Sunday, November 20, 2022

देव म्हणजे काय रे भाऊ?

आज्जी कायम सांगायची, "अन्न हे पूर्णब्रह्म". ताटात वाढलेलं सगळं पुसून खा. अन्नाशी खेळ नको. असल्या गोष्टी आम्हाला समजाव्यात अशी तिची अपेक्षा असावी. पण आपलं डोकं, "आपण उपवास करतो तेव्हा नास्तिक असतो का?" असा आगाऊ प्रश्न विचारावा का... इकडं भटकत असायचं. देवळात भटजी लोकांचं पोट मोठं का असतं याचं उत्तरसुद्धा याचं उक्तीमध्ये दडलेले असावं असं मला राहून राहून वाटायचं. कोल्हापूरसारख्या धार्मिक ठिकाणी राहिल्यावर देवावर मत नसणं म्हणजे छे छे च न?


आता इथून पुढं काहीतरी देवाधर्माच्या संस्कारी गोष्टी लिहिलेल्या असतील असं वाटत असेल तर पुढे अगदीच वाचू नका. निष्काम माणसाच्या विसंगत विचारांत सुसूत्रता असल्याचा अप्रस्तुत दावा करण्याचा माझा हा विस्तृत प्रयत्न आहे. (अर्थातच निष्काम माणूस म्हणजे मी ... नाहीतर तो गैरसमज व्हायचा!)


तर...

तर आम्ही मोठं झाल्यावर, देवांवरच्या विविधावह मतांचे चहापोहे करून मन भरल्यावर, मानसिक आरोग्य, ध्यान लावणे (म्हणजेच प्राकृत मराठीमध्ये मेडीटेशन) या विषयांवर संवाद घडू लागल्यावर, मला देव हा विषय जरा विशेष वेगळ्या बाजूने दिसू लागला. देवाच्या सगळ्या इकोसिस्टीमकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन मिळाला. कुठेतरी हे दोन विषय एकमेकांशी सलग्न असणं निर्मात्याला अभिप्रेत असावं असं वाटलं.


वर्षागणिक द्विगुणित होणाऱ्या अगणित लोकांच्या बहुगुणी अज्ञानामुळे लोकांची मनं सैरभैर न होता त्यांनी आपापली छोटी छोटी आयुष्यं बरी काढावीत, हा बड्या बुजुर्ग लोकांचा हेतू असावा. पूर्वीच्या काळात लोकांना पाऊस का पडतो माहिती नव्हतं. आकाशात धूमकेतू का येतो माहिती नव्हतं. औषध पाण्याचा पत्ता नव्हता. रोगराईने शिट्ट्या वाजयच्या. कशाचंच काहीही आपल्याला सुधरत नाही असं वाटून डिप्रेशन येत असेलच की पब्लिकला. डिप्रेशन हा शब्द माहिती नसला म्हणून काय झालं? मग लोकांना शांत कसं करावं? त्यासाठी कुठं बरं लक्ष केंद्रित करायला सांगावं? लोकांनी कुठं बरं मन मोकळं करावं? तर ते ठिकाण म्हणून "देव" शोधला असावा. इथे या. बसा. शांत व्हा. मोठा श्वास घ्या. एकाग्र व्हा. वगैरे वगैरे. You know the drill. And I'm sure it must have been very effective. अपने जमाने में देव क्या स्टड हुआ करता था... असं इतिहासकार सांगत असतील तर त्यात नवल नाही.


"देव" म्हणजे प्राचीन काळातलं बेफाम वायरल झालेलं मेडीटेशनचं ऍप असावं. जगभर सगळेच एका ट्यून वर आपापली कला दाखवू लागले हो. आणि मग कोणाला किती लाइक्स याची शर्यत लागली. जगातलं पाहिलं टिकटॉक म्हणजे "देव" असावा. कास्ट-अवे मध्ये कसं व्हॉलीबॉलला विल्सन बनवून, चक् त्याच्यासोबत गूज करत राहतो, तशी आपण वेडं न होण्यासाठी बनवलेला व्हॉलीबॉल म्हणजे "देव" असावा. आता त्यामुळे आपण वेडे व्हायचे राहिलो का? हा प्रश्न वेगळा.


जर "अन्न हे पूर्णब्रह्म" असेल तर मग सध्याचे देव म्हणजे खूप पाणी घालून पातळ केलेली भाजी असावेत असं मज पामराचं मत आहे. बघा की... ही भाजी कशीही असली तरी पौष्टिकच आहे म्हणून शपथेवर सांगणारे लोक दिसतील. ही भाजी म्हणजेच एकमेव पौष्टिक पदार्थ असल्यामुळे, दिसेल त्याच्या घशात ढकलू पाहणारे लोक सापडतील. आता या भाजीत काही दम राहिला नाही म्हणून चिडचिड करणारे लोकही दिसतील. तुमच्या भाजीपेक्षा आमची भाजी सरस या विषयावर अडकलेले लोक दिसतील. दुसऱ्याच्या भाजीत कसं पाणी जास्ती आणि सत्व कमी आहे याची कुचेष्टा करणारे लोक दिसतील. भाजीच्या नावानं झालेली ही सगळी जत्रा बघून, मला भाजीच नको असं म्हणत फास्ट फूडच्या आहारी जाणारी एक वेगळी जमात सुद्धा निर्माण झालेली दिसेल. एकूण काय तर, दुसऱ्यांच्या रेसिपी मधलं कार्ब दिसतं पण स्वतःच्या भाजीतलं तेल दिसत नाही अशी आपल्या दैवी लोकांची परिस्थिती भाजी विना कशी समजावून सांगावी? म्हणूनच "अन्न हे पूर्णब्रह्म" असा क्लू जाणकारांनी पौरणात सोडला असावा.


खरं तर, जगण्यासाठी खावं हे लागणार आहेच, हा एवढाच मुद्दा असावा. मग त्यात कोणासाठी पालेभाजी, कोणासाठी फळभाजी. हे मान्य करायला काय हरकत आहे? पण या गोष्टीमध्ये भाजी विक्रेत्यांची आगाऊ जमात पण आहे. या लोकांची आपापली लॉबी बनलेली आहे. या जमातीची सुपर पॉवर म्हणजे, इतर लोकांनी भाज्या एकमेकांत मिसळल्या की यांच्या पोटात ऑटोमॅटिकली दुखायला लागतं. या लोकांना भाज्यांच्या नव्या रेसिपी काढता येत नाहीत. आणि म्हणून की काय एकच भाजी सगळ्या तमाम जनतेला पाणी घालून घालून घालून घालून वाढणं सुरू आहे, हे असं झालं असावं. पण मागवली काय म्हणतो, नळ दमयंती खायचे, म्हणून आम्हीही तेच जेवण जेवायचं? वरण भात भाजी चपाती नळ दमयंतीच्या नशिबी नव्हती यात आपली काय चूक?


अन्न हे पूर्ण ब्रह्म असलं तरी अन्न विकणारा अण्णा म्हणजे पूर्णब्रह्म नाही न? सशक्त राहायचं तर, निरोगी राहायचं तर वेगवेगळ्या रंगांच्या भाज्या खायला हव्यात, विविध भाज्यांची सरमिसळ व्हायला हवी. भाज्या स्वतः स्वतः आपल्या आवडीनुसार निवडून, धुवून, चिरून, त्यावर संस्कार करता यायला हवेत. त्यासाठी वेळ काढला पाहिजे, राखून ठेवला पाहिजे. असं केलं नसतं तर आज आपल्याला ना वडा पाव मिळाला असता, ना पाव भाजी! मग हे असं न करून आपण देवा धर्मात होऊ शकणार असलेले केवढे नवे नवे प्रयोग आणि शोध मिस् केलेले असू बघा.


असो. भाज्या खा. नव्या रेसिपी शोधा. आणि खवय्ये व्हा.

आणि हो, दुनियामे जिनके और भी तरीके है गालिब... हे विसरू नका.

Saturday, October 22, 2022

माझं (पण) (शाकाहारी) खाद्य जीवन

माझा "तू भोसले म्हणजे चिकन मटण हाणतच असशील?" पासून "कोल्हापूरचा असून नॉन वेज खात नाहीस?" पर्यंतचा प्रवास अजिबात नाट्यमय नव्हता. पण तो नाट्यमय, क्रांतिकारी, जनहितकरी किंवा वैज्ञानिक असावा असं माझ्या जवळच्या जनतेला अजूनही वाटतं. किंवा त्यांना असं वाटत असावं असं मला वाटतं. आता तर मी शाकाहारी होऊन सुमारे बारा-तेरा वर्ष झालीत. तरीही "काय सांगतो?" "कधीपासून?" हे असले फुलटॉस अधून मधून सर्रास येत असतात. यावर कधीतरी "मेरे पास माँ है" सारखं लिजेंडरी उत्तर सापडवं अशी खूप वर्षं ईच्छा होती. और फिर एक दिन.........

और फिर एक दिन यंदा पुण्याहून परत येताना मला फ्लाईटमध्ये एक गोरा प्राणी भेटला. त्या बाबानं जेवायला विगन मागितलेलं. तसंही आजकाल इतकी गोरी लोकं स्वतःला विगन म्हणून आयडेंटीफाय करतात, की काय सांगू! कधी कधी मला वाटतं लवकरच LGBTQ सारखं Potato-Mushroom-Beetroot वरून PMB असं काहीतरी बनवून विगन लोकांसाठी सर्वनामं पण बनवतील. लंडन वगैरे सोडा, पण मला पोलंडमधल्या क्राकव सारख्या भागात सुद्धा खास फक्त विगन खाण्यापिण्याच्या जागा सापडलेल्या. पूर्वी नॉनव्हेज जगभर सर्वज्ञ आणि स्वाभाविक होतं. वेजीटेरीयन पामराला आपली ओळख करून देताना चिकन मटण नको, गाय बैल नको, मासे नको असा जो तो मी असं सांगावं लागायचं. त्यानंतर सुद्धा ताटात ऑक्टोपस आल्याच्या कथा आहेतच, कारण तुम्ही ऑक्टोपस नको असं थोडीच म्हणालेला? पण अहो, आता हे विगन लोक सहज समजलेत सगळ्यांना! म्हणजे वेजीटेरीयन माणसाचा आयडेंटिटी क्रायसिस गेलाला नाहीये तो नाहीच. आता आम्ही "विगन प्लस चीज किंवा डेअरी चालेल.", अशी ओळख करून देतो. तरीही "मग अंडी चालतील का?" असा कुत्सित प्रश्न कधी कधी वाट्याला येतोच तो भाग वेगळा. (कधी कधी मला वाटतं की हिंदू खतरे में हैं... मुसलमान खतरे में हैं... पेक्षा खरं तर वेजीटेरीयन जास्ती खतरे में हैं! असो) तर अशा आयडेंटिटी क्रायसिस ने ग्रासलेल्या माझ्या वेजीटेरीयन मनाला या गोऱ्या विगनला डिवचायची इच्छा न झाली तरच नवल. मी म्हणालो, "(गोरा म्हणजे बीफ आणि पोर्क हाणत असणार?) विगन? (असं काय झालं जिंदगी मे?) का म्हणे? जस्ट क्युरियस बर का! (काहीतरी मसालेदार, क्रांतिकारी, वैश्विक, सामाजिक आणि वैज्ञानिक सांग बघू) अजून काही नाही." आईस ब्रेकरच्या नावाखाली माझ्या वाट्याला आलेले तसले अजून चार स्टिरीओटाईप खोडसाळपणे खपवले. आता समोरच्याने आपल्या आपल्या श्रध्देनुसार बिटवीन दी लाईन्स वाचावं.

पण हा बाबा नास्तिक निघाला. त्याला श्रद्धा नव्हती. त्यानं मी दिलेला फुल टॉस झेलला आणि अलगद बाजूला ठेवला. त्यातून काहीच क्रांतिकारी, जनहितकारी किंवा गहन बाहेर पडलं नाही. तो म्हणाला, "मी विगन झालो कारण मी विगन झालो. That's it." आणि त्यानं परत जे खात होता ते खायला सुरू केलं. माझ्यासाठी ही युरेका मोमेंट होती. कारण यही जवाब तो मै इतने साल ढूंढ रहा था! डोक्यावरचं वजन गेल्यासारखं झालं. मी पण शाकाहारी झालो कारण मी शाकाहारी झालो. एवढंच तर होतं. आणि एवढंच तर असतं. कुठं "मेरे पास मां है" च्या शोधात गाव भटकत होतो! आपण थोडीच कोंबडीने आज्ज्याला चोच मारली म्हणून कोंबड्या खात सुटलोय? जस्ट... खातो म्हणून खातो. जस्ट लाईक दॅट. चव आवडते, रंग आवडतात, वास आवडतो, अशी सोपी मध्यमवर्गीय करणंच असतात खरं तर. तसंच कोंबडी न खाण्याला पण असूच शकतात की. नाही काय? या सगळ्या प्रकारात माझी मलाच मजा आली.

माझ्या शाकाहारी होण्यामागे ठोस कारणं नव्हती अशातला भाग नव्हता. पण शाकाहारी होण्या आणि न होण्यामागे इतकी ठोस करणं सापडली की गुद्दागुद्दी व्हायला लागली. त्यामध्ये अजून खोल जाण्याचा आळस, हे असं माझं कारण असावं, असं आत्ता मागे वळून बघताना वाटतंय. आपण भारतावर प्रेम का करतो? तर "भारतात जन्मलो म्हणून" हे कारण बहुतांश लोकांसाठी पुरतं. पण सांगायला बोलायला सुजलाम सुफलाम आणि संतांची भूमी बरं पडतं. तसंच ते शाकाहारी मांसाहारी प्रकरण आहे, असं मला कधी कधी वाटतं. आपण कुठं जन्माला आलो, कुठं वाढलो, यामध्येच बहुतांश लोकांची करणं संपत असतील. पुढे मित्र बदलले, जागा बदलल्या, परीस्थिती बदलली की खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात. काही उरतात, काही सरतात. शेवटी काय हो, आपलं आपलं तेव्हा तेव्हा ठरलेलं असतं काय करायचं. करणं नंतर काही का सुचेनात. माझे य लोकं ओळखीचे आहेत की जे आधी मांसाहारी नव्हते पण आता आहेत. पण माझ्या वाट्याला येतं ते अटेंशन त्यांच्या वाट्याला नाही येत.

प्लॅस्टिक पिशव्या वापरू नका, असा एक काळ होता. आठवतंय? तेव्हा अमुक तमुक जाडीच्या पिशव्या वापरू नका. त्या पेक्षा कागदी किंवा कापडी पिशव्या वापरा, याचा खूप कल्ला असायचा. मग तेव्हा एकदा असं वाटलं की, इतक्या पिशव्या वापराच कशाला? असलं काय पिशवी मधलं आयुष्य? चिप्सच्या पॅकेट सारखं बहुतांश पिशव्यांमध्ये हवाच तर असते! चार सीटच्या गाडीतून दोन लोक जायचं आणि हवा भरभरून पिशव्या घेऊन जायचं? खरं सांगायचं तर मला काहीही घंटा फरक पडत नव्हता, पण बसल्या बसल्या मनातल्या मनात क्रांती घडवून आणण्यासाठी हा विषय बरा होता. अजून जरा वेळ याच विषयावर घुटमळल्यानंतर असं वाटलं की पिशव्या भरभरून आणण्या इतक्या गोष्टी लागतातच कुठं आपल्याला? हू म्हणून खरेदी सुरू केली की मग प्लॅस्टिक काय, कागदी काय आणि कापडी काय? शेवटी प्रॉब्लेम म्हणून पिशवीकडे रोखलेल्या हाताची चार बोटं स्वतःकडे आहेत या विषयाकडे आपण येतोच की. याचा अर्थ, जीवन मिथ्या आहे, आणि आपण फकीर है आणि झोला लेके निघू, असं म्हणणं नाही आहे. पण आपल्या सोयीच्या नावाखाली आपल्या आजूबाजूच्या परीसराची, वातावरणाची घाऊक गैरसोय करतोय का, याची जाण असायला काय हरकत आहे?

बीनकामाचं बसलेलं असताना विचार आलेला असला तरी इसमे पॉइंट तो था! पण त्याचं आकलन होईल एवढं गांभीर्य नव्हतं. वाचनाचा आळस आणि आपले सगळेच मित्र मैत्रिणी दिव्य असल्यामुळे सुरुवातीला दिशाहीन प्रश्नांच्या चौफेर फैरी झाडणं सुरु होतं. यातूनच मी प्रथम आपण खातो पितो ते का? तेच का? आणि कशाला? इथंवर पोचलो. बाकीच्या प्रश्नांची नाही तर या प्रश्नाचं उत्तर मिळेल म्हणून मग इथे खणायला सुरु केलेलं. सुरुवात छोट्या छोट्या लुटूपुटूच्या अर्ग्युमेंट्सनी झाली. अमक्याला आवडतं म्हणून खायचं असतं. तमाक्याला नाही आवडत म्हणून खायचं नसतं, मग या महिन्यात खायचं नसतं, त्या वारी एवढंच खायचं असतं, इथपासून ते जंगलात राहायचे लोक तेव्हा प्राणीच मारून खायचे, शेती केल्यामुळेच खरतर पर्यावरणाची वाट लागली, आपल्या जबड्याचा आकार बघा, दातांची रचना बघा, आणि काय आणि काय आणि काय!

या अशाच क्षणी मर्फीला "अज्ञानात सुख असतं" ही उक्ती सुचलेली असावी. कारण यानंतर दरवेळी खाताना डोक्यात प्रश्नांचा भुंगा डोकावू लागला. एकूणच कनफ्युजन ही कनफ्युजन है, सोल्युशन कुछ पता नही... ही हालत! प्रत्येकाचं आपलं आपलं लॉजिक. त्यात कोणाचंही तुमचं आमचं सेम असतं असं नाही. या सगळ्यामध्ये सुखी माणसं म्हणजे खवय्ये लोक. त्यांचं ब्रीद, खानेका, पीनेका, न्हानेका, धोनेका, बोंब न्ही मारनेका, भाईसे पूछनेका. ऍनालिसिस पॅरालिसिस त्यांच्या गावी नाही. पण या निर्वाणापर्यंत पोचण्यासाठी मला वेळ होता.

दरम्यानच्या काळात मला बरेच नवे नवे प्रश्न मिळत राहिले, आणि साहजिकच कशाचंही एक असं घंटा उत्तर मिळालं नाही. आपण वापरतो त्या गोष्टींमुळे तसंच आपण खातो पितो त्या गोष्टींमुळे, त्या उगवण्यासाठी, त्या पोसण्यासाठी, त्यांची वाहतूक करण्यासाठी आणि त्यांचा निचरा करण्यासाठी लागणाऱ्या साधनांमुळे आपण वातावरणाची आणि आपल्या आजूबाजूच्या परीसराची खूप मोठी झीज करतो आहोत का? जिथे जे पिकतं तिथे ते खावं असं तर शाळेत सुद्धा होतं. गांधीबाबा सुद्धा म्हणाले होते की जिथे जे बनतं ते वापरावं. पण उसे कभी इस नज़र से बघितलेलं नव्हतं. ते सगळं अंगिकारायचं असतं असं कुठं सांगितलेलं? आता ते सगळं तपासून बघण्याची, त्याला उलट प्रश्न विचारण्याची ही पहिलीच वेळ. मुळात शाकाहार म्हणून आपण जे बकासुरा सारखं खातो, ते उगावण्याची आपली क्षमता आहे का? आणि प्रमाणात हवं तेवढंच खात असू तर मांसाहार केला तर योग्य आहे का? कोंबडी खाल्ली तर ठीक मग कुत्रा मारून का खात नाहीत? मांसाहार म्हणून जे प्राणी मारणार, त्यांना सुद्धा पोसायला धनधान्य लागणारच की, मग त्याची क्षमता आहे का? या सगळ्याचा एक सरसकट जगभर लागू पडेल असा क्रांतिकारी नियम होऊ शकतो का? याचा जातीधर्माशी संबंध आहे की हा केवळ कॉमन सेन्सचा भाग आहे?

एके ठिकाणी लिहिलेलं की, भारतीय उपखंडात, किंवा आफ्रिकेत कुठे कुठे, जिथे हवामान नियमित आहे, शेती खूप करता येते, तिथं शाकाहार स्वाभाविक आहे. पण इंग्लंड, रशिया, नॉर्वे सारख्या प्रदेशात जिथे हवामानाच्या नावानं बोंब आहे, जिथं शेती करताना खूप मर्यादा पडतात, तिथं मुबलक गहू, तांदूळ आणि पालेभाज्यांचा हट्ट करणंसुद्धा वेडेपणाचं आहे. उदाहरणार्थ, रशियामध्ये सायबेरीया भागात, भाजीपाल्याच्या नावानं शंख आहे. मग लोक घोडी पण खातात. त्यातल्या घोड्याच मांस काढलं की राहतं ते फॅट हे शाकाहारी म्हणून वाढतात.

मला एक WFP चा रिपोर्ट सापडला. त्यात लिहिलेलं की जगाची लोकसंख्या सात अब्ज असेल, तर आपण म्हणे साडे दहा अब्ज लोकांना पुरेल इतकं अन्न बनवतो! आणि या सातपैकी जवळ जवळ एक अब्ज लोकांना दररोज भुकेल्या पोटी झोपावं लागतं. म्हणजे एकाच बातमी मध्ये टाळ्या वाजवायचेत की आपल्या ऑलरेडी शिट्ट्या वाजलेत, हे कळेना. पण असं आहे म्हणे. मग हे अनाठायी अन्न बनतंय कोणासाठी? त्याची मागणी कोण करतंय? ते वाया कोण घालवतंय? या तीनमध्ये तुम्ही आणि मी कुठे बसतो हे आपलं आपण तपासावं.

हे सगळे लूज एंड्स आहेत खरं तर. थोडा अजून विचार केला असता तर सापडलंही असतं काहीतरी त्यातून. पण मग अशा वेळी कामी येणारी सुपर पॉवर म्हणजे - आळस. डोक्यात इतका कल्ला झाल्यावर आपण एकदम व्यावहारिक मार्ग निवडला. घाला काशी! मला पुरे झालं असं म्हणून, कापडी पिशव्या वापरायच्या आणि कंदमुळे खायचीत न? ते करू की! यावर स्वतःशीच मांडवली केली. बाकी पुणे तिथं वेजिटेरीयन माणसाला काय उणे? प्रमाणात खाओ. खुश रहो. इथे सेटलमेंट झाली. ती अजूनपर्यंत टाकलीय. बाकी प्रश्नांचं काय झालं? तर काहीच नाही झालं. ठेवलेले माळ्यावर. कधीतरी मला त्यातूनच "मेरे पास माँ है!" असं लीजेंडरी उत्तर मिळेल अशी अपेक्षा होती. पण आता त्याची गरजच संपली. मग आज फराळाच्या निमित्तानं सोडलं गाठोडं.

आणि हो ... दिवाळीच्या खुप खूप शुभेच्छा. प्रमाणात खा. 😊

Saturday, September 10, 2022

दुसऱ्याचा तो इतिहास

इतिहासाकडं एकदम निष्पक्षपणे बघता आलं पाहिजे. इतिहासामधल्या झुंजी इतिहासामध्ये ठेवता आल्या पाहिजेत. इतिहास हा भूतकाळ आहे हे समजून घेऊन इतिहासात नव्यानं झुंजी लावायचा मोह टाळला पाहिजे. जे कधी भांडलेच नाहीत, त्यांच्या नावानं आपणही भांडलं नाही पाहिजे. "सिकंदरने पोरससे की थी लड़ाई, तो मै क्या करू?" हा अलिप्तपणा जमला पाहिजे. मग त्यात सिकंदरचं गोत्र किंवा पोरसचं कुलदैवत काढू नये. सिकंदर आणि पोरस हे शेवटी एकमेकाचे बेश्ट फ्रेंड्स झालेले हे वाचून सोडून द्यावं. एकूण काय? तर इतिहासाकडे केवळ इतिहास म्हणून बघावं. "इति... हास..." या शब्दाचा अर्थ इति(पण)हास किंवा इति(का)हास असा नसून, "असं झालं" हा एवढाच आहे समजून घ्यावं. "पुढच्यास ठेच मागचा शहाणा" म्हणजे "आपल्याला ठेच लागतायत म्हणून इतिहासाला शहाणं करायचं" असा असू नये. जसं तेंडुलकरकडे दहावी बारावीच्या अभ्यासातले सल्ले विचारू नयेत, किंवा सद्गुरू जग्गी कडे रॉकेट सायन्स विचारू नये, तसं इतिहासातल्या लोकांकडे त्यांच्या त्यांच्या गोष्टी पुरतं बघावं. सगळ्यांनी सगळ्या परीक्षांत अव्वल यावं अशी अपेक्षा करणं फोल आहे हे शिकवणाऱ्या केवळ दोनच गोष्टी... एक म्हणजी आपली स्वतःची गुणपत्रिका आणि इतिहास. समस्त गरजू होतकरू आणि होऊ घातलेल्या क्रांतिकारी लोकांनी या दोनीही गोष्टींचा विसर पडू देऊ नये.
.
हं.... हुश.... आता साईड बी.
.
या वरच्या सगळ्या गोष्टी खूप आदर्श आणि पुस्तकी वाटतात का तुम्हाला? मलापण वाटतात. अहो हे सगळं ब्रह्मज्ञान आहे. म्हणजे हे लोकांना सांगायचं असतं. आपल्यासाठी थोडंच असतं? आता मला सांगा, इतिहासाने आणि इतिहासातल्या लोकांनी आपल्या सगळ्यांच्या फॅन डिमांड पुऱ्या करायच्या नाहीत, तर अजून कोणी करायच्या? जिवंत लोकांनी? छे! आम्ही इतिहासाचं रक्षण करायला झटत नाही? मग इतिहासानं पण एवढं आमच्यासाठी केलं पाहिजे की. अहो केवढ्या भावना गुंतवतो आम्ही त्यात. केवढ्यांदा अस्मिता दुखावून घेतो. इतिहासातल्या लोकांनी चार गोष्टींच्या ऐवजी दोनच सांगितल्या असतील तर आम्ही स्वतःच्या पदरच्या दोन गोष्टी त्यांना देऊ करतो! मग हे असं सगळं असताना, इतिहास म्हणजे फक्त इतिहास असं बघणं म्हणजे RRR audible वर ऐकण्यासरखं नाही? मला वाटतं आपला तो इतिहास नसतोच मुळी.
.
आता परत साईड - ए.
.
मलाही वाटतं, आपला तो इतिहास नसतोच मुळी. दुसऱ्याचा तो इतिहास असतो. खरं शिकायला तिथूनच मिळू शकतं. कारण दुसऱ्याच्या इतिहासात आपण निरपेक्ष होऊ शकतो. त्याला तासून बघू शकतो. घासू पुसू शकतो. खंगळून काढू शकतो. काही गवसलं नाही तर बिनदिक्कत पान पालटू शकतो. आणि कधी कधी मस्करी पण करू शकतो. आता बघा, तुम्हाला अर्जेंटिनाचा इतिहास सांगितला तर? किंवा इटली किंवा स्पेनचा कोणी संत महात्मा गाठून दिला तर? थायलंड आणि स्वित्झर्लंड मधल्या शौर्य गाथा ऐकवल्या तर? आपण ते डब झालेले सिनेमे नाही का बघत? तसं आहे हे. दुसऱ्याच्या इतिहासात माणसांना काळंच किंवा गोरंच असायचा शाप नसेल. दुसऱ्याचा इतिहासातले लोक, काळ्या आणि गोऱ्याच्या अधे मध्ये असू शकतील. तिथे रावणाला पण थोडं चांगलं असायची मुभा असेल, किंवा रामाच्या पण कोणी खोड्या काढू शकत असेल. आणि त्यामुळं अस्मिताचं पण काहीच दुखावत नसेल. प्रयत्न करून बघा. डब झालेले सिनेमे बघायचा नाही... दुसऱ्याचा इतिहास बघायचा. मी केलाय अगदी नुकताच. असते एक्कोही कहानी पण आपल्यालाच जरा वेगळ्याने कळतात.
.
-----------------------------------
.
उदाहरणादाखल इंग्रज घ्या. आता इंग्रज भारतात आले आणि मग त्यांनी काय केलं हे तूर्तास बाजूला ठेवू. आपण त्याच्याही खूप खूप आधीचं बघू. एक काळ असा होता की इंग्रजाना कोणीही यावं आणि टपली मारून जावं असं करायचे. किती लोकांनी टपल्या मारल्या म्हणून सांगू? येता जाता, वेळ जात नाही म्हणून, विरंगुळा म्हणून, खायचे प्यायचे वांदे झाले म्हणून, यंदा थंडी जरा जास्ती आहे म्हणून, आमच्या वन्सं जरा नाराज आहेत म्हणून, आमच्या चिरंजीवाना तुमच्या चिरंजीवाची खोडी काढायची आहे म्हणून, किंवा आमच्या आज्ज्याचं थोडं देणं बाकी आहे म्हणून, काहीच नाही तर, आज कुछ तुफानी करते है म्हणून आक्रमणावर आक्रमणं करायचे लोक. केवढाले लोक इंग्लंड मध्ये आले, काही निघून गेले आणि बरेचसे इंग्लंडचे म्हणून राहिले. बसल्या बसल्या त्यांनी, इंग्रजी भाषेवर, पोषाखावर, राहणीमानावर आपापली छाप सोडली. शीप ऑफ थेसिस सारखं कोडं ब्रिटिश जनतेला कसं नाही पडलं याचं मला कोडं पडतं कधी कधी.
.
(मुन्नाभाई ने कसं चाळीस पानी पुस्तकातून समस्त गांधीजी शिकले असं स्वतःला वाटवून घेतलेलं, तसं हे मी चाळीस तासात युट्यूब वरून जमवलेलं उथळ पाणी आहे. त्यामुळे तज्ञ वाचकांनी दुरुस्त्या सुचवताना हयगय करू नये.)
तर... मला इंग्रजांचा इतिहास वाचताना वाटलं की इंग्रजांनी ते पारतंत्र्यात आहेत हे मान्यच न केल्यामुळे कदाचित त्यांच्याकडच्या कुठल्याच लढाईला स्वातंत्र्य लढाई म्हणत नसावेत. सारखं "पिच्चर अभी बाकी है मेरे दोस्त" असं असावं. बघा की... इंग्रजांचा कुठं आहे पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारी? पण लोकांनी यांच्यावर राज्य केलीयेत मात्र. कधी जर्मन, कधी नॉर्वेजियन, कधी डेन्मार्कवासी, कधी शेजारचे स्कॉटिश आणि फ्रेंच तर येऊन जाऊन मुक्कामाला असायचेच. "मी पुन्हा येईन" "मी पुन्हा येईन" म्हणत लोक परत परत यायचे हो भांडायला! मला वाटतंय मी त्या काळी, नेटफ्लिक्स नव्हतं आणि अमेझॉन फक्त जंगल होतं म्हणून लोकांच्याकडे मारामाऱ्या करायला इतका वेळ असावा! कोणीही यावं टपली मारून जावं. एकदा तर एका राजाला इंग्रजी येत नव्हतं फारसं म्हणून त्यानं एक मंत्री नेमला मदतीला. त्या बाबाला पंतप्रधान म्हणायला लागले. आणि मग तिथून पुढे राजा आणि राणीच्या खांद्याला खांदा देऊन पंतप्रधान सुरूच राहिला. की तो अजूनही आहे.
.
एकदा वायझेड दिसणाऱ्या वायकिंग्ज लोकांनी इंग्रजांवर आक्रमण केलं आणि सुमारे शे सव्वाशे वर्षं इंग्लंड मधून बुड हलवलंच नाही. मग आला आल्फ्रेड. आल्फ्रेड इंग्रजच होता. त्यानं वायकिंग राजांना हरवलं. आणि आपलं छोटंसं राज्य बनवलं. पण आल्फ्रेड जनतेला म्हणाला की बाबो... हे वांयकिंग लोक वायझेड असेल तरी आता आपलेच आहेत की. त्यांच्या इतक्या पिढ्या इथे राहिल्या, इथे रुजल्या. मग आता आपलं काय आणि त्यांचं काय हे कसं ठरवणार? आल्फ्रेड त्यांच्या काळातला नाना पाटेकर होता. त्यानं इंग्रजांचं रक्त आणि वायकिंग लोकांचं रक्त आपल्या हातावर एकत्र करून चौकात विचारलं, "अब बोल इसमें अंग्रेज़ी खून कौनसा है और वाइकिंग खून कौनसा है?" आपण राहू की सगळे गुण्या गोविंदानं! असं म्हणाल्यावर, लोकांना लै च आवडला आल्फ्रेड आणि त्यांनी त्याला "आल्फ्रेड दी ग्रेट" पदवी दिली. इंग्लंड मध्ये नंतर जे जे म्हणून राजे आणि राण्या झाल्या, अगदी दुसऱ्या एलिझाबेथ पर्यंत, सगळ्यांचे पूर्वज बघत गेलात की ते शेवटी या आल्फ्रेड कडे कुठूनतरी पोचतातच. आणि इंग्लंडमध्ये झालेल्या सगळ्या राजा बीजांपैकी आल्फ्रेड या एकट्यालाच म्हणेज "the great" म्हणतात.
.
आहे कि नाही भारी गोष्ट. आपण त्रयस्थ पणे किती मजेत वाचू शकलो की नै? आता जरा अशीच आपल्याकडची गोष्ट सांगून मामला टेन्स करू?
.
चला ... आता याची साईड - बी
.
तुम्हाला माहिती आहे काय की गांधी बाबांनी पण सांगितलेलं एकदा की इंग्रजांना हाकलणे म्हणजे स्वातंत्र्य मिळवणे असं नाही आहे. स्वातंत्र्य मिळालं तरी इंग्रज राहूच शकतात की आपल्याकडे. आता गांधी काय नी गोखले काय? त्यांनी इंग्रजी साहित्य वाचलं म्हणून त्यांची टीका पण झालेली म्हणे. काय माहिती, गांधींना पण आल्फ्रेडची गोष्ट आवडली असेल आणि मग त्यांनी लालसिंग चड्डा सारखं त्या गोष्टीचं भारतीयीकरण केलं असेल. आणि मग बॉयकॉट लालसींग चड्डा करण्याच्या नादात, मुख्य मुद्दा बाजूला राहिला असेल. आता बघा होनेको सब कुछ हो सकता है की नै?
.
गांधीनी न, आपल्या "हिंद स्वराज्य" पुस्तकात (चाळीस पानाचंच आहे ते पण. तसे आपले सगळे संदर्भ चाळीस पानी पुस्तकातलेच आहेत 😜) एक गमतीशीर गोष्ट सांगितलीय. ती मला आठवतेय आत्ता ती अशी (तज्ञ मंडळींनी दुरुस्ती नक्कीच सुचवा जर सदर्भात काही गडबड झाली असेल तर). गांधी म्हणाले की, समजा तुमच्या गावात एक भांग विकणारा आला. आणि त्यानं सगळ्या गावाची वाट लावली. तर तुम्ही सगळे पेटून उठून भांगवाल्याला गावातून हाकलून द्यायला निघाल. कदाचित हाकलून द्याल सुद्धा. पण आपण त्याला स्वातंत्र्य म्हणू का? उद्या भांगवाल्याच्या ठिकाणी दारूवाला आला तर? दारूवाला तुमच्यातलाच असला तर? म्हणून आपण जे भांगेच्या आहारी गेलो ते म्हणजे पारतंत्र्य. आणि ते दुरुस्त केलं आपण, तर मग उद्या कोणी येऊन दारू विको किंवा अफूच्या गोळ्या विको. काय फरक पडतो? बाहेरून येणारा वाईटच असेल किंवा आतमध्ये असलेला चांगलाच असेल असं थोडीच असत. आपण चांगल्या गोष्टी ठेवू, वाईट सोडून देऊ. मग आपल्यात ब्रिटिश लोक येऊन राहू देत किंवा आणखी कोणी येऊन राहू देत? काय फरक पडतो? हे खरं स्वातंत्र्य.
.
आता बघा. हे सगळं निरपेक्ष आणि निष्पक्षपणे वाचू शकला का? आता आल्फ्रेडच्या गोष्टीवर पण टीपणी करायची खुमखुमी आली का? आता इथून ही गोष्ट पुढे कुठेही ओढून घेऊन जात येऊ शकते.
.
मे बी तुम्ही अलिप्तपणे वाचू शकला असाल. मे बी तुम्हाला आधीच टिपणी करायची खुमखुमी अली असेल. पण I think I made my point.
.
ता.क. मुद्दा काय? वाचून मजा घ्यायची, त्यातून काही शिकायचं असा कुठला इतिहास असेल तर तो दुसऱ्याचा इतिहास. Long Live अस्मिताs.

दहीहंडी, बील गेट्स आणि बरंच वेगळं काही काही

हॅपी दही हंडी म्हणायचं होतं खरं तर. पण हे लिहिता लिहिता गणपती बाप्पा मोरया म्हणायची वेळ आलीय. मग तोच मांडव वापरून मूर्ती बदलावी असा चतुर विचार आलेला खरा. पण मग मुद्दा तो नाहीचे हे आठवलं.
तर... इक लड़की थी दीवानी सी, एक लड़के पे वो मरती थी, जब भी मिलती थी उससे, यही पूछा करती थी, प्यार कैसे होता है? ये प्यार कैसे होता है? और मग पुढे... मग पुढे साधुवाणीची बोट बुडते. त्याची गर्लफ्रेंड त्याला गावभर शोधते. आणि मग एके ठिकाणी प्रसाद खाते आणि तिकडे साधुवणीची बोट परत तरते. त्यानंतर... त्यानंतर अकबर नाराज होतो, शहजादा सलीमला फाटा देऊन अनारकलीला भिंतीत टाकून शांतीत क्रांती करतो.
आता बघा, केवढे म्हणून सिनेमे, नाटकं, पुस्तकं, कथा, कादंबऱ्या, आणि कविता खपल्या असतील या तुमचं आमचं सेम असणाऱ्या प्यार कैसे होता है वर? या सगळ्या प्यार, इजहार, तकरार, इकरार यांच्या भाऊ गर्दी मध्ये फ्रेंड झोन झालेला प्रकार म्हणजे ब्रेक अप किंवा त्याही पुढे जाऊन घटस्फोट. याला इतकी सावत्र वागणूक का दिलीय याचं एक नवल आहे.

या प्रकाराची एकूणच केविलवाणी अवस्था आहे. एक म्हणजे ग्रेसफुली ब्रेकअप किंवा घटस्फोट करायला कोणी शिकवत नाही. किंवा कोणी केला असेल तर त्यांचं चारचौघात कौतुक करत नाहीत. कायम ते अस्पृश्य असल्यासारखं वस्तीपासून लांब ठेवलंय! प्रेम करणाऱ्या लोकांना सरसकट एकत्र करून इश्क वाले, प्यार वाले, अशी छचोर का असेनात, काहीतरी नावं असतात. ब्रेकअप वाल्यांचं तसं नाही. त्यांची असली कुठली संघटना नाही की काही छचोर नावं पण नाहीत. त्यांना कोणी स्फोट वाले, किंवा तुकडे तुकडे गँग असंही म्हणत नाहीत. "ब्रेक अप" ला तर मराठी मध्ये शब्द पण नाही. "आमचं मोडलं" हे असं निरुत्साही म्हणून ब्रेक अप साजरा करावा लागतो. "घटस्फोट" या शब्दाबद्दल तर आता कायच सांगा! इथे पाळण्यातच घटोत्कच सारखं नाव ठेवून पूर्वग्रहदूषितकरून ठेवलाय.
 
आता मला सांगा, नुकतीच दहीहंडी पार पडली. त्यासाठी कोणा कोणा सेलिब्रिटी लोकांना बोलावलं. ढोल ताशे वाजवले. लोक नाचून धुंद झाले. पण शेवटी केलं काय? थरावर थर रचून, शेवटी घटच फोडला न? मग या सगळ्या प्रकरणाला "घटस्फोट" असं नाव का बरं दिलं नसेल? म्हणजे विषय तोच की नै? मी म्हणतो, "घटस्फोट" शब्दाचा दर्जा वाढवायचा असेल तर एक तर त्याला दही हंडी असं काहीतरी म्हणावं. नाहीतर चक्क "घटस्फोट" झाला म्हणण्याच्या ऐवजी आम्ही "दही हंडी" केली असं म्हणण्याची प्रथा करावी. त्याशिवाय हे बदलणार नाही.

जर दोन लोकांनी एकत्र येणं ही चांगली गोष्ट असेल. तर दोन लोकांनी वेगळं होणं सुद्धा असायला काय हरकत? दोन लोकांनी एकत्र येण्यात जर उज्ज्वल, समृद्ध शक्यता दडलेल्या असतात, तर तसंच दोघांनी आपापली डोकी ठिकाणावर ठेवून वेगळं होण्यात सुद्धा असूच शकतात. आणि मग डोकी ठिकाणावर न ठेवताच करायचं असेल तर लग्न करा, लफडी करा, नाहीतर काशी घाला. कुठं काय फरक पडतो? माझं तर असं म्हणणं आहे की वेगळं होण्याचे निर्णय पण दही हंडी सारखे गाणी लावून, नाच करून, एकमेकांना शुभेच्छा देऊन, साजरे केले पाहिजेत. जसे लग्न समारंभ हटके करायची शर्यत असते, तसं इथपण पिअर प्रेशर तयार करायला हवं. प्री-वेडिंग शूट सारखे, पोस्ट डिव्होर्स शूट केले पाहिजेत. आता आपण एकत्र नसलो तरी जिथे आहोत तिथं बरे आहोत, हे बघून पण बरं वाटू शकेलच की. आणि अहो जिडीपी पण वाढेल. दोन हजाराच्या नोटमध्ये नॅनो चीप घालून जशी हवा तयार केलेली, तशी काहीतरी क्रांतिकारी थिअरी डिव्होर्स बद्दल पण उठली पाहिजे. उदाहरणार्थ, "यंदा डिव्होर्स जरा जास्त झालेत" याच्या बरोबर "यंदा देशाची प्रगती पण जास्ती झालीय" हे ही आहेच की. You see where I'm going with this? ठरवलं तर थेट नॅशनल आणि अँटी नॅशनल पर्यंत जाऊ शकतो आपण या वाटेने. लफडी लपवून करायची असतात तर ती उघड्यावर करतात पब्लिक. आणि घटस्फोट बद्दल मात्र चिडीचूप?! ही काय पद्धत?

विनोदाचा मुद्दा जरा बाजुला ठेवू. लोकांनी डिव्होर्सच करावेत असं माझं म्हणणं नाही आहे. पण केले तर बरे करावेत हा मुद्दा आहे. काही महिन्यांपूर्वी, बिल गेट्स आणि मिलिंडा गेट्सनी दही हंडी खेळली. त्यांनी गेल्या सत्तावीस वर्षात जे थर रचले, यंदा त्यावर चढून घट फोडला. ते म्हणाले, "व्यक्ती म्हणून आपल्याला जसं वाढायचं आहे, तसं आता एकत्र वाढत येत नाहीए. मग वेगळं होऊन प्रयत्न करू. मार्ग अवघड आहे, म्हणून आम्हाला आमचा आमचा शोधू द्या." अशा आशयाचा एक संदेश त्यांनी ट्विटरवर टाकला. बिल आणि मेलिंडाने सुरु केलेलं फाऊंडेशन ते अजूनही एकत्रच सांभाळतील हेही त्यात नमूद केलं.

देखा? ऐसे भी कर सकते है! विचार करून. शंतीत. शिस्तीत. खरं सांगायचं तर ही बातमी वाचून जरा कसंस झालेलं पण पुढे वाचून विंडोज टेन बघून कसं अचानक बरं वाटलं तसं बरं वाटलं. करत असतील की लोकं खरंच समजून सावरून. आपल्याच डोळ्यांवर चष्मा असेल तर.

असो.
हॅपी दही हंडी म्हणायचं होतं खरं तर. पण आता गणपती बाप्पा मोरया.

Tuesday, June 07, 2022

My rant is nobody's business

I want to write a biography... A biography of nobody. A nobody who's all around us but camouflaged. We are poor at acknowledging these nobodies. But if you look closely, I feel, mostly we are all the same nobodies. I want to write a biography to celebrate this nobodyhood.


Maybe we are more fond of Gandhis, Jobs, Hitlers or Tendulkars. But there was only one Gandhi, one Jobs, one Hitler or one Tendulkar. That's it. Rest are the nobodies who are there to get defocused from the picture. Sometimes I feel that the world would be very boring, if it was filled with plenty of Gandhis or lots of Jobs or more of Hitlers or ton of Tendulkars? But thanks to the nobodies, the world is far from boring. It's way more buzzing than it should be.


Despite this, we are obsessed with the concept of One Hero. If that wasn't enough, we also invent The Villain. And then we celebrate the herohood. I wonder how the aspiration of becoming the Hero or finding the Hero became a socially acceptable and popular goal. Some days I find this superhero craving burdensome. What if... I don't want to be a superhero. What if... I don't want anything grandeur. How about, instead of dreaming about being a Gandhi, we simply try not to be a Hitler? Isn't that a way more sensible and achievable goal? I feel that it's a way better middle-ground. Because if so, then most of us have already won. Rest of the life is not a race anymore to be somebody but it's more about celebrating who we already are. Celebrating the nobodyhood. Just writing this is so refreshing!


One old chap once said to me, "why get so fussed about problems? Just like how you cry out loud to accept your own imperfections, how about we accept these as the imperfections of society. We didn't create problems overnight. It took time for us. Your smartass generation will take a little more time and invent new problems for next generation. So until the new ones are invented, live with the ones you have. When the new ones would emerge, the one bothering you right now would disappear. and trust me you'd miss them. We don't need heroes. We just need time." Some of the days, I totally agree with him. And then I wonder how about a story of nobody who is not a problem solver but a problem-co-exister... if there is a word like that.


So... I need a story of a nobody who hardly has anything and it's all okay. There is no massiah coming. There was no massiah ever. Not in personal life. Not on a world stage. A story where we are all melting ice-creams. We are taught to dream of becoming an iceberg. But seldom we notice that the icebergs are melting too. In hindsight, when we manage to keep this dreaming business aside, we also realise that we carry a flavour. Over the period of time, but much before we are super-old, we learn that there is fun in enjoying this very own flavour too... and we learn to cherish the joy when we mixed with the neighbouring flavour and occasionally made sundaes. A story that tells me that that's all what there is.


In sum, I want to read a story of nobody which is not spectacular in a popular sense, but it tells me how some nobody navigated thru the tiny miniscule day to day challenges which seemed like a world war more often than not! I think I will relate to that. And if you look carefully, there are so many nobodies who win that war, every freaking day and go back to being nobody as if nothing happened and get ready for the next day to fight it all over again, even if it looked like being stuck in a Groundhog's Day. In a grand scheme of things, I find this part way more spectacular. Imagine this... whatever the drama that maybe unfolding on the inside or outside, these nobodies get up every day, lay the brick. Get up next day, lay the brick. and keep doing it. They did it when we were turning from apes to humans, they did it when hunters were becoming farmers and causing a chaos, they did it when some dudes were going crazy to conquer the world, they did it when the world was playing war-war, and they are doing it now. Just laying the brick. Nothing grand. One brick at a time. One day at a time. That's the mantra.


You see, these nobodies make the whole world proud. Nobodies actually make up this whole world. Nobodies run the world. While writing this post, I looked around to notice the people whom I'd generally fail to notice. There's a bus driver, a postman, a gym instructor, a traffic police, parents, security guards, the folks incessantly swiping up or down or right or left. The guy coding for a unicorn, an investment banker, teacher, artist sketching in a tiny book. They are all nobodies. Nobodies... Most of whome may hardly crave for being the topper in their class. Nobodies.. who are perfectly awesomely average. Nobodies... made out of the same flesh n blood. Nobodies... who get affected by rain, heat, storm, virus, food, etc, etc, etc, and etc. Nobodies who are hardly perfect. Nobodies.. who laugh, cry, outrage all at the same time. nobodies... Who are generally on track.


Irony with these nobodies is that they might get only one or two things right in their whole lifetime. Some of them will know that's good enough. and some of them will run behind finding what is good enough. I think this should be taught in the schools too. On the side of showing pictures of somebody and asking children to get motivated and get inspired, one should also tell them that... these somebodies were one in a million. They can consume them some times when they must. But they don't end up doing an overdose. Just like how news can be depressing, over-inspiration can be depressing.


I think that the pursuit of winning the world cup, winning the match, being the topper is injurious to nobodyhood. It's unreal and unnecessary. If there is only one topper, then who are rest of them? Why create a format where there is one person who has a possibility of being happy? How sadist is that! Instead, how about we tell the kids in school, "You all will get to do some shit. Whatever you get to do, do it right. That's it. That's your bloody job. If you all do it, the world will be a much better place. There is no topper and there is no loser. You get what you all are... not what you alone are. Look around you. The grocery store, the train station, the book shop, the construction site, the science labs, offices, the banks. These are nobodies who work here. I doubt how many of them dreamed of doing exactly what they're doing right now as a job. But they are mostly doing their job alright. That keeps our world ticking. These are micro-inspirations. These are real and relatable inspirations. You need them like the healthy diet that you need every day. Learn absorbing these micro-inspirations. There are no books about these nobodies. These nobodies are books in themselves. Learn to read them. Go talk to them. That's all you need."

Monday, April 11, 2022

अलविदा

"hey.... तू...?" मागून आवाज आला. चेहरा नक्की म्हणजे नक्की ओळखीचा होता... मी हिच्याशी बोललोय हेही आठवत होतं... पण लिंक लागत नव्हती.
"Looks like... Same me..." हे म्हणता म्हणता हातातल्या केकची आणि माझी लिंक तुटली.
"What are the odds?" ती म्हणाली. मला थोडं आठवलं. तब्बल दोन वर्षाआधी भेट झालेली आमची.
"Yup... What... Are... The... Odds?" मी केक उचलायचा निष्फळ प्रयत्न करून उभा राहिलेलो. "पण बघ न आजूबाजूला. केवढे लोक आहेत. याचे तरी कुठं ऑड्स होते?" असं म्हणत सवयीप्रमाणे खिशातून मास्क काढला. पण मग घालायचा की नाही यामुळं जरा ऑकवर्ड होत परत ठेवला.
"कोरोनाचं वेगळं आहे बाबा. त्याला आपलंसं करणारच होतो की आपण. मग ये तो होनाही था." तिच्याकडे मास्क वगैरे नव्हता. किंवा माझ्यासारखा बाहेर तरी काढलेला नव्हता.
"So much inclusivity... नाही का...? हेच ते अतिथी देवो भव... हीच ती संस्कृती... 🙂" आता जवळपास मागे काय बोललो होतो ते अजून जरा आठवलं. तशीही केव्हढी धावती भेट होती ती. म्हणजे ती धावत होती, आणि मी धावायचं की नाही या विचारात होतो.
"कोरोनाला धर्म नाही न कुठला. मग सोपं जात असावं आपलंसं करायला. 😉" असं म्हणून तिनं डोळा मिचकावला आणि खुर्ची ओढून घेतली.
"अर्र... लै च लोडेड केलंस की हे सुरुवातीलाच? इतक्या दिवसांनी भेट झालीय. थोडं वॉर्म अप करूया? मग धार्मिक, वैश्विक, जागतिक आणि कॉस्मिक बोलू. काय?", मी विषयातून काढता पाय घेत घेत खाली पायात पडलेल्या केककडे शेवटचं पाहिलं.
"सॉरी. माझा धार्मिक, वैश्विक किंवा जागतिक अशा कशावरच बोलायचा विचार नाही आहे. आणि कॉस्मिक कशाशी खातात तेही माहिती नाही. आणि होय रे... आपण परत भेटायचा स्कोप नव्हता हाच तर आपल्यातला चार्म होता की नई. आता मग...", ती.
"बघ आता भेटलो तर आहोत. म्हणालीस तर पलिकडच्या टेबलावर जाऊन बसतो. जाऊ का?" मी.
"Of course you can. But do you want to?" ती.
"अजिबात नाही. परत न भेटण्याच्या बोलीवर भेटत असू तर डीप डार्क सिक्रेट, कीलेका रहस्य, नाहीतर खजानेका पता, काहीतरी सांगशील न? ते का सोडू?"
"आत्ता मी आल्या आल्या केक कसा सोडलास, तसं दे सोडून. स्वाहा"
"सोडला काय... पडला तो हातातून. आता त्या केकसाठी तरी, I should stay for some more time. नई का?"
"माझा अजिबात आग्रह नाही आहे पण I can imagine. I have that effect on people."
"There you go. हा वॉर्म अप हवा होता. आता बोल. काय फ्रेश? तू इथेच कुठे राहतेस? आपण इथेच भेटलेलो का मागे?" मी.
"नाही आठवत. पण तू रोड ट्रीप करणार होतास. केलीस का?" ती.
"केली न. And I'm so glad I did when I did it. त्या नंतर कोरोना आणि मग आता युद्ध. त्यामुळे, रोड ट्रीप... आणि रशिया .. हे दोनही आता डेंजरस आहेत!" मी.
"म्हणजे रशिया डेंजरस आहे असं म्हणणाऱ्यांपैकी आहेस तर तू.", ती.
"युक्रेनच्या लोकांबद्दल वाईट वाटणाऱ्या पैकी आहे. हा पर्याय आहे का तुमच्याकडे?" मी
"नाही. हा पर्याय नाही. आम्हाला कोंबड्या झुंजवायचेत. त्यात तिसरी बाजू नसते!" ती.
"तुमच्या कोंबड्या छपरी आहेत मग. बाकी तुझा हा अवतार मागच्या भेटीपेक्षा केवढा वेगळा आहे!" हलकं फुलकं असा पर्यायच नव्हता आज मॅडम कडे.
"माझा अवतार समजायला, भेटलाच केवढास्सा वेळ होतास मागच्या वेळी?" ती.
"तरीही तेव्हाही तुझीच कॅसेट सुरू होती." मी.
"Maybe you're a good listener" ती.
"Or I'm bad at expressing" मी.
"I was trying to be nice. पण ठीके. We will go with what you say. You're bad at expressing." ती.
"आत्तपण फार वेळ नाहीचे. तू आली नसतीस तर निघणारच होतो." मी.
"I like that." ती.
"Like what?" मी.
"छोट्या भेटी. लोड नाही येत मग." ती.
"हे ही आहे का? लोड पण येतो का तुला?" मी.
"I don't think I can entertain anyone longer. त्यामुळं झटपट भेटायचं, निघायचं. सगळेच खुश. Just one coffee stand."
"कोणाला एन्टरटेन करणं ही तुझी जबाबदारी थोडीच आहे? Look what I did to the cake. सगळे आपापलं एन्टरटेन करून घेत असतात."
"मे बी. पण ऑकवर्ड होतं मला जास्ती वेळ बसलं की"
"मागे जेव्हा भेटलेलो तेव्हा पण असाच लोड घेतलेलास का?"
"क्या पता?"
"Maybe I have that effect on people."
"Yeah.. right. Why not? आधी केक सांभाळा."
"सॉरी शक्तिमान. आता थोडाच वेळ आहे. तू सांग डीप डार्क सिक्रेट. परत तर आपण भेटणार नाहीच आहोत. तर मग कर सुरू."
"Yeah. Right. तर मग ये सूनो. सध्या हे आहे डोक्यात. आत्ता या इथून बाहेर पडलं की मला कोणीतरी भेटायला हवं. आणि मग I offer a tour of this city!" यावर, 'म्हणजे airbnb का रे भाऊ?' असं विचारायचं मनात आलं क्षणभर.
"What's deep dark in that?" मी
"Except that I don't want to do that."
आता लंबा ये लंबा खिंचने वाला है असं वाटून मी तिच्यासाठी पण काहीतरी ऑर्डर करूया का असं हातानं सुचवायचा प्रयत्न केला. पण तिनंही नको अशी खूण केली आणि बोलणं पुढं सुरू ठेवलं.
"हा... म्हणजे मला वाटतं की बोरींग पण होऊ शकेल न."
"मे बी. तू काय काय दाखवणार त्यावर अवलंबून न"
"हा आत्ता आपण बसलोय हा कॅफे दाखवेन."
"हा छान आहे की."
"Most of the times... Yes."
"आणि काय दाखवशील?"
"ॲक्च्युअली मी जिथे जिथे बसून काम केलं ते सगळेच कॅफे दाखवेन."
"काम करून पण दाखव. How about that?"
"Not bad n?"
"मी मजेत म्हणालो ग... पण ठीके..."
"सिरीयसली. गेले दोन वर्ष आता आपापलं एकेकटं तर काम केलं. पण न मला कायम हवं होतं कोणीतरी मला हळूच बघत असायला. मे बी दोन कॅफे दाखवून, तिसऱ्या मध्ये बसवून ठेवेन. आणि थोडं काम पण उरकून घेईन."
"बरोबर आहे. सुट्टी पण नको पडायला. आणि तू जशी आहेस तशी दिसशील. गीता... जशी आहे तशी. नाव काये by the way तुझं? गीता च नाही न?"
"नाही. गीता नाही."
"मग पपीता."
"चालेल. पपीता."
"मग आगे बोलो पपीता."
"तर मग मला आवडलेल्या खूप जागा आहेत या शहरातल्या. मला आठवत पण नाहीत खूपदा. पण काही ठिकाणी गेलं न की आठवतं मी मागे इथे येऊन छान वाटलेल."
"याला absent minded म्हणतात. किंवा माझी आज्जी याला धांदरट पण म्हणायची"
"असेल. पण होतं की असं. आपण लोकांच्यात इतकं हरवून जातो की कधी कधी जागा विसरून जातात. मग लोक ओसरले की जागा आठवतात."
"Actualy माझ्याही खास जागा आहेत. पण माझ्या मोस्टली नदी काठच्या आहेत."
"मलाही आवडतात. नदीकाठी बेंचेस असतात न. I connect with them. मी तिथे घेऊन जाईन. नदीचा आवाज ऐकवेन."
"ज्जे बात. मला ट्रेन मधून बाहेर पडताना लोकांच्या पावलांचा खडाक खडाक आवाज होतो न, तो आवडतो. मी तर एकदा रेकॉर्ड करून ठेवायचा प्रयत्न पण केलेला."
"मलाही ट्रेन आवडतात. म्हणजे हे जे ट्रेन दररोजच्या दिवसातला अविभाज्य भाग आहे न... ते आवडतं. It's like part of me. मी ट्रेन ने घेऊन जाईन. ट्रेन स्टेशन मधले शॉर्ट कट सांगेन. मग कधी बोटीने घेऊन जाईन. मग सायकलने घेऊन जाईन. स्कूटरने घेऊन जाईन."
"होय की.. पण कुठे घेऊन जाईन? की असच पब्लिक transport ची सहल?"
"कुठे असं नाही. पण जाईन असच घेऊन. मला जे जे जस जस फिल झालं न..."
"ते फिल करवणार?"
"नाही. मला जे जे जस जस फिल झालं न... ते मला परत फिल करायचय... पण जस्ट दॅट कोणीतरी सोबत असताना."
"ओह... हाऊ डीप!"
"डीप काही नाही .. कदाचित थोडं स्वार्थी आहे."
"तू तरी कुठं हे सगळं लोक कल्याणकारक करायच्या हेतून करत होतीस?"
"नाही. पण तरीही."
"पण... What's deep dark in that?"
"पण मे बी मला हे नाही पण करायचंय."
"That's twisted. Why not?"
"Maybe I like more to live with this thought that I'd do it with someone someday. And it'll be amazing. And if I do it then I won't have that amazing thought anymore. And if it doesn't turn out to be as good then even worse."
"You have me right here."
"And?" तू असल्याचं लोणचं घालू? असं म्हणायचं असावं तिला...
"नाही सोड. अँड काही नाही." मी
"I know what you meant." Of course she didn't.
"No. I didn't mean that at all." कारण साहजिकच I thought I knew what she thought what I thought.
"Mean what?" असं म्हणून तिनं इथेच कर हा सूर्य आणि हा जयद्रथ असं सांगितलं. पण नेकी कर दरिया में डाल असं झाल्याच्या आविर्भावात मी ही फुरफुररलो.
"मी जे केलं त्याला being kind म्हणतात. पण तू being human च्या ऐवजी being jerk च्या मार्गावर आहेस म्हणून सोड म्हणालो."
"यू आर वेलकम." परत भेटायचं नाहीचे असा प्रीमाईस असला तर आगाऊ सौजन्याचा आग्रह कधीच गाळून पडतो. नै?
"तुझ्या मनात आहे कोणीतरी... ज्याला तुला गाव भटकायला घेऊन जायचं आहे."
"Not only THIS city. All the cities I've ever been to."
"Okay.. that's like super long plan."
"घडला तर सुपर लाँग न... नाहीच घडला तर हा इथे डोक्यात इत्तुसा तर आहे"
"So.. you've someone in your mind."
"आहे पण आणि नाही पण"
"म्हणजे जिसको सोच के प्लान बनाया वो अब इस दुनिया में नही है असं आहे का?"
"नाही.. मगर वो अब वो नही... मैं भी अब मैं नहीं. असं आहे."
"रवीना तुम रवीना नही... करिश्मा तुम करिश्मा नही. असं आहे तर..."
"आज के लिये, ये इतना ही मेरे अंजान दोस्त. दुवा में याद रखना" असं म्हणून ती निघण्यासाठी सरसावली. काहीतरी आठवलं तिला कदाचित. मलाही उशीर झालाच होता.
"Wait... And THIS was your deep n dark?
"That's MINE... That's it. डीप डार्क काय लावलायस मागास पासून?"
"ये लो करलो बात! त्या धारातीर्थी पडलेल्या केक साठी तरी थोडं स्पायसी काहीतरी हवं होतं न."
"I told you, I'm not a kind person anyway. Being jerk म्हणालास की मगाशी"
"परत कधी भेटणार?"
"Only if I could tell the future"
"By the way, is this your "keeping the loyalty cards" phase or "throwing away the cards" phase?
"So you do remember what I said last time."
"You also remembered my trip. Didn't you?"
"इसी बात पर अलविदा..."
"अलविदा."

Saturday, February 19, 2022

MODI JOINING CONGRESS... FROM MIDNIGHT!

(सत्य घटनेवर आधारित)

सकाळी उठलो आणि ही एकच बातमी सगळीकडे.
 
इंस्टाग्राम रिल्स, व्हॉट्सॲप स्टेटस, फेसबुक, ट्विटर, आणि एवढंच काय तर, रेडीट आणि डिस्कॉर्ड वर सुद्धा एकच काय तो गोंधळ उडालेला. खग्रास सूर्यग्रहण लागलं की पक्षी कसे अंधाधुंद होतात, तो प्रकार माणसांचा झाला होता. कोणाला सुधरत नव्हतं की ही बातमी कशी पचवायची? कशासोबत पचवायची? निवडणुका तोंडावर आहेत, देश आत्ता कुठं कोरोना मधून बाहेर निघतोय, आणि आत्ता तर हिजाब सारखा हिट्ट विषय सुरू आहे, आणि ते सगळं बाजूला सोडून हे काय नवीन? अशी प्रतिक्रिया बऱ्याच लोकांच्या मनात आली. काहींनी प्रसार माध्यमांनी गुडघ्याला बाशिंग बांधलंय म्हणून टीका केली. २००१ ला नाही का, एकाच वेळी गदर आणि लगान रिलीज केलेला. लोकं म्हणाली, तसं केलंय हे. उगाच जमतंय म्हणून ज्यादाची काय शिप्पारस! जरा दम धरायचा न? काहींना वाटलं की प्रसार माध्यमांना नेटफ्लिक्सची स्पर्धा झेपत नाही आहे. म्हणून आता ही असली पिल्लं सोडतायत.

पण थोड्याच वेळात कळलं की, प्रसार माध्यमं सुद्धा तेवढीच गोंधळली आहेत. हा मास्टर स्ट्रोक खरोखरच पंतप्रधानांकडून आलेला... तोही रात्री आठ वाजताच्या ब्राह्म मुहूर्तावर... आणि तेही ट्विटर सारख्या जागृत देवस्थानी!
मित्रों... मी आता आज रात्री बारा पासून काँग्रेस मध्ये! काल मी लोकसभेत जे जे काँग्रेस विरोधी बोललो, त्याचा मला इतका पश्चाताप होतोय की आता मी स्वतःला काँग्रेसमध्ये झोकून देणार आहे.

शहांचा तेव्हा सोशल मीडिया डिटॉक्स सुरु होता म्हणून त्यांना ही बातमी थेट सकाळीच समजली. एका रात्रीत एवढं होईल अशी त्यांनाही कल्पना नव्हती. आता पुलाखालून खूप पाणी गेलेलं होतं. "सठिया गया है बुड्ढा" असं म्हणालं तर UAPA लागेल, देशाचा अवमान होईल, की धर्मभ्रष्ठ होईल हे न कळल्याने भाजपाच्या बऱ्याच कार्यकर्त्यांनी आवरतं घेतलं. निवडणुकांत उमेदवार पळवतात ईथपत ठीक होतं. पण पंतप्रधानच पळवला? हे कसं काय? तेही शहा सहेबांच्याकडून!

प्रसंगावधान साधून, शहांनी आधी योगींना फोन लावला. म्हणाले, "तुम्ही तुमची निवडणूक सोडू नका. आम्ही पंतप्रधानपदाचं बघून घेतो". योगी म्हणाले, "त्यापेक्षा तुम्हीच व्हा मुख्यमंत्री. मी पंतप्रधानपदाचं बघून घेतो." कोणी योगींना पळवून नेईल का असं शहांचं झालं!

पलीकडे केजरीवालनी यशराज मुखाटेला आपल्या गेल्या दहा वर्षातील "ये सब मिले हुए है जी!" म्हणालेल्या वाक्यांचा मॅश-अप बनवायला सांगितला. यशराज मुखाटे "स्वीट आतंकवादी" घेऊन काही जमतंय का बघत होता. त्यालापण एका रात्रीत इतकं मटेरियल मिळायची अपेक्षा नव्हती.

डोळ्यात पाणी आणून मोदींना सहकार्य करा रे, असे व्हिडीओ बनवलेल्या लोकांना रायटर्स ब्लॉक आला. आय-टी सेल मध्ये दी ग्रेट रेसिग्नेशनची लाट पोचली. इकडच्या सेल मधले तिकडे आणि तिकडचे इकडे जाऊया असा विचार करायला लागले.

हसावं की रडावं, चिडावं की खुश व्हावं, कशाचं काही सुधरेना. डिबेट्स मध्ये कोणाला बोलवायचं, आणि कोणाला झाकायचं याच गणित सुटेना. स्टॅन्ड-अप करणाऱ्या लोकांना वाटलं आता आपलं दुकान बंद!! आता जोक कोणावर करणार? अर्धे लोक तर डिप्रेशन मध्ये गेले. वीर दास म्हणाला, मी तर सांगत होतो, there is a gigantic joke which is not funny. मुनावर ने आधीच सांगितलं, हा जोक मी केलेला नाही! एआयबी ला नवीन रोस्टची आयडिया आली म्हणून त्यांनी लगेच प्रोव्हिजनल बेल घेऊन टाकली. कुणाल कामारा ने सियाचीनमे जवान लढ रहे है, त्यांचं काय? म्हणून प्रश्न विचारला. त्याला इंसेन्सिटिव्ह म्हणून परत विमान कंपन्यांनी बॅन केला. "ऐसी तैसी डेमॉक्रसी" वाल्यांनी आपलं गाणं राष्ट्रगीत करा म्हणून आग्रह धरला. आमिर खान यावर कशावरच काही बोलला नाही, म्हणून त्याला अँटी-नॅशनल घोषित करण्यात आलं. जावेद अख्तरनी यावर काहीतरी प्रतिक्रिया दिली म्हणून त्यांना बॅन करण्यात आलं. अर्णब (व्हॉट्सॲप वर) म्हणाला, "स्क्रू दी नेशन, हाऊ कम आय डीडंट नो?" पतंजलीने वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन प्रमाणित "मोदी-वापसी काढा" काढला. पण हा प्यायचा कोणी हे ठरेना. या बाबाच्या कुठल्याही बाबीशी आमचा संबंध नाही असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ने परत जाहीर केलं. हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं वागणं कसं अँटी नॅशनल आहे हे सांगायला स्वास्थ्य मंत्री पुढं सरसावले. पण नंतर आपण आता मंत्री नाही याची त्यांना आठवण झाली. क्वांटम, मोलेक्यूलर, का‌‌ॅस्मीक हे शब्दभांडार वापरून सद्गुरूंनी सुरू असलेल्या गोष्टीचं विश्लेषण करायचा प्रयत्न केला आणि शेवटी योगा से होगा यावर सांगता केली.

अमिश, रजत, अमन, सुधीर, राहुल, नाविका या सगळ्यांनी तातडीची बैठक बोलावली. हिंदू-मुस्लिम, पाकिस्तान का हाथ, एलियन्स, ड्रग्स, नेहरू, गांधी, वो सत्तर साल यातलं काही थीम बरोबर जातंय का बघितलं. आज संस्कृती, सिस्टीम, जिहाद, किंवा असे कोणते शब्द वापरायचे, बंब कुठल्या सोमेश्वरी न्यायचा याचे काहीच निर्देश न आल्याने, त्यांनाही दिशाहीन वाटत होतं. आज स्वतः स्वतः विचार करायचा म्हणजे जरा आऊट ऑफ सिलॅबस असल्यासारखं झालेलं. आपण स्क्रिप्ट रायटरना बोलवायचं का? असंही कोणीतरी मत मांडलं. पण मग स्क्रिप्ट रायटरना पैसे द्यावे लागतील आणि ते आपल्या संस्कृतीमध्ये बसत नाही, म्हणून त्यांनी सोडून दिलं.

मी पण डोळे घट्ट मिटून घेतले. आजच्या ईस रात को सुबह नकोच अशी मनोमन प्रार्थना करत आता पुढे काय होणारे बघायचा प्रयत्न केला. एव्हाना मलाही कळलेलं की आता कुठल्याही क्षणी मला जाग येणार आणि हे अर्धवट राहणार आहे सगळं! माझ्या स्वप्न टिकवण्याच्या प्रयत्नांत स्टोरीची लिंक तुटली. (स्वप्नं फास्ट फॉरवर्ड करून बघता यायला हवी होती नई?)

आता राहुल गांधी यांची शुद्ध हरपली याची बातमी सुरू होती. मोदीजी काँग्रेस मध्ये आले म्हणजे आपण जिंकलो की आपली रिटायरमेंट आली, याचा काही पत्ता लागेना. शशी थरूरांनी काहीतरी ट्विट केलं, लोकांनी डिक्शनऱ्या पालथ्या घातल्या पण शब्दांचा अर्थ लागेना. इथे "सठिया गया है बुड्ढा" असं म्हणायला कोणाची भीती नव्हती. म्हणून कोणी आपले २८० अक्षरं त्यावर खर्चावी असा विचारही केला नाही. फ्रीडम ऑफ स्पीच आहे बब्बा याची परत एकदा जाणीव करून दिली.

ललित मोदीनी आयपीएलच्या नव्या फॉरमॅटची कल्पना पुढे ठेवली. दर निवडणुकीला खुले आम पैसे देऊनच आपण नेते मंडळी विकत का घेऊ नयेत असा प्रस्ताव मांडला? काँग्रेस, बिजेपी, आप, सपा आणि काय जे कोणी असतील ते, त्यांनी आपापले अंबानी, अदानी, टाटा, बिर्ला वगैरे आपापले स्पॉन्सर निवडायचे, प्रत्येकाने आपापल्या टीम बनवायच्या आणि बोली लावायची. प्रत्येक टीमचे चार लोक चार वर्ष फिक्स. बाकी लोक येऊन जाऊन! त्यानिमित्ताने पैशावर टॅक्स लावता येईल, आणि प्रत्येक नेत्याला आपली किंमत वाढवण्यासाठी सतत कामही करत राहावं लागेल. खऱ्या अर्थाने ब्लॅक मनी व्हाईट होईल. तेही डीमॉनेटायजेशन न करता. आणि शेवटी धोनी चेन्नई कडून खेळला काय आणि पुण्याकडून खेळला काय, शेवटी आहे धोनीच न? मग मोदी काँग्रेसकडे गेले म्हणून फरक पडतोच कुठे? या प्रकारामुळे केवढा ताण कमी होईल. आज एकाला शिव्या घातल्या तर उद्या प्रेमाने मिठी मारताना अवघडल्या सारखे होणार नाही. पण तेवढ्यात नरेंद्र मोदी, नीरव मोदी आणि ललित मोदी हे अमर अकबर अँथनी सारखे बिछडे हुई भाऊच असल्याचा फॉरवर्ड आला आणि आय-टी सेल परत कार्यरत होतोय यांची चाहूल सगळ्यांना लागली! 

मोदीजींचा पहिला ट्वीट बघून ट्विटरने त्यांचं अकाउंट आपोआप काही काळ सस्पेंड केलेलं. ट्विटरच्या अल्गोरिदमला सुद्धा ते झेपलं नव्हतं. पण नंतर काही काळानंतर त्यांनी अकाउंट परत सुरु केलं आणि बाकीचे ट्विट आले. आता खरी मन की बात कळणार होती.

आणि झोप उडालीच हो.