इतिहासाकडं एकदम निष्पक्षपणे बघता आलं पाहिजे. इतिहासामधल्या झुंजी इतिहासामध्ये ठेवता आल्या पाहिजेत. इतिहास हा भूतकाळ आहे हे समजून घेऊन इतिहासात नव्यानं झुंजी लावायचा मोह टाळला पाहिजे. जे कधी भांडलेच नाहीत, त्यांच्या नावानं आपणही भांडलं नाही पाहिजे. "सिकंदरने पोरससे की थी लड़ाई, तो मै क्या करू?" हा अलिप्तपणा जमला पाहिजे. मग त्यात सिकंदरचं गोत्र किंवा पोरसचं कुलदैवत काढू नये. सिकंदर आणि पोरस हे शेवटी एकमेकाचे बेश्ट फ्रेंड्स झालेले हे वाचून सोडून द्यावं. एकूण काय? तर इतिहासाकडे केवळ इतिहास म्हणून बघावं. "इति... हास..." या शब्दाचा अर्थ इति(पण)हास किंवा इति(का)हास असा नसून, "असं झालं" हा एवढाच आहे समजून घ्यावं. "पुढच्यास ठेच मागचा शहाणा" म्हणजे "आपल्याला ठेच लागतायत म्हणून इतिहासाला शहाणं करायचं" असा असू नये. जसं तेंडुलकरकडे दहावी बारावीच्या अभ्यासातले सल्ले विचारू नयेत, किंवा सद्गुरू जग्गी कडे रॉकेट सायन्स विचारू नये, तसं इतिहासातल्या लोकांकडे त्यांच्या त्यांच्या गोष्टी पुरतं बघावं. सगळ्यांनी सगळ्या परीक्षांत अव्वल यावं अशी अपेक्षा करणं फोल आहे हे शिकवणाऱ्या केवळ दोनच गोष्टी... एक म्हणजी आपली स्वतःची गुणपत्रिका आणि इतिहास. समस्त गरजू होतकरू आणि होऊ घातलेल्या क्रांतिकारी लोकांनी या दोनीही गोष्टींचा विसर पडू देऊ नये.
.
हं.... हुश.... आता साईड बी.
.
या वरच्या सगळ्या गोष्टी खूप आदर्श आणि पुस्तकी वाटतात का तुम्हाला? मलापण वाटतात. अहो हे सगळं ब्रह्मज्ञान आहे. म्हणजे हे लोकांना सांगायचं असतं. आपल्यासाठी थोडंच असतं? आता मला सांगा, इतिहासाने आणि इतिहासातल्या लोकांनी आपल्या सगळ्यांच्या फॅन डिमांड पुऱ्या करायच्या नाहीत, तर अजून कोणी करायच्या? जिवंत लोकांनी? छे! आम्ही इतिहासाचं रक्षण करायला झटत नाही? मग इतिहासानं पण एवढं आमच्यासाठी केलं पाहिजे की. अहो केवढ्या भावना गुंतवतो आम्ही त्यात. केवढ्यांदा अस्मिता दुखावून घेतो. इतिहासातल्या लोकांनी चार गोष्टींच्या ऐवजी दोनच सांगितल्या असतील तर आम्ही स्वतःच्या पदरच्या दोन गोष्टी त्यांना देऊ करतो! मग हे असं सगळं असताना, इतिहास म्हणजे फक्त इतिहास असं बघणं म्हणजे RRR audible वर ऐकण्यासरखं नाही? मला वाटतं आपला तो इतिहास नसतोच मुळी.
.
आता परत साईड - ए.
.
मलाही वाटतं, आपला तो इतिहास नसतोच मुळी. दुसऱ्याचा तो इतिहास असतो. खरं शिकायला तिथूनच मिळू शकतं. कारण दुसऱ्याच्या इतिहासात आपण निरपेक्ष होऊ शकतो. त्याला तासून बघू शकतो. घासू पुसू शकतो. खंगळून काढू शकतो. काही गवसलं नाही तर बिनदिक्कत पान पालटू शकतो. आणि कधी कधी मस्करी पण करू शकतो. आता बघा, तुम्हाला अर्जेंटिनाचा इतिहास सांगितला तर? किंवा इटली किंवा स्पेनचा कोणी संत महात्मा गाठून दिला तर? थायलंड आणि स्वित्झर्लंड मधल्या शौर्य गाथा ऐकवल्या तर? आपण ते डब झालेले सिनेमे नाही का बघत? तसं आहे हे. दुसऱ्याच्या इतिहासात माणसांना काळंच किंवा गोरंच असायचा शाप नसेल. दुसऱ्याचा इतिहासातले लोक, काळ्या आणि गोऱ्याच्या अधे मध्ये असू शकतील. तिथे रावणाला पण थोडं चांगलं असायची मुभा असेल, किंवा रामाच्या पण कोणी खोड्या काढू शकत असेल. आणि त्यामुळं अस्मिताचं पण काहीच दुखावत नसेल. प्रयत्न करून बघा. डब झालेले सिनेमे बघायचा नाही... दुसऱ्याचा इतिहास बघायचा. मी केलाय अगदी नुकताच. असते एक्कोही कहानी पण आपल्यालाच जरा वेगळ्याने कळतात.
.
-----------------------------------
.
उदाहरणादाखल इंग्रज घ्या. आता इंग्रज भारतात आले आणि मग त्यांनी काय केलं हे तूर्तास बाजूला ठेवू. आपण त्याच्याही खूप खूप आधीचं बघू. एक काळ असा होता की इंग्रजाना कोणीही यावं आणि टपली मारून जावं असं करायचे. किती लोकांनी टपल्या मारल्या म्हणून सांगू? येता जाता, वेळ जात नाही म्हणून, विरंगुळा म्हणून, खायचे प्यायचे वांदे झाले म्हणून, यंदा थंडी जरा जास्ती आहे म्हणून, आमच्या वन्सं जरा नाराज आहेत म्हणून, आमच्या चिरंजीवाना तुमच्या चिरंजीवाची खोडी काढायची आहे म्हणून, किंवा आमच्या आज्ज्याचं थोडं देणं बाकी आहे म्हणून, काहीच नाही तर, आज कुछ तुफानी करते है म्हणून आक्रमणावर आक्रमणं करायचे लोक. केवढाले लोक इंग्लंड मध्ये आले, काही निघून गेले आणि बरेचसे इंग्लंडचे म्हणून राहिले. बसल्या बसल्या त्यांनी, इंग्रजी भाषेवर, पोषाखावर, राहणीमानावर आपापली छाप सोडली. शीप ऑफ थेसिस सारखं कोडं ब्रिटिश जनतेला कसं नाही पडलं याचं मला कोडं पडतं कधी कधी.
.
(मुन्नाभाई ने कसं चाळीस पानी पुस्तकातून समस्त गांधीजी शिकले असं स्वतःला वाटवून घेतलेलं, तसं हे मी चाळीस तासात युट्यूब वरून जमवलेलं उथळ पाणी आहे. त्यामुळे तज्ञ वाचकांनी दुरुस्त्या सुचवताना हयगय करू नये.)
तर... मला इंग्रजांचा इतिहास वाचताना वाटलं की इंग्रजांनी ते पारतंत्र्यात आहेत हे मान्यच न केल्यामुळे कदाचित त्यांच्याकडच्या कुठल्याच लढाईला स्वातंत्र्य लढाई म्हणत नसावेत. सारखं "पिच्चर अभी बाकी है मेरे दोस्त" असं असावं. बघा की... इंग्रजांचा कुठं आहे पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारी? पण लोकांनी यांच्यावर राज्य केलीयेत मात्र. कधी जर्मन, कधी नॉर्वेजियन, कधी डेन्मार्कवासी, कधी शेजारचे स्कॉटिश आणि फ्रेंच तर येऊन जाऊन मुक्कामाला असायचेच. "मी पुन्हा येईन" "मी पुन्हा येईन" म्हणत लोक परत परत यायचे हो भांडायला! मला वाटतंय मी त्या काळी, नेटफ्लिक्स नव्हतं आणि अमेझॉन फक्त जंगल होतं म्हणून लोकांच्याकडे मारामाऱ्या करायला इतका वेळ असावा! कोणीही यावं टपली मारून जावं. एकदा तर एका राजाला इंग्रजी येत नव्हतं फारसं म्हणून त्यानं एक मंत्री नेमला मदतीला. त्या बाबाला पंतप्रधान म्हणायला लागले. आणि मग तिथून पुढे राजा आणि राणीच्या खांद्याला खांदा देऊन पंतप्रधान सुरूच राहिला. की तो अजूनही आहे.
.
