Sunday, November 20, 2022

देव म्हणजे काय रे भाऊ?

आज्जी कायम सांगायची, "अन्न हे पूर्णब्रह्म". ताटात वाढलेलं सगळं पुसून खा. अन्नाशी खेळ नको. असल्या गोष्टी आम्हाला समजाव्यात अशी तिची अपेक्षा असावी. पण आपलं डोकं, "आपण उपवास करतो तेव्हा नास्तिक असतो का?" असा आगाऊ प्रश्न विचारावा का... इकडं भटकत असायचं. देवळात भटजी लोकांचं पोट मोठं का असतं याचं उत्तरसुद्धा याचं उक्तीमध्ये दडलेले असावं असं मला राहून राहून वाटायचं. कोल्हापूरसारख्या धार्मिक ठिकाणी राहिल्यावर देवावर मत नसणं म्हणजे छे छे च न?


आता इथून पुढं काहीतरी देवाधर्माच्या संस्कारी गोष्टी लिहिलेल्या असतील असं वाटत असेल तर पुढे अगदीच वाचू नका. निष्काम माणसाच्या विसंगत विचारांत सुसूत्रता असल्याचा अप्रस्तुत दावा करण्याचा माझा हा विस्तृत प्रयत्न आहे. (अर्थातच निष्काम माणूस म्हणजे मी ... नाहीतर तो गैरसमज व्हायचा!)


तर...

तर आम्ही मोठं झाल्यावर, देवांवरच्या विविधावह मतांचे चहापोहे करून मन भरल्यावर, मानसिक आरोग्य, ध्यान लावणे (म्हणजेच प्राकृत मराठीमध्ये मेडीटेशन) या विषयांवर संवाद घडू लागल्यावर, मला देव हा विषय जरा विशेष वेगळ्या बाजूने दिसू लागला. देवाच्या सगळ्या इकोसिस्टीमकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन मिळाला. कुठेतरी हे दोन विषय एकमेकांशी सलग्न असणं निर्मात्याला अभिप्रेत असावं असं वाटलं.


वर्षागणिक द्विगुणित होणाऱ्या अगणित लोकांच्या बहुगुणी अज्ञानामुळे लोकांची मनं सैरभैर न होता त्यांनी आपापली छोटी छोटी आयुष्यं बरी काढावीत, हा बड्या बुजुर्ग लोकांचा हेतू असावा. पूर्वीच्या काळात लोकांना पाऊस का पडतो माहिती नव्हतं. आकाशात धूमकेतू का येतो माहिती नव्हतं. औषध पाण्याचा पत्ता नव्हता. रोगराईने शिट्ट्या वाजयच्या. कशाचंच काहीही आपल्याला सुधरत नाही असं वाटून डिप्रेशन येत असेलच की पब्लिकला. डिप्रेशन हा शब्द माहिती नसला म्हणून काय झालं? मग लोकांना शांत कसं करावं? त्यासाठी कुठं बरं लक्ष केंद्रित करायला सांगावं? लोकांनी कुठं बरं मन मोकळं करावं? तर ते ठिकाण म्हणून "देव" शोधला असावा. इथे या. बसा. शांत व्हा. मोठा श्वास घ्या. एकाग्र व्हा. वगैरे वगैरे. You know the drill. And I'm sure it must have been very effective. अपने जमाने में देव क्या स्टड हुआ करता था... असं इतिहासकार सांगत असतील तर त्यात नवल नाही.


"देव" म्हणजे प्राचीन काळातलं बेफाम वायरल झालेलं मेडीटेशनचं ऍप असावं. जगभर सगळेच एका ट्यून वर आपापली कला दाखवू लागले हो. आणि मग कोणाला किती लाइक्स याची शर्यत लागली. जगातलं पाहिलं टिकटॉक म्हणजे "देव" असावा. कास्ट-अवे मध्ये कसं व्हॉलीबॉलला विल्सन बनवून, चक् त्याच्यासोबत गूज करत राहतो, तशी आपण वेडं न होण्यासाठी बनवलेला व्हॉलीबॉल म्हणजे "देव" असावा. आता त्यामुळे आपण वेडे व्हायचे राहिलो का? हा प्रश्न वेगळा.


जर "अन्न हे पूर्णब्रह्म" असेल तर मग सध्याचे देव म्हणजे खूप पाणी घालून पातळ केलेली भाजी असावेत असं मज पामराचं मत आहे. बघा की... ही भाजी कशीही असली तरी पौष्टिकच आहे म्हणून शपथेवर सांगणारे लोक दिसतील. ही भाजी म्हणजेच एकमेव पौष्टिक पदार्थ असल्यामुळे, दिसेल त्याच्या घशात ढकलू पाहणारे लोक सापडतील. आता या भाजीत काही दम राहिला नाही म्हणून चिडचिड करणारे लोकही दिसतील. तुमच्या भाजीपेक्षा आमची भाजी सरस या विषयावर अडकलेले लोक दिसतील. दुसऱ्याच्या भाजीत कसं पाणी जास्ती आणि सत्व कमी आहे याची कुचेष्टा करणारे लोक दिसतील. भाजीच्या नावानं झालेली ही सगळी जत्रा बघून, मला भाजीच नको असं म्हणत फास्ट फूडच्या आहारी जाणारी एक वेगळी जमात सुद्धा निर्माण झालेली दिसेल. एकूण काय तर, दुसऱ्यांच्या रेसिपी मधलं कार्ब दिसतं पण स्वतःच्या भाजीतलं तेल दिसत नाही अशी आपल्या दैवी लोकांची परिस्थिती भाजी विना कशी समजावून सांगावी? म्हणूनच "अन्न हे पूर्णब्रह्म" असा क्लू जाणकारांनी पौरणात सोडला असावा.


खरं तर, जगण्यासाठी खावं हे लागणार आहेच, हा एवढाच मुद्दा असावा. मग त्यात कोणासाठी पालेभाजी, कोणासाठी फळभाजी. हे मान्य करायला काय हरकत आहे? पण या गोष्टीमध्ये भाजी विक्रेत्यांची आगाऊ जमात पण आहे. या लोकांची आपापली लॉबी बनलेली आहे. या जमातीची सुपर पॉवर म्हणजे, इतर लोकांनी भाज्या एकमेकांत मिसळल्या की यांच्या पोटात ऑटोमॅटिकली दुखायला लागतं. या लोकांना भाज्यांच्या नव्या रेसिपी काढता येत नाहीत. आणि म्हणून की काय एकच भाजी सगळ्या तमाम जनतेला पाणी घालून घालून घालून घालून वाढणं सुरू आहे, हे असं झालं असावं. पण मागवली काय म्हणतो, नळ दमयंती खायचे, म्हणून आम्हीही तेच जेवण जेवायचं? वरण भात भाजी चपाती नळ दमयंतीच्या नशिबी नव्हती यात आपली काय चूक?


अन्न हे पूर्ण ब्रह्म असलं तरी अन्न विकणारा अण्णा म्हणजे पूर्णब्रह्म नाही न? सशक्त राहायचं तर, निरोगी राहायचं तर वेगवेगळ्या रंगांच्या भाज्या खायला हव्यात, विविध भाज्यांची सरमिसळ व्हायला हवी. भाज्या स्वतः स्वतः आपल्या आवडीनुसार निवडून, धुवून, चिरून, त्यावर संस्कार करता यायला हवेत. त्यासाठी वेळ काढला पाहिजे, राखून ठेवला पाहिजे. असं केलं नसतं तर आज आपल्याला ना वडा पाव मिळाला असता, ना पाव भाजी! मग हे असं न करून आपण देवा धर्मात होऊ शकणार असलेले केवढे नवे नवे प्रयोग आणि शोध मिस् केलेले असू बघा.


असो. भाज्या खा. नव्या रेसिपी शोधा. आणि खवय्ये व्हा.

आणि हो, दुनियामे जिनके और भी तरीके है गालिब... हे विसरू नका.

No comments: