Saturday, February 22, 2020

Part 4: One Night Stand

In the beginning, there was nothing. Then there was light. There was still nothing. But you could see it. या अशा तत्वावर आपली ट्रिप सुरु झाली, आणि त्याच तत्वाशी कायम राहत संपली. मजा अशी की, या अशाच पद्धतीने भटकणारी य लोकं सुद्धा मध्ये मध्ये भेटत राहिली. काही सेकंदापासून, काही तासापर्यंतचा प्रत्येकाबरोबरचा सहवास. मग तुम अपने रस्ते, और मै अपने.


मी जेव्हा मिन्स्क वरून वार्साव ला यायचं ठरवलं तेव्हा त्याला कारण म्हणजे, तेव्हा त्या क्षणी स्वस्तात स्वस्त फ्लाईट तिकीट वार्साव पर्यंतचं होतं. खरंतर खूप खूप आधी मी जेव्हा या ट्रीपसाठी काहीतरी तरी तयारी करू असा विचार केलेला, तेव्हा वार्साव माझ्या यादीमध्ये होतं. पण मग कोणीतरी ऑनलाईन लिहिलेलं की, खरं पोलंड पाहायचं तर क्राकाव मध्ये बघायला मिळेल. वार्साव तर महायुद्धामध्ये खाक झालेलं. आता तिथं सगळं नवं बांधलंय. त्यामानाने क्राकाव मध्ये अजूनही जुन्या गोष्टी शाबूत आहेत. तेव्हा क्राकाव कशाशी खातात हेही मला माहिती नव्हतं. पण मग, हे सगळं सुरु असताना, मला एका क्राकावीयन कुटुंबानं त्यांच्याकडे राहायला यायचंही आमंत्रण दिलं. मग ही एवढी करणं पुरेशी होती यादीमधून वार्साव काढून टाकून त्याठिकाणी क्राकाव घालायला. पण तरीही पुढे, एका रात्रीसाठी का होईना, शेवटी वॉर्सावला यावंच लागलंच. तर ही त्या रात्रीची गोष्ट.



मिन्स्क सोडताना बॉर्डर कंट्रोलवाल्या बाबाशी बोलून झालेलं. त्यामुळे, वॉर्साव मध्ये घुसताना, आता यापुढे सगळं सुरळीत आहे, या अशाच अविर्भावात आलेलो. एक रात्र, दोन दिवस. एवढे काढायचे इथे, आणि दुसऱ्या दिवशी परत मिन्स्कला, रात्री तिथल्या एअरपोर्ट वर. आणि मग पुढे रशिया. हा आपला सरळ सोपा प्लॅन. मिन्स्कमधून निघताना, काही मिनिटं राहिलेली असताना, वॉर्साव मध्ये एक हॉस्टेल शोधलं आणि तिथे रात्रीची सोय केली. आता फोन बंद करा अशी सूचना झाली, आणि मग टेक ऑफ!


हॉस्टेल मध्ये राहण्याचा फायदा असा, की काही ना काहीतरी हालचाल सुरु असते तिथे कायम. कोणीतरी कुठल्यातरी ट्रिपला जात असतो, कोणी जाऊन आलेला असतो. हॉस्टेलच्या लोकांनी काही गोष्टी आयोजित केलेल्या असतात. वगैरे वगैरे. दुपारी हॉस्टेलमध्ये पोचलो. साधारण वॉर्साव मधल्या बऱ्याचशा प्रसिद्ध गोष्टींपासून हे हॉस्टेल खूपच जवळ होतं. कोपर्निकस बाबाचं एक म्यूजियम होतं जवळ. तिथेतर जाऊचया असं ठरवून, मी माझ्या खोलीत बॅग टाकली. तिथे अजून दोघेजण नुकतेच येऊन गप्पा मारत बसलेले. त्यातला एक सुदीप. त्याच्या लगेजची काहीतरी वाट लागलेली. पण शेवटी मिळालं होतं म्हणे. आणि मग फायनली हा इथे पोचला. ओझरतं ऐकलं. आपापले नंबर एकमेकांना दिले, आणि मग सटकलो. खाली कॅफे मध्ये एक जॉन का मार्क भेटला. म्हणाला, स्टार्ट-अप साठी काम करतो. ऑफिस असं नाही मग कधी या हॉस्टेलला, कधी त्या हॉस्टेलला, असं राहतो. नाहीतरी काम ऑनलाइनच तर करायचं असतं, ही त्याची philosophy. त्यानं मलाही विचारलं मी काय करतो. सध्या काहीही करत नाही, म्हणून मी त्याला बगल दिली. अपने त्वचा से अपने उम्र का पता नहीं चलता, म्हणून त्याला मी साध्याच कुठलातरी युनिव्हर्सिटी मधून बाहेर पडलोय असं वाटलं. आपल्याला काय? की फ़रक पडता है? मीही ते दुरुस्त करत बसलो नाही.


पुढे मग, पाय तुटेपर्यंत वॉर्साव चाललो. मधेच इलेट्रीक स्कुटर सापडल्या, मग त्यावरून फिरलो. किल्ले बिल्ले, रस्त्यावरचे आर्टिस्ट, त्यांच्या कला. विगन आणि चविष्ट खाण्याच्या जागा शोधायचा जरा किडा तेव्हा सुरु झालेला. प्राग आणि क्राकाव मध्ये सापडलेली पण अशी ठिकाणं. मग इथेही शोधली, आणि जवळच एक छान छोटेखानी जागा सापडली पण. यासगळ्या मध्ये, कोपर्निकस म्यूजियम अर्थातच नाही झालं. तिथे दोन का तीन दिवस आधी ऍडव्हान्स बुकिंग लागायचं, असं तिथं गेल्यावर कळलं. पण याच म्यूजियम च्या बाजूला आपल्याला विस्वा नदी होती. ही पोलंडच्या मधोमध जाते. पोलंडची सर्वात मोठी आणि सर्वात लांबलचक नदी. नदीकाठी अर्थातच बऱ्याच गोष्टी सुरु होत्या. कोणाचा तरी लाईव्ह परफॉर्मन्स, एकीकडे पार्क मध्ये खेळ, वर खाण्या पिण्याची रेलचेल. नदीकाठी बसलो थोडावेळ. तुम्हाला माहिती आहे? कोपर्निकस ज्या युनिव्हर्सिटी मधून शिकला, त्यावर anti-national म्हणून गदा आणली होती नाझी राजवटीमध्ये. मग प्रोफेसर लोकांना धरलं. विद्यार्थ्यांना धरलं. वगैरे वगैरे. म्हणजे एक्को ही कहानी बस बदले जमाना. याचं मला थोडं अधिक वाईट वाटायचं कारण म्हणजे, आता कोपर्निकस जेव्हा जेव्हा आठवणार, तेव्हा तेव्हा हे सुद्धा आठवणार. म्हणजे झालं न कायमच गढूळ! तसं मला न आठवल्यामुळे जे घडलं ते तर बदलत नाही, हा भागही आहेच. पण असो. जरा जास्ती भरकटायला होतंय म्हणाल्यावर शेवटी शटर डाऊन करू तिथून उठलोच. परत हॉस्टेलवर आलो. डोळा लागणारच होता, तेवढ्यात सुदीपचा मेसेज आला. त्याला मी जेवायला भेटू म्हणालेलो ते कधीच विसरलेलो! तेव्हा रात्रीचे नऊ - दहा वगैरे वाजत आलेले. कमीत कमी हॅलो तरी करू, म्हणून परत उठलोच.


खाली कॉमन एरियामध्ये कोणीही नव्हतं. बारपाशी एक मुलगी होती. चारू. ऍडव्हान्स मध्ये तिने पब-क्रॉल साठी रजिस्टर केलेलं, पण हिच्या शिवाय अजून कोणीच रजिस्टर केलेलं नव्हतं, म्हणून पब क्रॉलच रद्द झालेला. आणि मग ही बसलेली इथे.


"I can take you on a pub crawl, as long as you don't mind drinking alone." पासून आमच्या गप्पांची सुरुवात झाली. ते थेट "तू पण लंडन वरूनच आलीस का?" वगैरे करत करत, दुसऱ्या दिवशी चारूचा वाढदिवस आहे हे समजण्यापर्यंत गेली. एवढ्यात सुदीप उगवला. आणि drinking alone situation चा निकाल लागला. सुदीप समान टाकून आला. आणि मग रात्री दहा अकराच्या सुमारास, आम्ही परत बाहेर पडलो. आपण रहातो त्या ठिकाणची लोकांना टूर करून द्यायची आपली हौस आहेच. मग ते कॅलिफोर्नया असो, लंडन असो, किंवा काही तासाच्या ओळखीचं वॉर्साव असो. थोडे तास का होईना, ते शहर आता माझ्या जास्ती ओळखीचं होतं. मग self proclaimed टूर गाईड बनून, इकडे सायकली मिळतात, इकडून इलेक्ट्रिक स्कूटर उचलू, इथे याव किल्ला, तिथे त्याव काहीतरी, इथे पायऱ्या उतरल्या की थेट नदी, हे असलं करवत करवत पुढचे दोन अडीच तास घालवले. शेवटी आम्ही वीस्वा नदीकाठी येऊन पोचलो. आता मध्यरात्र होऊनही बराच वेळ झालेला. नदीवरच्या पुलावर रंगीबेरंगी लाईट टाकून काहीतरी देखावा सुरू होता. थोडासा पाऊस सुद्धा सुरू झाला. आता तो थांबेपर्यंत आम्हालाही थांबणं भाग होतं. आणि मग इथे आम्हाला तिघांनाही प्रथम थोडीशी एकमेकांची ओळख करून घ्यायला वेळ मिळाला.


पाऊस ओसरला, पण अजूनही हॉस्टेल मध्ये परत जायची इच्छा अजिबात नव्हती. आणि अजून चारुचा वाढदिवस सुद्धा झालेला नव्हता. तसं म्हणाल तर पब-क्रॉल सुद्धा नव्हताच झालेला, पण ते लिस्ट मधून कधीच गायब झालेलं होतं. आता तिथे नवी एन्ट्री झालेली. चीज केक. ऑफ कोर्स. माझी टूर. माझी चॉईस. माझी बॅट, माझी बॅटिंग. आता रात्री दोन का तीन वाजता आम्हा तिघांना चीज केक कोण देणार यासाठी शोध मोहीम सुरू. नदीकाठीच अजून थोडं फिरलो. पण केक वाली जागा काही मिळेना. आता रस्त्यातल्या छोट्या मोठ्या जागाही बंद व्हायला लागलेल्या. मधेच एका लग्नाच्या पार्टीमध्ये सुद्धा घुसलो. पण त्याचं कारण वेगळं होतं. शू लागली म्हणून कुठेतरी जायचं होतं आणि कुठंही पर्याय दिसेना. मग माहिती असूनही सोंग पांघरूण एका पार्टीमध्ये चीज केक आहे का विचारायला गेलो आणि शू करून आलो. पुढे शोध मोहीम सुरूच. अशा वेळी गुगल मॅप वापरायचा नाही, ही क्रांतिकारी कल्पना कोणाची हे आत्ता आठवत नाही पण तीन नंतर त्याला अजिबात पर्याय उरला नाही. रात्रभर सुरू असेल असल्या जागा चाळून, त्यातल्या एका ठिकाणावर बोट ठेवलं आणि बोलावली उबर. ऑफ कोर्स त्या ठिकाणी चीज केक काय तर कुठलाही केक मिळाला नाही. पण एव्हाना उबरच्या ड्रायव्हरला सुद्धा चारूच्या वाढदिवसाबद्दल माहिती होतं. "अरे माझ्या वाढदिवसासाठी म्हणून कशाला इतका त्रास घेताय?" करणारी चारू आता "आज केक ख़ाके ही रहेंगे" वर आलेली. त्यामुळे चीज केक वाली जागा शोधणं हे ऊबरच्या ड्रायव्हर ने पण मनावर घेतलेलं.


शेवटी कदाचित, चार वाजता वगैरे मला एक ठिकाण सापडलच. मी माझ्या आत्तापर्यंतच्या प्रवासाची रसभरीत कहाणी सांगितली, सुदिपने त्याच्या स्टार्टअपची, त्याच्या बॅग ची आणि कसं दर वर्षी तो जग भटकायला निघतो त्याची गोष्ट सांगितली, चारूने तिचा वाढदिवस तिला कसा करायचा होता, की जो आम्ही करत होतो त्याच्या किंचितही जवळपास नव्हता, त्याची गोष्ट सांगितली.


खिदळत, उड्या मारत, अनोळखी शहराच्या, अनोळखी गल्ल्यांतून, तितकेच अनोळखी असलेले आम्ही तिघे, शेवटी हॉस्टेलवर पोचलो. आत्ता इथे हे असं, भेटायचं, असायचं, आणि जे काही केलं ते काहीही करायचं, तेही ठरवून केलं असतं त्याहूनही amazing, असं काहीच कारण नव्हतं. आठवण म्हणून फोटो काढून ठेवला. पुन्हा भेटू असा काही सिन नव्हताच. त्यामुळे त्याच्या वाट्याला गेलोच नाही. पहाटे, म्हणजे आत्ताच एक दोन तासात, सुदिप पुढे निघणार होता. दुपार होईपर्यंत मी निघणार होतो. चारुला अजून एक दिवस काढायचा होता.


No comments: