Monday, September 02, 2019

क्रमशः

"खूप जोराची लागलीय!" असं म्हणून ती बाहेर पडली. तरातरा चालत ट्रेन स्टेशन वर आली. एक स्टॉप पुढे गेली. पलीकडच्या प्लॅटफॉर्म वर जाऊन उगाच ट्रेन बदलली. आणखी एक स्टॉप गेली. आणि उतरली. पुढचे सगळे जिने चढून उतरून स्टेशनच्या बाहेर आली. रंगीत माणसं हुंगत, जवळचा एक छोटेखानी कॅफे हुडकून, तिथल्या एका खिडकी पाशी बस्ता टाकून बसली. एका मिनिटात उठली आणि काउंटरला जाऊन एक कॅपूचीनो मागवली. तिथल्या बॅरीस्ताने सवईनुसर लॉयल्टी कार्ड घेतेस का म्हणून विचारलं. तिनं ऑफ कोर्स मान हलवली. त्यानं शिक्का बीक्का मारून किती कॉफ्या रिचवल्या की मग एक कॉफी फुकट मिळणार वगैरे गणित सांगितलं. "मी लॉयल होण्यात एक्सपर्ट आहे" असं म्हणत तिनं परत मान हलवली आणि कार्ड उचललं.

सुमारे सहा महिन्यापूर्वी ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये सारुक खान बनून प्रोजेक्ट मधल्या पोराटोरांना काय ऐकवलेलं ते आठवून मग स्वतःशीच हासूनही झालं.

.
.
.

"हवीतच कशाला ही कार्ड इतकी? If you are loyal to everyone, then you are loyal to no one. काय मोठा खजाना जमा होणारे हे दोन चार कॉफ्या फुकट मिळवून? एवढं तिकडं पैसे मिळवायचे आणि इकडे एक एक कॉफीची गणितं मांडायची? सरळ आपापली कॉफी घ्यावी आणि चालते व्हावे. कोणी सांगितलंय उगाच ते कार्ड शोधा, मग त्यावर शिक्का मारून घ्या. आणि तोवर आपल्या मागे उभे असलेल्यांची रांग पंगवा. त्यापेक्षा हे सगळं टाळलं तर किती लोकांचा किती वेळ वाचेल? आणि त्या कॉफीवाल्याला द्यायच्यात आहेत दर नऊ कॉफी विकल्यावर दहावी कॉफी फुकट, तर अशीच दे न म्हणावं समोर येणाऱ्याला! ज्याला अचानक अशी फुकट कॉफी मिळेल त्याला किती छान वाटेल सरप्राइज! येईल की पठ्ठ्या परत परत! वर कागदाची आणि शाईची बचत, ती वेगळी." असं म्हणत सगळी कार्ड कानाकोपऱ्यातून काढून कचऱ्यात स्वाहा केलेली. आणि ऑफ कोर्स, पोरं टोरं पण पांगलेली.
.
.

नंतर काही महिन्यात परत फ्रेश मध्ये कार्ड जमा करणं सुरू पण झालेलं. "अधे मध्ये उगाच हट्टाने क्रांतिकारी व्हायची भूक म्हणजेच बीइंग ह्युमन की!" ते ही असं पान पुसून.
अणि इथे झोपला तोच सारुक!

.
.
.

हे चक्र तिचं सुरू असायचं. आता परत एकदा कार्डांचा साठा त्यांचं अस्तित्व वेगळं जाणवेल इतका मोठा झालेला. तिनं एकदा सगळ्या पसाऱ्याकडे नजर टाकली. यावं कॅफे. त्याव कॅफे. याचं सँडविच. त्याचा बरिटो. कुठे डोनट. कुठे ज्यूस. मग झालच तर किराणा माल. घ्या. प्रत्येकाचं प्रॉमिस. कधीतरी, काहीतरी वस्तू फुकट द्यायचं. आणि ज्यामध्ये तिला काडीमात्रही रस नव्हता. तिच्या लेखी दर कार्डामागे एक वेगळीच गोष्ट फुकट मिळायची. आणि त्याची उत्कट तहान लागली, की ती "जोराची लागलीय" म्हणून असेल तिथून बाहेर पडायची.

तेवढ्यात कॉफी आली. तीही एव्हाना थोडी शांत झालेली. स्टेशनवरचा लाल जॅकेट मधला तिकीट वाला म्हातारा, एकमेकांच्या खोड्या काढणारं कपल, फोन मध्ये घुसलेली मुलगी, गलेलठ्ठ बॅग घेऊन रस्ता चुकलेला मुलगा, टुरिस्ट म्हणून आलेले काका काकू आणि त्यांना अक्कल शिकवणारं त्यांचं शेम्बड नातवंड. या सगळ्यांबरोबर झालेल्या अडीच तीन सेकंदाच्या नजरा नजरेत छोट्या छोट्या गप्पा मारून झालेल्या तिच्या. अभी के लिए वो काफी था. रिचार्ज डन. "कॉफी है... काफी है" असं स्वतःशीच म्हणत तिनं निवांत श्वास घेतला.

आजचं कार्ड आणि त्यावरचा शिक्का म्हणजे हे सगळं. असं पॅक करून तिनं कार्ड आतमध्ये ठेवलं. बाकी परत आहेच की, कॉन्फरन्स रूम. व्हाईट बोर्डिंग. मिनिट्स ऑफ द मिटिंग. क्लायंट. टीम. बॉस. ईमेल. कॅलेंडर इन्व्हाईट. आणि काय नि काय नि काय.

शाळा, कॉलेज, एमबीए, पचवत पचवत, प्रत्येक टप्प्यावर केलेल्या सेलेब्रेशन गणिक, झालेली ही आखीव रेखीव, शिस्तबद्ध प्रगती. या चाकोरीमध्ये अडकवून घेण्यासाठीची अखंड धडपड. आणि मग हीच धडपड जरा अति झाली की अचानक, भरगच्च कॉन्फरन्स मध्ये, किंवा अपने पराये घेऊन थाटलेल्या छोट्या मोठ्या मिटींग्स मध्ये, नेमून दिलेल्या चौकोनी जागेत, किंवा कुठेही, तिला वाटायचं की कोणाशी बोलणंच नाही झालं की य काळात? काहीही संबंध नसणारं, काहीही पॉईंट नसलेलं, कही से - कही को भी - आओ - बेवजह चले - वालं २ सेकंद ते २ तास अशा कुठल्याही मोजमापात बसू शकणारं.

कहा गए वो लोग वगैरे मेलोड्रॅमॅटिक व्हायच्या आधी मग, तेच बोलणं हुडकण्यासाठी मुँह उठाके बाहेर पडते. ही माझी माझी छोटीशी रोडट्रीप. सापडलं मला हवं ते की जाते परत. आणि मिळतं की इथे तिथेच काहीतरी.

.
.

गलेलठ्ठ बॅग घेऊन रस्ता चुकलेला मुलगा आता आपल्या रस्त्यावर जायला परत निघाला. जाताना तिला म्हणाला, "तुला एक सुचवू काय? म्हणजे आता हलकी झालीचेस तू. पण तरीही आपलं उगाच. तुझ्यामुळे फुकट मिळालेल्या कॉफीचं ऋण फेडायला म्हण."
तिनं मान हलवली. "एका अमेझिंग पॉईंटला आपण आटा आहोत. याचा विचका करू नको." हे आपलं मनातल्या मनात.
"तू ऍप वापरू शकतेस की. लॉयल्टी कार्ड गोळा करण्या पेक्षा?"

.
.

परीस्थितीचं गांभीर्य ओळखून त्यानं मौका-ए-वरदाद वरून पळ काढला. त्यालाही त्याच्या रोडट्रीप वर जायचं होतं. पुढचा पाडाव. प्राग.

No comments: