Monday, February 18, 2019

भाड्याची मशाल

Being part of the governance आणि being a political commentator या दोन गोष्टी खूप वेगळ्या आहेत. नुसतंच political commentator असणं याचा petriotic असण्याशी सबंध नाही. Governance मध्ये भाग घेणं म्हणजे निवडणुकाच लढवणं असं नाही. थोडक्यात फरक असा की एकात तोंडची वाफ दवडायची आणि एकात बुड हलवायचं. या दोनही गोष्टी करायची विधी आणि प्रमाण हललं की केविलवाणी अवस्था होते. मग पुलवामानंतर कोणी काय केलंच पाहिजे हे शीरा फुगवून सांगायला जमलं तरी घराबाहेरच्या रस्त्यावरचा खड्डा पलिकेबरोबर पाठपुरावा करून बुजवयचं जमत नाही. चमचाभर बुड हलवलं म्हणून खंडीभर वाफ दवडायला मुभा नाही. खंडीभर वाफ दवडली हा बुड हलवायला पर्याय नाही. म्हणून वाफ दवडायचीच नाही का? अमक्याचा तमाका करतो तेव्हा कसं चालतं? असे पोटतिडीकीने प्रश्न पडले तर खालील दोन पैकी एक उत्तर स्वतः स्वतःसाठी निवडून दुसऱ्यांचा त्रास वाचवायचा. पहिलं उत्तर म्हणजे रावसाहेबनी म्हणल्याप्रमाणे मूळव्याध होतंय का नाही बघ! हे. आणि दुसरं म्हणजे शांतेच कार्टं मध्ये होतं तसं, आपला पगार किती? आपण बोलतो किती? हे. दुसऱ्यानं घाण केली की आपण करायलाच हवी या मूलभूत अवस्थेतून आपण सुमारे पन्नास साठ हजार वर्षांपूर्वी गच्छंति केलेली आहे. ही एकदाची मनाशी गाठ बांधून घ्यावी.


त्याही पुढे, आत्ताच काही शे वर्षांपूर्वी आपण एकमेकावर एककल्ली मतांचा भडिमार करून, निरुत्तर करून, आपापला मुद्दा सिद्ध करायची सवय पण सोडलेली आहे. आता प्रयोग करून, अभ्यास करून, तज्ञ बनून आपापला मुद्दा अधिकारवाणीने मांडायचा, इथवर आपण पोचलेलो आहोत. या मधल्या पायऱ्या वगळून आपला मुद्दा किंवा भाड्याचा मुद्दा, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पणे मांडणं आणि कळत नकळत तोच प्रमाण माना असा हट्ट धरणं हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. कोणावरही, कशावरही, कसंही, कुठंही, काहीही बोलणं याचाही अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी संबंध नाही. आपली बोलण्याची कुवत हे बोलण्याच्या लायकीचं प्रमाण नाही. स्थलकालपरत्वे एकाच गोष्टीच्या वेगवेगळ्या छटा असू शकतात. त्या असू द्याव्यात. मतभेद असू शकतात. तेही असू द्यावेत. मतं चूक असू शकतात. आपण शिकलेल्या गोष्टीही चूक असू शकतात. आणि चूक सुधारता येऊ शकते. याची आपल्याला जाण असणं आणि याचा दुसऱ्याला वाव असू देणं याला प्रगती म्हणतात. हे न करू देण्याला हट्ट म्हणतात. आणि त्या हट्टाची परिणीती अधोगतीत होते.


आपण आपापल्या क्षेत्रात अभ्यास करावा. मेहनत घ्यावी. खूप प्रगती करावी. आपण आपल्या क्षेत्रातले छोटे मोठे प्रश्न सोडवावेत. हे कौतुकास्पद आहे. हे नियमित आणि प्रामाणिकपणे केलं की आजूबाजूचा प्रत्येक जण सुद्धा त्याच्या त्याच्या क्षेत्रात मेहनत घेतोय यावर विश्वास बसेल. आपल्या आजूबाजूला बरेच प्रश्न आहेत असं वाटलं तरी त्यावर तोडगा काढायला ती ती तज्ञ मंडळी कार्यरत आहेत, हे मान्य करणंही सोपं जाईल.


माकडाचा माणूस झाला. तेव्हा त्याच्याकडे पर्याय नव्हता. पण आता आपलं परत माकड होऊ न द्यायचा पर्याय आपल्याकडे आहे. आपल्यासारखा दुसरा दिसत नाही, वागत नाही, बोलत नाही, किंवा विचार करत नाही हे काळजीचं किंवा पिसाळण्याचं कारण नाही. या विविध गोष्टी आपल्यात सामील करून घेत आणि आपण या विविध गोष्टींमध्ये सामील होत आपण इथवर पोचलेले आहोत. हे चालू द्यावे. या विविधतेला आपला वैरी न करता, आपली ओळख होऊ द्यावी.


तेव्हा मोजकं बोलू आणि शांतीत क्रांती करू. दर दोन आठवड्यांनी वेगवेगळ्या कारणांनी पेटून उठलो तर राख होऊन जाऊ. त्यापेक्षा ज्योत म्हणून तेवत राहण्याचा प्रयत्न करू. (आता मग ज्योतच का? मशाल का नाही? असं वाटलं तर लगेच मशाल बनून टाका. कोणाच्या अनुमतीची वाट बघू नका. पण मग दर दोन दिवसांनी वेगवेगळ्या कारणांनी भडकू पण नका. नाहीतर लोक भाड्याची मशाल म्हणतील. मग आम्ही पेटून उठायचंच नाही का? असा प्रश्न पडला तर पहिल्या परिच्छेदात याची संभाव्य उत्तरं दिलेली आहेत.)


तसंही अवघड प्रसंगी समजूतदार पणा जास्ती हवा. Let's be one less problem to worry about.

No comments: