Friday, December 02, 2016

ले के राहेंगे... आ जा दी

परवा अथेन्समधून परत येताना राडा झाला. तसा तिकडे जाण्यासाठी निघतानाच सुरु झालेला. फायनल बोर्डिंगच्या क्यूमध्ये उभं असताना फोननं हापुशी घातली! अथेन्समध्ये दंगा सुरु झाला अशी बातमी आली. टायमिंग असलं अफलातून की अगदी दोन मिनिटात विमानात बसणार होतो. ओबामा आला, लोकं चिडले, मोर्चे काढले, ओबामा त्याचं काम करून गेला, लोकं मात्र मारामाऱ्या करायला लागले. हे सगळं वाचून क्षणभर विचार केला की ब्वा जायचंय की नाही? पण मोर्चा बीर्चाचं आपल्याला काय कौतुक? आपण स्वतः मोर्चामध्ये सामील झालेली माणसं! म्हणून ठरवलं जाऊच या. काय हाय काय अन नाय काय? तोवर आपला नंबर पण आला लाईन मध्ये.

आपलं नशीब इतकं भारी की या दिवसाच्या दुसऱ्या दिवशी होता स्टुडंट्स डे. जरा कमी लोकशाही दिवसच असायचा. पण कोणीतरी याला स्टुडंट्स डे बनवलं. हा दिवस म्हणजे १९७३ ला ग्रीसच्या स्टुडंट लोकांनी युनिव्हर्सिटीच्या कट्ट्यावर येऊन आरोळी ठोकलेली, "ले के राहेंगे... आ जा दी!!" तो दिवस. घ्या आता. तरीपण हा विषय आपल्याला जरा विशेष होता. म्हणजे ग्रीसने जगाला लोकशाही दिली हे माहिती होतं पण तिथंही अजादीसाठी लढा दिलेला आणि तोही नुकताच ४० वगैरे वर्षांपूर्वी हे माहिती नव्हतं. तर असं झालेलं म्हणे तिकडं काहीतरी. येताना कॅब ड्रायवर बरोबर गप्पा मारताना त्यानं सांगितलं.

या ड्रायवरचं नाव थॉमस. तो म्हणाला की ८-१० वर्षं लष्करानं ताबा घेतलेला म्हणे यांचा. शेवटी स्टुडंटनी दंगा सुरु केला आणि फायनली मिळाली यांना लोकशाही. परत. दर वर्षी आता त्या दिवशी युनिव्हर्सिटी पासून ते अमेरिकन एम्बसीपर्यंत हे लोक रॅली काढतात. अमेरिकन एम्बसीचा संबंध काय झेपाला नाही. पण ठिके. अमेरिकेच्या नावानं किंवा अमेरिकेच्या नावपुढं ओरडायचा छंद युरोप मध्ये तसंही सहज सापडतो. बाकी रॅली म्हणजे किती शांततेत असते माहित्ये की आपल्याला. तर इकडंही असंच झालं. त्यामुळं सलग दुसऱ्या दिवशीही सेंट्रल अथेन्स बंद करावं लागलं.
थॉमस म्हणाला की "लोकं चिडलीत."
मी म्हणालो "कशासाठी? लोकशाही मिळाली न या दिवशी? की लोकांना लष्करच हवंय अजून?"
तर तो खुदकन हसून म्हणाला की "नाही. तसंही नाहीए. आम्ही ग्रीक आहे न? म्हणून काढत बसतो मोर्चे अधे मधे!! बऱ्याचदा आम्हालाही कळत नाही काय पॉईंट आहे ते."
पाहुण्यांच्या समोर हसत हसत घराची इज्जत काढणारं वात्रट पोर सगळ्यांच्याच घरी असतं म्हणा. असो. ज्याची जळते त्याला कळते. आपण बाहेरून येऊन ४ मिनिटांच्या संवादामध्ये रॅशनॅलिटीची काय अपेक्षा धरावी? थॉमसनं चिडण्याचं कारण म्हणून सरळ मला गणितच सांगितलं.
म्हणाला "हे बघ. तू आत्ता दहा युरो देशील. त्यातले बावीस टक्के टॅक्स आणि वर सव्वीस टक्के सरकारला कर्ज चुकवायला. आठठेचाळीस टक्के गेले इकडेच. बाकीच्यातले थोडे कॅबवाल्या कंपनीला द्यायचे ते मी अजून मोजतच नाहीए."
"बरेच झाले की हे. मग कसं करता मग मॅनेज?"
"भरत नाही टॅक्स." एकदम सोर्टेड.
"मग?"
"मग सरकार आणखी टॅक्स वाढवतं! त्यांना कर्ज चुकावायचंय." हाही समजूतदारपणा!

आता यावर काय बोलता? पण थॉमसची गोष्ट एवढ्यावर नाही संपली. आजसे बीस साल पहले वाला अँगल पण होता त्याच्याकडे. हमारी दोस्ती भूल गये टाईप राष्ट्रीय दुःख थॉमसनं प्रयत्नपूर्वक मनात जपलेलं. म्हणाला "काये. आमच्या पुढच्या पिढ्यांना पुरेल इतकं कर्ज करून ठेवलंय आमच्या सरकारनं. ते पैसे परत मिळवण्यासाठी जर्मनी वंगाळ नियम टाकतात आमच्यावर. आमचं सरकारपण मन खाली घालून ऐकतं सगळं. ते लोकांना आवडत नाही. मग लोकं ऐकत नाहीत. पण मुळात जर्मनीला आम्ही आवडतच नाही. हा इथं प्रॉब्लेम आहे!" थॉमसची दुखती नस पुढे होती. म्हणाला की, "जर्मनीचा दुसऱ्या महायुद्धामुळं ग्रीसवर राग आहे. तेव्हा जर्मनी हरलं ते ग्रीसमुळे! तरी आम्ही त्यांना खूप पैशाची मदत केलेली युद्धानंतर. पण आमचे लोक आपसात भांडत बसले. कोणी पैसेच परत मागितले नाहीत. आता जर्मनी आमची मदत विसरलंय. आता जेव्हा आमची पैसे परत करायची वेळ आली तेव्हा विसरायचं तर सोडाच, पण ते लोक त्यावर इंटरेस्ट पण लावतायत!!"

आम्ही विसरलो, तुम्हीही विसरा हे असलं फ्रेंडली सोल्युशन बेष्ट. तसंही आपल्याला नाही का वाटत की ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी ते कसे मोठ्या मनानं गरिबांना वाटून टाकावे. तसंच की हे थोड्या फार फरकानं. पण मी खरं तर इथपर्यंत पोचलोच नाही. आपली सुई त्याच्या पहिल्या वाक्यावरच अडखळली.

मी विचारलं, "दुसऱ्या महायुद्धात काय काय काय?" आपलं दुसरं महायुद्ध सुरु झालं पोलंड, ऑस्ट्रिया पासून, पुढे जर्मनी, इंग्लंड वगैरे. मग अमेरीका, रशिया आणि मग डायरेक्ट हिरोशिमा नागासाकीवर बॉम्ब. या सगळ्यात ग्रीसमुळं जर्मनी हरलं हे कुठं हुकलं कळेचना.

प्रत्येक देशाच्या, प्रत्येक गावाच्या आपल्या आपल्या वदंता असाव्यात. तिथल्या तिथल्या लोकांना रमायला आवडतील अशा. तुम्हाला पटो न पटो. तसंच थॉमससाठी एकदम सौ फी सदी सच होतं हे. आणि असेलही खरं. काय सांगा?

म्हणाला, "काय झालेलं? की जर्मनीला वाटलं आपण ग्रीसला असंच जिंकू. आणि मग पुढे जाऊ रशियाला जिंकू. पण ग्रीक लोकं भारी. त्यांनी टफ दिली जर्मनीला. हा असा इकडं डोंगर. जर्मनी त्या साइडला. ग्रीस या साईडला. ग्रीसकडं नव्हती फारशी शस्त्रास्त्र. हे लोकं पडले शेतकरी लोक. मग त्यांनी काय केलं? त्यांनी आणले ट्रॅक्टर. ते लावले डोंगराच्या बाजूला. आणि तेच सुरु करून ठेवले. पलीकडे जर्मन सैन्याला वाटलं रणगाडे आहेत. आणि यामुळं लांबली लढाई. खूप महिने सुरु राहिली. पुढे जर्मनीने ग्रीस काबीज केलंच. पण झालं असं की त्यांना रशियाकडं जायला झाला उशीर. समरच्या ऐवजी विंटर मध्ये जावं लागलं. थंडी कुठे झेपती तिकडची? मग तेव्हापासून जी उतरण लागली जर्मनीला ती थेट हरेपर्यंत. चर्चिलपण म्हणाला तेव्हा की Greeks don't fight like Heroes. Heroes fight like Greeks!" थॉमसला स्वतःलाच मजा आलेली गोष्ट सांगून.

"Wow! मला खरंच हे असलं काही माहिती नव्हतं. टू मच. पण मग तुम्ही पैसे का दिलात जर्मनीला?"
"शेजारधर्म म्हणून. त्यांना उभं राहायला गरज होती." पण अब वो ये सब भूल गये है - असला राग होता बिचाऱ्याचा. त्यात पुढे आता गोष्टीमध्ये लष्कर बिष्कर पण येणार होतं.
"पण आमचे लोक बसले कुठेतरी तिसारीकडंच अडकून. असलंच काहीतरी करत बसतात आमचे लोक. आता जर्मनी बघा विसरतंय का पैसे परत घ्यायला?"

तेवढ्यात आम्ही पोचलो आमच्या ठिकाणी. थॉमसची गोष्ट रंगात आलेली पण मग थांबवावी लागली. म्हणाला पैसे नको. गप्पा मारून मजा आली. तरीही मी आग्रहानं दिलेच आणि म्हणालो की यावाल्या पैशावरचा टॅक्स भर.

शेवटी कोणी कोणापासून कुठली आजादी मिळवली काय माहिती. आणि आजादी नसली तर सत्ता कोणाची हेही काय माहिती. शेवटी लोक त्यातच आपापलं काहीतरी शोधून काढतात. त्यातच त्यांना विरंगुळा सापडतो. त्यातच पुढचं पान उलटतात.

Friday, November 25, 2016

बैठे बैठे क्या करे? करना है कुछ काम!

बैठे बैठे क्या करे? करना है कुछ काम!
शुरू करे मीटिंग कोई, लेके सबका नाम!

चल ... तुझ्यावर "म" आलं... आता तू "म" पासून अपडेट दे.


ओके. मी ... मी ... मी ...! मी याव ... मी त्याव ...! मी इकडं ... मी तिकडं ... मी महान... सगळं मीच!
चल तुझ्यावर "च" आलं...

हं ... च ...... ओके. I got it!
चू**!... हा चू** ... तो पण चू**...! तसा जरा कमी तू पण चू**...! मीही महान असणार होतो ... पण सगळं जगच चू** !
चल आता तुझ्या य आलं ... चू**!

या या ... हो ... नक्कीच. या या या ... अगदीच. ऍबसोल्युटली. काय म्हणाल ते... या या या!

ठीके ठीके बास कर ... परत "य" च आलं होय?
ये .... वो ... ये उधार से वो... फिर उधर से किधर से कूछ तोभी और एक वो ... फिर सबंध नसला तरी किधर से तो ये वो ...
चल काही कळलं नाही तर सोडून दे..! तुझ्या वर "व". पुढं बोल.

व्हाय? हे सगळं का सुरुए? आपण इथे का जमालोय? याचा काय संबंध आहे? कोणाचा वेळ जात नव्हता म्हणून इथं बोलावलंय मला? व्हाय? व्हाय? व्हॉट? व्हॉट?

टाईम अप! काहीतरी सेन्सिबल बोलायलाय तो... चला ... इतकंपण स्ट्रेच नको करायला ... टाईम अप. मिटिंग ओवर. I think, this was very productive session. Let's continue having these sessions. I am sure we made some progress today. एक तास झाला. Perfect duration for the meeting. It shouldn't go beyond this. चला निघूया. लेट्स रिस्पेक्ट सगळ्यांचा टाईम.

म?
MOM.

Sunday, November 20, 2016

"एक्सेल" इन द करिअर

साधुवाणी, अध्याय सातवा
मी कोण आहे, माझ्या जगण्याचा काय अर्थ आहे, हा इथं प्रश्नच नसतो
कारण इथला प्रत्येक जण कोणा ना कोणाच्यातरी एक्सेल शीट मधला एक सेल असतो
तो एक चौकोन म्हणजे ज्याला त्याला बहाल केलेली त्याची जागिर
आणि किती एक्सेल शीट मध्ये आपल्या जागिरी त्यावर आपला भाव ठरतो

आपण कोणाच्यातरी एक्सेल शीट मध्ये नांदतो
हे काळण्याला आपण इथं वयात येणं असं म्हणतो
ज्याला हे कळत नाही तो ज्युनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर किंवा असोसिएट मेम्बर ऑफ स्टाफच राहतो

एका सेल पासून ते अख्खा रो आपल्या नावाचा बनणं
म्हणजे पुढचा टप्पा असतो
या टप्प्यात कोणीही येऊन आपल्या नावावर बिलं फाडून जातो
आणि आपणही हळूच कोणावर तरी हात साफ करून घेतो
अंगावर पडलेल्या वाढीव जबाबदाऱ्या
मिळालेल्या, मिळवलेल्या की लादलेल्या असल्या प्रश्नांना आपण बगल द्यायला लागतो!

जो याच्यापुढे तगतो त्याला आख्खीच्या आख्खी एक शीट आपल्या नावावर करायची संधी मिळते!
आपल्यावर फडलेल्या बिलांना त्या शीटमधल्या कुठल्याही रो मध्ये घुसवायची मुभा मग असते
आपापल्या शिटवर अकर्षक रित्या जेवढे रो आपण मांडू शकतो, तेवढी आपली रँक जास्ती असते
कोणी बॉर्डर काढतो, कोणी रंग भरतो, तर कोणी सबटोटलही मारतो
ज्या शीटवर जास्ती फॉर्म्युले, त्या शीटवाल्याचा तीळ भर जास्ती दरारा असतो.

आणि ज्याच्या शिटमधले जितके जास्ती आकडे, शीटच्या बाहेर वापरले, त्याचा तितका जास्ती पगार असतो.

एखादी शीट स्पेशलही असू शकते.
स्वतःचा एकही आकडा नसताना, अख्खी एका नजरेत मावायला झूम लेव्हल ८० टक्के करायला लावते
सबटोटलच नाही तर इथं वीलूकअप आणि सम-इफ पण असतात
आणि व्हॅल्यू ऍडिशन म्हणून वरती चार पाच फिल्टर आणि दोन तीन सॉर्टपण लावले जातात.
एखादा फॉर्म्युला गंडला, किंवा कुठे एरर आला तर यांची झोप उडते
आणि यांच्या शीट मध्ये एकाहून जास्ती करन्सीची चिन्हं आली की यांची लाईफ बनते!

यासागळ्यांवर एक गॉड फादर बसलेला असतो
त्याच्या नावाचीच डायरेक्ट फाईल बनते
त्याच्या आतमध्ये खूपशा शीट्स असतात
त्याच्यापर्यंत पोचलं की म्या ब्रह्म पाह्यलाचं फिलिंग येतं
आपण जसं प्रत्येक पानाच्या डोक्यावर । गुरुदेव दत्त। लिहतो
तसं या फाईलच्या प्रत्येक शीट मध्ये "अवर ऑर्ग इज फ्लॅट" असं मुबलक टाकलेलं असतं

या इथवर पोचायच्या आधीच बऱ्याचदा आपलं आयुष्य संपलेलं असतं
मग आपल्याला वडीलधारे म्हणवून उपदेश घेण्यासाठी नव्या बॅचला आपल्याकडं पोचवलं जातं
चौकोनात कसं राहायचं आणि चौकोनात कसं वाढायचं याचं ज्ञान ग्रोथ स्ट्रॅटेजीची घुट्टी म्हणून आपण त्यांना देऊ करायचं असतं.
शेवटी आपलं जे काय बनेल, जे काय घडेल, त्याला कंट्रोल एस मारून, सक्सेस स्टोरी म्हणूनच सेव करायचं असतं.

Wednesday, September 07, 2016

नावात काय आहे?

पिच्चर संपला आणि शेवटी अगणित लोकांची नावं यायला लागली की ती वाचायला जो थांबतो तो खरा शौकीन. पण शौकीन जरी नसाल तरीही शेवटपर्यंत थांबवायची ट्रिक मार्वल आणि डीसी च्या लोकांना फक्कड जमलीए. ते चक्क मिड क्रेडीट आणि पोस्ट क्रेडीट सीनच टाकतात. घ्या. आता जाताय कुठं? ही नावं बघताना सापडतो कोण कुठला जेम्स, कोण अय्यर, कोण पाटील, कोण रूदरफोर्ड. ज्यांच्या ज्यांच्या हातभाराने पिच्चर बनला ते सगळे.

तर मुद्दा या सगळ्यांच्या खारीच्या वाट्याचा नाहीए. (तेवढं महान वीकडेला कुठं सुचणार?) मुद्दा आहे सिनेमा आणि त्यात सोयीस्कर नसलेल्या आडनावांचा. हे कुठल्या तरी प्रकारचं ism किंवा acy आहे. (परत... hypocrisy किंवा racism वगैरे शब्द वापरायची आपली लेवल नहिए. आणि वीकडे ला तर नक्कीच नाहीए). पण या भानगडीला काहीतरी नाव नक्कीच हवंय. पण तुरतास ते बाजूला ठेवू. कारण नावात काय आहे?

तसं म्हणालं तर हॉलीवूडच्या सुपर हिरोना आपल्या आडनावाचा बळी द्यावा लागत नाही. म्हणजे आपल्याला पीटर पारकर, ब्रूस वेन, टोनी स्टार्क, बॅरी अॅलन हे सगळे आडनावानिशी माहिती आहेत. पण आपल्याला क्रिशचं आडनाव माहिती आहे का? द्रोणाचं (द्रोणाचार्य नव्हे... अभिषेक बच्चन)? रा.वन चं (वन हे आडनाव नव्हतं)? किंवा शक्तिमानचं? आपला प्रश्न असं आहे की हा भेदभाव का? एवढंच कशाला? आत्ताच्या मोहेनजेदारोच्या सरमनचं आडनाव माहिती आहे का? त्यातल्या त्या बखर जोखरचं? किंवा राज आणि सिमरनचं? कहो ना प्यार है मधल्या रोहितचं? राहुल खन्ना आठवत असेल. तोही थोडक्याच लोकांना कदाचित. नाहीतर राहुलच. कारण वो एकच नाम सुना होगा. पण राहुल खन्नाची अंजली ही अंजली शर्मा होती हे किती जणांना लक्षात आहे? आता त्यातल्या अमनचं आडनाव आठवतंय?

Nation must want to know. हे असं का?

म्हणजे सरमन हा सरमन सृजन तावडे असला तर? बखर जोखर तर मला आधी एकाच प्राण्याचं नाव वाटलेलं. ते निघालं माणसांचं नाव. तेही दोन वेगळ्या माणसांच. (तीस मार खान मध्ये कसं भाईयोको बुलाव अशी कॉमन हाक असायची रघु आणि राम ला. तसं इथं बखर-जोखर को बुलाव अशी कॉमन हाक होती). ते दोघे बखर नलावडे आणि जोखर नलावडे असं असेल तर. एवढंच कशाला राज कुलकर्णी आणि सिमरन पाटील यांची लव स्टोरी असली असती तर? किंवा अमन हा अमन चाबुकस्वार असला तर?

म्हणजे तावडेनी पराक्रमी असू नये की काय? नलावडेना हिंस्त्र जुळं होऊ नये की काय? किंवा पाटील कुलकर्णी यांची लवस्टोरी गोल्डन जुबिली होऊ नये की काय? अगदीच काय तर चाबुकस्वारने सलमान सारखा त्याग करू नये की काय?

आ?

म्हणून म्हणतो. या ism किंवा acy ला काहीतरी नाव मिळालंच पाहिजे आणि त्यासाठी मेणबत्त्या जाळल्या पाहिजेत.

एखादाच कोणीतरी बाबुराव गणपतराव आपटे. की जो चक्क बापाचं नावपण सांगायला कमी करत नाही. उगाच राज, प्रेम, राहुल, रोहित, प्रिया, अंजली एवढंच अर्धं मुर्धं सांगून थांबत नाही. (इंजिनिअरींगच्या पहिल्या वर्षीचं रॅगिंग आठवायचं. तेव्हा कसं संपूर्ण नाव सांगायचं ट्रेनिंग मिळतं?)

कसंय.
मिशा वाढवल्या की चेहरा अचानक चौकोनी दिसायला लागतो तसं आडनाव लावलं की पात्राला पात्रता येते. रोबर्ट लँगडन किंवा हॅरी पॉटर सारखी. आपल्याला सवयच नाही न राव त्याची. (आडनावांचं आरक्षण हवं पिच्चर मध्ये. कशी आयडिया? यासाठी तरी मेणबत्त्या जाळल्याच पाहिजेत!)

आता वर सांगितलेल्या आडनावांसकट ते ते पिच्चर आठवून बघा. त्रास झाला तर तुम्ही कुठले तरी ist आहात. नाही झाला तर तुम्ही बेष्ट.

- हुकुमावरून.


आणि म्हणून गाढवासारखं काम केल्यानंतर शिव्या खाल्ल्या की जेव्हा उगाचच कशातरी विरुद्ध बंड करावसं वाटतं तेव्हा लिहायला बसू नये.

Saturday, August 20, 2016

पॉर्न खाये सैय्या हमारो

पॉर्न या विषयावरती कोणाला सखोल चर्चा करायची आहे का? लगेच "वर ती" आणि "खोल" यांच्याकडे लक्ष देऊ नका. "चर्चा" हा मुद्दा आहे.
आमच्याकडे आत्ता रिसेन्टली झालेली आहे अशी चर्चा. आणि त्याचे हे मिनिट्स ऑफ द मिटींग. जनहितार्थ प्रस्तुत.
(अशा रोकठोक मतांसाठी समाज अजूनही तयार नसल्याने मिटिंगमधल्या सर्व सहभाग्यांनी आपापली नावं गुप्त ठेवून भूमिगत राहणं पसंत केलेलं आहे. आणि मला मल्टीपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर नाहीए)

पॉर्न हा उगाचच अस्पृश्य बनवलेला विषय आहे! आमिरखानला तुषार कपूर म्हणाल्यासारखं आहे. मी म्हणतो जर अवघे विश्वची माझं घर असेल तर या घराची संस्कृती म्हणजे पॉर्न! पण व्यथा अशी की, जरी पॉर्नचं ध्रुव ताऱ्यासारखं अढळ स्थान असलं तरी नशिबी प्रेम नाही. तुमच्या सिनेमाला शंभर वर्षं झाल्यावर इतका प्रेक्षकवर्ग मिळाला. तेही जिवाच्या आकांतानं मार्केटिंग करून. आत्ताकुठं खंडीभर लोकं फिल्म बनवायला लागलेत. पण पॉर्नमध्ये हे कधीपासून सुरु आहे. (हे म्हणजे भारताला शून्य लय आधीपासून माहिती होता अशा टेचात सांगता येण्यासारखं आहे). वर जगभर प्रसिद्धी. वर पायरसी फ्रेंडली. कोणी निंदा कोणी वंदा. शंका असेल तर आज इंटरनेटवर सर्वात पॉप्युलर काय आहे पहा. पॉर्न. इंटरनेट सुरूच आहे पॉर्न मुळं. पॉर्न हा सिनेमाचा जॉनर वगैरे नाही. There is only one iPod. Rest are mp3 players. असं आहे ते.

केवढं अफाट साहित्य तयार करून ठेवलंय लोकांनी!! त्याला काही परिसीमाच नाही. एवढं निर्विवाद वर्चस्व मिळवलेल्या या विषयाला अशी सावत्र वागणूक का? हेच बघा की. तमाम चाहत्यांना खुले आम आपल्याबद्दल बोलता येत नाहीये. गणपती, दही हंडीला चीफ गेस्ट म्हणून बोलावता येत नाहीये. ही चाहत्यांची कुचंबणा ओळखून सनी लिओनिनं चक्क पॉर्न सोडालं. आणि आता तिची सांस्कृतिक  गाणी घेऊन आपण आपल्या पोरी बाळींना नाचावतो. हे असंय सगळं. पॉर्न आर्टिस्टमध्ये त्यागाची भावना असते. देऊन टाकायची भावना असते. (देगी क्या? या प्रश्नाचा उगम इथेच झाला असावा). 

आपल्याला लाँचबॉक्ससारखी लव स्टोरी, थ्री इडियट सारखी कॉमेडी किंवा बाजीराव मस्तानी हे सुद्धा आवडतंच की! पण खूप शोधावं लागतं यार त्यासाठी. वाट बघावी लागते. त्याच्यासाठी आधी दहा प्रेम अगन आणि आप के सुरुर बघावे लागतात!! या शोषणाचं काय? पॉर्नचं तसं नाही. हवं असलं की लगेच. त्यामध्ये दर्जा बिर्जा असला भेदभाव नसतोच. ५ सेकंदात सापडतं. Instant Results! पॉर्नसारखं प्रगल्भ आणखी काहीच नाही. एकदम close to roots! आणि to the point. फाफट पसारा लावणं हे काम तुमच्या ताकाचं भांडं लापावणाऱ्यांचं. कहानी की डिमांड वगैरे भानगडी नसतातच पॉर्न मध्ये. कहानीच पूर्ण अशी असते. या परदर्शीतेमुळेच कदाचित आज पॉर्न टिकून आहे.

जनतेसाठी परत ऑप्शन केवढे? जी हवी ती गोष्ट. जो हवा तो प्रकार. जी हवी जागा, देश प्रदेश. सगळं सापडतं. लग्गेच. एवढा वेल सॉर्टड डाटाबेस उपलब्ध असणं म्हणजे चेष्टा नाही!! म्हणून तर हीच आपली संस्कृती. इंड्यानं कामसूत्र लिहून काय दिवे लावले? घंटा!! पॉर्ननं ते घरोघरी पोचवलं. इलेक्ट्रिसिटी शोधली म्हणून सांगू नका. ज्यानं दिवे लावले तोच खरा! पॉर्नला रंग नाही. जात नाही. सीमा नाहीत. आकार नाही. तरी सर्वत्र आहे. हॉस्टेलच्या शेअर्ड हार्ड डिस्क पहाल तर त्यामध्ये मराठी आणि गुजराती पॉर्न पण सापडेल. तेही विंडोजच्या सिस्टीम फोल्डर मध्ये! म्हणजे इतकं कानाकोपऱ्यात पोचलंय पॉर्न. सर्वाना समजेल असं. समजेल अशा पद्धतीत. प्रत्येकानं आपापल्या परीनं त्यातून आपापल्यासाठी स्ट्रेच गोल्स निवडावे असं. समजा आजच्या आज सगळी मनुष्य जात नष्ट झाली तर भविष्यात उत्खाननामध्ये लोकांना जे काही मुबलक सापडेल ते पॉर्न असेल!

आणि या पॉर्नच्या बीभत्स विळख्या मध्ये आपल्या पुढच्या पिढीला अडकू द्यायचं नसेल तर शालेय अभ्यासक्रमात रीतसर सेक्स एजुकेशनचा समावेश झाला पाहिजे. म्हणजे मग आंब्याला आंबा आणि गजाराला गाजर म्हणायला शिकतील मुलं.
(हे आपलं उगाच शेवटी सामाजिक संदेश म्हणून. आमच्यातल्या एकाला वाटलं की पॉर्न सारखं हेही कोणीतरी बॅन केलं तर... म्हणून)

Thursday, June 23, 2016

जागो मोहन प्यारे

तशा सगळ्या गोष्टी इकडून तिकडून सेमच. म्हणून उगाच बाजूला सन सनावळी द्यायची. तर पिरिएड फिल्म सारखी ही आपली एक पिरिएड गोष्ट. सध्याच्या आपल्या किंवा आजूबाजूच्यांच्या आयुष्याशी साधर्म्य आढळल्यास आढळू दे. काही हरकत नाही. गोष्ट एकदम १९००च्या आधीची आहे. किंवा असं म्हणू की, १८५७ चा उठाव झाला त्याच्या नंतर काही दशकं उलटली तेव्हाची आहे.

गोष्टीचा हिरो मोहन. म्हणून गोष्टीचं नाव जागो मोहन प्यारे

तर एक असतो मोहन. त्याला काय शाळेत फार काही झेपत नसतं. ठीकठाक मार्क पडत असतात. पण बोलायला लई भारी असतो. पण तेही घराच्या आतमध्ये. बाहेर गेला की दातखिळी बसत असते! कोणत्याही आईसारखी मोहनची आईसुद्धा त्याला कोणाशी मैत्री करावी आणि कोणाशी करू नये हे सांगत असते! मोहनची आई श्यामची आई नसल्याने, मोहनही श्याम नसतो. म्हणून तो आईला कायच्या काय क्रिएटिव्ह उत्तरं देऊन गुंडाळत असतो. एक लई बेणा पोरगा असतो मोहनच्या संगतीत. त्याला बघून मोहनची आई त्याला बजावते, "चार हात लांब राहा त्याच्यापासून. नाहीतर बिघडशील!" त्यावर मोहन लगेच त्याची थेअरी सांगतो, "त्याच्या संगतीत राहून मी बिघडेन कसं काय? माझ्या संगतीत राहून तो सुधारेल असं का नही वाटत तुला?" असले दिव्य उत्तर ऐकून आई म्हणते, "जा कार्ट्या!"

मोहनला वाटतं आपण जिंकलं. आणि मग पुढे तो आपल्या मित्राबरोबर माती खायला सज्ज होतो. कारण हर एक दोस्त कामिना होता है. त्याचा मित्र लागलीच मोहनला आपले क्रांतिकारी विचार सांगायला सुरु करतो. मोहनला क्रांती करायला आवडत असतं म्हणून तोही कान देऊन ऐकतो.
मित्र म्हणतो की "बघ, मी अथेलेटे आहे पण हे गोरे लोक आले स्पर्धेमध्ये की तेच जिंकतात! सांग का?"

मोहनला तसंही झेपलेलं नसतंच की हे चाललंय कुठं? तो विचारतो, "का?"

मित्र आपली अक्कल पाझळतो. "कारण गोरे लोक मांस खातात! मांसाहारामध्ये जी शक्ती आहे ती शक्ती आणि कशातच नाही!"
मोहनच्या चक्कीत जाळ! तो लगेच आणखी पुढच्या क्रांतिकारी लेवलला एक्स्ट्रापोलेट करतो. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढा बिढा देण्यापेक्षा हे सगळ्यांनी मांसाहारी बनवलं की झालं! मग कशाला राहतायत इंग्रज भारतात? पण यात असतो एक झोल! मोहन असतो एकदम वैष्णव ब्राह्मण वगैरे! म्हणजे मास मच्छी खाल्लं तर घरी रट्टे मिळणार हे नक्की असतं. मग मोहन स्वतःला पण शेंडी लावतो. "देशाच्या हितासाठी हे सगळं" असं म्हणतो आणि मग सुरू करतो नॉनव्हेज खायला! त्याचा मित्र अन तो मिळून शकला लढवून कुठे कुठे काय काय बनवून खाता येईल ते शोधून सगळे प्रकार करून बघतात. हर एक दोस्त कामीना असतोच. मग हा मित्र मोहनला पुढे सिगारेट वगैरेची पण ओळख करून देतो! अशी ही गहरी दोस्ती आणि असे हे दिव्य मित्र! आणि असा हा मोहन.

मोहनला जेव्हा कळतं की आपल्याला आपणच पद्धतशीरपणे उल्लू बनवून घेतलंय, तेव्हा तो काय हयगय न करता डायरेक्ट आत्महत्याच करूया म्हणतो. पण नंतर त्याला कळतं की मांसाहारासारखं ते सोपं नाहीये. त्याच्याकडे तितके पैसेही नसतात आणि धाडसही नसतं. त्यामुळे आत्महत्या वगैरे प्रकरणं झेपत नाही. मग मोहन पुढे आयुष्यभर हा आपला गाढवपणा लक्षात ठेवतो. हा मांसाहार त्याच्या आयुष्यात परत एकदा येतो! तेव्हाचा दुसरा मित्र त्याला म्हणतो, की "अरे दिव्य माणसा. जेव्हा गरज नव्हती तेव्हा गावभर नॉनव्हेज खात सुटलेला! आणि आता गरज आहे तर काय म्हणे उसुल? याला काय अर्थ आहे?"

(आता इथे इंटर्वल घेऊ शकतो. :))

तर झालेलं असतं असं. प्रत्येकाचे जसे cross-referencing वाले काका मामा असतात तसे मोहनचे ही असतात. ते मोहनच्या घरी येतात आणि म्हणतात, "घाला बोटे, मांडा गणित! आता इथं शिकतोयस तिथंच पुढे शिकत गेलास की कारकून होशील आणि इतका पगार मिळेल! त्यापेक्षा मुंबईला वगैरे गेलास आणि अमुक कॉलेजमध्ये शिकलास तर अशी प्लेसमेंट मिळेल आणि मग इतका पगार! पण तरीही त्या अमक्याच्या त्या तमक्या शेंबड्या पोरा एवढा पगार तुला नाहीच मिळणार! बोल काय करतोस?"
मोहनकडं काही उत्तर नसतं. पण काका सोडतायत कुठे?

ते सांगतात "तुला परदेशीच शिकावं लागणार." (सन १९०० च्या आधी आहे म्हणालो की नाही? उगाच GRE, GMAT वगैरेचं नाव नका घेऊ) मोहन परदेशी जायच्या ऑप्शनवर हरकून जातो! तिकडं जाऊन कॅमेरा आणि मॅकबुक घ्यायची सोय नसली तरी काय झालं? फॉरेन ते फॉरेन. आता काय पण झालं तरी भरताबाहेरच जायचंच असं ठरवतो! मग माँ का प्यार मध्ये येतं. सल्ला दिलेले काका सोयीस्कर गायब झालेले असतात. आई आता कुठल्या दुसऱ्या काकांची की मामांची परवानगी घेऊन ये असं सांगते. "तुझे बाबा गेल्यानंतर आपल्याकडे तेच तर सगळं ठरवतात". मग बिचारा मोहन त्यांच्याकडं जातो. काका मग बॉल दुसऱ्याच्या कोर्टात टाकतात. दुसरा तिसऱ्याच्या कोर्टात टाकतो. जॉईंट फॅमीली म्हणाल्यावर ढीगभर हितचिंतक आलेच. आणि मग त्यांसगळ्यांचं हित चिंतायला हवंच की. शेवटी हा "ताकतुंबा त्या घरी जा" वाला खेळ संपवायला एकजण शक्कल लढवतो.

मोहनकडून देवासमोर प्रॉमिस करून घेतात की "मोहन वाईन, वूमन आणि मीट यांना अजिबात हात लावणार नाही. तरच त्याला परदेशी जाता येईल!" हा तह मंजूर करून मोहन शेवटी परदेशी जायला निघतो. (आपण शाळेत नाही का करायचो? आईची शप्पथ आहे वगैरे भानगडी? तसच की पण जरा उगाच १९०० च्या आधीचं) आपल्या बापजाद्यामध्ये कोणी समुद्र ओलांडून गेलं नाही म्हणून समुद्र ओलांडणंच निषिद्ध असं ठरवलेले मोहनच्या जातीमधले काही लोक सोयीस्कर रित्या मोहनला धर्मामधून बाहेर वगैरे काढतात. उद्या मोहनने बाहेर जाऊन काहीतरी भलतेच दिवे लावले तर काय घ्या? असा त्यांचा शुद्ध हेतू असावा. आपला धर्म सेफ राहिला पाहिजे न? पुढे हेच लोक मोहन परत आल्यावर त्याला रीतसर धर्मामध्ये परतही घेतात तो भाग वेगळा. कारण "फॉरेन रिटर्नड" लेबलवाला मेंबर त्यांना अचानक आवडायला लागतो. मोहन दोनही वेळी म्हणतो, "काय करायचंय ते करा. I don't care".

आता तिकडे फॉरेनमध्ये हे इथे, साउथ केन्सिंग्टनच्या या आत्ता मी बसलोय याच्या पलीकडच्या फलाटावर बसून मोहनचा मित्र त्याला म्हणाला असेल की, "अरे दिव्य माणसा. जेव्हा गरज नव्हती तेव्हा गावभर नॉनव्हेज खात सुटलेला! आणि आता इथे जगायचं असेल तर गरज आहे तुला नॉनवेज खाण्याची!" पण मोहनचं उत्तर एकच "उसूल!" आता मोहनला वाटत असतं की सगळ्या भारताने शाकाहारी झालं पाहिजे. पण त्याच्याबद्दल फिरकभी.

मोहनची ही हळू हळू जागं होण्याची कथा खूपच वळणं घेते. पुढे मोहनचा बॅरिस्टर गांधी आणि नंतर बापू होतो. त्याला महात्मा करतात तेव्हा त्याच्याकडे फारसा ऑप्शन नसतो. आणि शेवटी मोहन पैशाच्या नोटेवर जाऊन विसावतो.


हे लिहिल्यावरपण मला एकदम ज्ञानेश्वर लेवलचं काम केल्यासारखा आगाऊ फील आलाय. शेवटी पुस्तक सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत सांगण्यापेक्षा पवित्र काम ते आणखी काय? बाकी नेहमीसारखच ५ पैशाचा मसाला सोडला तर हे सगळं असं आणि असंच झालेलं. नाही पटत तर डायरेक्ट गांधींची ऑटोबायोग्राफीच वाचा.

(क्रमशः)

Friday, June 03, 2016

Worthy Opponents!

स्टीव्ह जॉब्सच्या पुस्तकातले सुरुवातीचे काही चाप्टर सोडले तर अधून मधून बिल गेट्स दर्शन देत राहतो. सुमारे ३ दशकांच्या कालावधीमध्ये, ज्यांनी कॉम्प्युटर आणि नंतर डिजिटलचं क्षेत्र घडवलं आणि गाजवलं असे हे दोन लोक. या तीन दशकांच्या कालावधीमध्ये हे दोघे बऱ्याचदा एकमेकाच्या समोरासमोर येत राहिले. पुस्तकाच्या शेवटच्या भागात या दोघांच्या एका खूप विलक्षण भेटीचं वर्णन आहे. तेव्हा जॉब्स कँसरमुळं जवळपास बिछान्याला खिळलेला. आणि गेट्स पण मायक्रोसॉफ्ट मधून रीटायर झालेला होता. त्या भेटीबद्दल ऐकताना आधीच्या बऱ्याच आठवणी येतात.

खूप खूप खुप वर्षांपूर्वी स्प्रेडशीट्स नावाचं सॉफ्टवेअर (की जे आत्ता आपण एक्सेल म्हणून वापरतो) बनवून गेट्सनं apple मधल्या काही इंजीनिअर लोकांचा रोष ओढवून घेतलेला. गेट्सचा तो काही पहिला परिचय नव्हता apple बरोबर. पण तरीही हा वाला जरा विशेष. जॉब्सला हे स्प्रेडशीट्स इतकं आवडलेलं की त्यानं स्वतःची टीम जी अशाच सॉफ्टवेअर वर काम करत होती, ती थेट बंदच करून टाकलेली. तेव्हापासून हा लुकडा उंच गेट्स apple च्या लोकांसाठी अप्रिय झाला होता. Apple च्या लोकांनी वारंवार जॉब्सला सांगायचा प्रयत्न केला की याच्यावर विश्वास ठेऊ नको. जॉब्सचं आणि गेट्सचं फारसं जमत होतं यातलाही भाग नव्हता. फक्त गेट्स जॉब्सचा तेव्हाचा फेवरेट होता एवढंच. तसंही जॉब्सचं आणखी कोणाबरोबर जमत होतं? हाही तितकाच चर्चेचा विषय. जॉब्सला टेक्नॉलॉजीमधलं घंटा कळत नाही तर हा का सगळ्यात नाक खुपसतो म्हणून गेट्सचा आकस. आणि गेट्सची काहीतरी छान डिजाईन करण्यात किंवा एकूणच सगळ्यात किती घाणेरडी टेस्ट आहे हे वारंवार अधोरेखित करण्याचा जॉब्सचा हट्ट. त्यांची पहिली भेट झाली तेव्हा गेट्सची मायक्रोसॉफ्ट फक्त स्टार्टअप होती आणि जॉब्स apple पब्लिक गेल्यामुळे श्रीमंत झालेला.
तिथून पुढचा या भेटींचा सिलसिला खूप खास आहे. त्यातल्या मला या काही भेटी विशेष लक्षात राहिलेत.

गेट्सनं जेव्हा स्प्रेडशीट्सचं सॉफ्टवेअर आयबीएमला विकलं तेव्हाची भेट. जॉब्सला mac बरोबर हे सॉफ्टवेअर exclusive हवं होतं. त्यानं तसा करारही केलेला गेट्स सोबत. पण नंतर mac रिलीज व्हायला एक वर्ष उशीर झाला. आणि कराराचा कालावधीही संपला. त्यात भरीस भर म्हणून mac बरोबर स्प्रेडशीट्स प्रीलोडेड द्यायच्या प्रॉमिसवर जॉब्स स्वतःच पलटलेला. यामुळे कायद्याचं म्हणा किंवा नैतिक म्हणा, गेट्सवर कुठलंच बंधन राहिलं नव्हतं. सॉफ्टवेअर आयबीएमला विकणं हा तेव्हाच्या सॉफ्टवेअर कंपनीसाठी खूप स्वाभाविक निर्णय होता. आणि करार संपताच गेट्सनं तो घेतला. पण जॉब्सला ते अजिबात आवडलं नाही. आणि मग त्यानं गेट्सला बोलावून घेतलं. खडसावणी करण्यासाठी. जॉब्सच्या बऱ्याचशा मीटिंग या ऑफिसच्या बाजूला कुपर्टीनोच्या रस्त्यावर चालत चालत व्हायच्या. तशीच ही एक. जॉब्सचा थयथयाट आणि आरडा ओरड गेट्सनं नेहमीप्रमाणे ऐकून घेतला. पण तरीही जे झालंय त्यात अजिबात बदल होणार नाही यावर तो ठामही होता. सगळी आग ओकून झाल्यावर जॉब्सनं गेट्सकडं एक बालिश मागणी केली. "Don't make it as awesome as it is on Mac!!" जॉब्सनं हे असले प्रकार आयुष्यभर केलेले. क्षणात राग आणि क्षणात ढसाढसा रडणं हे वगैरे त्याच्या अजूबाजूच्यांसाठी नवं नव्हतं. गेट्स साठीही नव्हतं. या सगळ्यानंतरही गेट्स apple साठी सॉफ्टवेअर बनवत राहिलाच हा भाग वेगळा.

नंतरची खास भेट म्हणजे जेव्हा मायक्रोसॉफ्ट विंडोज 1.0 रिलीज झालं तेव्हाची. गेट्सनं mac मधल्या बऱ्याच गोष्टी चोरल्या आणि विंडोज मध्ये वापरल्या हा त्याचा आरोप. आणखी एक कडाक्याची मीटिंग!! जॉब्सनं परत एकदा गेट्सला हजेरी घेण्यासाठी बोलावलं. जॉब्सची आरडओरड ऐकून घेतल्यानंतर गेट्स जॉब्सला आठवण करून देतो की, ते दोघेही ज्याच्यावरून भांडतायत, ते आहे खरं झेरॉक्स नावाच्या कंपनीचं. म्हणून त्यामध्ये तुझं माझं करण्याचा प्रश्नच येत नाही!! जॉब्सचा संताप 'आपण केलेली टेक्नॉलॉजी दुसऱ्या कोणीतरी कॉपी केली' याही पेक्षा 'किती घाणेरडी कॉपी केली' यामुळं खूप जास्ती होता असं मला वाटतं. पुढे गुगलनं अँड्रॉइड काढल्यावरसुद्धा अशाच प्रकारचा संताप जॉब्सनं केलेला. प्रॉडक्ट सुंदर डिजाईन करण्यात जॉब्सचा हातखंडा. त्यामध्ये जाण असलेली माणसं जॉब्सला विलक्षण आवडायची. त्यांच्याबरोबर काम करायला त्याला खूप आवडायचं. पण बाकीच्या लोकांना गई गुजरी वागणूक देण्यातही त्याला कधीच वावगं वाटलं नाही. गेट्स हा बाकी जगासाठी कोणीही असला, तरी जॉब्स साठी त्या बाकीच्या लोकांपैकी एक होता.

त्यानंतर एक काळ असा आला की गेट्स मोठा माणूस बनलेला. गेट्सची मायक्रोसॉफ्टही खूप मोठी झाली. आणि जॉब्स जवळ जवळ रस्त्यावर आलेला. त्याला apple मधून काढून टाकलेलं आणि apple स्वतःसुद्धा जवळपास बुडीत निघणार होती. दरम्यान या दोघांच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शाब्दिक चकमकी सुरूच होत्या. जॉब्सनं सुरु केलेली दुसरी कंपनी नेक्स्ट सुद्धा फार काही चांगलं करत नव्हती. तेव्हा गेट्सकडे एक प्रस्ताव आलेला. Apple साठी ऑपरेटिंग सिस्टीम लिहिण्याचा. त्याचवेळी apple ने तसाच प्रस्ताव नेक्स्टलाही दिलेला. या चढाओढीमध्ये जॉब्सने बाजी मारली आणि गेट्सला आत घुसू दिलं नाही. किंबहुना ही जॉब्सची दुसरी एन्ट्री होती apple मधली. Apple ने थेट नेक्स्ट अख्खी कंपनीच विकत घेतली. यामध्ये मजा अशी होती की ज्या ऑपरेटिंग सिस्टीम साठी नेक्स्ट घेतली, ती सिस्टीम, apple ने कधीच वापरली नाही. पण apple ला जॉब्स परत मिळाला. हेच काय ते या डीलचं फलित.

अशाच सारखा पण थोडा वेगळा प्रसंग याच्या आधीही घडलेला. पण तेव्हा गेट्सने कुरघोडी केलेली. नेक्स्टला वाचवण्यासाठी जॉब्सने आपल्या तत्वांना मुरड घालून आयबीएमच्या कॉम्प्युटरसाठी ऑपरेटिंग सिस्टीम देण्याचा प्रस्ताव मांडलेला. विंडोज किती घाणेरडी सिस्टीम आहे हे त्याने आयबीएमला पटवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला. आयबीएम बरोबर करार पण केला. पण यावेळी गेट्सनं थयथयाट केला आणि तिथं जॉब्सला घुसू दिलं नाही. त्यासाठी जॉब्सनं आयबीएमला दिलेली वागणूकही तितकीच किंवा जास्तीच जबाबदार होती हेही खरं.

जॉब्सच्या apple मधल्या दुसऱ्या इनिंगमध्ये परत यशस्वी झाल्यावर जॉब्स आणि गेट्स एका इंटरव्यू मध्ये एकत्र आलेले. काही वर्षांपूर्वी तो इंटरव्यू मला अचानक युट्युब वर सापडलेला. आणि लय भारी मजा आलेली तो बघताना. त्यावेळेस हे दोघेही खूप यशस्वी होते. दोघांनीही आपापल्या पद्धतीने जगावर आपली छाप सोडलेली. आता इतकं सगळं झाल्यावर एकमेकांचं श्रेष्ठत्व नाकारण्याची तशी काहीच गरज उरलेली नव्हती. त्या इंटरव्यूमध्ये काही दशकानंतर का होईना, गेट्स काही बाबतीत जॉब्सचं कौतुक करताना दिसतो. पण जॉब्स मात्र गेट्स बद्दल चार चांगले शब्द काढायला कचरतानाच दिसतो. जॉब्सच्या लेखी तुम्ही प्रचंड भारी असणं खूप आवश्यक होतं, काहीतरी तारीफ मिळवण्यासाठी. त्यात उत्तेजनार्थ बक्षीस नावाचा प्रकारच नव्हता.

या सगळ्यापेक्षा खूप वेगळ्या अशा भेटीचे वर्णन पुस्तकाच्या शेवटच्या भागात आहे. कँसरमुळं बिछान्यावर खिळलेल्या जॉब्सला भेटायला म्हणून गेट्स गेलेला तेव्हाचा किस्सा. ते फक्त दोघे असे सुमारे ३ तास बोलत बसलेले. मला अजूनही अफाट कुतूहल वाटतं त्या भेटीचं. जॉब्सनं गेट्सला त्याच्या तेव्हाच्या नव्या आयडियाबद्दल सांगितलं. नवं प्रॉडक्ट कसं डिजाईन करणार त्याचे नमुने दाखवले. गेट्स तेव्हा म्हणाला "कुठे मी मलेरिया का कशावर औषध शोधतोय आणि हा माणूस या अशा अवस्थेतही नवी प्रॉडक्ट डिजाईन करायचा विचार करतोय! कदाचित मी थोडा उशिरा रिटायर व्हायला हवं होतं!" त्या भेटीमध्ये दोघांनीही आपापल्या गातायुष्यावर गप्पा मारल्या. जॉब्सनं त्याच्या बायकोचं कौतुक केलं. जॉब्स म्हणाला की "माझ्यासारख्या माणसा बरोबर राहणं सोपं नाही आणि ते मला माहिती आहे. तसं आपण दोघेही लकी होतो. आपल्याला खूप चांगले जोडीदार मिळाले. आपली मुलंही खूप चांगली घडतायत." गेट्सनं म्हणे एक पत्रही लिहिलेलं जॉब्सला की जे म्हणे त्यांनं आपल्या उशाशी ठेवलेलं. मागच्या ३ दशकांत झालेल्या सगळ्या भेटीपेक्षा ही भेट खूपच निराळी आणि भावूक वाटली मला.

Apple आणि मायक्रोसॉफ्ट बद्दल शिरा ताणून भांडणाऱ्या जनरेशन मधून आपण वाढलो. या दोघांच्याबद्दलही फॅन म्हणून एक पक्कं असं मत बनलेलं. पुस्तक वाचायला सुरु करण्या आधी थोडीफार अपेक्षा होती की आतमध्ये काय असणारे. तरीही पुस्तकात असलेल्या जॉब्सबरोबर जमायला बराच वेळ लागला! पण कट्टर अशी काल्पनिक मतं गुंडाळून ठेवल्यावर जमलं शेवटी. किंवा पुस्तकाशी वाद घालण्याचा स्कोप नसल्यामुळे शेवटी जमवून घ्यायलाच लागलं. मला हे पुस्तक वाचून ज्या आणखी काही लोकांबद्दलचा आदर वाढला त्यापैकी गेट्स हा एक. पण हे दोघेही खूप वेगळ्या प्रकारे समोर येतात या पुस्तकातून. दोघांचीही काम करण्याची पद्धत, परिश्रम घेण्याची तयारी, आलेल्या परिस्थितीला काय वाट्टल ते झालं तरी तोंड द्यायची हिम्मत बघितली की मग या दोघांच्यात चढाओढ लवावीशी नाही वाटत. त्यांनी एकमेकांशी स्पर्धा केली, किंवा जे काही केलं तो त्यांचा विषय होता, पण फॅन म्हणून मग दोघेही आवडतात आपल्याला. वर्दी अपोनंट्स!