Thursday, February 20, 2020

Part 3: वॉर्सावचा करार

तर मग पळत, धडपडत, शेवटी मॉस्कोच्या उंबरठ्यावर येऊन पोचलो तेव्हाची ही गोष्ट. इंटरवल आलेली. अर्धी ट्रीप झालेली. अर्धी ट्रीप राहिलेली. सोळा, सातारा तासाचा स्टॉप ओवर होता मिन्स्क एअरपोर्ट वर आणि मग पुढे मॉस्को. खैय्यामला मेसेज टाकला, की परत येतोय रे तुझ्या मिन्स्क मध्ये. आणि अशा करू की कुठं अडकणार नाही की कोणी अडवणार नाही. त्याचं उत्तर आलं की नाही, बघायच्या आधीच इकडे बॅग्स टाकायला आपला नंबर आला.


इथून जो एअरपोर्टवर किस्सा सुरू झाला तो तासाभरात भलताच तापला. शेवटी मला एक मोठ्ठी Do's and Don'ts ची यादी देऊन सोडण्यात आलं. जाताना बाई म्हणाल्या. "हे बघ, We don't do this. This is not normal. Please don't screw up. Do exactly how I said it. Otherwise, I will also lose my job." बाजूच्या बाबाने सुद्धा तीन चार वेळा रंगीत तालीम करून घेतली. "बघ, फ्लाईट उतरली की इकडे जायचं. त्यांना हे दाखवायचं. आणि हे एवढंच म्हणायचं. या दुसऱ्या ठिकाणी अजिबात फिरकायच नाही. आणि मग अमुक. आणि तमुक. समजलं? पक्कं?"


यातल्या प्रत्येक आणि प्रत्येक वाक्याला आपल्याकडे उत्तर होतं. म्हणजे अगदी उचांबळून येत होतं. Simply, असं एवढं कधी काही होत नाही काका! कमीत कमी हे असं तरी म्हणायचं गळ्यापर्यंत आलेलंच होतं. पण तरीही प्रसंगावधान राखून ते म्हणायचा मोह आवरणे म्हणजेच maturity होय. आणि ती मी तेव्हापुरती तरी दाखवली. कश्शाला म्हणजे कश्शाला नाही न म्हणता, सगळं ऐकून घेतलं. पाठीवरची बॅग उचलली. बोलता बोलता चित्रकला करून दाखवलेला कागद इंस्टाग्रामला खायला घालू नंतर म्हणून उचलला. वर बघून परत एकदा विचारलं, "जाऊ मग? पक्कं?"


बाई आणि बाबा, दोघांनी मान हलवली. मी निघायच्या आधी, बाई पुढे गेलेल्या मागे आल्या आणि म्हणाल्या, "का? Why are you doing this?"


तरीही आपण काही म्हणजे काहीही म्हणालो नाही. फक्त मान हलवली. आणि निघालो. जरा दोन पावलं जाऊन न राहवून परत मागे आलो. त्या बाई नी बाबा, दोघांना विचारलं, एक सेल्फी घेऊ का आपल्या सगळ्यांचा? आठवण म्हणून. एवढ्याने आमची सगळी maturity चुलीत गेलेली. दोघांनीही एकत्र मान हलवून उत्स्फूर्तपणे ताबडतोब नकार दर्शवला. त्यांनी अजून कुठला निर्णय बदलायच्या आत, मी आपली गेलेली maturity परत आणून खाली मान घातली आणि चालायला लागलो. आता मॉस्कोपर्यंत पोचल्याशिवाय मान वर काढायची नाही. खैय्यामचा मेसेज आलेला. ब्लडी रशियन्स.


आता थोडं रिवाइंड करू.
झालेलं असं.
बेलारूस नावाच्या देशामध्ये, काही ठराविक अटींखाली भारतीय नागरिकांना ३० दिवस, व्हिसा फ्री एन्ट्री मिळते. या अटी शोधणे म्हणजे एक मोठ्ठ काम आहे हा भाग वेगळा. पण फुकट ते पौष्टिक न? म्हणून शोधलं. लंडन वरून मॉस्कोपर्यंत का जायचंय याला जसं उत्तर नव्हतं, तसं, बेलारूसच्या फॉरेन मिनिस्ट्रीच्या वेबसाईटची पानं चाळत का बसायची यालापण काही खास उत्तर नव्हतं. ऑनलाईन बघाल, तर युरोप मधून रशियाकडे जमिनीवरून जाणारी लोकं सहसा रिगा मधून जातात. बेलारूस पार करून मॉस्कोमध्ये जाणं, इतकं सरळ सोपं असताना ऑनलाईन कोणीच कसं काय याबद्दल फारसं लिहिलेलं नाही, हे बघून इथेच सावध होण्यापेक्षा, हीच ती वेळ आपणच इतिहास घडवायची, हा मनात विचार आला असावा. तसंही, आपल्याला भूगोलापेक्षा भूमिती जास्ती प्रिय असल्यामुळे, सरळ रेषेत बेलारूसमधून मॉस्को कडे जात येत असताना, उत्तरेकडे वाकडी वाट करून रिगामधून हे तर आपल्या बुध्धीला पटतच नव्हतं. आणि रिगाकडे वाकडी वाट न केल्यामुळे, मला दोन दिवसही जास्ती मिळणार होते. जोमात मी बेलारूसच्या वेबसाईटची पानं चाळायला सुरु केली. भारताच्या यु के हाय कमिशनच्या वेबसाईटपेक्षा सुद्धा यांची वेबसाईट जास्ती गचाळ असूनही, आपण धीर सोडला नाही. सरकारी आणि खाजगी अशा दहा ठिकाणी हे व्हिसा फ्री वालं गणित सापडलं. तुमच्याकडे भारतीय पासपोर्ट असेल, चालू आणि एकदा तरी वापरलेला असा मल्टिपल एन्ट्री शेंगन विसा असेल, आणि हे सगळं किमान सहा महिने valid असेल, तर मग तुम्हाला मिन्स्क मधून बेलारूस मध्ये ३० दिवस व्हिसा फ्री एंट्री. इथे मला तर जेमतेम २ किंवा ३ दिवस हवी होती.


पण मग मिन्स्कच्या एअरपोर्ट वर रात्रीच्या अकरा बारा वाजता आपली गाठ पडली ते बेलारूसच्या बॉर्डर कंट्रोलशी. Neither a good time nor a good idea. त्यावर sms आला की सरप्राइज...! तुमचं रोमिंग इथं चालतच नाही. हे य पैसे द्या, मग थोडंसं देऊ. यावर आपल्याला काही फरक पडत नाही असलं काही म्हणायच्या आत पासपोर्ट कंट्रोलवाल्या ताईंनी बोलावलं. शेंगन विसा आहे वगैरे बघून परतीचं तिकीट आहे का विचारलं. "परती नाही पण पुढचं आहे" असं म्हणून मॉस्को आणि नंतर परत लंडनवालं सगळं तिकीट दाखवलं. पण मग ताईंनी, क्या लगा था? गब्बर शाबाशी देगा? अशी प्रतिक्रिया दिली. एक काम कर म्हणाल्या ताई. वरच्या मजल्यावर जा आणि बॉर्डर कंट्रोलवाल्या काकांना भेट. आणि ते काय म्हणतायत बघ. त्यांनी सोडलं तर मग तुला इथून जाऊ देऊ. काहीतरी बिनसलंय याचा अंदाज थोडा थोडा येऊ लागलेला तेव्हाच.


बाकी सारी जनता लाईनीतून एक एक करत बाहेर पडत असताना, आपण एकटेच उलट दिशेने चालत जाताना उगाच exclusive असा फिल येतो. तुमच्यावर अशी वेळ न येवो. पण आलीच तर एकदम टशन मे जानेका. फुल ऑन अटेंशन मिळतं लोकांकडून. तुमची वाट लागलीय हे तुम्हाला माहिती आणि त्या काऊंटर वाल्या ताईला. बाकीच्यांना थोडीच?


पुढे बॉर्डर कंट्रोलवाल्या काकांनी सांगितलं की कंनेक्टींग तिकीट हवं आणि ते जग्गात कुठंही जायचं असलं तरी चालतं, पण मॉस्कोशिवाय. आता हे शेवटचं "मॉस्को शिवाय" हे लिहायचं न ठळक पणे? उगाच स्टार मारून खाली कोपऱ्यात कशाला? असंही काही म्हणायचा स्कोप नव्हता. काकांनी त्यांच्या काचेच्या बाहेर, चक्क प्रिंट आऊट चिकटवून ठेवलेली - केवळ हेच लिहिलेली! तिथे काकांसमोर वेबसाईट उघडली, तर चक्क सापडलं की हे पान! म्हणजे मागे बघितलं तेव्हा कुठं झाक मारायला गेलेलं काय माहिती! तरी on a side note, इथे प्रिंट आऊट लावून ठेवलीय अशी, म्हणजे असला उद्योग करणारा, मी पहिलाच इसम नसणार! अजूनही महाभाग इथे फिरकले असतील. असो. तासभर गेला यांच्यातच. रात्री बारा वाजता तेव्हा त्या वास्तु मध्ये, त्यांचे कर्मचारी सोडले, तर एक मी होतो, आणि खालच्या मजल्यावर खैय्याम. त्याची गोष्ट वेगळी. मला जे काय करायचं ते पुढच्या काही मिनिटात करणं भाग होतं. समोर दोन पोलिस, दोन पासपोर्ट कंट्रोलची लोक आणि हे बॉर्डर कंट्रोलचे काका. सगळ्यांची नजर माझ्यावर. माझ्या हातातल्या फोन वर इंटरनेट उपकार केल्यासारखं चालत होतं. आणि मला आता फास्टेस्ट फिंगर फर्स्ट करायचं होतं आणि ठरवायचं होतं की आपण दरवाज्याच्या इस पार जाणारे की ऊस पार?


कुठलंही युरोप मध्ये परत जाणारं तिकीट काढायचं आणि इथून सटकायचं. Then you're not my problem. हे अप्रत्यक्षपणे काकांनी स्पष्ट केलेलं. "मग तू तीस दिवस राहून जा, नाहीतर आत्ता लगेच जा. मला काहीही फरक पडत नाही." आणि मग इथून वॉर्साव कडे जायचं ठरलं. केवळ एकच कारण. तेव्हा त्या वेळी ते एकच स्वस्तात स्वस्त तिकीट मिळत होतं. ते तिकीट दाखवलं. आणि मिन्स्क शहरात दाखल झालो. पुढे अजून मॉस्कोकडे कसं जायचं हा भाग होताच. या सगळ्या ट्रिप मध्ये एकमेव महागडं फ्लाईट तिकीट काढलेलं ते हे मिन्स्क वरून मॉस्कोकडे, मॉस्को वरून याकुतस्क आणि मग मगदान वरून लंडन कडे. ते चुकवलं तर खूपच वाट लागणार होती.


रात्री, अजून दहा ठिकाणी शोधाशोध करून, एक मार्ग सापडला. आता आपल्याला मिन्स्कच्या फॉरेन मिनिस्ट्रीच्या वेबसाईटचा थोडा थोडा सराव झालेला. सकाळी, म्हणजे सुमारे ५-६ तासात परत एअरपोर्टला गेलो. थेट बॉर्डर कंट्रोल कडे. यावेळी दुसरे काका होते. त्यांना माझं वॉर्सावचं तिकीट दाखवलं. एक रात्री सोडून पुढच्या दिवशीचं मॉस्कोचं तिकीट दाखवलं. म्हणालो, काका, हे बघा, आता निघालो इकडून. उद्या परत येईन. तुमच्या वेबसाईटवर लिहिलंय, तुम्ही २४ तासापर्यंत transit मध्ये बसू देता. आणि तसं बसलो, तर मग मला पुढे मॉस्को मध्ये जायला नाही पण म्हणू शकत नाही. कारण, नियमाप्रमाणे, आपण मिन्स्क शहरात एंट्री केलेली नसेल. काकानी मान हलवली. म्हणाले, जा सिमरन. जी लो अपनी जिंदगी.


हे सगळं करून आता जेव्हा मी वॉर्साव वरून परत मिन्स्क कडे जायला निघालो, तेव्हा काहीच कुठे गंडण्याचं कारण नव्हतं. मला मिन्स्क मध्ये जायचंच नव्हतं. सोळा सातारा तास transit मध्ये बसेन. एअरपोर्ट फिरेन. आणि जाईन पुढे. हा आपला प्लॅन.


मगर वो हो न सका, और अब ये आलम है, के तुम नहीं, तेरा गम, तेरी जुस्तजू भी नहीं. हे असं सगळं मॉस्को बद्दल होणार होतं! कारण काय? तर या वॉर्सावच्या एअरपोर्टच्या या लोकांना माझं एकूणच प्रकरण संशयास्पद वाटलेलं.


"तू कालच मिन्स्क मध्ये होतास न? आता परत का निघालायस?"
"मिन्स्क मध्ये नाही जाणारे. रशियाला जाणारे."
"नाही जाऊ शकत"
"मिन्स्क मध्ये गेलो तर नाही जाऊ शकत. Transit मध्ये असलो तर जाऊ शकतो. जा विचारून ये मास्तरांना"
बाबा गेला, आणि मग बाई आल्या.
.
.
"मग कालच का नाही गेलास? वॉर्सावला का आलास?"
"रशियन व्हिसा सुरु व्हायला दोन दिवस होते."
"मग वॉर्साव मधून थेट जा की मॉस्कोला. मिन्स्क मधूनच का जायचंय?"
"अरे बाबा. पुढची तिकिटं सगळी मिन्स्क मधून आहेत."
"का?"
"का काय का?"
"का?"
"तशी काढलेली तेव्हा, म्हणून तशी आहेत."
"मिन्स्कच का?"
"हे बघ आपण सरळ रेषेत जाणारा माणूस आहे. म्हणून."
"मॉस्को मध्ये जाऊन काय करणार?"
"काही नाही करणार. सायबेरिया मध्ये जाणार. तिथे अमुक अमुक गावात फिरणार."
"काय?"
"काय काय काय?"
"आम्हीपण गेलो नाही कधी तिथे. कोणीच जात नाही तिथे सहसा. तू का निघालाय?"
"का काय का अरे? आता निघालोय."
"कोणाबरोबर"
"आहेत २-३ लोक"
"तू ओळखत नाहीस?"
"तिथेच भेटेन प्रथम"
बाईंनी गिव्ह अप मारला. बाबाला परत बोलावलं.
.
.
"वर्साव मध्ये राहतोस?"
"नाही"
"मग कुठून आलास?"
"क्राकाव"
"तिथं राहतोस?"
"नाही"
"तिथं कुठून आलास?"
"प्राग"
"तिथं राहतोस?"
"नाही"
"बस मग इकडे बाजूला. आता मास्तरांनाच बोलावतो."
.
.
.
आता अजून कोणीतरी आलं.
"परत एकदा सांग पहिल्यापासून. या कागदावर काढून दाखव, कुठल्या तारखेला कुठून कुठे कसा आलास."
"काका, तुमच्या मिन्स्कच्या बॉर्डर कंट्रोल ला विचार न. मी तिथे होतो काल. मी त्यांना विचारून आलोय."
"ते आमचं काम आहे. ते करतो आम्ही. तू कागदावर काढून दाखव आधी."
"काढतो की. घाबरतो काय? पण तुम्ही विचारा तरी. उगाच गैरसमज झालाय. त्यांनी परवानगी दिली तर विषयच मिटला न."
"आम्हाला आमचा देश माहिती आहे. तुला नाही सोडणारे."
हे सहाव्यांदा बोलून झालेलं या गॅंगचं की मला नाही सोडणारे!
"संबंधच नाही. आधी मला एक सांगा. तुमचा देश - म्हणजे exactly कुठला देश? पोलंड, बेलारूस की रशिया?"
"रशिया"
च्यामारी. तरीही आपण मागं हटणार थोडीच होतो.
"हे बघ. तुम्हाला काय वाटतंय याला फार महत्व नाही आहे, खरं तर. वाईट वाटून घेऊ नका. बॉर्डर कंट्रोलला फोन करा. तुमच्या देशाने दिलेले नियमच पाळतात ते. आणि त्यांनी सांगितलंय मला."
"तुला कागदावर काढून द्यायला काय हरकत आहे? कुठून आलास सांग तरी"
"काही हरकत नाही आहे. काढणारच आहे." आणि पोस्ट पण करणारे इंस्टाग्राम वर.
.
.
.
हे सगळं होता होता, दहा लोकं येऊन गेली. बाकीची काउंटर ओस पडली. आता विमान के उडान की वेळ अर्ध्या पाऊण तासावर आलेली. हे बघा. म्हणून एअरपोर्ट वर कायमच आपण खूप म्हणजे खूप वेळ हाताशी ठेवून जातो. कधी कुठं लागेल सांगता येत नाही. इथे तर भाषेची सुद्धा मजा होती. तशी भाषेची मजा तर मिन्स्क पासून सुरू होती. मिन्स्कमधली अर्ध्याहून जास्ती हुज्जत आपण गूगल ट्रान्सलेटर वापरून घातलेली. इथे थोडी बरी परीस्थिती होती. पण एकूणच स्वतःच्या पेशन्सची माझी मलाच दाद द्यावीशी वाटत होती. पण आता अर्ध्यावर येऊन परत पण जायचं नव्हतं.


शेवटी. सच्चाई की जीत झालीच. किंवा बेलावियन एअरलाईनला मायेचा पाझर फुटला, म्हणू. किंवा त्यांना बरोबर माणूस सापडला मिन्स्क बॉर्डर कंट्रोलचा. काहीही असो. दहा गोष्टी माझ्याकडून वदवून घेऊन, पुढे कुठं जायचं. कुठं नाही जायचं. वगैरे सांगून, मग जा म्हणाले.


No comments: