.
Sounds familiar? पण ही गोष्ट १९५७ ची आहे. उस जमाने की स्टार्टअप स्टोरी... असं म्हणू. न्यू यॉर्क टाइम्सने नंतर या घटनेची नोंद "टॉप टेन डेज दॅट चेंज्ड दी हिस्टरी" म्हणून केलेली.
.
या आठ लोकांच्या पैकी कमीत कमी गॉर्डन मूर आणि रॉबर्ट नॉईस कदाचित माहिती असतील. गॉर्डन मूर म्हणजे तोच तो ज्याने नंतर मूर-लॉ बनवला (की जो अजूनही भारी आहे). आणि रॉबर्ट नॉईस म्हणजे तोच तो ज्याने (आणि गॉर्डनने) एका स्टार्टअपनं भागलं नाही म्हणून पुढे जाऊन अजून एक स्टार्टअप काढली - "इंटेल" नावाची.
तसा नॉईस नंतर गरजू होतकरू तरुणांना मार्गदर्शन करत असायचा. त्यातल्या एका स्टीव्हने काढलेली स्टार्टअप सुद्धा माहिती असेल - ऍपल नावाची.
.
१९५७ ला या आठ जणांनी "आज कुछ तुफानी करते है" म्हणत जी कंपनी बनवली, त्याचं नाव "फेअरचाईल्ड सेमीकंडक्टर्स". या कंपनीने सुद्धा इतिहास रचला. आज कुठलाही फोन किंवा कॉम्प्युटर किंवा इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट उघडून बघितलं की आतमध्ये नखा एवढेसेच किंवा कधी कधी थोडे मोठे काळपट चपटे ठोकळे दिसतात. याना म्हणतात इंटिग्रेटेड सर्किट्स. यांच्यामुळे आपले गॅजेट्स लहानात लहान आणि हुशारात हुशार होऊ शकतात. तर "फेअरचाईल्ड सेमीकंडक्टर्स" या कंपनीने सर्व प्रथम इंटिग्रेटेड सर्किट्स हा प्रकार बनवून दाखवला आणि सगळ्यांच्या चक्कीत धूर आणला. पुढे या इंटिग्रेटेड सर्किट्सनी इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राचाच चेहरा मोहरा बदलून टाकला.
.
आणि हो... आज तंत्रज्ञान क्षेत्राचा खूप महत्वाचा भाग असलेली सिलीकॉन व्हॅली ही सुद्धा या आठ जणांनी सुरु केली. त्यात स्टीव्ह जॉब्स म्हणा, बिल गेट्स म्हणा, मार्क झुकरबर्ग म्हणा, हे सगळे खेळले बागडले.
.
या आठ जणांना "ट्रेचरस एट" म्हणून ओळखलं जातं.
.
***************************
.
ही गोष्ट या आठ जणांना एकत्र आणलेल्या एका बाबाची आहे. "सब चले पूरब तो हम चले पश्चिम" म्हणत या बाबाने जग ईस्ट कोस्टवर कंपन्या काढत होते तेव्हा वेस्ट कोस्टच्या कॅलिफोर्निया मध्ये जाऊन कंपनी काढला, आठ लै भारी इंजीनिअरना हुडकला, आणि एक कमाल प्रश्न सोडवायला दिला. त्याला अर्थातच अपेक्षित क्रांती करता आली नाही. कारण आठही जण, "आपला बॉस किती खडूस आहे" म्हणून सोडून गेले. पण... त्याचा पिच्चर तंभीभी बाकी होता मेरे दोस्त कारण या बाबाला पुढे १९५६ मध्ये नोबेल सुद्धा मिळालं! तर ही आजची गोष्ट.
.
तशी ही गोष्ट कुठूनही सुरु केली... तरी ड्रॅमॅटिकच वाटते. आपण सुरु करू १९४५ पासून. दुसऱ्या महायुद्धानंतर पासून. तेव्हा व्हॅक्युम ट्यूब वापरून इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू बनायच्या. साहजिकच व्हॅक्युम ट्यूब हे प्रकरण त्या काळासाठी खूप कमाल असलं तरी खूप नाजूक होतं. यावर तोडगा काढण्यासाठी AT&T च्या बेल लॅबच्या मर्विन केली ने एक टीम बनवली. ही अतरंगी टीम म्हणजे आपल्या गोष्टीचे अमर, अकबर आणि अँथनी. या तिघांनी ट्रान्सिस्टर बनवायचं हे त्यांचं काम मनावर घ्यायचं होतं. हा ट्रान्सिस्टर व्हॅक्यूम ट्युबपेक्षा भरी तर असणारच होता, पण त्याने खूप लहान आणि कमी नाजूकसुद्धा असायचं होतं.
.
या कामासाठी एकत्र आलेल्या या तिघांच्यातला सगळ्यात बुड्ढा माणूस वॉल्टर ब्रॅटन - हा होता एक्सपेरीमेंटल फिजिसिस्ट. त्याला फिजीक्स कळायचं म्हणून तो काहीपण बनवू शकायचा. दुसरा होता जॉन बर्डीन - हा म्हणजे त्यांच्या काळाचा शेल्डन कूपर. थिअरॉटिकल फिजीसीस्ट. हा पंधराव्या वर्षीच कॉलेजमध्ये पोचलेला. आणि तिसरा विल्यम शॉकली. कमालीचा स्पर्धा वृत्ती असलेला वैज्ञानिक आणि तिघांच्यातला सगळ्यात धाकटा. पण धाकटा असला तरी शॉकलीने या टीम मध्ये यायच्या आधीपासूनच ट्रान्सिस्टरचा एक ढोबळ स्वरूपाचा आराखडा बनवलेला. हा ट्रान्सिस्टर बनवून आपण दुनियामें फेमस होणार असं शॉकलीचं स्वप्न होतं. पण त्याची कल्पना कागदावर जरी सॉलिड असली, तरी प्रत्यक्षात अजिबातच जमत नव्हती. शॉकलीचा हा आराखडा या त्रिकुटासाठी सुरुवात बनला.
.
काही काळानंतर, रक्त तरुण सळसळणारं म्हणत, शॉकली स्वतः वेगळं काम करायला लागला. म्हणाला मी अजून अलग नजरीयाने बघतो. इकडे ब्रॅटन आणि बर्डीन दोघे मिळून त्यांच्या पद्धतीने काम करतच होते. अधे मध्ये तिघे एकत्र यायचे. पण परत आपापल्या मार्गी जायचे. एक वर्ष गेलं तरी दाखवण्यासारखी प्रगती कोणाचीही नव्हती. आणि मग एके दिवशी, नसत्या उचापती करताना बर्डीनला युरेका मोमेन्ट मिळाली. त्यानं सगळं उपकरण काहीही कारण नसताना पाण्यात बुडवलं आणि अनपेक्षित रीत्या बरेच बरे परीणाम दिसले. पाण्यामुळे हे असं का झालं? हे शोधता शोधता ब्रॅटन आणि बर्डीन ला चक्क प्रत्यक्षात काम करणारा खरा खुरा पहिला ट्रांसिस्टर बनवायची युक्ती सापडली. आणि त्यांनी तो बनवला सुद्धा.
.
खुश होऊन त्यांनी आपला यार शॉकलीला फोन केला. पण मग "क्या सोचे थे? गब्बर खुस होगा? साबासी देगा?" वाली मोमेन्ट आली. शॉकली खुश झाला झाला म्हणेपर्यंत नंतर चिडला सुद्धा. कारण एकच... ट्रान्सिस्टरच्या शोधामध्ये शॉकलीला फेमस व्हायचं होतं की नै? पण आता त्याचं नाव पण लागणार नव्हतं असं त्याला वाटलं! या चिडचिडीमध्ये, सगळ्यांना सोडून शॉकली पुढे मग आपल्याच वनवास गेला. आपल्या आपल्या मठीत त्यानं काम सुरु ठेवलंच. आता बाजूला अमर अकबर.... आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा अँथनी.
.
ब्रॅटन आणि बर्डीन ने बनवलेलं ट्रान्सिस्टरवालं उपकरण काम जरी करत असलं तरी ते बाहेरच्या जगात वापरण्यासाठी अजून योग्य नव्हतं. त्यात अजूनही खूप सुधारणा अपेक्षित होत्या. इथे शॉकली बाबाला संधी दिसली. त्याने त्याच्या पद्धतीने उत्तम सुधारणा केल्या आणि थेट बेल लॅबच्या वकिलांना गाठलं. म्हणाला, माझा शोध, माझी अक्कल. माझ्या नावावर पेटंट काढा. त्यात ना ब्रॅटन ना बर्डीन!
.
ब्रॅटन आणि बर्डीनला जेव्हा हे समजलं तेव्हा त्यांना मेरे साथ धोका हुआ है वाला फिल आला. तीन उत्तम आणि तल्लख बुद्धीच्या लोकांनी एकत्र येऊन भारी काहीतरी बनवलं खरं, पण नंतर आपसात खूपच राडा केला. तिघांच्या घाऊक गोंधळात, इकडे वकिलांनी वेगळीच कलाटणी दिली. त्यांनी कागदपत्रं तयार केली, त्याचा अभ्यास केल्यावर असं ठरवलं की या शोधावर खरं तर ब्रॅटन आणि बर्डीन यांचं नाव हवं. हे शॉकली साठी शॉकींग होतं!
.
अशा वेळी न कॉर्पोरेट कल्चर उत्तम असतं. त्यात कसला ड्रामा नसतो की भावना नसते. इकडे हे दिल आणि दर्द घेऊन बसलेले तिघे. आणि तिकडे "ट्रान्सिस्टर बनवायला जमलंय" हे एका कार्यक्रमात जाहीर पण करायला सज्ज झालेली AT&T. १९४८ ला हा कार्यक्रम झाला. एवढंच नाही, तर ब्रॅटन, बर्डीन आणि शॉकलीला एकत्र येऊन फोटो काढायला लावला. हा इथे दिलेला फोटो तोच तो. हा खूप ऐतिहासिक फोटो आहे. याच्या मागेही छोटी गोष्ट आहे की कसं शॉकली फोटो काढायच्या वेळी अचानक मधोमध येऊन बसला आणि भाव खाऊन गेला. वगैरे वगैरे.
.
***************************
एपिलोग:
ट्रांसिस्टर लै भारी हे आपल्याला आत्ता माहिती आहे म्हणून तेव्हाच्या या घटनेचं कौतुक. पण तेव्हा लोकांना अजूनही व्हॅक्युम ट्यूबमधेच जास्ती स्वारस्य वाटत होतं. टच स्क्रीन आला आणि तरीही लोकं बटणाचे फोन वापरायचे न? तसं. पण तेव्हा जपानमधल्या दोन इंजिनिअरना या शोधाचा पत्ता लागला. मॅगझीन वाचायचे हो. बॉम्ब मुळे देश उध्वस्त झालेला. त्याची नवी बांधणी सुरू होती. लोक नवनवी शक्कल लढवत होती. त्यात या दोघांना या छोट्या ट्रान्सिस्टरचं अप्रूप वाटलं. त्यांनी ट्रांसिस्टर वापरून छोटा, खिशात मावेल असा रेडीओ बनवला. रेडिओचं नाव नंतर ट्रान्सिस्टर असच पडलं.
आणि ही जी स्टार्टअप होती.. ती म्हणजे अर्थातच... सोनी.
.
इकडे ब्रॅटन, बर्डीन आणि शॉकली यांनी आपापल्या वाटा वेगळ्या केलेल्या. १९५१ ला बर्डीन ने बेल लॅब्स मधून टाटा बाय बाय केलं. शॉकलीची खडूस कीर्ती इतकी पसरली की त्याला बेल लॅब काय पण एकूणच ईस्ट कोस्ट वर कोणी काम करायला पार्टनर सापडेना.
.
पण फेमस होण्याचं स्वप्न अजूनही बाकी होतं. त्यानं इंटिग्रेटेड सर्किट बनवण्यासाठी आपली नवी कंपनी सुरु करायचं ठरवलं. या वेळी शॉकलीने आपला गाशा गुंडाळला, आणि तो वेस्ट कोस्ट वर पोचला. तिथे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी नव्या कंपनीना स्वस्तात जागा देत होती. तिथं शॉकलीला कोणी ओळखत सुद्धा नव्हतं. मग आपल्या चार्मने त्याने आठ उत्तमातले उत्तम इंजिनिअर शोधले... आणि त्यांना शॉकलीच्या भूतकाळाची कल्पना नसल्यामुळे, त्यांनीही भुलून बिनदिक्कत त्यात उडी मारली. पण या आठ जणांचा "भारावून जाणं" आणि नंतर "ये क्या कर दिया यार" म्हणाण्यापर्यंतचा प्रवास खूपच लवकर संपला
.
शॉकलीला काहीही म्हणा, पण त्यानं तयार केलेल्या सुरुवातीच्या आरखड्याचं महत्त्व कमी होत नाही. ब्रॅटन आणि बर्डीनने केलेले परिश्रम आणि त्यांना मिळालेलं यश, हे सुद्धा कमी मोलाचं होत नाही. ट्रांसिस्टरमुळे इलेक्ट्रॉनिक्स जगतात जी क्रांती झाली ती तर आता कायच सांगा!
या सगळ्याची नोंद घेत, १९५६ मध्ये, या तिघाही जणांना नोबेल पारीतोषक देण्यात आलं.
.
तळटीप: जॉन बर्डीनला नंतर १९७२ मध्ये दुसरं नोबेल सुद्धा मिळालं... सुपर कंडक्टीवीटी साठी.
.
ता.क. बरेच संदर्भ AT&T Tech channel मधले आहेत, बाकी विकीपीडिया आहेच, आणि "न्यू थिंकिंग" मधले बरेच संदर्भ. फोटो अमर अकबर अँथनी चा. 😛 आणि डावीकडे उभा असलेला मर्विन केली.