Saturday, September 10, 2022

दहीहंडी, बील गेट्स आणि बरंच वेगळं काही काही

हॅपी दही हंडी म्हणायचं होतं खरं तर. पण हे लिहिता लिहिता गणपती बाप्पा मोरया म्हणायची वेळ आलीय. मग तोच मांडव वापरून मूर्ती बदलावी असा चतुर विचार आलेला खरा. पण मग मुद्दा तो नाहीचे हे आठवलं.
तर... इक लड़की थी दीवानी सी, एक लड़के पे वो मरती थी, जब भी मिलती थी उससे, यही पूछा करती थी, प्यार कैसे होता है? ये प्यार कैसे होता है? और मग पुढे... मग पुढे साधुवाणीची बोट बुडते. त्याची गर्लफ्रेंड त्याला गावभर शोधते. आणि मग एके ठिकाणी प्रसाद खाते आणि तिकडे साधुवणीची बोट परत तरते. त्यानंतर... त्यानंतर अकबर नाराज होतो, शहजादा सलीमला फाटा देऊन अनारकलीला भिंतीत टाकून शांतीत क्रांती करतो.
आता बघा, केवढे म्हणून सिनेमे, नाटकं, पुस्तकं, कथा, कादंबऱ्या, आणि कविता खपल्या असतील या तुमचं आमचं सेम असणाऱ्या प्यार कैसे होता है वर? या सगळ्या प्यार, इजहार, तकरार, इकरार यांच्या भाऊ गर्दी मध्ये फ्रेंड झोन झालेला प्रकार म्हणजे ब्रेक अप किंवा त्याही पुढे जाऊन घटस्फोट. याला इतकी सावत्र वागणूक का दिलीय याचं एक नवल आहे.

या प्रकाराची एकूणच केविलवाणी अवस्था आहे. एक म्हणजे ग्रेसफुली ब्रेकअप किंवा घटस्फोट करायला कोणी शिकवत नाही. किंवा कोणी केला असेल तर त्यांचं चारचौघात कौतुक करत नाहीत. कायम ते अस्पृश्य असल्यासारखं वस्तीपासून लांब ठेवलंय! प्रेम करणाऱ्या लोकांना सरसकट एकत्र करून इश्क वाले, प्यार वाले, अशी छचोर का असेनात, काहीतरी नावं असतात. ब्रेकअप वाल्यांचं तसं नाही. त्यांची असली कुठली संघटना नाही की काही छचोर नावं पण नाहीत. त्यांना कोणी स्फोट वाले, किंवा तुकडे तुकडे गँग असंही म्हणत नाहीत. "ब्रेक अप" ला तर मराठी मध्ये शब्द पण नाही. "आमचं मोडलं" हे असं निरुत्साही म्हणून ब्रेक अप साजरा करावा लागतो. "घटस्फोट" या शब्दाबद्दल तर आता कायच सांगा! इथे पाळण्यातच घटोत्कच सारखं नाव ठेवून पूर्वग्रहदूषितकरून ठेवलाय.
 
आता मला सांगा, नुकतीच दहीहंडी पार पडली. त्यासाठी कोणा कोणा सेलिब्रिटी लोकांना बोलावलं. ढोल ताशे वाजवले. लोक नाचून धुंद झाले. पण शेवटी केलं काय? थरावर थर रचून, शेवटी घटच फोडला न? मग या सगळ्या प्रकरणाला "घटस्फोट" असं नाव का बरं दिलं नसेल? म्हणजे विषय तोच की नै? मी म्हणतो, "घटस्फोट" शब्दाचा दर्जा वाढवायचा असेल तर एक तर त्याला दही हंडी असं काहीतरी म्हणावं. नाहीतर चक्क "घटस्फोट" झाला म्हणण्याच्या ऐवजी आम्ही "दही हंडी" केली असं म्हणण्याची प्रथा करावी. त्याशिवाय हे बदलणार नाही.

जर दोन लोकांनी एकत्र येणं ही चांगली गोष्ट असेल. तर दोन लोकांनी वेगळं होणं सुद्धा असायला काय हरकत? दोन लोकांनी एकत्र येण्यात जर उज्ज्वल, समृद्ध शक्यता दडलेल्या असतात, तर तसंच दोघांनी आपापली डोकी ठिकाणावर ठेवून वेगळं होण्यात सुद्धा असूच शकतात. आणि मग डोकी ठिकाणावर न ठेवताच करायचं असेल तर लग्न करा, लफडी करा, नाहीतर काशी घाला. कुठं काय फरक पडतो? माझं तर असं म्हणणं आहे की वेगळं होण्याचे निर्णय पण दही हंडी सारखे गाणी लावून, नाच करून, एकमेकांना शुभेच्छा देऊन, साजरे केले पाहिजेत. जसे लग्न समारंभ हटके करायची शर्यत असते, तसं इथपण पिअर प्रेशर तयार करायला हवं. प्री-वेडिंग शूट सारखे, पोस्ट डिव्होर्स शूट केले पाहिजेत. आता आपण एकत्र नसलो तरी जिथे आहोत तिथं बरे आहोत, हे बघून पण बरं वाटू शकेलच की. आणि अहो जिडीपी पण वाढेल. दोन हजाराच्या नोटमध्ये नॅनो चीप घालून जशी हवा तयार केलेली, तशी काहीतरी क्रांतिकारी थिअरी डिव्होर्स बद्दल पण उठली पाहिजे. उदाहरणार्थ, "यंदा डिव्होर्स जरा जास्त झालेत" याच्या बरोबर "यंदा देशाची प्रगती पण जास्ती झालीय" हे ही आहेच की. You see where I'm going with this? ठरवलं तर थेट नॅशनल आणि अँटी नॅशनल पर्यंत जाऊ शकतो आपण या वाटेने. लफडी लपवून करायची असतात तर ती उघड्यावर करतात पब्लिक. आणि घटस्फोट बद्दल मात्र चिडीचूप?! ही काय पद्धत?

विनोदाचा मुद्दा जरा बाजुला ठेवू. लोकांनी डिव्होर्सच करावेत असं माझं म्हणणं नाही आहे. पण केले तर बरे करावेत हा मुद्दा आहे. काही महिन्यांपूर्वी, बिल गेट्स आणि मिलिंडा गेट्सनी दही हंडी खेळली. त्यांनी गेल्या सत्तावीस वर्षात जे थर रचले, यंदा त्यावर चढून घट फोडला. ते म्हणाले, "व्यक्ती म्हणून आपल्याला जसं वाढायचं आहे, तसं आता एकत्र वाढत येत नाहीए. मग वेगळं होऊन प्रयत्न करू. मार्ग अवघड आहे, म्हणून आम्हाला आमचा आमचा शोधू द्या." अशा आशयाचा एक संदेश त्यांनी ट्विटरवर टाकला. बिल आणि मेलिंडाने सुरु केलेलं फाऊंडेशन ते अजूनही एकत्रच सांभाळतील हेही त्यात नमूद केलं.

देखा? ऐसे भी कर सकते है! विचार करून. शंतीत. शिस्तीत. खरं सांगायचं तर ही बातमी वाचून जरा कसंस झालेलं पण पुढे वाचून विंडोज टेन बघून कसं अचानक बरं वाटलं तसं बरं वाटलं. करत असतील की लोकं खरंच समजून सावरून. आपल्याच डोळ्यांवर चष्मा असेल तर.

असो.
हॅपी दही हंडी म्हणायचं होतं खरं तर. पण आता गणपती बाप्पा मोरया.

No comments: