Thursday, March 25, 2021

बंडू - भाग: अधल्या मधल्याच्या खूप पुढचा


.
.
.
बंडू आणि त्याचे किस्से याला आता उधाण आलेलं. कोर्ट कचेऱ्याच कशाला, पण आता तुरुंगवास पण झालेला. तुरुंगवास कुछ रास नहीं आया म्हणून, तुरुंगातून एक दोन वेळा पळ काढून पण झालेला.
.
.
बंडूवरचा एकही आरोप पूर्णपणे सिद्ध झालेला नसला तरी त्याच्या नावावर निरनिराळे गंभीर गुन्हे मात्र दाखल होतच होते. पण बंडूही कमी नव्हता. आता तोही सराईत बनलेला. प्रत्येक नवा आरोप आणि त्यावर सुरु होणारा खल जणू काही त्याला सुखावतोय की काय, असं काही लोकांना वाटू लागलं. इतक्या लोकांच्या इतक्या नजर आपल्यावर खिळलेल्या आहेत हे बंडूच्या कल्पनेच्याही बाहेरचं होतं. बंडूच्या आयुष्याचं थेट प्रक्षेपण सुरु होतं. अख्ख्या देशभरात बंडूची चर्चा होती. त्याच्या छोट्या मोठ्या गोष्टींचं विश्लेषण सुरु होतं. काय खाल्लं, काय पिलं, काय म्हणाला, कसं म्हणाला, या सगळ्याचं! आणि आपण केलेली एक एक कृती, बारकाईने सर्वांसमोर येतेय, घराघरांत पोहोचतेय, याची बंडूला तिकडे वेगळीच नशा चढत होती.
.
.
बंडूच्या वकिलांचं काम मात्र यामुळं अवघड होत होतं. हा माणूस पायावर कुऱ्हाड नाही तर कुऱ्हाडीवर नाचतोय अशीच स्थिती होती. याला वाचवणार तरी कसं? काहीच नाही तर, कमीत कमी बोल, तोंड बंद ठेव, मग कमीत कमी शिक्षा होईल, हा वकिलांचा प्रयत्न. पण बंडू कोर्टात स्वतःच वकील होऊन प्रतीपक्षाची उलटं तपासणी घ्यायचा! एकदा वकिलाने सांगितलं की मला नाही घ्यायची याची केस! आम्ही नाही जा!
.
.
कारण, बंडूने केलेल्या उलट तपासणी मध्ये साध्य काहीच व्हायचं नाही. नुसताच तमाशा व्हायचा. हे करून बंडू स्वतःला वाचावतोय की उगाच थिअट्रिक करून दाखवतोय याचा हिशोब पण नाही लागायचा. बंडूचे हातवारे केलेले फोटो मात्र पेपरातून झळकत राहायचे. तसं बंडूला सरकारने दिलेला वकील कधीच मान्य नव्हता. तसं वकिलालाही बंडू मान्य नव्हताच म्हणा. पण आता करताय काय? बदल पण शक्य नव्हता. काहीच नाही तर वकिलाने नंतर थेट पुस्तकच लिहून टाकला काही वर्षांनी. की काय दिमाग को शॉट लावलेला बंडूनं म्हणून. बंडू काही वाचणार नाही हे बंडूच्या वकीलाला सुद्धा वाटायचं. आणि म्हणूनच तो बंडूला नको होता. "माझी केस मी लढणार. आणि मी सुटून बाहेर येणार." हे बंडूचं ठरलं होतं. मग ते ठेचकळत का असेना.
.
.
एकच वेळी खूप वेगवेगळ्या गोष्टी सुरू होत्या.
बंडूवर सबूत पे सबूत दाखल होत होते. नवनवीन आरोप पण लागतं होते.
बंडूसारखा चार्मिंग गुन्हेगार कटघरेमें बघायला कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली पण कोर्टात हजेरी लावू लागल्या होत्या.
बंडूची आई सगळ्यांना हर समय सांगत होती की कसा तीचा मुलगा निर्दोषच आहे.
आणि तिकडे बंडूने आउट ऑफ़ नो व्हेअर कोर्टात आपल्या जुन्या मैत्रिणीला कटघऱ्या मध्ये बोलावून प्रपोज करूँ टाकला.
.
.
घ्या. म्हणजे अरे, स्थळ काय? वेळ काय? आपलं चाललंय काय? पण बंडूच्या गोष्टीत या सगळ्याची सांगड होतीच कधी? बंडू पोलिसांची किंवा एकूणच न्याय व्यवस्थेची चेष्टा करतोय असा सूर कधीपासून बळावत होता. एकही गुन्हा अजूनही सिद्ध नसला तरी त्याच्याबद्दलची सहानुभूती पार संपून गेलेली. "बंडू नराधमच आहे का?" या प्रकारच्या बातम्या कधीपासून छापून येत होत्या. पण त्याचबरोबर बंडूची घरोघरी पसरणारी प्रसिद्धी मात्र कमी होत नव्हती. सगळाच गुंता. सगळंच अशुद्ध.
.
.
बंडूने भर कोर्टात प्रपोज करून आता वेगळाच चाप्टर सुरु केलेला. टेक्नीकली, कोर्टात सगळ्यांच्या साक्षीने बंडूचं लग्न झालेलं. बंडू वेगळ्याच प्रकारच्या गृहस्थाश्रमात शिरणार होता. कारण या आगळ्या वेगळ्या लग्नानंतर दोन तीन तासांनी, त्याच कोर्टात, तिथेच बंडूला जज आणि ज्युरी किडनॅपिंग आणि खुनाच्या आरोपावरून देहदंड ठोठावणार होते!
.
आता तरी या माणसाला शुद्ध येईल का? हा प्रश्न होताच.
.
.
.
ता. क. पुढचा भाग शेवटचा.


No comments: