Thursday, May 22, 2014

They are inexperienced!

"
बऱ्याचदा मला असं वाटतं की आम्ही लोक खूप approachable होतो जनतेला. आणि म्हणून कोणीही येऊन आम्हाला काहीही बोलून जाणे सोपे होते. सत्ताधारी कोणाच्याही आवाक्याबाहेर! सर्वसामान्य विचारही करू शकत नव्हते त्यांना काही बोलण्याचा. आम्ही केला विचार. तर आम्हाला ते कसं जमणार नाही, हे सांगायला हिरीरीने पुढे आलेले लोक खूप होते. आमच्या चुकांवर हसणारे लोक होते. सुरुवातीच्या काळात प्रश्न पडायचे की, "या" लोकांसाठी आपण सर्वस्व पणाला लावतोय? पण नंतर हा प्रश्न उरला नाही. ते लोक उरले नाहीत यातला भाग नाही. स्वतःला कशाचा फरक पडून घ्यायचा ते शिकलो आम्ही.

तुम्हाला काय वाटतं की देशाला मुक्त करणं हे एकच परमोच्च ध्येय होतं? तुम्हाला ६० वर्षानंतर मागे वळून बघताना असं वाटतंय. किंवा ऐकायला चांगलं वाटत म्हणून तुम्ही असं म्हणता की सगळा देश सामील झाला! ज्याला कळालं त्यानं यात उडी मारली. सगळा देश पेटून निघावा असे दिवस होते ते. पण सगळा देश नव्हता पेटलेला. इंग्रजांची सत्ता असावी असं म्हणणारे पण कमी नव्हतेच. तसे सगळे इंग्रज वाईट थोडीच होते? इंग्रजच करतील सगळं नीट यावरही गाढ श्रद्धा असणारे लोक होतेच. तुम्हा लोकांना काय येतं? बट्ट्याबोळ करणार तुम्ही! आत्ताच धड जमत नाहीये तुम्हाला काही! अनुभव कुठाय तुम्हाला काही? हे असले टोमणे असंख्य वेळा ऐकायचो आम्ही. हे लोक सत्ताधाऱ्याना प्रामाणिक राहिले. याची सल काही काळ राहिली.

वेड लागलंय या लोकांना. अशीच ओळख होती आमची. पण नंतर नंतर अभिमान वाटायचा त्याचापण! आपण जे करतोय ते बरोबर आहे. ते घडणे गरजेचे आहे. यावर अभूतपूर्व विश्वास होता. ज्या लोकांसाठी करतोय, त्यांची थोडीशी जास्ती साथ मिळावी असं वाटायचं. पण तसं होत नाही. प्रस्थापीत बुद्धीजीवी खचितच साथ द्यायला पुढे येतात. खरं सांगू तर क्रांती यांच्या जीवावर नाहीच होत. नाना म्हणून होते एक. आम्ही त्यांचे ऐकायचो. ते शिवाजी महाराजांचे उदाहरण द्यायचे. म्हणायचे, स्वकीयांचा बंदोबस्त करताना महाराजांची अर्धी उर्जा गेली! महाराजांनी आमचे खूप सारे प्रश्न सोडवले. आमच्या शेजारच्या जोशीकाकांना थोडेसे श्रम घेऊन आम्ही काय करतो त्याची माहिती घेणं जड होतं. पण चार लोक नावं ठेवायला लागले की मात्र दुप्पट उत्साहाने हेही सहभागी व्हायचे! अशा लोकांचे कितपत वाईट वाटून घ्यायचे किंवा तेच जोशीकाका नंतर जेव्हा चार लोक चांगले म्हणायला लागले तेव्हा स्तुतीही करू लागले, तर त्याचेही भान कितपत राखायचे, हे सर्व नानांनी दिलेल्या उदाहरणातून कळायचे.

तुम्ही आज ६० वर्षानंतर मागे बघताय तेव्हा तुम्हाला स्वातंत्र्य संग्राम वगैरे वाटतंय. Larger than life! जेव्हा हे सगळं सुरु होतं तेव्हा लोकांना शाश्वती नव्हती की खरच मिळणारे स्वातंत्र्य! पारतंत्र्याची सवय झालेली. त्याच्यात जगण शिकलेले लोक. तू मगाशी म्हणालास तसं, "उंगली क्यू कर राहे हो?" असं म्हणणारे लोक होते. आम्ही नव्हतो १०० टक्के बरोबर. आम्ही organized ही नव्हतो. हर कोपऱ्यातून वेगवेगळे आवाज उठत होते. पण सगळ्यांचा हेतू चांगला होता. एक होता. आमच्यावर टीका करणं काहींनी पसंत केलं. आमच्यातील उणीवा भरून काढण्यासाठी आम्हाला साथ देणं काहींनी पसंत केलं. साथ दिली त्यांना घेऊन आम्ही पुढे गेलो. हे महत्वाचे. हेतू शुद्ध ठेवला तर लोक जुळत जातात. ज्यांना समजायचं त्यांना कळत जात! आज नाही समजलं तरी काय झालं! नाहीच कळणारे ज्यांना, त्याचं दुःख काय करावं!

स्वातंत्र्य मिळवताना जे लोक जीवानिशी गेले ते गेले. तुरुंगवास भोगला तो भोगला. पण त्यापासून कोसभर लांब राहून, साहेबांचा जमानाच चांगला होता असं म्हणणारे लोकही होतेच की. नंतर एकदा जोशीकाका येऊन म्हणाले, मिळालेलं स्वातंत्र्य उपभोगायला आम्ही कितपत लायक अहोत हे काळात नाही! कारण जेव्हा सहभागाची गरज होती तेव्हा आम्ही टीका करत बसलेलो! त्यांना नाना म्हणाले. वेळ अजूनही गेलेली नाही. संग्राम अजूनही संपलेला नाही. १०० टक्के गणितं अजूनही सुटलेली नाहीयेत. आणि ते एकट्या दुकट्याच काम नाहीचे! उणीवा भरून काढता येतात का बघा. तुमच्या बाजूला असंख्य लोक आजही प्रयत्न करतायत. त्याला साथ द्या. ते अपूर्ण असतील. म्हणून त्याना दूर सरू नका. लायक किंवा नालायक यावरून तर ठरवणार? आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं होतं. इंग्रजांना घालवण हा फक्त त्यातला एक भाग होता. ते गेले म्हणजे स्वातंत्र्य मिळालं असं थोडीच आहे! आत्ता साथ सोडाल या संग्रामाची तर ६० वर्षानंतरही स्वातंत्र्य मिळालं असं वाटायचं नाही!
"

कर्नल जोगळेकारांबरोबर एक आजोबा भेटले. ते स्वातंत्र्य सेनानी होते. अनायासे भेट झाली आणि गप्पा रंगल्या. त्यांचं नाव विचारायचं राहून गेलं. पण पुन्हा भेट होईलच अशी इच्छा आहे. स्वातंत्र्य मिळालेलं बघायचंय त्यांना. त्यांना अजूनही आशा आहे.

No comments: