Sunday, March 21, 2021

बंडू - भाग १

एक होता बंडू. त्याला धरला पोलिसांनी. म्हणाले रात्री बीन हेडलाईट लावता कोणी गाडी घेऊन जातं का? मग बंडूला घेऊन गेले की पोलीस स्टेशनवर. बंडूला वाटलं थोडी समज देतील, दंड करतील आणि सोडून देतील. त्याने हॅलो केला स्टेशनमधल्या लोकांना. प्रश्नांची उत्तरं दिली. आणि बसला वाट बघत. पण इकडं पोलिसांच्या डोक्यात भलतीच ट्यूब पेटत होती. त्यांनी डोकं लावलं, आणि दिला एकमेकांना हाय फाईव्ह. म्हणाले आपल्याला हवा तसाच माणूस सापडलाय आणि थेट kidnapping ची केस टाकली की बंडू वर! बंडूच्या दिमाग को शॉट! त्याने तिथून दोन चार लोकांना पॅनिक होऊन फोन केले, म्हणाला मला धरलंय बघा यांनी उगाच! पण काही फायदा नाही झाला.


बंडूला तात्पुरता सोडला पण मग स्टेशन वाऱ्या सुरूच झाल्या दिवसापासून. पेपरात लै काय काय छापून यायला सुरू झालं. तसा बंडू हरहुन्नरी होता. त्याच्या प्रत्येक हुनरला धरून मग बातम्या यायला सुरु झाल्या. गालावर खळी पडायची त्याला, तर कोणीतरी लिहिलं, "बघा किती साधा दिसतो पण तरीही...". बंडूने एका राजकीय पक्षासाठी काम केलेला. रॅली मध्ये, प्रचारामध्ये भाग घेतलेला. मग एका पेपरात आलं अमक्या पक्षाचा कार्यकर्ता, kidnapping मध्ये पोलिसांच्या ताब्यात! तिसऱ्या पेपरला समजलं की बंडू परड्यातल्या देवळात नियमित जायचा. तिथल्या लोकांशी हसत खेळत बोलायचा. मग त्यांनी छापलं, तमक्या मंदिराचा सेवक धरला गेला kidnapping च्या केस मध्ये! आणि कोणा पेपरला दिसलं की बंडू लॉ शिकतो. कॉलेजला जातो. मग त्यांनी त्यावर बातमी छापली. एकूण काय? बंडू तुरुंगामध्ये गेल्यामुळे सगळीकडे उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. लोक क्रिएटिव्ह झाले. स्टोरी टेलर झाले. पण काही लोक क्रांतिकारी पण झाले.


बंडूला ओळखतो की मी! म्हणणाऱ्या लोकांनी छोटा मोठा मोर्चाच काढला. म्हणाले उगाच काय बंडूला धरलाय. त्याची सोडवणूक झालीच पाहिजे. पोलीस डिपार्टमेंटला दिलेल्या केस सोडवत नाहीत, मग असं कोणाकोणाला अडकवतात! अरे बंडूची बॅकग्राऊंड बघा, इकडं तिकडं विचारा! बंडू किडनॅपिंग करणार? काहीही काय?


पण हा उत्साह किती काळ टिकणार हो? पोलीस इकडे ठाम होते. म्हणाले लोकांना काय जातंय कल्ला करायला. आमच्याकडे सबुत आहे की बंडूने प्रयत्न केलेला एका पोरीला पळवायचा. त्या पोरीने बंडूला ओळखलंय. घेऊन गेले बंडूला कोर्टात. लोकांनी गर्दी केली कोर्टाबाहेर. आणि झाली गोष्ट सुरु! या गोष्टीला आता लवकरच और एक, और एक करत पुरवण्या लागणार होत्या. लवकरच गोष्ट देशभर पसरणार होती. गडे मुर्दे बाहेर येणार होते.


आणि बंडू... त्याचं काय सुरू होतं, त्यालाच माहिती!




ता.क. ही गोष्ट थोडी जुनी आहे, पण सत्य घटनांवर आधारित आहे. आता एक्को ही कहानी पर बदले जमाना हे असतंच की. त्यामुळं खूप साऱ्या गोष्टींमध्ये घटनांमध्ये साधर्म्य सपडेलच तुम्हाला. त्यामुळे स्थळ, काळ, वेळ वगैरे शेवटाला बघू.

No comments: