Friday, August 08, 2014

फॉरेन विरीद्ध फोरेन



नव्या शहरात, नव्या देशात जाणं आता नवीन नाही. किंवा ते कुतूहलही आता फारसं उरलं नाही. आजूबाजूचे चार लोक आणि हाती असलेलं काम याच्या पलीकडे आपण थोडीच जातो? मग ते सिंगापूर असो किंवा शिंगणापूर. नाही म्हणलं तरी माणसाला “ढाई बिघा जमीन” पेक्षा जास्ती आणखी काय लागतं? अशा धरतीचं सपक तत्वज्ञान हे! पण वयाबरोबर कदाचित सपक गोष्टी पौष्टिक वाटत असाव्यात. ही असली अक्कल घेऊन लंडन मध्ये आपल्याला काय काय दिसणारे आणि आपण काय काय करणारोत याचं म्याच फिक्सिंग करून राणीच्या शहरात यायला निघालो.

समस्त फोरेणच्या जगात पंजाबी taxi ड्राइवर असत असतील, तरी आपल्याला लंडन मध्ये चक्क मुरुड जिल्ह्यातला मस्त मराठी ड्रायवर मिळाला. दिवेआगार आणि हरिहरेश्वरच्या समुद्राची चर्चा करत आम्ही थेम्सकाठच्या या शहराच्या रस्त्यावर आलो. विमानतळ एक तासापेक्षा कमी अंतरावर असणे वगैरे प्रकार आपल्या नशिबी नसतातच. त्यामुळे तासभरचा प्रवास पुढे वाढून ठेवलेला. मुरुडवासी या ड्राइवरने तासाचा प्रवास दीड तासाचा केला. त्याने गप्पांच्या ओघात शहराच्या आतून फेरफटका मारत, पहिल्याच दिवसाच्या पहिल्याच तासात, लंडन मधल्या खूप साऱ्या गोष्टी दाखवून टाकल्या. पण काचेच्या आतमधून. “इथं यायला लोक खूप प्रयत्न करतात. तरी त्यांना संधी मिळत नाही. तुला मिळालीये तर त्याचं चीज कर” असं काहीसं त्याच्या दुप्पट वयाच्या आजोबांसारखं बोलून तो अंतर्धान पावला. संधी मिळणं आणि संधी लाभण यामध्ये फरक असतोच की. पण आपण थोडीच आजोबा झालोय असली उत्तरं द्यायला? म्हणून काही उत्तर बित्तर नाही दिल. अधाशासारखं नव्या शहराचे कानेकोपरे मापणे सुरु ठेवलं.

यापुढे जे सुरु झालं ते म्याच फिक्सिंगपेक्षा काहीसं निराळं होतं. नकळत का होईना, मनातल्या मनात तुलना सुरु झालेली. कशाची म्हणाल तर पुण्याची आणि लंडनची नव्हे! एका फोरेणची दुसऱ्या फोरेणशी! लंडन आणि कॅलिफोर्नियाची. पहिल्या काही दिवसात, ठळकपणे जाणवलेल्या या काही गोष्टी. या व्यतिरिक्त तुम्हालाही काही जाणवलं असेल तर जरूर सांगा.


१. काही वर्षापूर्वी जेव्हा कॅलिफोर्नियामध्ये पोचालो तेव्हा इंटरनेट मिळायचे वांदे होते तेव्हा बाल्कनीमध्ये बसून कुठाल्यातरी शेजाऱ्याच्या इंटरनेटवर दिवस काढलेले. फुकटची कनेक्शन शोधणे असा टाईमपास होता काही दिवस. इकडे घरी पोचल्यावर इंटरनेट तर मिळाले पण काहीही ओपन करा. प्रत्येक वेबपेजवर कुकीजची वार्निंग. “आम्ही कुकीज वापरतोय. वापरणारच आहोत म्हणजे. तरी तुम्हाला सांगतलं ब्वा एकदा” या अशा धर्तीची. मग तुम्ही "got it" क्लिक करायचं. हे असं सगळीकडे. एकदा मला वाटलं की आपल्या मशीनमध्ये काही बिनसलं की काय? पण माझ्या मशीनला काहीही झालेलं नव्हतं. पहिल्यांदा वापरताना जवळ जवळ सगळ्याच वेबसाईट ही वार्निंग दाखवतात इथं. हे म्हणजे वेबसाईटनी युजर ला “केहके लुंगा” असं म्हणाल्यासारखं आहे. पण असो. इथं लोकांना आवडत असावं ब्वा! पुढे Torrent वगैरे काढावे तर चक्क सर्विस प्रोवाईडरन कॉपीराईटची काहीतरी वॉर्निंग दाखवावी!! शिव शिव शिव! हे म्हणजे अतीच की!

२. मला आठवतंय, अमेरिकेमध्ये कुठेपण भटकताना समोर फिरंग आला की भुवया उंचावून गुड मोर्निंग, गुड इविनिंग करून जायचा. नकळत आम्ही पण करू लागलो होतो. समोरच्याकडून उत्तराची अपेक्षा कधीच नसायची. पण हे रुटीन होतं. उगाच जाता येत एकमेकाला ग्रीट करात बसायचं. हा आपण बघितलेला पहिला फोरेणर. (त्या आधी एशियामध्ये फिरलेलो पण तिकडच्या लोकांना फोरेणर नाही म्हणवल. असंच. racist वगैरे नाही. पण ते म्हणजेच आपलेच आयसोटोप वाटले.) तर इकडचा फिरंग चक्क खाली मान घालून निघून जातो!! असं थोडीच करतात फोरेणर? असं कसं? मी एक दोनदा स्वतःहून म्हणायचा प्रयत्न केला. पण समोरचा ऐकायला थांबतो कुठे? आठवडाभर फिरल्यावर मला एक जण भेटला की जो स्वतः बेंचवर बसला होता आणि मी बाजूने जाताना मला गुड इविनींग म्हणाला. हा खरा फोरेणर! पण तो ब्रिटीश नव्हता. :(

३. पुण्यातून बाहेर पडलो तेव्हा ट्राफिकची शिस्त वगैरे लिहिती बसलो होतो. इकडं तर धर्मभ्रष्ट झाल्यासारखं वाटलं. गाड्या सिग्नल पाळतात पण लोक काहीही करतात हो! "जे वॉक" वगैरे भानगड नाहीच! बऱ्याचदा उजवीकडे बघा, डावीकडे बघा, आणि असाल तिथून रस्ता पार करा. हाच एक नियम! तिथे चालणाऱ्या लोकांसाठी लाल पिवळे लाईट आहेत ते करमणुकीसाठी असल्यासारखं! कॅलिफोर्नियामध्ये असताना दंड करायचे लोक! इकडे भाईचारा सुरु होता सगळीकडे. लाल सिग्नलच्या नाकावर टिच्चून आपल्याकडे जशा गाड्या पुढे जातात तसे इथले पादचारी लोक बिनधास्त कुठूनही रस्ता पार करतात. हे म्हणजे एकदम होमली फिलिंग! तसा इथे चक्क रस्त्यावर थुंकणारा गोरा पण मी माझ्या या डोळ्यांनी पाहिलेला आहे. इथे पान खायची संस्कृती नसल्याने असल्या दुर्मिळ गोऱ्यांच्या कलेचे ठसे उमटलेले नाहीत! पण असो. ग्लोबलायजेशन म्हणू हो. आणि काय?

४. भारतामधून आला असाल तर लंडन आपलंच शहर आहे असं वाटायला वेळ नाही लागत. कॅलिफोर्नियामध्ये नव्हतं ब्वा असं वाटलं कधी. याचं कारण म्हणजे इथल्या इमारती. विटांची बांधणी आणि कौलारू छप्पर. किंवा बाहेरून तरी असं दिसतं तसं. आपल्याकडचच पण जरा सुबत्ता असलेलं टुमदार शहर असं लगेच वाटून जातं. आपल्यातलच वाटलं शहर मग सुरु केली किरकिर! म्हणजे वर जी काय आरती ओवाळली, ती अशामुळेच. एकदम आपल्या शहरात करतो तशी! असो. पण इथल्या इमारती खूपच खास! मजा आ गया!! कॅलिफोर्निया मधल्यासारखं लाकडी बिकडी काही नाही इथं काही!

५. आणि शेवटचं म्हणाल तर फ्याशन! आता याचं काय सांगावं रे बाबा! सुरुवातीला "अरे काय हे ध्यान?" पासून ते "इसमे कुछ बात है" पर्यंत जायला फार वेळ नाही लागला. San Francisco मध्ये बघितलेले अचाट प्रकार आठवले. इथे जे दिसले ते आता हळू हळू इंटरेस्टींग वाटण्यापर्यंत मजल गेलीये. शेवटी कसय न. अंगात घालायची गोष्ट एक आणि ती carry करणं दुसरं! हट्टानं रंगवलेले केस, उघडलेली बटणे किंवा घातलेले कपडे, हा प्रकार म्हणजे फ्याशन हे San Francisco मधलं आपलं दृश्य. इथे मात्र जरा elegance वाटला. पहिल्या दिवशी disaster वाटलेल्या स्टाईलची आता डोळ्याला सवय होऊ लागलीये. २ वर्ष राहून पण San Francisco मध्ये गेल्यावर, तिथल्या फ्याशनची सवय नाही झाली! ते अचाटच वाटत राहिलं.

बाकी न, इथले लोक सगळे कशातरी सारखे वाटतात. सगळे. हर किसीकी शकल किसीना किसीसे तो मिलतीही है. यातला प्रकार. म्हणजे प्रत्येकजण आपण पाहिलेल्या कुठाल्या न कुठल्या तरी सिनेमाचा कलाकार वाटतो. सगळे तसेच वाटतात. ट्रेन मध्ये आजूबाजूला बघितलं की च्यायला याला किंवा हिला कुठेतारी बघितलय असं फिलिंग जोरदार येतं. तसही समोर दिसणारा माणूस गोरा आहे म्हणजे ब्रिटीश आहे, असं असण्याची शक्यता ताशी कमीच. आता बाहेरून येऊन राहणारी इतकी खंडीभर माणसं आहेत तर मग त्यात पक्का ब्रिटीश कुठे सापडायचा? अमेरीकेमध्ये लोक पाउंड कमी करायच्या मागं पाळतात. इकडचे लोक पाउंड मिळवायला पाळतात. या अशा धावपळीमध्ये बनलेलं हे शहर. आत्ता जितके दिवस नशिबात असेल तितके दिवस नवं काहीतारी दाखवेल अशी अपेक्षा. आपण आपलं अधाशासारखं बघणं सुरु ठेवावं.

No comments: