हे सगळं असंच करत शाळा बिळा पार पडली. कॉलेजमध्ये पावसाचा संबंधच आला नाही असं आत्तातरी वाटतंय. यासाठी खास कधीतरी ठरवून आठवायला बसलं पाहिजे. कॉलेज म्हणालं की खूपच वेगळ्या प्लॅनेटवरच्या आठवणी आहेत. त्यात मग पाऊस किंवा रेनकोट किंवा असलं काहीच येत नाही.
इथून थेट पुढचं जे आत्ता आठवतंय ते म्हणजे नाईट शिफ्ट मधला पाऊस. पुण्यात आल्यानंतर सुरुवातीच्या काळात, २-३ वर्षं तरी नाईट शिफ्ट होती. सुरुवातीला काही माहिती नव्हतं म्हणून. आणि नंतर मजा येत होती म्हणून. पावसाळ्यामध्ये, सकाळी सकाळी काम संपवून घरी जाताना, मी चक्क पाऊस यायची वाट बघत बसायचो ते आठवतंय. रात्रभर चार पाच वेळा कॉफी पिऊन झालेली असली, तरी पावसाची वाट बघत रिचवलेला शेवटचा कप म्हणजे मेडिटेशन असायचा. यामध्ये चहाचा नंबर कसा लागला नाही याचं नवल आहे. पण ठीकपण आहे. इतकं हवंच कशाला चहाचं कौतुक. हे आपलं आपलं एक उगाच तयार केलेलं तत्वज्ञान. की आता घरीच जायचंय न? मग त्यासाठी कशाला रेनकोट आणि टोपी वगैरे लवाजमा. त्यापेक्षा वॉटर प्रूफ बॅग घेऊ. ते जास्ती रास्त. नाही का? आणि मग असं दरवेळी खास पावसाची वाट बघून मग नखशिखांत भिजत घरी गेल्यावर स्वतःवरच खुश व्हायला व्हायचं. ते वेगळं सुख. ही पावसाची दुसरी ठळक वाली आठवण. यामध्ये पण पॅकेज्ड डील असायचं. खरं तर पाऊस म्हणजे फक्त भिजणं नव्हतं. त्यात ओलावा होता, नाद होता, गंध होता, ख्या ख्या खी खी होतं, आयुष्याचं गुपित आणि फिलोसिफिकल किरकिर होती, भावनिक रडारड होती, अजागळ खाणं पिणं होतं, फिगरेटीव्ह आणि लिटरल धडपड होती. आणि नवं म्हणजे, थोडीशी खर्डेघाशी आणि थोडीशी फोटोग्राफी होती. एकूण काय? तर सगळा पावसाचा लवाजमा अपग्रेड झालेला. आता पुढच्या व्हर्जन मध्ये काय अशी चाहूल लागावी असा.
पण मग विंडोज मिलेनियम नंतर विंडोज विस्टा जसं आलं तसं पावसाच्या अनुभवाचं पुढचं व्हर्जन पण आलं. हा पाऊस थोडा सोशल डिस्टंसिंग वाला पाऊस होता. हा पाऊस काचेबाहेर आणि मी काचेच्या आत. कधी गाडीची काच, बाल्कनीची काच, ऑफिसच्या इमारतीची काच, कधी मोबाईल फोनची काच. बहुदा या सगळ्याच काचा नॉइज प्रूफ. त्यामुळे त्यांचा नाद करायचा नाही. गंध वगैरेचा संबंध नाही. मग आता हा पाऊस अनुभवणार कसा? या काळात, पाऊस इज अ गुड आयडिया असं इतकंच वाटायला सुरु झालं. पाऊस ही, "आमच्या काळी हे असं असायचं..." वरून सुरु करायची गोष्ट झाली. रेनकोटची जागा आता ब्लेझरने घेतली. दोघंही पावसाचे वैरी जे छातीशी कवटाळून ठेवायला लागतात. पण पोस्ट मोर्टेर्म केल्यासारखा कधी कधी पाऊस सापडतो सुद्धा. नाही असं नाही. ओला रास्ता, काळवंडलेलं आकाश, कधी कधी मूक कडाडणारी वीज, पुसटसं झालेलं बाहेरचं चित्र, सगळं अर्थातच काचेपलीकडचं. खूपच जोराचा पाऊस पडणार असेल तर आगाऊपणे चार पाच ईमेल्स पण येतात. की, बाबांनो बाहेर पडू नका. पाऊस येणारे. मग लहान मुलं रेन रेन गो अवे, कम अगेन अनादर डे हे असं गायला लागतात. आणि इथेच झाला न सगळा पैसे खोटा? असं म्हणून मी माझ्या कॉफीकडं वळतो. आता यावर काय बोलतोस सांग! असं स्वतःलाच विचारतो.
या सगळ्याला, एक खूप भारी मैत्री होती आमची आणि आता आठवण राहिलीय, असा थोडासा रंग आल्यासारखं वाटतं खरं. पण यात पिच्चर अभी बाकी है मेरे दोस्त असंही म्हणावं यातला भाग नाहीये. जे आहे हे असं आहे आणि इथवर आलंय. पुढे काही असेल तर समजेल. नसेल तर तेही समजेल. खरं तर, मी आजूबाजूला बघितलं तर हे इतकं ग्लूमी चित्र नाहीये. या सध्याच्या व्हर्जनमध्ये सुद्धा हा पाऊस जसा मिळतोय तो अनुभव बाकी कुठल्याही अनुभवांपेक्षा, थोडासा उजवा नक्कीच आहे. मग तुलना भूतकाळाशी करावी की वर्तमानकाळाशी करावी की अपेक्षित भविष्यकाळाशी करावी हा इतकाच प्रश्न उरतो.
2 comments:
Mazyasathi Paus=Maticha Sugandha.
Mast lihilays. Specially pahila paragraphtar khoopach awadala.
Mazi pahilya pawasachi athavan mhanaje, amachya junya gharat, drawing room madhe mothya khidkya ani khidakila lokhandi gaj hote, tya gajanna mi ani mazi mavas bahin lombakalat, paus jorjorat padat asatanahi, mothmothyane ye re ye re pawasa gaan mhanat asu. Uff, I am missing my Desi Paus!
Sadhya Dubaimadhe 50 degreechya ass-paas tapman firatay ani government bichar "Cloud Seeding" karatay. Tyamule tuza ha blog manala thoda paus, tyacha awaj ani maticha gandh deun gela.
Thank you! :)
Welcome back. आज तुझ्यामुळे इतक्या दिवसांनी, ईस गली में चाँद निकला! छान असशीलच.
बाकी होय यार... "पावसात चिंब भिजून आलो" हा प्रकार होऊन य काळ लोटला. सगळी गणितं थोडी फार बदलली नै?
Post a Comment