Tuesday, March 17, 2015

आयुष्यावर बोलू काही...

एक म्हातारा दिसला मला कॅफे मध्ये आज. जरा त्रस्तच होता. त्याच्या बोलण्यावरून तसं जाणवत होतं. माझ्याहून दूर बसलेला. काय बोलतोय ते ऐकू येत नसलं तरी तावातावाने जे हातवारे करत होता ते नजरेतनं सुटणं अशक्य होतं. राहून राहून त्याच्याकडे नजर जात होती. कॅफेमध्ये जे Jazz म्युजीक सुरु होतं त्याच्या तालावर या म्हाताऱ्याने कोणालातरी फैलावर घेतलेलं!

म्हाताऱ्याचे कपडे मळलेले. खूप दिवस कपडे धुण्या बिण्याच्या भानगडीत पडलाच नसावा. किंवा इथं येऊन बोलत बसण्यासाठी कपड्या बिपड्याचं भान सोडून आला असावा. दर दोन मिनिटाला भुवया वर खाली करत होत्या. घडी घडी हातोप्यातून बाहेर येऊन, त्याची बोटं कधी समोरच्याच्या तर कधी बाजुच्याच्या नाकावर वार करत असल्यासारखी वाटत होती! सरल्या आयुष्यातल्या घडल्या गोष्टींचा हिशोब मांडल्यासारख्या चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या!

डिस्टर्ब करणारा भाग वेगळाच होता. हा म्हातारा एकटाच बसला होता. त्याच्या ना पुढे कोणी होतं की ना बाजूला!

सुमारे १५-२० मिनीटे त्याचा हा सगळा प्रकार सुरु होता! त्यानंतर म्हातारा निघायला उठला. कदाचित त्याला जे बोलून टाकायचं होतं, ते एकदाचं झालं असावं. केव्हाचं उरलेलं, पदरात साचलेलं, निचरा करायचं राहून गेलेलं, त्यातलं थोडसं का होईना त्या कॅफेमध्ये सांडून झालं असावं.

किंवा कॉफीचा कप रिकामा झाला असावा आणि आता दुसरा घ्यायला खिशामध्ये काही उरलं नसावं.

तो उठला आणि तसाच तंतरत निघून गेला. थोड्या वेळाने त्याच्या जागी आणखी कोणी येऊन बसलं. आणि त्यांच्या गप्पा रंगल्या. गप्पा होण्यासाठी तर असतात कॅफे! नाही?


कॅफे मध्ये अजूनही jazz म्युजीक सुरु होतं. मी ज्यांची वाट बघत होतो ते दोघेही येऊन पोचले होते. त्यांचं बाळ आता ६ महिन्याचं झालेलं. बोलायला काहीही येत नसलं तरी आपल्या आई बाबांनी आपलं ऐकावं असं त्याचं म्हणणं होतं. दर पाच मिनिटांनी त्याचा बाबा त्याच्याकडे बघून "हो क्का? बर हं!" अशी मान हलवायचा. त्या बाळासाठी तेवढी acknowledgement पुरेशी होती.

थोड्या फार गप्पा मारून आम्ही तिथून निघालो. मी मझ्या ट्रेन मध्ये बसलो. डोळे बंद केले. डोकं मागे टेकलं.

आयुष्याच्या अगदी दोन भिन्न टोकांवर उभ्या असलेल्या या दोन जीवांच्या बोलण्याच्या, व्यक्त होण्याच्या, या desperation ला पाहून, थोडा वेळ का होईना मलाच निःशब्द व्हायला झालं.

No comments: