Sunday, April 16, 2017

Peace and Dark Comedy

मला एक इतिहासाचा प्रोफेसर भेटलेला एअरपोर्टवर. तो मला म्हणाला की इतिहासाचं टीव्हीच्या डेली सीरिअल सारखं आहे. मधली चार पाच पानं फाटली आणि अचानक काही दशकं पुढं आलो तरी फार काही हुकलेलं नसतं. तेच ते परत सुरू असतं. लोक ते नवं म्हणून बघत असतात. त्यांना असं बघताना बघण्यात ज्यांना मजा येते त्यांनी इतिहास शिकवा. ज्यांना त्रास होतो त्यांनी क्रांतिकारी व्हावं. असो. त्या इतिहासाच्या प्रोफेसर बद्दल परत कधीतरी.

पण त्यातला "आपलं जग एक स्टँड अप कॉमेडी शो आहे" हा अंडरटोन मला आजकाल राहून राहून आठवतो. अति झालं आणि हसू आलं. अशा प्रकारचा. एकूणच. सरसकट. डार्क कॉमेडी.

आपलं हे असं आहे.
आपण सगळे एका खोलीमध्ये बंद आहोत.
या खोलीतल्या सगळ्या भिंती, सगळे कोपरे पेट्रोलने रंगावलेत.
खोलीत दोन कट्टर वैरीपण बसवलेत.
त्यातल्या एकाकडे ७०० कड्यापेट्या आहेत. पण दुसऱ्याकडे चक्क फक्त ५०० च आहेत!
यावर खोलीमध्ये खल सुरू आहे.
म्हणजे काड्यापेट्या आहेत म्हणून नाही काही. तर या दोघांच्यातला कोणीही एकजण दुसऱ्याच्या डोईजड होऊ नये म्हणून.
त्यासाठी आपण भन्नाट उपाय पण काढलेत.
आधी या दोघांनी. नंतर बाकीच्यांनी.

हे दोघंही अविरत काड्यापेट्या बनवायचे. कारण बॅलन्स राहिला पाहिजे न? सगळ्यांना पटलेलं हे. आता तरीही ७०० विरुद्ध ५०० होईपर्यंत.

हे दोघे काड्यापेट्या बनवतायत तर आता खोलीतला प्रत्येक छोटमोठा पण आपापल्या कुवतीप्रमाणे काड्यापेट्या बनवू लागलाय. कारण त्यांनाही बॅलन्स हवाच आहे की. नाही?

सुरक्षित राहण्याचा या खोलीतला आपला एक सर्वमान्य मार्ग म्हणजे सगळ्यांनी आपापल्या परीनं काड्यापेट्या बनवतच राहणं. म्हणजे एकमेकांकडच्या काड्या बघून कोणी आग लावायला धजणार नाही!

आहे की नाही बेष्ट?

म्हणजे काड्या न बनवणं हा कोणाकडे पर्याय नाहीए. करण बाकीचे लगेच आपल्याला खाकच करतील इतका गाढ विश्वास आहे आपल्याला एकमेकांवर.
पण बाकीच्या कोणी काड्या बनवू नये हाही आपला हट्ट आहे.
कारण इतकं प्रेमही आहे आपलं आपल्या खोलीवर! उगाच नाही?

आणि या प्रेमापोटी आम्ही खोलीतल्या भिंतीच्या कोपऱ्या कोपऱ्यावर खडूने लिहूनही ठेवलंय वेळोवेळी. तेही बदाम काढून.

We Love Peace.
We पण Love Peace.
We तर कधीपासून Love Peace.
तरीपण फक्त We च Love Peace.

आता भिंती भरून गेलेत. पण आमचं प्रेम संपलेलं नाही. मग आम्ही एकमेकांनी लिहिलेलं पुसून स्वतःच्या प्रेमाला जागा करतो.

अहो We अजूनही Love Peace.
Peace साठी काहीपण न?
आमच्या आडे आलात तर मग तुमची खैर नाही. कारण आमच्या आडे म्हणजे peaceच्या विरूद्ध. मग या अशांसाठी आणखी दोन काड्यापेट्या जास्ती बनवू आम्ही.

ज्याच्याकडे काड्या जास्ती त्याचं peace वरचं प्रेम जास्ती. त्याला ते व्यक्त करायला जास्ती मुभा.

हे असंय.

आण्विक अस्त्रं बनवण्याची चढाओढ जेव्हा अमेरिका आणि रशियामध्ये सुरू होती, त्यावर टिपणी करताना कार्ल सेगन असं काही बोललेला. दशकं उलटली त्याला आता. मला काल एकजण म्हणाला की खूप असंतोष पसरलाय. सगळं परत बरोबर करायला आता युद्धाला तोंड फुटणारे.

तेव्हा हे सगळं आठवलं.

हा निव्वळ योगायोग की सध्या मी माईन काम्फ पण वाचतोय. पण त्याही बद्दल परत कधीतरी.

बाकी I Love Peace!

No comments: