळे, जगभर "औद्योगिक क्रांती" ची पायाभरणी झाली.
.
.
ता.क. न्यू थिंकिंग नावाचं एक पुस्तक काही वर्षापूर्वी वाचलेलं. त्यातले खूप संदर्भ वर वापरलेत. बाकी फोटो बर्मिंगहॅम मधला गुगल बाबाने शोधून दिला. हे जेम्स, मॅथ्यू आणि विलियम. आणि वेगळा दिसतोय फोटो तो थॉमस न्युकोमेन.
2 comments:
एकदम छान माहितीपूर्ण लेख आणि अतिशय रंजक पद्धतीने लिहीला आहे
धन्यवाद. 🙂
तुलाही एखादी अशी गोष्ट माहिती असेल तर सांग.
Post a Comment