एकदा वायझेड दिसणाऱ्या वायकिंग्ज लोकांनी इंग्रजांवर आक्रमण केलं आणि सुमारे शे सव्वाशे वर्षं इंग्लंड मधून बुड हलवलंच नाही. मग आला आल्फ्रेड. आल्फ्रेड इंग्रजच होता. त्यानं वायकिंग राजांना हरवलं. आणि आपलं छोटंसं राज्य बनवलं. पण आल्फ्रेड जनतेला म्हणाला की बाबो... हे वांयकिंग लोक वायझेड असेल तरी आता आपलेच आहेत की. त्यांच्या इतक्या पिढ्या इथे राहिल्या, इथे रुजल्या. मग आता आपलं काय आणि त्यांचं काय हे कसं ठरवणार? आल्फ्रेड त्यांच्या काळातला नाना पाटेकर होता. त्यानं इंग्रजांचं रक्त आणि वायकिंग लोकांचं रक्त आपल्या हातावर एकत्र करून चौकात विचारलं, "अब बोल इसमें अंग्रेज़ी खून कौनसा है और वाइकिंग खून कौनसा है?" आपण राहू की सगळे गुण्या गोविंदानं! असं म्हणाल्यावर, लोकांना लै च आवडला आल्फ्रेड आणि त्यांनी त्याला "आल्फ्रेड दी ग्रेट" पदवी दिली. इंग्लंड मध्ये नंतर जे जे म्हणून राजे आणि राण्या झाल्या, अगदी दुसऱ्या एलिझाबेथ पर्यंत, सगळ्यांचे पूर्वज बघत गेलात की ते शेवटी या आल्फ्रेड कडे कुठूनतरी पोचतातच. आणि इंग्लंडमध्ये झालेल्या सगळ्या राजा बीजांपैकी आल्फ्रेड या एकट्यालाच म्हणेज "the great" म्हणतात.
.
आहे कि नाही भारी गोष्ट. आपण त्रयस्थ पणे किती मजेत वाचू शकलो की नै? आता जरा अशीच आपल्याकडची गोष्ट सांगून मामला टेन्स करू?
.
चला ... आता याची साईड - बी
.
तुम्हाला माहिती आहे काय की गांधी बाबांनी पण सांगितलेलं एकदा की इंग्रजांना हाकलणे म्हणजे स्वातंत्र्य मिळवणे असं नाही आहे. स्वातंत्र्य मिळालं तरी इंग्रज राहूच शकतात की आपल्याकडे. आता गांधी काय नी गोखले काय? त्यांनी इंग्रजी साहित्य वाचलं म्हणून त्यांची टीका पण झालेली म्हणे. काय माहिती, गांधींना पण आल्फ्रेडची गोष्ट आवडली असेल आणि मग त्यांनी लालसिंग चड्डा सारखं त्या गोष्टीचं भारतीयीकरण केलं असेल. आणि मग बॉयकॉट लालसींग चड्डा करण्याच्या नादात, मुख्य मुद्दा बाजूला राहिला असेल. आता बघा होनेको सब कुछ हो सकता है की नै?
.
गांधीनी न, आपल्या "हिंद स्वराज्य" पुस्तकात (चाळीस पानाचंच आहे ते पण. तसे आपले सगळे संदर्भ चाळीस पानी पुस्तकातलेच आहेत 😜) एक गमतीशीर गोष्ट सांगितलीय. ती मला आठवतेय आत्ता ती अशी (तज्ञ मंडळींनी दुरुस्ती नक्कीच सुचवा जर सदर्भात काही गडबड झाली असेल तर). गांधी म्हणाले की, समजा तुमच्या गावात एक भांग विकणारा आला. आणि त्यानं सगळ्या गावाची वाट लावली. तर तुम्ही सगळे पेटून उठून भांगवाल्याला गावातून हाकलून द्यायला निघाल. कदाचित हाकलून द्याल सुद्धा. पण आपण त्याला स्वातंत्र्य म्हणू का? उद्या भांगवाल्याच्या ठिकाणी दारूवाला आला तर? दारूवाला तुमच्यातलाच असला तर? म्हणून आपण जे भांगेच्या आहारी गेलो ते म्हणजे पारतंत्र्य. आणि ते दुरुस्त केलं आपण, तर मग उद्या कोणी येऊन दारू विको किंवा अफूच्या गोळ्या विको. काय फरक पडतो? बाहेरून येणारा वाईटच असेल किंवा आतमध्ये असलेला चांगलाच असेल असं थोडीच असत. आपण चांगल्या गोष्टी ठेवू, वाईट सोडून देऊ. मग आपल्यात ब्रिटिश लोक येऊन राहू देत किंवा आणखी कोणी येऊन राहू देत? काय फरक पडतो? हे खरं स्वातंत्र्य.
.
आता बघा. हे सगळं निरपेक्ष आणि निष्पक्षपणे वाचू शकला का? आता आल्फ्रेडच्या गोष्टीवर पण टीपणी करायची खुमखुमी आली का? आता इथून ही गोष्ट पुढे कुठेही ओढून घेऊन जात येऊ शकते.
.
मे बी तुम्ही अलिप्तपणे वाचू शकला असाल. मे बी तुम्हाला आधीच टिपणी करायची खुमखुमी अली असेल. पण I think I made my point.
.
ता.क. मुद्दा काय? वाचून मजा घ्यायची, त्यातून काही शिकायचं असा कुठला इतिहास असेल तर तो दुसऱ्याचा इतिहास. Long Live अस्मिताs.
No comments:
Post a Comment