.
देहदंड झाल्यानंतर बंडूला आता तुरुंगाच्या वेगळ्या भागात हलवलं. तिकडे त्याच्यावर दाखल झालेल्या बाकीच्या गुन्ह्यांसाठी तारखा पडतच होत्या. त्यावर चर्चा उपचर्चा होतच होत्या. आणि यामध्ये महिने गेले. म्हणजे खरंच महिने गेले. बंडूच्या कोठडीमध्ये सगळे देहदंड झालेले कैदी असल्यामुळे तिथे सहसा कोणालाही भेटायची परवानगी मिळणं मुश्किल होतं. आणि तीही मिळाली तर पाच ते दहा मिनिटंच मिळायची. आणि हे असं असताना, बंडूने थेट वेगळ्याच पातळीवरचा परफॉर्मन्स दिला. बंडू फॅमिलीवाला झाला. बंडूला मुलगी झाली. नवरा, बायको आणि छोटं बाळ यांचा तुरुंगाच्या कोठाडीच्या बॅकड्रॉप वर काढलेला हसरा फोटो लवकरच पेपरात झळकला. बंडूकडच्या गुड न्युजची न्युज देशभर झाली. आणि बंडू तुरुंगात असताना असं झालंच कसं? याला घेऊन बाकी कुठे कुठे कशी कशी बोंबाबोंब झाली तो भाग वेगळा.
.
बंडूला कोर्टात सुरु असलेल्या कला अजून तशाच सुरु होत्या. त्याचे वकील तसेच त्याच्यावर वैतागलेले होते. एकूण काय तर पूर्वीपेक्षा फारसं काही बदलेललं नव्हतं. स्वतःचं थोडं फार भलं करून घ्यायच्या मोजक्याच संध्या आता त्याच्याकडे उरलेल्या. पण त्यासाठी गुन्हे मान्य करणे ही पहिली पायरी होती. अहो पण मी शेंगदाणे खाल्लेच नाहीत तर मी टरफलं का उचलू? या तत्वावर बंडू अडून बसलेला. त्याला नव्हती माफी मागायची. त्याला नव्हती कबुली द्यायची. आणि एव्हाना पोलीस काय आणि कोर्ट काय, सगळ्यांचं म्हणणं होतं की टरफलं उचलणं एवढं साधं प्रकरण नाहीचे हे. त्यांच्या दृष्टीने एका भयंकर गंभीर गोष्टीचा उलगडा होत होता. पण बंडू कडून अजिबात काहीही बाहेर पडत नव्हतं. पोलिसांनी तर बंडूचा अभ्यास करण्यासाठी मानसोपचार तज्ञ् पण बोलावले होते. बंडू सगळ्यांशी गप्पा मारत बसे.
.
बऱ्याच लोकांनी बरेच प्रयत्न केले. बंडू बरोबरच्या गप्पा रेकॉर्ड केल्या, त्या अभ्यासायला दिल्या. या दरम्यान एक दोन वेळा बंडूची शेवटची तारीख पण ठरून पुढे गेली. गोष्टीमध्ये पाहुणे कलाकार म्हणून ह्युमन राईट्स वाले पण घुसून झाले. पण कोर्टाला, पोलिसांना आता पुरे झालेलं. "अजून वेळ दिला याला म्हणजे हा करतोय अजून घुमिव गाडी रचिव किस्सा!" हे त्यांचं म्हणणं.
.
आणि या चढाओढीत आता परत एकदा शेवटी तारीख ठरली. आता काही बदलणार नाही असंही कोर्टानं सांगितलं. आता फारसे पर्याय उरले नव्हते. मग बंडूवरच्या आरोपांचं काय? त्यांची उत्तरं कुठं मिळालीत? केवढे केवढे गंभीर आरोप, असेच अनुत्तरित ठेवून अटोपणार की काय? असं वाटेल तोपर्यंत बंडूने जाहीर केलं की त्याला व्यक्त व्हायचंय. काही आहे की जे अजून त्याने सांगितलं नाही आहे. कोर्टाने ताबडतोब सांगितलं की, "झाला तितका तमाशा बस झाला. तुला सांगायचंय तर सांग बापड्या पण काहीही सांगितलंस तरी यावेळी तारीख बदलणार नाही आहे. त्यामुळे ठरलेल्या तारखेच्या आधी सांगितलंस तर ऐकू. नाहीतर टाटा बाय बाय." हा माणूस अर्धवट सांगून परत लांबड लावत बसणार, याची त्यांना भीती होती. आता लोक, वृत्तपत्रं, नेतेमंडळी, सगळ्यांकडून दबाव पण वाढत होता.
.
ठरलेल्या दिवशी पहाटे लोक तुरुंगाच्या बाहेर जमा झाले. काहींनी आतिषबाजी केली. तुरुंगाच्या बाहेरून दिसणार काहीच नव्हतं. पण तरीही टीव्ही चॅनेलवाले लोक कधीपासून बाहेर कॅमेरे आणि अँटेना लावून बसून राहिले. बंडूला इलेक्ट्रिक शॉक देण्यासाठी सकाळी सात का आठची वेळ ठरली होती. टीव्हीवर अखंड लाईव्ह बडबड सुरु होती. सगळीकडे चैतन्य पसरलेलं. बंडूच्या मृत्यूकडे सगळे डोळे लावून होते. लोकांची आरडा ओरड, जल्लोष, तुरुंगाच्या आत पर्यंत ऐकू येत होता.
.
या सगळ्या तमाशाकडे बघून बंडू म्हणाला, "...आणि त्यांचं म्हणणं आहे की मी वेडा आहे? मला मारलं की यांचे प्रश्न मिटतील?" पण आता बंडूचं ऐकणारं, त्यावर प्रतिक्रिया देणारं कोणी नव्हतं.
.
ठरल्या प्रमाणे, ठरल्या दिवशी, ठरल्या वेळी, बंडूला इलेक्ट्रिक खुर्चीमध्ये बसवला, आणि एक विषय संपवला.
.
.
.
दोन दिवस आधी, बंडूने आपण केलेल्या गुन्ह्यांचा कबुलीजबाब दिलेला. त्याने सुमारे तीसच्या आसपास खून केलेले असं सांगितलं. त्या खूनांचे तपशील सांगितले. पोलिसांच्या मते बंडूने शंभर तरी खून केले असावेत असा अंदाज होता. पण तीस ते शंभर पर्यंतचा प्रवास करायला वेळ उरला नव्हता. बंडूने त्याने केलेल्या खुनांची निघृण वर्णनं, आणि मृत शरीरांचे अजून माहिती नसलेले खुलासे पण केले. त्याच्या बोलण्यात पश्र्चाताप नव्हता. भीती नव्हती. वेडसरपणा नव्हता. हे झालं हे असं झालं. हे एवढंच होतं. असं का केलंस बाबा? या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर नव्हतं. पण उत्तराने समाधान झालं नाही तर तो प्रश्न बंडूचा नव्हताच.
.
.
.
ता.क.
नेटफ्लिक्सवर टेड बंडी नावाच्या कुख्यात सिरीयल किलर वर बनवलेली डॉक्युमेंट्री आहे. शक्य असेल तर अजिबात बघू नका. खूप अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. पण खरी घडलेली गोष्ट आहे. सत्तर ऐशीच्या दशकातला अमेरीकेला हादरवून टाकलेला हा किस्सा.
.
.
.
.
No comments:
Post a Comment