Saturday, June 09, 2007

तन्वी ...

"काय रे? कोणाबद्दल आहे ती कविता? काय भानगड?"

"नायक आणि त्याची प्रेयसी."

"ओये हिरो ये किस्से सभीको सुनाते नही है. मगर दोस्तोसे छुपाते नही है. सांग पटकन"

"अरे कोणी नाही रे. असेच सुचले आणि लिहीले"


बऱ्याच जणानी विचारले या 'भानगडी'बद्दल. काय ताप आहे खरच. कोणाला काही असेच नाही काय वाटू शकत? कोणीतरी मुर्तरूप पाहीजेच कल्पनेला असा का अट्टाहास? मी तर म्हणेन, जे खरोखर लफड्यात असतील ते असे काही लिहणे शक्यच नाही. साधे लॉजीक आहे, पोरीला फिरवतील की ब्लॉग लिहीत बसतील? तसे चोर सगळेच पण हे आमच्या सारखे संधी न मिळालेले चोर असतात ते ब्लॉग मधे प्रेम वगैरे करतात. मग उगाच लोकात हव्वा! चर्चा. किसका फाट्या, किसका तुट्या? परत फ्रीडम आहेच की!


तर मुद्दा असा, की माझ्याही त्या कवितेला कोणी मुर्त अशी प्रेरणा नाही. म्हणजे आमच्या कॉलेजच्या भाषेत सांगायचे झाले तर प्रेरणा भोसले नाही. पण हो कोणीतरी आहे. मुर्त नसेल म्हणून काय! कल्पना आहे

तन्वी.

(समस्त ऊपस्थीतांच्या विनंतीला मान देऊन, तन्वी बद्दल काहीतरी लिहायचेच होते. आणि आता या Newark airport वर करायलापण काही नाही. म्हणून लेखक परत जागा झालाय. थोडेसे विस्कळीत आहे लिखाण पण जसे मनात येईल तसे लिहीतोय. चूकभूल द्यावी घ्यावी. चुक असेल तर तो स्टारबक्स कॉफीचा परीणाम आणि भूल असेल तर तो घरी जातोय त्या खुशीचा परीणाम)



तर तन्वी
- या नावाची उत्पत्ती हा जरा संशोधनाचा विषय आहे. पण सुरूवात 'तनू'पासून झाली. सुमारे ३-४ वर्षापुर्वी. नाशिकमधे असताना. माझे एकटेपण - ही बाकी गोची मला अद्यापही उलगडली नाहीए - मला जिथे कुठेही पाठवतात किंवा जावे लागते तिथे एकटेच का जावे लागते कळत नाही. म्हणजे दरवेळी नवा गडी नवे राज्य. आणि राज्य बसले की झाले - राजाला धाडतात आणखी कुठेतरीअसो - म्हणजेच तनहाई, आणि या शब्दाचे तनू या नावाशी साधर्म्य या सगळ्यातून तनू उगवली. मै और मेरी तनहाई म्हणताना उगाचच मग मी आणि माझी प्रेयसी म्हणल्याचा भास होऊ लागला. आणि मग ही तनू किती दिवस तनू राहणार? मग तिला नावपण दिले. तन्वी.


त्यापुढे, कधीही एकटे वगैरे पाडले कोणी की ताबडतोब तन्वीला हाक आणि लेखक जागृत. पुर्वी फारसा लिहायचो नाही, हे भूत अत्ताचेच पण विचार करायला कोण बंदी घालतो. एकदम कोल्हापुरी भाषेत सांगायचे तर, घुमीव गाडी, रचीव किस्सा! सध्या फक्त हे किस्से ब्लॉगमधे उतरतायत एवढेच.


जे काही आवडेल, ते सगळे तन्वीचे गुण. कधी हवे तेव्हा बोलवा कधी हवे तेव्हा विसरून जावा. कधी काही ऐकायची हौस असेल तर तेही तिच्या तोंडी द्या. तसेच आली लहर समुद्राकाठी फिरायची. आता एकटा कशाला फिरू. म्हणून आणले तिला बरोबर. केली कविता लिहीला ब्लॉग. आणि मग झाली हव्वा. काही दुर्भागी लोक असे असतात की याच्या अफेअर बद्दल तमाम जनतेला कायम उत्सुकता लागून असते. नुसतीच हव्वा. यांचे कुठे ना कुठे तरी काही भानगड असणारच अशी मुलीना मनापासून खात्री. म्हणून कोणी मुलगी यांच्या वाट्याला जात नाही. बाकीच्यानाही हीचखात्री. म्हणून तेही जासूसी करायचेही सोडत नाही. अशतलाच मी एक आहे. :-) आणि बिचारी तन्वी या सगळ्याला साक्षीदार.


तशी ती बऱ्याच गोष्टीना साक्षीदार आहे. ईथे जेव्हा कॉर्नफ्लेक्स मधे दुधाऐवजी ताक घातले तेव्हा वेड्यासारखे एकटेच हसताना ती होती. साठा उत्तराची कहाणी असो किंवा त्याची न मिळालेली पाच उत्तरे असो - हे सगळे लिहून झाल्यावर हिरमुसून गेलेल्या लेखकाबरोबर ती होती. एवढेच काय? तर मागच्या वर्षी बॅंगकॉक च्या टर्मीनल वर अमिताभ बच्चन शेजारून गेला तरी मागे पळत जाऊ नको अधाशासारखे सांगताना पण ती होती. पुढे अरे वेड्या जायचास की हात तरी मिळवायला असे ओरडतानाही ती होती. जकर्तामधे ईंटरनॅशनल फ्लाईट डीले केल्यावर उगाचच विजयी मुद्रेने हसणाऱ्या माझ्याकडे 'आता शांत व्हा राजे, फार काही मोठे दिवे नाही लावलेले' हे हसत सांगतानाही ती होती. पुण्याच्या ई-स्क्वेअर मधून फिरताना, भाव खात ऍटिट्यूड दाखवणारीपण तीच होती. एवढेच काय तर त्या पोरीबरोबर फिरू नको, तू आणि ती दोघेही पस्तावाल असे सांगतानापण ती होती. आणि पुढे तसेच झाल्यावर आता ऊठ आणि परत लढ म्हणून सांगताना पण तीच होती.


मला उगाचच गोष्टी त्रयस्थपणे कशा दिसतात बघायची सवय आहे. आणि कदाचीत या त्रयस्थपणाला माझ्यालेखी नाव आहे - तन्वी. आयुष्याची ही मजा आहे. माझ्याच बाबतीत म्हणायचे झाले तर, मी जसा नाही तसा ईतराना हमखास भासतो. म्हणजे मी शारीरीक आणि मानसीक दोनही बाबतीत कमजोर आहे. पण हे कधी कोणाला पटतच नाही. माझा अगाऊपणा असेल कदाचीत. आले मनात की मार ऊडी बाकीचे निस्तरू नंतर - हा ऍटीट्युड असेल. फुकट सल्ले लोकाना देऊ करण्यात एकदम पटाईत. घडल्या गोष्टी की मग बघत बसतो त्याच्याकडे. मग स्वतःचीच समीक्षा. आणि स्वतःचीच टीका. आणि तन्वी. काहीतरी असते प्रत्येकाच्या मनात जे कायम सांगते की "थांबलास की संपलास" "कीप गोईंग" "लढ" "तू करू शकशील, नाही तर निस्तरू की नंतर"- कदाचीत एक चेतना - माझ्यासाठी तन्वी.


काही लोकांशिवाय मी आजीबात राहू शकत नाही. आणि मी त्यानाच दरवेळी दुखावतो. मला पश्चाताप आवडत नाही पण दरवेळी तोच वाट्याला येतो. मला एकटे रहायला आवडत नाही पण अनेक वेळा माझी पुढची पायरी कुठेतरी नव्या ठीकाणी नेवून टाकते. परत आलो की पुन्हा ये रे माझ्या मागल्या. तन्वी आणि तिच्या बरोबरच्या या सगळ्या कथा, या अश्यातून तयार झालेत. प्रचंड आनंदी आणि भरपूर मित्रांच्यात असलो की ही कधीही येत नाही. किंवा माझा स्वर्थ असेल हा तिला न आणण्यात. पण गरज पडली की मात्र हमखास येते.


आता आजही या टर्मीनलवर ६ तासाचा ब्रेक आहे. उगाच काही न करता बसलो तर परत विचार चक्र सुरू होईल. नाही ते भरकटलेले विचार. मग बोलावले तिला. म्हणालो बस माझ्या समोर. तुझ्याबद्दल लिहायचेय. ती कधीही त्रस्त असत नाही. ती कधीही लाचार दिसत नाही. ती कधी नाही म्हणत नाही. पण ती कशी आहे विचाराल तर सांगताही येत नाही.


I can't describe her, but I can feel her. हे असले वाक्य कोणाला पटायची अपेक्षा करत नाही पण काही अंशी खरच खरे आहे ते. बऱ्याचदा वाटते की आपल्या आयुष्यावर आपला ताबा नाहीए. वादळात गळून पडलेल्या पानासारखे आहे. जिथे नेईल वारा तिकडे जाईल. आता कदाचीत ही आई बाबांची पुण्याई असेल की हे वादळ मला कधी चुकीच्या ठिकाणी घेऊन नाही गेले. पण म्हणूनच माझ्या तन्वीकडे मी जबरदस्त महत्वाकांक्षा पाहतो. काहीतरी लक्ष्य पाहतो. ते मिळवण्यासाठी काहीही करायची जिगर पाहतो. आपल्याला कधी कुठे काय करायचेय हे तिला अचूक माहीत आहे. माझ्यासारखी भरकटलेली नाही ती. जे काही मला माझ्यात नाही असे वाटते ते तिच्यात घालून मोकळा होतो.


शाहरूख खान साहेबानी आयष्य बरच सोपे केलेय. सगळ्याप्रकारच्या भावनासाठी काही ना काही डायलॉग आहेच.

मै आंखे बंद करता हू, तो तुम्हे देखता हू

आंखे खोलता हू, तो तुम्हे देखना चाहता हू,

जब तुम साथ नही होती

तब तुम्हे अपने चारो तरफ मेहसूस करता हू,

अब ईसे प्यार कहो, पागलपन या मेरे दिलकी धडकन,

एकही बात है.


एकदम सगळे असेच नाही पण चारो तरफ मेहसूस वगैरे करणे या भनगडी होतात - पण जेव्हा गरज असते तेव्हा! आणि मग ईसे प्यार, पागलपन वगैरे नावे देण्याचा अट्टाहास मात्र होत नाही. नाहीतर उगाच केमीकल लोचा वगैरे व्हायचा.


असो फ्लाईटची वेळ होतीये आणि मी कारण नसताना कनेक्टींग फ्लाईट असतानाही टर्मीनल सोडून बाहेर आलोय. उगाचच हसू येतेय आता पुढे काय काय होणार आहे याची कल्पना करताना.

आणि हा पुढच्या नाट्याला तिही असेलच साक्षीदार.